कलोडियन : ईथर व अल्कोहॉल यांच्या मिश्रणात गन कॉटन किंवा पायरोक्सिलीन (सेल्युलोज नायट्रेटे) विरघळलेले असता जो वर्णहीन, दाट, चिकट व ज्वालाग्राही विद्राव बनतो त्यास कलोडियन म्हणतात. यात कधीकधी ॲसिटोनासारखे इतरही विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) वापरतात. गन कॉटनाचे संशोधन सी. एफ्. शन्बाइन यांनी १८४६ मध्ये याचे प्रथम वर्णन केले. त्याच साली पॅरिसमध्ये ल्वी नीकॉला मेनार यांनी व १८४८ मध्ये बॉस्टन येथे जे. पार्कर्स मेनार्ड यांनी स्वतंत्रपणे याचा शोध लावला.

कलोडियन एखाद्या पृष्ठभागावर लावल्यास ईथराचे बाष्पीभवन होऊन त्या पृष्ठावर पातळ पटलाचे आवरण निर्माण होते. ईथर व अल्कोहॉल यांची प्रमाणे व पायरोक्सिलिनाचे स्वरूप यांनुसार पटलाचे गुणधर्म बदलतात. चांगल्या प्रकारच्या कलोडियनामुळे झालेले पटल सूक्ष्मदर्शकाने पाहिल्यास वर्णहीन व अर्धपार्य (अर्धवट पारदर्शक) दिसते. कलोडियनात ईथराचे प्रमाण जास्त असल्यास त्यापासून बनणारे पटल चिवट व मजबूत असते पण अल्कोहॉलाचे प्रमाण जास्त असेल, तर ते मऊ बनते व सहज फाटू शकते. कॅनडा बाल्सम व एरंडेल हे पदार्थ मिसळलेल्या कलोडियनापासून बनणारे पटल नम्य (लवचिक) असते, त्यास भेगा पडत नाहीत किंवा ते आकसतही नाही. प्रकाश आणि उष्णता यांपासून सुरक्षित अशा स्थितीत कलोडियन साठविल्यास टिकते.

खरचटल्याने किंवा पोळल्याने झालेल्या जखमांवर कलोडियन लावले असता त्याच्या आवरणामुळे जखमेचा हवेशी संपर्क येत नाही आणि जखम झालेल्या भागाच्या कडा परस्परांशेजारी राहिल्यामुळे जखम भरून येण्यास मदत होते.

कलोडियनात सॅलिसिलिक अम्ल इ. औषधी पदार्थ मिसळल्यास ‘सॅलिसिलिक कलोडियन’ तयार होते. कुरूपावर (सामान्यतः तळपायांवर वा टाचांवर जास्त दाबामुळे वा घर्षणामुळे पडणार्‍या घट्ट्यावर) उपचार करण्याकरिता याचा उपयोग करतात. शस्त्रक्रियेच्या वेळी तसेच छायाचित्रणाची फिल्क व काचा तयार करण्याकरिता कलोडियन वापरतात. अपोहनात [कलिल कण व रेणुरूप कण वेगळे करण्याच्या एका तंत्रात, → कलिल] व व्हायरसांचा अभ्यास करण्यासाठी कलोडियनाचे पटल वापरतात. शिलामुद्रण, कोरीवकाम यांमध्ये वाताभेद्य (हवेचा संपर्क होणार नाही असे) आवरण व्हावे म्हणून कलोडियनाचा उपयोग करतात.  

ठाकूर, अ. ना.