विल्किन्सन, सर जिऑफ्री : (१४ जुलै १९२१ – ). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी कार्बनी-धातू संयुगांविषयी महत्त्वाचे संशोधन केले असून असेच संशोधन ⇨एर्न्स्ट ओटो फिशर या जर्मन रसायनशास्त्रज्ञांनीही केले होते. या संशोधनाकरिता या दोघांना १९७३ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिके विभागून देण्यात आले होते. या दोघांच्या संशोधनामुळे संक्रमणी [२१ ते ३०, ३९ ते ४८, ५७ ते ८० आणि ८९ ते १०३ हे अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या ) असलेल्या व ज्यांच्या उपकक्षेत अपेक्षेपेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात अशा ⟶ आवर्त सारणी संक्रमणी मूलद्रव्ये] धातूंपासून बनणाऱ्या कार्बनी- धातू संयुगांच्या क्षेत्रात फार मोलाची भर पडली. यातूनच रसायनशास्त्राची संक्रमणी रसायनशास्त्र ही नवी शाखा पुढे आली.

विल्किन्सन यांचा जन्म व शालेय शिक्षण इंग्लं डमधील टॉडमार्डन (यॉर्कशर) येथे झाले. लंडन विद्यापीठातील इंपीरिअल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नो लॉजी अणुऊर्जा प्रकल्पात काम केले, नंतर त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील रॅडएशन लॅबोरेटरीत (१९४६-५०) व मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रसायनशास्त्र विभागात (१९५०-५१) संशोधन केले आणि हार्व्हर्ड विद्यापीठात १९५१-५५ दरम्यान ते सहाप्राध्यापक होते. १९५६ साली ब्रिटनला परतल्यानंतर ते इंपीरिअल कॉलेजात अकार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि १९८८ साली तेथे गुणश्री प्राध्यापक झाले. दरम्यान त्यांनी सर एडवर्ड फ्रँकलँड प्राध्यापक (१९५६-५८) व वरिष्ठ संशोधन फेलो ( १९८८ ) म्हणूनही काम केले.

ज्यांच्यामध्ये दोन समांतर कार्बनी वलयांमध्ये धातूचा अणू सममितपणे (प्रमाणबद्ध रीतीने) अंतःप्रवेशित झालेला (मध्यभागी बसविलेला) असतो, अशा संयुगांना अंतःप्रविष्ठ (सँडविच) संयुगे म्हणतात. अशा प्रकारच्या संयुगांमधील धातू व हायड्रोजन यांच्यातील रासायनिक बंधाविषयी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. ‘विल्किन्सन उत्प्रेरक’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या क्लोरोट्रिस या उत्प्रेरकाचा (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलण्यास मदत करणाऱ्या पदार्थाचा) त्यांचा शोध विशेष महत्त्वाचा आहे. अल्केनांसाठी समांग हायड्रोजनीकरण करताना क्लोरोटिसचा उत्प्रेरक म्हणून उपयोग होतो. अंतःप्रविष्ठ संयुगांवरील त्यांचे संशोधन १९५० साली सुरू झाले आणि १९५१ सालीच त्यांचा यावरील लेख नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. फिशर यांनी क्ष-किरणांच्या मदतीने फेरोसीन स्फटिकांचे निरीक्षण केले तर विल्किन्सन यांनी अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांच्या साहाय्याने वर्णपटवैज्ञानिक संशोधन केले. यामुळे फेरोसीन या संयुगांची वास्तव संरचना निश्चित झाली. विल्किन्सन यांनी स्वतंत्रपणे पुढील निष्कर्ष काढला फेरोसीन या कार्बनी-धातू संयुगाच्या रेणूत दोन सायक्लोपेंटाडाइन (पाच बाजू असलेल्या कार्बनी) वलयांमध्ये लोहाचा अणू अंतःप्रविष्ट आहे (फिशर यांनी या स्फटिकाचे क्ष-किरणांनी निरीक्षण करून या निष्कर्षाला पुष्टी दिली). यामुळे धातू व कार्बनी द्रव्ये एकमेकांस जोडली जाण्याचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला. परिणामी निकेल, कोबाल्ट इ. संक्रमणी धातूयुक्त अनेक कार्बनी  धातू संयुगे बनविण्यात आली. अशा प्रकारे त्यांचे संशोधन व त्यामधून पुढे आलेली कार्बनी-धातू संयुगे कार्बनी व अकार्बनी रसायनशास्त्रांतील संशोधन आणि औद्योगिक उपयोग यांच्या दृष्टींनी महत्त्वाची ठरली आहेत. उदा., पेट्रोलमध्ये प्रत्याघाती [अनिष्ट विस्फोटामुळे एंजिनाच्या सर्व भागांवर पडणाऱ्या ताणांसारखे दुष्परिणाम टाळण्यासाठी मिसळण्यात येणारा ⟶ अंतर्ज्वलन – एंजिन] पदार्थ म्हणून टेट्राएथिल-लेड हे शिसेयुक्त संयुग वापरतात. यामुळे शिसेयुक्त प्रदूषण निर्माण होते. म्हणून शिशाऐवजी वेगळी धातू असलेली संयुगे वापरून प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येऊ शकेल, तसेच अंतःप्रविष्ट संयुगे वापरून मोटारगाडीच्या एंजिनातून बाहेर पडणारी प्रदूषणकारक द्रव्ये पूर्णपणे जाळून टाकणेही शक्य होईल. उत्प्रेरक म्हणूनही या संयुगांचा उपयोग होतो.

विल्किन्सन यांनी ५०० हून जास्त शोधनिबंध लिहिले आहेत. शिवाय एफ्. ए. कॉटन यांच्याबरोबर त्यांनी ॲडव्हान्स्ड इनऑर्‌गॅनिक केमिस्ट्रीबेसिक इनऑर्‌गॅनिक केमिस्ट्री (१९७६) ही दोन पुस्तके लिहिली आहेत.

विल्किन्सन यांना अनेक मानसन्मान मिळाले असून त्यांपैकी काही पुढील होत : जॉन सायमन गुगेनहाइम फेलो (१९५४) रॉयल डॅनिश ॲकॅडेमी ऑफ सायन्स (१९६८), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्स (१९७०), अमेरिकन केमिकल सोसायटी (१९७६) इ. संस्थांचे सदस्यत्व अमेरिकन केमिकल सोसायटीचे पारितोषिके (१९६५), फ्रान्सच्या केमिकल सोसायटीचे लव्हॉयझर पदक (१९६८), ब्रिटिश केमिकल सोसायटीचे लव्हॉयझर पदक (१९६८), ब्रिटिश केमिकल सोसायटीचे संक्रमणी धातुरसायनसास्त्राचे पदक (१९७२), रॉयल पदक (१९८१), हिरोशिमा विज्ञान पदक, पीसा विद्यापाठीचे गॅलिलीओ पदक (१९८३), रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे लाँगस्टाफ पदक (१९८७) तसेच एडिंबर्ग (ग्रानाडा, १९७६), कोलंबिया (१९७८), बाथ (१९८०), एसेक्स या विद्यापीठांच्या सन्माननीय डी. एस्‌सी. पदव्या वगैरे.

ठाकूर, अ. ना.