फ्रिऑन : फ्रिऑन हे मिथेन व एथेन यांच्या फ्ल्युओरीनयुक्त पॉलिहॅलोजन (क्लोरीन, ब्रोमीन, इ. हॅलोजनांचे अनेक अणू समाविष्ट असलेल्या) अनुजातांच्या (एका संयुगापासून बनविलेल्या इतर संयुगांच्या) समूहास अमेरिकेतील द्यू पाँ या कंपनीने दिलेले व्यापारी नाव आहे.

इतिहास : १९२८ च्या सुमारास नवीन प्रशीतनक द्रव्यांचा [→ प्रशीतन] फार जरूरी भासू लागली कारण त्या वेळी वापरण्यात येणाऱ्या प्रशीतनक द्रव्यांमुळे बऱ्याच अडचणी येऊ लागल्या होत्या. त्या दृष्टीने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिजली व मॅक्नेरी यांनी डायक्लोरोडायफ्ल्युओरो मिथेन हे संयुग तयार केले आणि गिनीपिगांवर प्रयोग करून ते विषारी नाही, हे सिद्ध केले. तसेच ते ज्वालाग्राही नाही व प्रशीतनक द्रव्य म्हणून वापरता येईल, हेही दाखविले. या संशोधनामुळे फ्ल्युओरिनाच्या कार्बनी संयुगांच्या (फ्ल्युओरोकार्बनांच्या) उत्पादनास सुरुवात झाली. १९३० मध्ये द्यू पॉं कंपनीने या संयुगाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याकरिता एक नवीन कंपनी सुरू केली आणि १९३१ च्या प्रारंभी CCI, F, (फ्रिऑन–१२ ) व CCI F (फ्रिऑन–११) यांचे व्यापारी उत्पादन सुरू केले. द्यू पाँने ‘फ्रिऑन’ हे व्यापारी नांव व त्याची अंकीय निर्देशन पद्धती यांचे नोंदणी हक मिळविले. तथापि अंकीय निर्देशन पद्धतीचे हक्क जगाच्या वापराकरिता द्यू पाँने सोडून दिले; मात्र ‘फ्रिऑन’ ह्या व्यापारी नावाचा वारसा अद्यापही या कंपनीकडेच आहे.

फ्रिऑन ही संज्ञा द्यू पाँची असली, तरी निरनिराळ्या देशांत या फ्ल्युओरीन संयुगांच्या समूहाला निरनिराळी नावे प्रचलित आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये इतर कंपन्यांची व्यापारी नावे जेनेट्रॉन, आयसोट्रॉन, यूकॉन व कायसर अशी असून इतर देशांतील नावे पुढीलप्रमाणे आहेत : इंग्लंड­–आरक्टॉन, इसेऑन; प. जर्मनी–हेडॉजेन, फ्रिजेन, काल्ट्रॉन; पू. जर्मनी–फ्रिजिडॉन; फ्रान्स–फ्ल्यूजीन, फोरेन, इटली–आल्गोफ्रीन; एदिफ्रेन; रशिया–एस्किमॉन; जपान–डायफ्लो, असहिफ्लॉन इत्यादी.

 रासायनिक सूत्र    रासायनिक नाव    व्यापारी नाव  
 CCl3F  ट्रायक्लोरोफ्ल्युओरोमिथेन  फ्रिऑन–११
 CCl2F2  डायक्लोरोडायफ्ल्युओरोमिथेन  फ्रिऑन–१२
 CClF3  क्लोरोट्रायप्ल्युओरोमिथेन  फ्रिऑन–१३
 CHClF2   क्लोरोडायप्ल्युओरोमिथेन  फ्रिऑन–२२
 CHF3   ट्रायफ्ल्युओरोमिथेन (प्ल्युओरोफॉर्म)  फ्रिऑन–२३
 CClF2· CCl2 F  १, १, २, ट्रायक्लोरो १, २, २, ट्रायफ्ल्युओरोएथेन  फ्रिऑन–११३
 CClF2 . CClF2   १, १, २, डायक्लोरो १, १, २, २ टेट्राफ्ल्युओरोएथेन किंवा सममित  डायक्लोरोटेट्राफ्ल्युओरोएथेन  फ्रिऑन–११४
 CBrF3   ब्रोमोट्रायफ्ल्युओरोमिथेन  फ्रिऑन–१३ बी १
 CBrF2–CBrF2   सममित डायब्रोमोटेट्राफ्ल्युओरोएथेन  फ्रिऑन–११४ बी २
 CClF=CF2   १, १, २ ट्राफ्ल्युओरो २ क्लोरोएथिलीन  फ्रिऑन–१११३

विविध संयुगे : फ्रिऑन समूहातील काही महत्त्वाची संयुगे वरील कोष्टकात दिली आहेत.

अंकीय निर्देशन पद्धती किचकट व लांबलचक रासायनिक नावांऐवजी फ्रिऑनांची बी सुटसुटीत व्यापारी नावे देण्यात आली त्याची पद्धती पुढीलप्रमाणे आहे. उजवीकडील पहिला आकडा (एकंस्थान) फ्रिऑन रेणूतील एकूण फ्ल्युओरीन अणू दर्शवितो. त्याच्या डावीकडील आकडा (दहंस्थान) त्या रेणूतील हायड्रोजन अणू अधिक एक असे दर्शवितो. त्याच्याही अलीकडील (शतंस्थान) आकडा फ्रिऑन रेणूतील कार्बन अणू उणे एक असे दर्शवितो. एक कार्बन अणू असलेल्या संयुगात शतंस्थानात शून्य येते, ते लिहीत नाहीत. फ्रिऑन रेणूत ब्रोमिनाचा अणू असल्यास व्यापारी नावाच्या पुढे बी (B) हे अक्षर व त्यापुढे ब्रोमीन अणूंची संख्या दर्शविणारा आकडा घालतात. असंपृक्त (रासायनिक विक्रियेत आणखी इतर अणूंचा समावेश होऊ शकणारे) संयुग दर्शविण्याकरिता सहस्रस्थानी एक हा आकडा लिहितात. या निर्देशन पद्धतीची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

निर्मिती, गुणधर्म व उपयोग : या संयुगांतील फ्रिऑन–१२ व फ्रिऑन–११ ही संयुगे विशेष महत्त्वाची आहेत. फ्रिऑन–११, १२, १३, २२ व २३ ही तयार करण्यासाठी कार्बन टेट्राक्लोराइड किंवा क्लोरोफॉर्म या स्वस्त व भरपूर उपलब्ध असलेल्या संयुगांचा उपयोग केला जातो. या दोन संयुगांतील क्लोरिनाचे अणू फ्ल्युओरिनाच्या अणूंनी विस्थापित केल्यावर फ्रिऑन तयार होते. या विक्रियेसाठी हायड्रोफ्ल्युओरिक अम्ल (HF) हे विक्रियाकारक व अँटिमनी टेट्राक्लोरोफ्ल्युओराइड (SbCl, F) हा उत्प्रेरक (विक्रियेत स्वतः भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ). वापरतात. हा उत्प्रेरक अँटिमनी पेंटाक्लोराइडावर हायड्रोफ्ल्युओरिक अम्लाच्या विक्रियेने तयार करतात. या विस्थापनामुळे तयार होणाऱ्या फ्रिऑनाचा उकळबिंदू मात्र मूळ संयुगाच्या उकळबिंदूपेक्षा बराच खाली जातो. कार्बन टेट्राक्लोराइड व क्लोरोफॉर्म यांचे उकळबिंदू अनुक्रमे ७६° से. व ६३.५ से. आहेत, तर फ्रिऑन–११ व फ्रिऑन-१२ यांचे उकळबिंदू अनुक्रमे २३.८ से. व -२९° से. असे आहेत.

फ्ल्युओरिनाच्या अणूमुळे क्रिओनाचा रेणू कमालीचा स्थिर होतो. त्यातील सर्व अणू घट्टपणे बंधित झालेले असतात म्हणूनच फ्रिऑनाचे अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) सहजगत्या होऊ शकत नाही. यामुळे फ्रिऑनाचा शरीराला अपाय होत नाही व रासायनिक दृष्ट्याही ते अक्रिय (रासायनिक विक्रियेत सहजपणे भाग न घेणारे) असल्याचे दिसून येते.

फ्रिऑनांमध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म एकत्र आलेले आहेत. कमी उकळबिंदूमुळे फ्रिऑने प्रशीतकामध्ये प्रशीतनक द्रव्ये म्हणून वापरण्यात येतात. फ्रिऑने अत्यंत स्थिर असून ती ज्वालाग्राही नाहीत अगर शरीरास अपायकारक नाहीत. ती बिनविषारी असून त्यांस दुर्गंधी येत नाही. फ्रिऑने रासायनिक दृष्ट्या अक्रिय, उष्णतेला स्थिर आणि उच्च विद्युत् रोधक अशी आहेत. त्याची श्यानता (दाटपणा) व पृष्ठताणही (द्रवाच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ कमीत कमी करण्याची प्रवृत्ती असणारी व पृष्ठाच्या पातळीत कार्यकारी असणारी प्रेरणा) कमी आहेत. फ्रिऑनाचे हवेमधील प्रमाण २०% पर्यंत गेले तरीही ते शरीरास अपायकारक नसते. या सर्व गुणधर्मांमुळे फ्रिऑने केवळ प्रशीतकांतच नव्हे, तर चित्रपटगृहे, आगगाड्या, उपहारगृहे इ. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा वातानुकूलक म्हणून किंवा पाणी थंड करण्यासाठी निर्धास्तपणे वापरता येतात.

फ्रिऑनांचे प्रशीतनाशिवाय इतर अनेक उपयोग आहेत. डीडीटीसारखे कीटकनाशक किंवा अत्तरे, सुवासिक द्रव्ये यांचे फवारे उडविण्याकरिता फ्रिऑन विसरणकारक (रेणू एकमेकांत मिसळविणारा पदार्थ) म्हणून वापरतात. फ्ल्युओरीन वायू तयार करण्यासाठी आणि आग विझविण्यासाठी फ्रिऑनांचा उपयोग होतो. विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) म्हणून तसेच प्लॅस्टिके तयार करण्याच्या प्रक्रियेतही फ्रिऑनांचा वापर केला जातो.

पहा : प्रशीतन; फ्ल्युओरीन.

संदर्भ : 1. Banks, R. E. Flurocarbons and their Derivatives, London, 1964.

2. Jordan, R. C. Priester, G. B. Refrigeration and Air Conditioning, London, 1957.

3. Slesser, C. Schram, S. R., Ed., Preparation, Properties and Technology of Fluorine and Organic Fluoro–Compounds,

New York, 1951.

 पाठक, श. पु.; घाटे, रा. वि.