टिसेलियस, आर्ने व्हिल्हेल्म काउरिन : (१० ऑगस्ट १९०२–   ). स्वीडिश जीवरसायनशास्त्रज्ञ. विद्युत् संचारण (एखाद्या माध्यमात लोंबकळत्या स्थितीत असलेल्या कणांचे विद्युत् क्षेत्राच्या प्रभावाखाली होणारे संचारण) आणि अधिशोषण विश्लेषण (एखाद्या पदार्थाच्या पृष्ठभागावर शोषण करून निरनिराळे द्रव वा घन पदार्थ अलग करण्याची पद्धत) यांसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाकरिता आणि विशेषतः रक्तरसातील (रक्त गोठल्यानंतर अलग होणाऱ्‍या पेशीविरहित द्रवातील) प्रथिनांच्या जटिल स्वरूपासंबंधी त्यांनी लावलेल्या शोधांबद्दल टिसेलियस यांना १९४८ च्या रसायनशास्त्राच्या नोबल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

त्यांचा जन्म स्टॉकहोम येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण अप्साला विद्यापीठात झाले. १९३० मध्ये त्यांनी रसायनशास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळविली. अप्साला विद्यापीठातच त्यांनी टी. स्व्हेड्बॅरी यांचे मदतनीस म्हणून १९२५–३२ या काळात काम केले व १९३०–३८ मध्ये ते रसायनशास्त्राचे व्याख्यातेही होते. १९३४-३५ मध्ये त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स‌्ड स्टडीज या संस्थेत संशोधन केले. १९३७ मध्ये अप्साला विद्यापीठात परत गेल्यावर त्यांना जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापकपद देण्यात आले व त्यांच्या विभागासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली. टिसेलियस यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने जीवरसायनशास्त्रात उपयुक्त असणाऱ्‍या अनेक पद्धतींचा विकास केला व त्यांत सुधारणाही केल्या.

टिसेलियस यांचे सुरुवातीचे कार्य विद्युत् संचारणासंबंधीचे होते. ज्या वेळी मोठे रेणू द्रवात निलंबित (लोंबकळत्या) अवस्थेत असतात त्या वेळी त्यांच्यावर विद्युत् भार असतो आणि विद्युत् क्षेत्राच्या दिशेनुसार त्यांचे मार्गक्रमण चालू होते. या मार्गक्रमणाची गती रेणूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. डॉक्टरेट पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधात त्यांनी प्रथिनांच्या विद्युत् संचारणाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या पद्धतीचे विवरण केले होते. या पद्धतीने पदार्थांचे रेणू अलग करण्याबरोबरच त्यांचे मोजमापही करता येते. या पद्धतीचा उपयोग त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्‍यांनी रक्तरसातील प्रथिनांचा अभ्यास करण्यासाठी, तसेच जीवरसायनशास्त्रातील इतर समस्या सोडविण्यासाठी केला. जीवरसायनशास्त्रात ही पद्धत फार महत्त्वाची ठरली आहे. तथापि काही जैव रेणू या विद्युत् संचारण पद्धतीस नीटसा प्रतिसाद देत नाहीत. याकरिता त्यांनी विवेचक (निवडक) अधिशोषण पद्धत वापरली. या पद्धतीने रेणू शुद्ध अवस्थेत मिळवता येतात. याकरिता ⇨ वर्णलेखन पद्धतीचा त्यांनी विशेष अभ्यास केला. ही पद्धत प्रथिनांच्या विश्लेषणासाठी विशेष करून उपयोगी पडते. टिसेलियस यांनी या क्षेत्रात १९४० पासून संशोधन केले असून ॲमिनो अम्ले, पेप्टाइडे, शर्करा इत्यादींच्या संशोधनासाठी त्यांनी ही पद्धत वापरली.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर टिसेलियस यांनी स्वीडनमधील वैज्ञानिक संशोधनाची पुनर्घटना करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली. ते स्वीडनच्या राष्ट्रीय निसर्गविज्ञान संशोधन मंडळाचे १९४६–५० मध्ये अध्यक्ष होते आणि स्वीडिश कर्करोग संस्थेच्या संशोधन समितीचे १९५१–५५ मध्ये अध्यक्ष होते. तसेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री या संस्थेचे ते अध्यक्ष (१९५१–५५) होते. १९४७ साली ते नोबेल फाउंडेशनचे उपाध्यक्ष व १९६० मध्ये अध्यक्ष झाले. १९४६ पासून त्यांनी रसायनशास्त्राच्या नोबेल समितीवरही सदस्य म्हणून काम केले. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसने १९४९ मध्ये त्यांची परदेशी सदस्य म्हणून निवड केली.

जमदाडे, ज. वि.