हरित रसायनशास्त्र : निसर्गाला अपायकारक किंवा घातक ठरणार नाही अशा पद्धतीने रसायने तयार करण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्याची संकल्पना म्हणजे हरित रसायनशास्त्र होय. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. अशा प्रकारे हरित रसायनशास्त्र हे स्वच्छ रसायनशास्त्र किंवा पऱ्यावरणस्नेही रसायनशास्त्र आहे. कारण यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते व प्रदूषणाला प्रतिबंध होतो. हरित रसायनशास्त्र हे रासायनिक संशोधन व अभियांत्रिकी या विषयांशी संबंधित असून यात घातक पदार्थांचा वापर व त्यांची निर्मिती किमान होईल अशी रसायने व रासायनिक प्रक्रिया तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाते. यामुळे हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक, अगदी भौतिकीय आणि जीवरसायनशास्त्र या शाखांनाही लागू पडते. ग्रीन केमिस्ट्री (हरित रसायनशास्त्र) ही संज्ञा पॉल टी. ॲनास्टस यांनी १९९१ मध्ये तयार केली तथापि, ही संकल्पना ट्रेव्होर क्लेट्झयांनी १९७८ मध्ये प्रथम सुचविली, असे मानतात. घातक पदार्थ व धोकादायक परिस्थिती यांच्याशी निगडित असलेल्या प्रक्रियांना पर्यायी ठरणाऱ्या प्रक्रिया रसायनशास्त्रज्ञांनी शोधून काढायला हव्यात, असेक्लेट्झ यांनी आपल्या शोधनिबंधात सुचविले होते.
औषधी द्रव्ये, औषधे, रंगद्रव्ये व रंगलेप, खते, कीटकनाशके, पीडकनाशके, कीडनाशके, तणनाशके, प्लॅस्टिके व बहुवारिके यांसारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झाले आहे. मात्र, अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यांत त्यांच्याबरोबरअनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणांत काही वनस्पती वखाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. रासायनिक विक्रियांत वापरले जाणारे विषारी पदार्थ, विक्रियाकारक आणि विद्रावक यांच्यामुळे प्रदूषणांची समस्या गंभीर व जटिल होत आहे. यामुळे अशा घातक, प्रदूषणकारी पदार्थांची त्यांच्या निर्मितीच्या ठिकाणीच म्हणजे कारखान्यातच निर्मिती होणार नाही याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. यातूनच हरित रसायनशास्त्राची संकल्पना पुढे आली.
युनायटेड स्टेट्स इन्व्हाय्रन्मेंटल प्रोटेक्शन एजन्सीमधील (ईपीए) पॉल टी. ॲनास्टस आणि जॉन सी. वार्नर या दोघांनी हरित रसायनशास्त्राची बारातत्त्वे किंवा मूळ कारणे मांडली (१९९८). त्यांच्यामुळे हरित रसायन-शास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. तसेच व्यावहारिक व्याख्या स्पष्ट होण्यास मदत झाली. ही तत्त्वे व त्यांतील संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत : (१) निर्माण होण्याच्या आधीच टाकाऊ (अपशिष्ट) पदार्थ निर्मितीला प्रतिबंध करणे. कारण ते निर्माण झाल्यास स्वच्छ करावे लागतात वा त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते. (२) कच्च्या मालाचे जास्तीत जास्त प्रमाणात अंतिम पदार्थात परिवर्तन करणाऱ्या प्रक्रिया वा कृत्रिम (संश्लेषण) पद्धती तयार करणे. यांत विद्रावक (विरघळविणारे पदार्थ), विक्रियाकारक इत्यादीही येतात. विद्रावक कमी वापरावेत. (३) मनुष्याला वा पऱ्यावरणाला घातक असणारे पदार्थ कमीत कमी वापरणे किंवा न वापरणे. (४) सुरक्षित व पऱ्या-वरणाच्या दृष्टीने हितकारक द्रव्ये वापरणे. यांमध्ये विद्रावक पदार्थही अपेक्षित आहेत. (५) रसायनांचे उत्पादन करताना कमीत कमी ऊर्जा वापरणे म्हणजे ऊर्जेच्या दृष्टीने कार्यक्षम असलेल्या कमी ऊर्जा वापरणाऱ्या प्रक्रिया तयार करणे. (६) सुरक्षित विद्रावक निवडून ते कमी प्रमाणात वापरणे. (७) गरजेच्या विक्रियाकारकांची अचूक निवड करणे. कृत्रिम पद्धती परिसरीय तापमान आणि दाबाला वापरणे. (८) तांत्रिक दृष्ट्या व व्यावहारिक दृष्ट्या व्यवहार्य असल्यास पुनर्निर्माणक्षम कच्चा माल वापरणे. (९) विक्रियेत सुरक्षा गटांचा वापर टाळणे. (१०) आवश्यक तेथे उत्प्रेरक वापरणे [→ उत्प्रेरण]. (११) विघटनशील पदार्थ वापरणे म्हणजे त्यांच्या क्रियेनंतर ते पर्यावरणात मागे न राहता त्यांचे अविकारी घटकांत विघटन होते. (१२) घातक पदार्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विश्लेषणाच्या पद्धती विकसित करणे आणि कारखान्यांत रासायनिक अपघात (उदा., स्फोट, आग, घातक पदार्थ सोडला जाणे इ.) होणार नाहीत असे संयंत्र उभारणे. अपघातांची शक्यता किमान राहील या उद्देशाने रासायनिक प्रक्रियेत वापरण्यात येणारी द्रव्ये व त्यांचे प्रकार निवडणे. यामुळे विक्रिया सुरक्षितपणे घडते.
प्रदूषण प्रतिबंधक कायदा (अधिनियम) १९९० मध्ये अमेरिकेत तयार करण्यात आला. या अधिनियमामुळे प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी मूळ वा नावीन्यपूर्ण पद्धत पुढे आली. प्रदूषणविषयक समस्या उद्भवण्याच्या आधीच ती टाळण्याचा हेतू या पद्धतीमागे होता. म्हणजे प्रदूषण निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण आणण्याआधीच प्रदूषण निर्माण होणार नाही, यासाठी प्रयोगशाळेत व कारखान्यात प्रयत्न करतात. १९९० अखेरीस ग्रीन केमिस्ट्री इन्स्टिट्यूट (जीसीआय हरित रसायनशास्त्र संस्था) स्थापन झाली. १९९१ मध्ये इन्व्हाय्र्न्मेंटल प्रोटेक्शन एजन्सीचा (ईपीए पर्यावरण वाचवा समितीचा) हेतूही हाच होता. मुख्यत्वे या संस्थेने व अमेरिकन केमिकल सोसायटीने हरित रसायनशास्त्राचे शिक्षण, संशोधन व विकास यांना चालना दिली. २००० सालापासून ग्रीन केमिस्ट्री इन्स्टिट्यूट व अमेरिकन केमिकल सोसायटी या संस्था एकत्रितपणे हरित रसायनशास्त्राशी संबंधित काम करीत आहेत. तसेच १९९६ पासून अमेरिकेद्वारा हरित रसायनशास्त्रात उल्लेखनीय काम करण्यासाठी प्रेसिडेन्शियल ग्रीन चॅलेंज पुरस्कार हा सन्मान दिला जात आहे.
यूरोपात २००७ मध्ये रजिस्ट्रेशन, इव्हॅल्यूएशन, ऑथरायझेशन अँड रिस्ट्रिक्शन ऑफ केमिकल्स [ संक्षेप : आरईएसीएच नोंदणी करणे, मूल्यांकन, अधिकार (स्वामित्व) देणे व निर्बंधित करणे] हा कार्यक्रम सादर झाला. यामुळे आपली उत्पादने सुरक्षित प्रकारची आहेत, हे दर्शविणारी माहिती कंपन्यांनी पुरविणे गरजेचे झाले आहे. या विनिमया-मुळे रसायने वापरण्यातील धोके व जोखमी यांचे मूल्य निर्धारण होतेच शिवाय विशिष्ट पदार्थाच्या वापरावरील बंदी, तसेच निर्बंध वा स्वामित्व यांविषयीचे उपाय योजणे यात अंतर्भूत आहे. या विनिमयाची पूर्तता हेल्सिंकी येथील यूरोपियन केमिकल एजन्सी (ईसीएचए) करते तर यूरोपातील सदस्य राष्ट्रे याची अंमलबजावणी करतात. अमेरिकेतील टॉक्सिक सबस्टन्सेस कंट्रोल ॲक्ट (टीएससीए) या १९७६ सालच्या अधिनियमात तत्त्वतः यांसारख्या तरतुदी आहेत. परंतु, नियामक प्रभावाच्या बाबतीत तो आरईएसीएच च्या तोडीचा नाही.
कॅलिफोर्निया ग्रीन केमिस्ट्री इनिशिएटिव्ह सुरू करताना कॅलिफोर्नि-या राज्याने २९ सप्टेंबर २००८ रोजी हरित रसायनशास्त्राला प्रोत्साहक असे दोन कायदे केले. या कायद्यांवर टीका करताना ॲनास्टस यांचे मत असे की संशोधन, शिक्षण व औद्योगिक प्रलोभने यांना प्रोत्साहन देण्याच्या कामी हे कायदे पुरेसे नाहीत. सार्वत्रिक विरोध झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन नियामक मसूदा तयार करणे गरजेचे होते.
रसायनशास्त्राचे २००५ सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणा-तील विपर्यय (पऱ्यायी) पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने ‘हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढेपडलेले मोठे पाऊल आहे’ असे निवेदन केले होते. यामुळे अधिकचलाख वा खुबीदार उत्पादनाद्वारे घातक टाकाऊ पदार्थांची निर्मिती प्रसंगवशात कमी झाली. मनुष्य, समाज व पर्यावरण यांच्या भल्यासाठी मूलभूत विज्ञान वापरणे किती महत्त्वाचे ठरते, याचे विपर्यय हे उदाहरण आहे. यानंतर विकसित झालेली हरित औषधनिर्माण शास्त्राची संकल्पना यांसारख्या तत्त्वांवरच आधारलेली आहे.
जगातील अनेक ठिकाणी हरित रसायनशास्त्रविषयक अभ्यासक्रम व पदव्या मिळविण्याचे अभ्यासक्रम आहेत. उदा., मॅसॅचूसेट्स (बॉस्टन), मिशिगन व ऑरेगन ही अमेरिकेतील विद्यापीठे. भारतात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे ग्रीन टेक्नॉलॉजीचा (हरित तंत्रविद्येचा) पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. युनायटेड किंग्डममध्ये युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर व इंपीरियल कॉलेज, लंडन येथे हरित रसायनशास्त्रविषयक अभ्यासक्रम आहेत.
प्रयोगशाळेत वापरली जाणारी अनेक रसायने वादग्रस्त असून त्यांना पर्याय शोधले जात आहेत उदा., एथिडियम ब्रोमाइड, झायलीन, पारा वफॉर्माल्डिहाइड. रासायनिक उत्पादनाचा पऱ्यावरणावर होणाऱ्या परिणामांमध्ये विशेषतः विद्रावकांचा मोठा वाटा असतो. म्हणून अशा प्रक्रियांमध्ये सुरुवातीलाच अधिक हरित विद्रावक वापरण्यावर भर दिला जातो. अनेक वैज्ञानिक संस्थांनी हरित रसायनशास्त्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार जाहीर केले आहेत. उदा., रॉयल ऑस्ट्रेलियन केमिकल इन्स्टिट्यूटचे ग्रीन केमिस्ट्री चॅलेंज ॲवॉर्ड्स, कॅनेडियन ग्रीन केमिस्ट्रीमेडल, क्रिस्टल फॅराडे पार्टनरशिपचे (ब्रिटन) ग्रीन केमिकल टेक्नॉलॉजी ॲवॉर्ड्स, प्रेसिडेन्शियल ग्रीन केमिस्ट्री चॅलेंज ॲवॉर्ड्स (अमेरिका) इत्यादी. यांशिवाय इटली व जपान या देशांतील संस्थाही असे पुरस्कार देतात.
रसायननिर्मितीच्या काही पर्यायी म्हणजे हरित पद्धतींची माहिती व त्यांच्यामुळे होणारे लाभ थोडक्यात पुढीलप्रमाणे : (१) थॅलोसायनीनतांबे (II) तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीत उच्च उकळबिंदू असलेले विद्रावक वापरतात. शिवाय या पद्धतीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.मात्र, हिला पऱ्यायी ३, ४ – डायमिथॉक्सी बेंझाल्डिहाइड आणि १-इंडेनोन यांच्यातील विद्रावकहीन अल्डॉल संघननाच्या हरित पद्धतीत उत्प्रेरक व सूक्ष्मतरंगांच्या रूपातील ऊर्जा वापरतात. या पद्धतीत प्रदूषण कमी होते विक्रिया साधी असते तसेच खर्च, ऊर्जा व वेळ यांची बचत होते. ही पद्धती मुख्यतः कारखान्यांत वापरतात.
(२) दोन घनरूप पदार्थांमध्ये विद्रावकाशिवाय रासायनिक विक्रिया घडवून आणणे कठीण असते. मात्र, ॲझोमिथाइन तयार करण्याच्याहरित पद्धतीत अशी विक्रिया घडवून आणली जाते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीत वापरावयाचा टोल्यूइन विद्रावक न वापरता ही विक्रिया होते. परिणामी प्रदूषणाचा धोका टळतो. अणु-काटकसर (ॲटम इकॉनॉमी) साध्य होते (तयार झालेल्या पदार्थातील मूलद्रव्याच्या वजनाला वापरलेल्या सर्व विक्रियकांच्या मूलद्रव्यांच्या वजनाने भागून आलेल्या राशीला १०० ने गुणिले असता अणु-काटकसर मिळते. १००% अणु-काटकसर उत्तम समजली जाते).
(३) बेंझोइन संघननाच्या हरित पद्धतीत सायनाइडाऐवजी थायामीन हा उत्प्रेरक वापरतात. त्यामुळे विषारी व स्फोटक हायड्रोजन सायनाइडतयार होत नाही आणि रासायनिक विक्रिया यशस्वीपणे पूर्ण होते.
(४) बेंझोइनाचे बेंझिलामध्ये ⇨ ऑक्सिडीभवन करण्याच्या पारंपरिक पद्धतीत पिरीडीन हा विषारी पदार्थ वापरतात. तथापि, याच्या हरित पद्धतीत पिरीडिनाऐवजी झिओलाइट-अ तसेच सूक्ष्मतरंगयुक्त गरम पेटी वापरतात. शिवाय या विक्रियेत विद्रावक वापरत नाहीत. या हरित पद्धतीमुळे बेंझोइनाचे बेंझिलामध्ये ऑक्सिडीभवन होताना प्रदूषण होत नाही आणिखर्च व वेळ यांची बचत होते.
(५) पेट्रोल व गॅसोलीन यांसारख्या जीवाश्मरूप इंधनापासून बायोडीझेल (जैव डीझेल) तयार करताना हरितगृह वायुनिर्मिती होऊन प्रदूषण होते. शिवाय ही इंधने संपून जाणारी आहेत. मात्र, पुनःपुन्हा तयार करता येणाऱ्या वनस्पतिज तेलांचे ट्रान्स-एस्टरीकरणाद्वारे हरित पद्धतीने बायोडीझेलमध्ये रूपांतर करता येते. डीझेल एंजिनात जास्त बदल न करता बायोडीझेल सहजपणे वापरता येते. बायोडीझेलाच्या ज्वलनानंतर हवेत गंधक कमी प्रमाणात सोडले जाते. यामुळे अम्लीय पर्जन्य या प्रदूषणाचा धोका कमी होतो.
(६) १-ॲसिल फेरोसीन तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीत अल्किल हॅलाइड, ॲसिल हॅलाइड किंवा ॲसिटिक ॲनहायड्राइड यांच्यातील क्रिया ॲल्युमिनियम क्लोराइड या उत्प्रेरकाच्या साहाय्याने घडवून १, १-डाय-ॲसिटिल फेरोसीन तयार करतात. यात घातक विद्रावक वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अम्ल व ॲल्युमिनियमयुक्त टाकाऊ पदार्थ तयार होतात. हरित पद्धतीत ॲसिटिल क्लोराइडाऐवजी फॉस्फोरिक अम्ल व ॲसिटिक अनहायड्राइड वापरतात. फॉस्फोरिक अम्लामुळे १,१-डाय-ॲसिटिल फेरोसीन मिळण्याची शक्यता कमी होते व दोन्ही उत्पादने वेगळे करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे खर्च कमी होतो. शिवाय अम्ल उपपदार्थ निर्माण न झाल्याने प्रदूषण होत नाही.
(७) आयब्युप्रोफेन हे वेदनाशामक औषध सहा टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा ४०% असतो, म्हणजे ६०% कच्चा माल वापरला न जाता त्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. १९९० सालच्या हरित पद्धतीने हे औषध तीनच टप्प्यांत तयार होते व त्याचाउतारा ७७–९०% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते.
(८) टाकाऊ जैव द्रव्यापासून (उदा., लॅक्टिक अम्लापासून) प्लॅस्टिके व बहुवारिके तयार करणे हे हरित रसायनशास्त्राचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. पॉलिलॅक्टिक अम्ल हे बहुवारिक नैसर्गिक लॅक्टिक अम्लापासून तयार करतात व ते विघटनशील आहे, हा त्याचा महत्त्वाचा उपयुक्तगुणधर्म आहे. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलिलॅक्टिक अम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कापडासाठीचे तंतू इ. बनविण्यासाठी वापरतात.
(९) संगणकाच्या चिप पारंपरिक पद्धतीने बनविताना भरपूर पाणी व ऊर्जा तसेच चिपेच्या वजनाच्या ६३० पट वजनाची रसायने व जीवाश्मइंधन वापरले जाते. हरित पद्धतीने चिप बनविताना या सर्वच गोष्टी तुलनेने अगदी कमी प्रमाणात वापरल्या जातात व त्यांची मोठ्या प्रमाणात बचत होते.
(१०) टेट्राब्युटिल अमोनियम ब्रोमाइड (टीबीएबी) हे उत्प्रेरक ब्रोमिनीकारक म्हणून व काही द्रव्ये तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे हरित रसायन पारंपरिक पद्धतीने तयार करताना ब्रोमीन व हायड्रोजन ब्रोमाइड यांसारखे प्रदूषणकारी पदार्थ वापरतात. मात्र, हरित पद्धतीत असे पदार्थ टाळून प्रदूषणाचा प्रश्न सोडविला जातो.
(११) प्रयोगशाळेत अकार्बनी पदार्थांचे गुणात्मक विश्लेषण करताना परंपरागत पद्धतीत दुर्गंधी येणारा व विषारी हायड्रोजन सल्फाइड हा वायू वापरतात. त्यामुळे प्रदूषण व घातक परिणाम होऊ शकतात. तथापि, हरित रासायनिक पद्धती वापरताना हायड्रोजन सल्फाइड न वापरताही असे विश्लेषण करता येते.
(१२) चहा पावडरच्या मदतीने सोन्याचे सूक्ष्मातीत (नॅनो) कण (१ ते २ नॅनोमीटर आकारमानाचे नॅनोमीटर हा एक मीटर लांबीचा एक अब्जांश भाग असतो) तयार करताना परंपरागत पद्धतीत विषारी कार्बनी विद्रावक आणि थायॉल हे गंधकयुक्त थायमॉल व सोडियम बोरोहायड्राइड हे घातक रसायन वापरतात. शिवाय ही पद्धत गुंतागुंतीची असल्याने तिला अधिक वेळ लागतो. मात्र, हरित पद्धतीत सुरक्षित विद्रावक, प्रदूषण न करणारे क्षपणकारक, पाणी (विद्रावक) व बिनविषारी पदार्थ वापरता येतात. पर्यावरणस्नेही चहा पावडरमध्ये असणाऱ्या पॉलिफिनॉले व इतर वनस्पतिज रसायने यांचा उपयोग चांगले क्षपणकारक [→ क्षपण] म्हणून आणि सोन्याच्या सूक्ष्मातीत कणांचे स्थिरीकरण करणारे घटक म्हणून होतो.
(१३) परंपरागत पद्धतीने डाय-सोडियम इमिनोडाय-ॲसिटेट तयार करताना व हाताळताना काळजी घ्यावे लागणारे हायड्रोजन सायनाइड हे संयुग वापरतात. हरित पद्धतीत हायड्रोजन सायनाइडाऐवजी सोडियम सायनाइड वापरतात. तथापि, ही पद्धत सुरक्षित आहे. कारण यात होणारी हायड्रोजननिरास ही विक्रिया ऊष्माग्राही असून ही हाताळण्यासहीसुरक्षित पद्धत आहे.
वरील प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांचा पऱ्यावरणावर होणारा परिणाम तपासण्यासाठी ई – घटक (इन्व्हायरन्मेंटल फॅक्टर) वापरतात. विक्रियाकारकांच्या वस्तुमानाला उपयुक्त पदार्थांच्या वस्तुमानाने भागिले असता ई – घटक मिळतो. कमी ई- घटक हा पऱ्यावरणाचे अधिक संरक्षण वा जतन आणि कमी खर्च यांचा निदर्शक आहे.
पहा : परिस्थितिविज्ञान; पर्यावरण; प्रदूषण; रसायनशास्त्र; रासायनिक उद्योग; रासायनिक विक्रिया; रासायनिक विश्लेषण; रासायनिक संयुगे; वैश्लेषिक रसायनशास्त्र.
संदर्भ : 1. Anastas, P. T. Warner, J. C. Green Chemistry : Theory and Practice, Oxford, 1998.
2. Cann, M. C. Connelly, M. E. Real World Cases in Green Chemistry, American Chemical Society, 2000.
3. Lempert, R. J. et al, Next Generation Environmental Technologies : Benefits and Barriers, RAND Science and Technology Policy Institute, 2003.
4. Nelson, W. M. Green Solvents for Chemistry : Perspective and Practice, Oxford, 2003.
5. Rogers, R. D. Seddon, K. R. Ionic Liquids : Industrial Applications for Green Chemistry, American Chemical Society, 2000.
नारखेडे, हेमंत प्रभाकर