पा र्क स, ॲ ले क्झां ड र : (२९ डिसेंबर १८१३– २९जून १८९०). ब्रिटिश रसायनज्ञ व संशोधक. रबराचे व्हल्कनीकरण (गंधक वा त्याची संयुगे यांची प्रक्रिया करून रबराचे भौतिक गुणधर्म बदलण्याची प्रक्रिया) आणि विद्युत् धातुविज्ञान यांविषयी महत्त्वाचे कार्य. यांचा जन्म बर्मिंगहॅम येथे झाला. प्रारंभी त्यांनी पितळ तयार करण्याच्या एका कारखान्यात उमेदवारी पत्करली पण नंतर एल्किंग्टन या कारखान्यात ते ओतकाम विभागाचे प्रमुख झाले. त्यांनी एकंदर ६६ एकस्वे (पेटंटे) मिळविली. त्यांपैकी सर्वांत जास्त विद्युत् धातुविज्ञानाबद्दलची आहेत. त्यांचे पुढील शोध विशेष उल्लेखनीय आहेत. गंधक मिसळून रबर तापविले असता व्हल्कनीकरण प्रक्रिया घडते पण १८४१ मध्ये पार्कस यांनी असे दाखविले की, गंधकाऐवजी सल्फर क्लोराइड वापरले, तर उष्णतेशिवाय व्हल्कनीकरण घडविता येते. या पद्धतीने रबर विलेपित जलाभेद्य कापड बनविण्याच्या एका कृतीचे एकस्व त्यांनी मिळविले. कोळ्याच्या जाळ्याच्या नाजूक तंतूंवर यशस्वी रीतीने चांदीचे विद्युत् विलेपन करून त्यांनी तो नमुना १८४३ मध्ये प्रिन्स अल्बर्ट यांना नजर केला. वनस्पतिज तेलांवर गंधकाची विक्रिया केली असता गडद रंगाचे रबरसदृश पदार्थ बनतात. सल्फर क्लोराइड वापरून ही क्रिया केली असता हेच पदार्थ पांढऱ्या रंगाचे बनतात. असे पदार्थ बनविण्याची कृती पार्कस यांनी १८४९ मध्ये बसविली. जस्त वापरून रजतमिश्र (चांदी मिसळलेल्या) शिशातील चांदी काढून घेण्याची एक उपयुक्त पद्धत त्यांनी शोधून काढली [⇨ चांदी] या पद्धतीने त्यांनी १८५० व १८५१ मध्ये एकस्व मिळविले आणि ‘पार्कस पद्धत’ म्हणून ती अजूनही प्रचारात आहे. सेल्युलोज नायट्रेटापासून पार्कसाइन हे प्लॅस्टिक त्यांनी बनविले व १८५५ मध्ये त्याचे एकस्व मिळविले. हेच सेल्युलॉइड या नावाने पुढे प्रसिद्ध झाले. या शोधाबद्दल त्यांना ब्राँझ पदक बहाल करण्यात आले. यांशिवाय जोडरहित नळ्या व छपाईचे रूळ बनविण्याच्या कृतीही त्यांनी शोधून काढल्या. ते वेस्ट डलिज येथे मरण पावले.

मिठारी, भू. चिं.