मान्ना शर्करा:हिलाच मॅनिटॉल व मॅनाइट ही नावेही आहेत. घटनेत ६ हायड्रॉक्सी (OH) गट असलेल्या (हेक्झॅहायड्रिक) अल्कोहॉल वर्गाचे हे एक संयुग असून याचे रासायनिक सूत्र C6H3(OH)6 असे आहे. D–मॅनोज शर्करेचे ⇨क्षपण केल्यास ही बनते.

 निसर्गामध्ये ही प्लेनट्री, मान्ना ॲश आणि ऑलिव्ह वृक्ष यांच्या निःस्त्रावांत (बाहेर पडणाऱ्या स्त्रावांत) असते. इतर झाडांची फळे, पाने, त्याचप्रमाणे भोपळे, भूछत्रे, शैवाक (दगडफूल) व तपकिरी सागरी तृण यांमध्येही ती आढळते.

 एम्. प्रूस्त यांनी फ्रॅक्सिनस ऑर्नस या वनस्पतीच्या मान्न्यापासून १८०६ मध्ये मान्ना शर्करा वेगळी केली. त्याची विन्यासयुक्त (त्रिमितीय मांडणीला अनुसरून) संरचना [→ काबोहायड्रेटे] पुढीलप्रमाणे आहे. म्हणून याला D-मॅनिटॉल म्हणतात. L- रूपातील मॅनिटॉल निसर्गात आढळत नाही.

हा थोडी गोड चव असलेला, गंधहीन, वर्णहीन व स्फटिकी घन पदार्थ असून त्याचावितळबिंदू १६५º –१६६º सें. उकळबिंदू (३–५ मिमि.दाबास) २९०º–२९५º से. आणि वि. गु. १·५२ आहे. हा पाण्यात विद्राव्य (विरघळणारा), कमी रेणुभाराची अल्कोहॉल व अमाइने यांमध्ये किंचितविद्राव्य आणि इतर कार्बनी विद्रावकांत (विरघळणाऱ्या द्रवांत) जवळजवळ अविद्राव्य (न विरघळणारा) आहे. हा हवेत पाझरत नाही. 

पर्यस्त शर्करेचे (५० टक्के ग्लुकोज व ५० टक्के फ्रुक्टोज असलेल्या साखरेच्या मिश्रणाचे) उत्प्रेरकी (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविण्यास मदत करणारा पदार्थ वापरून केलेल्या) ⇨ हायड्रोजनीकरण केल्याने मॅनिटॉल व सॉबिटॉल यांचे मिश्रण तयार होते व मॅनिटॉल पाण्यात कमी विद्राव्य असल्यामुळे प्रथम बाहेर पडते. ते वेगळे करून शुद्ध करतात. ही पद्धत व्यापारी उत्पादनासाठी वापरली जाते.D-ग्लुकोजाचे सोडियम पारदमेलाने (पाऱ्याबरोबरच्या मिश्रधातूने) हायड्रोजनीकरण केल्याने, तसेच सागरी तृणांच्या किंवा मान्न्यांच्या निष्कर्षणानेही मॅनिटॉल मिळते पण ते किफायतशीर पडत नाही. 

मॅनिटॉलाचा उपयोग सौम्य विरेचक म्हणून, त्याचप्रमाणे जीवनसत्त्वे, अम्ल-रोधके (अग्लतेविरुद्ध कार्य करणारे पदार्थ), ॲस्पिरीन इत्यादींच्या गोळ्या बनविण्याच्या मिश्रणात केला जातो. ⇨ विद्युत् विलेपनाच्या विद्रावात ऑक्सिजनरोधी व स्थिरकारी म्हणून, त्याचप्रमाणे सूक्ष्मजंतुशास्त्रात आणि रासायनिक विश्लेषण प्रक्रियांतही हे उपयोगी पडते. उच्च विस्फोटकांत मर्क्यूरी फल्मिनेटाच्या ऐवजी मॅनिटॉल नायट्रेट वापरतात.

पहा :मान्ना.

मिठारी, भू. चिं. ठाकूर, अ. ना.