हायड्रॅझीन :हायड्रोनायट्रोजने नावाच्या संयुगांच्या मालेतील हेएक संयुग असून त्याचे रासायनिक संघटन H2NNH2 असे आहे. हाप्रबल क्षपणकारक [→ क्षपण] असलेला रंगहीन द्रव असून त्याचा वितळबिंदू २° से. व उकळबिंदू ११३.५° से. आहे. त्याचा वास कुबटव अमोनियासारखा असून ते आर्द्रता सहजपणे शोषून घेते व त्याचे हायड्रेट (N2H4·H2O) बनते. भौतिकीय दृष्ट्या ते पाण्यासारखे असले, तरी रासायनिक दृष्टीने क्षपणकारक, अपघटनशील (विघटनशील), क्षारकी व द्विकार्यकारी आहे. त्याच्यापासून तयार होणाऱ्या संयुगांचा म्हणजे अनुजातांचा पल्ला मोठा असून त्यांत साध्या लवणांपासून ते वलयीसंयुगे, बहुवारिके व सहसंयोजी जटिले येतात.
हायड्रॅझीन संयुग १८८७ मध्ये प्रथम कार्बनी संयुगांपासून अलग करण्यात आले. सामान्यपणे ते जिलेटीन किंवा सरसाच्या उपस्थितीत अमोनियाचे सोडियम हायपोक्लोराइटाने ⇨ ऑक्सिडीभवन करून तयार करण्यात येते. हायड्रॅझिनाचे उत्पादन करण्यासाठी जिलेटिनाच्या वा सरसाच्या उपस्थितीत अमोनियाबरोबर क्लोरामाइनाची किंवा यूरियाबरोबर सोडियम हायपोक्लोराइटाची विक्रिया घडवून आणतात. जिलेटिनामुळेकिंवा सरसामुळे विक्रिया न झालेल्या ऑक्सिडीकारकांद्वारे उत्पादित पदार्थाचे उत्प्रेरकीय [→ उत्प्रेरण] अपघटन होण्यास प्रतिबंध होतो.
हायड्रॅझीन विविध पीडकनाशकांच्या संश्लेषणात (कृत्रिम रीतीने तयार करताना), स्पंजी रबरात, छिद्रे निर्माण करणाऱ्या फुंकण्याच्या क्रियेस मदत करणाऱ्या द्रव्याचे आधार-द्रव्य म्हणून आणि बाष्पित्रातील गंजण्याच्या क्रियेस प्रतिबंध करणारे द्रव्य म्हणून वापरतात. हायड्रॅझिनाची अम्लांशी व काही धातवीय लवणांशी विक्रिया होऊन तयार होणारी द्रव्ये विशिष्ट स्फोटक द्रव्ये व कवकनाशके यांच्या उत्पादनात वापरतात. हायड्रॅझीन व कार्बनी संयुगे यांतील विक्रियांमधून तयार होणारी अल्किल हायड्रॅझिने रॉकेट व झोत प्रचालन यांमध्ये इंधने म्हणून वापरतात. कारण हायड्रॅझिनाचे ज्वलन ही अतिशय ऊष्मादायी क्रिया आहे. कार्बनी संयुगांशी होणाऱ्या इतर विक्रियांतून मिळणारी हायड्रॅझोने व हायड्राझाइडे ही आयसोनिॲझीड (क्षया-वरील उपचारासाठी वापरण्यात येणारी) यांसारख्या औषधांमध्ये आणि बहुवारिके व छायाचित्रीय रसायने यांच्या निर्मितीत मध्यस्थ द्रव्ये म्हणून वापरतात. जीववैज्ञानिक दृष्ट्या क्रियाशील द्रव्यांच्या संश्लेषणात हायड्रॅझीन वापरतात. वनस्पतींची वाढ नियंत्रित करणारी द्रव्ये, शैवलनाशके, डाखकामातील ⇨ अभिवाह, विषमवलयी संयुगे इत्यादींच्या निर्मितीत हायड्रॅझिनाचे अनुजात वापरले जातात.
पहा : अमोनिया आल्डिहाइडे नायट्रोजन यूरिया.
ठाकूर, अ. ना.
“