द्यू व्हीन्यो, हिन्सेंट : (१८ मे १९०१ – ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. १९५५ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म शिकागो येथे झाला. त्यांचे शिक्षण इलिनॉय विद्यापीठ, अर्‌बॅना (बी. एस्. १९२३, एम्. एस्. १९२४) आणि रॉचेस्टर विद्यापीठाची वैद्यकीय शाखा (पीएच्. डी. १९२७) येथे झाले. बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकीन्स विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागात, ड्रेझ्डेन येथील कैसर व्हिल्हेल्म संस्थेत व एडिंबरो विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागात त्यांनी अभ्यास केला. १९२९–३२ या काळात त्यांनी इलिनॉय विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागात व वॉशिंग्टन येथील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागातील जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख (१९३२–३८) आणि नंतर न्यूयॉर्क येथील कॉर्नेल विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.

इन्शुलीन, बायोटिनाच्या संरचनेचे स्पष्टीकरण, मिथिल गटाचे स्थलांतर, ॲमिनो अम्लांचा चयापचय (शरीरात सतत घडणाऱ्या, भौतिक–रासायनिक घडामोडी), पेनिसिलिनाचे संश्लेषण, गंधकयुक्त संयुगांचे जीवरासायनिक दृष्ट्या महत्त्व, ऑक्सिटोसीन व व्हॅसोप्रेसीन या पश्च पोष ग्रंथीतील ⇨ हॉर्मोनांची संरचना ठरविणे व संश्लेषण इत्यादींवर त्यांनी संशोधन केले. ऑक्सिटोसीन व व्हॅसोप्रेसीन या दोन बहुपेप्टाइडी हॉर्मोनांचे संश्लेषण आणि गंधकयुक्त संयुगांचे जीवरासायनिक महत्त्व या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

 

द्यू व्हीन्यो यांना चांडलर पदक (१९५५), विलर्ड गिब्ज पदक (१९५६), निकल्झ पदक, पसानो, हिलेब्रँड, लास्कर, ऑसबर्न-मेंडेल पुरस्कार इ. सन्मान देण्यात आले. न्यूयॉर्क, येल व इलिनॉय या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय ‘डॉक्टरेट’ पदवी दिली. ते एडिंबरो रॉयल सोसायटी, केमिकल सोसायटी (लंडन), रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्री इ. संस्थाचे मानसेवी तसेच सामान्य सभासद आहेत. त्यांनी ए ट्रेल ऑफ रिसर्च इन सल्फर केमिस्ट्री अँड मेटॅबोलिझम अँड रिलेटेड फील्डस (१९५२) हे पुस्तक लिहिले आहे.

कानिटकर, बा. मो.