हायड्रॉक्साइड : सर्वसाधारण M(OH)H हे रासायनिक सूत्र असलेल्या व हायड्रॉक्साइड आयन (OH-) हा ऋण विद्युत् भारित गट असणाऱ्या संयुगाला हायड्रॉक्साइड म्हणतात. सूत्रातील M म्हणजे धातुरूप मूलद्रव्य होय. धातूंची हायड्रॉक्साइडे बहुधा क्षारके, तर अधातूंची हायड्रॉ-क्साइडे बहुधा अम्ले असून हायड्रॉक्साइड कार्बनी किंवा अकार्बनी असू शकते. हायड्रॉक्सिल गट (-OH) असलेल्या संयुगांचा उपसंच म्हणजे हायड्रॉक्साइडे होत. हायड्रॉक्साइडे तीव्र क्षारक, उभयधर्मी [अम्लीय व क्षारकीय ही दोन्ही वैशिष्ट्ये असलेली → उभयधर्मी संयुगे] व अम्लीय ही रासायनिक वैशिष्ट्ये असणारी असतात. हायड्रॉक्सिल गटातऑक्सिजन व हायड्रोजन यांचे प्रत्येकी एकेक अणू रासायनिक दृष्ट्या बद्ध झालेले असून हा गट ऋण विद्युत् भारित आयनाप्रमाणे कार्य करतो. संयुगातील धन विद्युत् भारित भाग बहुधा सोडियम, मॅग्नेशियम किंवा ॲल्युमिनियम इ. धातूचा आयन असतो. अर्थात धन विद्युत् भारित भाग कार्बनी गट असू शकतो (उदा., ग्वानिडिनियम किंवा टेट्रामिथिलअमोनियम). आयनीभूत न झालेल्या, सहसंयुजी बंधाने बद्ध झालेल्या हायड्रॉक्सिल गटाचे अस्तित्व कार्बनी संयुगांमध्ये हायड्रॉक्सी हा पूर्वप्रत्यय लावून (उदा., हायड्रॉक्सि-ॲसिटिक अम्ल CH2OHCOOH) किंवा ऑल हा अनुप्रत्यय लावून (उदा., मिथेनॉल CH3OH) आणि सहसंयुजी संयुगांत हायड्रॉक्सो हा पूर्वप्रत्यय लावून [उदा., पोटॅशियम टेट्राहायड्रॉक्सोऑरेट KAu(0H)4] हायड्रॉक्साइडाचे वैशिष्ट्य दर्शवितात.

 

 हायड्रॉक्साइडामध्ये प्रयोगशाळेतील व औद्योगिक प्रक्रियांतील परिचित क्षार येतात. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम व सिझियम या क्षारधर्मी धातूंची हायड्रॉक्साइडे सर्वांत प्रबल क्षारके आहेत. ती हायड्रॉक्साइडांमधील सर्वाधिक स्थिर व सर्वांत विद्राव्य (पाण्यात विरघळणारी) हायड्रॉक्साइडे आहेत. सोडियम हायड्रॉक्साइड (NaOH) म्हणजे दाहक सोडा हे धातुविज्ञान व छायाचित्रण यांत विक्रियाकारक म्हणून आणि साबण व प्रक्षालकांच्या उत्पादनात महत्त्वाचे औद्योगिक संयुग आहे. कॅल्शियम, बेरियम व स्ट्राँशियम या सर्व क्षारीय मृत्तिका धातूंची हायड्रॉक्साइडे विद्राव्य असून ती प्रबल क्षारके आहेत. मात्र, ती क्षारीय हायड्रॉक्साइडापेक्षा कमी स्थिर आहेत. यांपैकी भिजविलेला चुना म्हणून सामान्यपणे ओळखले जाणारे कॅल्शियम हायड्रॉक्साइड हे सर्वांत सामान्य हायड्रॉक्साइड आहे. थॅलियम हायड्रॉक्साइडाचा (TlOH) अपवाद वगळता मॅग्नेशियम, लोह, बिस्मथ, निकेल, कोबाल्ट व तांबे यांसारख्या इतर धातूंची हायड्रॉक्साइडे पाण्यात अल्प प्रमाणात विद्राव्य आहेत. परंतु त्यांच्यामुळे अम्लांचे उदासिनीकरण होते. बेरिलियम, शिसे, जस्त, ॲल्युमिनियम, क्रोमियम (त्रिसंयुजी), कथिल (द्विसंयुजी), सोने (त्रिसंयुजी) व इतर विशिष्ट धातूंची हायड्रॉक्साइडे अम्लीय वक्षारकीय असे दोन्ही गुणधर्म दर्शवितात. म्हणजे क्षारकांच्या किंवा अम्लांच्या जलीय विद्रावांत विरघळतात. अशा दुहेरी गुणधर्मांच्या हायड्रॉक्साइडांना आणि ऑक्साइडे व सल्फाइडे यांसारख्या संयुगांनाउभयधर्मी संयुगे म्हणतात.

 

 बोरॉन हायड्रॉक्साइडासारखी [B(OH)3] अधातूंची हायड्रॉक्साइडे सर्वसाधारणपणे अम्लीय असतात. ब्रूसाइट [Mg(OH)2] व पायरो-क्लोराइट [Mn(OH)2] ही खनिजे म्हणजे नैसर्गिक रीत्या आढळणारी हायड्रॉक्साइडे आहेत. लँथॅनाइडे ही लँथानाइड संकोचन दर्शवितात म्हणजेजसा अणुक्रमांक वाढतो तशी आणवीय व आयनी आकारमाने कमी होतात. त्यामुळे लँथॅनम हायड्रॉक्साइडापासून [La(OH)3] ल्युटेशियम हायड्रॉ-क्साइडापर्यंत [Lu(OH)3] लँथॅनाइड मालेतील हायड्रॉक्साइडांच्या मूलभूत गुणवैशिष्ट्यात घट वा ऱ्हास झालेला दिसतो. 

ठाकूर, अ. ना.