स्पेडिंग, फ्रँक हॅरल्ड : (२२ ऑक्टोबर १९०२ — १५ डिसेंबर १९८४). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी १९४० — ५० या दशकात विरल मृत्तिका मूलद्रव्यांचे धातुरूप अवस्थेत रूपांतर करण्याची सोपी व स्वस्त पद्धत विकसित केली. यामुळे ही मूलद्रव्ये उद्योगांना वाजवी किमतीत उपलब्ध झाली. तसेच त्यांनी युरेनियम या धातूच्या शुद्धीकरणाचे नवे तंत्र शोधून काढले (१९४२).

स्पेडिंग यांचा जन्म हॅमिल्टन ( आँटॅरिओ, कॅनडा ) येथे झाला. त्यांनी मिशिगन विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले (१९२५) आणि बर्कली विद्या-पीठामधून पीएच्.डी. पदवी मिळविली (१९२९). विविध विद्यापीठांत त्यांनी अध्यापन व संशोधन कार्य केले. १९४१ मध्ये त्यांची आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ( एम्स ) येथे भौतिकीय रसायनशास्त्राच्या प्राध्यापक पदावर नेमणूक झाली. या ठिकाणी ते इन्स्टिट्यूट फॉर ॲटॉमिक रिसर्च व एम्स लॅबोरेटरी या संस्थांचे संचालक होते (१९४५ — ६८). १९६८ मध्ये ते एम्स लॅबोरेटरीचे प्रमुख शास्त्रज्ञ झाले.

स्पेडिंग यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो ( स्टॅग फील्ड ) येथे एच्. ए. व्हिल्हेल्म व सी. एफ्. ग्रे यांच्यासमवेत युरेनियम शुद्धीकरणाचे नवे तंत्र शोधून काढले. या तंत्राद्वारे तयार केलेल्या शुद्ध स्वरूपातील युरेनियम पहिल्या स्वनियंत्रित अणुकेंद्रीय साखळी विक्रिया प्रयोगात वापरण्यात आले. त्यातूनच पुढे अणुबाँब व अणुऊर्जा कार्यक्रम विकसित करण्यात आले.

दुसर्‍या महायुद्धानंतर स्पेडिंग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लँथॅनाइड मूलद्रव्यांचे अलगीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. लँथॅनाइड मूलद्रव्यांच्या भौतिकीय आणि रासायनिक गुणधर्मांत सारखेपणा असल्यामुळे त्यांचे अलगीकरण करणे अतिशय अवघड होते. स्पेडिंग यांनी त्यासाठी आयन-विनिमय वर्णलेखन या तंत्राचा वापर करून ती मूलद्रव्ये अलग केली.

स्पेडिंग व ॲड्रिअन डेन यांनी १९६५ मध्ये केमिस्ट्री ऑफ रेअर अर्थ एलेमेंट्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. स्पेडिंग नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या कमिटी ऑन रेडिओॲक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट या समितीचे सदस्य होते (१९६८ — ७६). त्यांना फ्रान्सिस जे. क्लॅमर पदकाने १९६९ मध्ये सन्मानित करण्यात आले.

स्पेडिंग यांचे एम्स ( आयोवा, अमेरिका ) येथे निधन झाले.

दीक्षित, रा. ज्ञा.