अंबर, उदी : इंग्रजी नाव अँबरग्रिस संस्कृत अग्निजार. एक सुगंधी द्रव्य. समुद्रात राहणाऱ्या ⇨कॅशलॉटांच्या (वसातिमी, स्पर्म व्हेल) आतड्यात तयार होणारा, करड्या रंगाचा, अपारदर्शक, मेणासारखा हा पदार्थ कधीकधी समुद्रात तरंगत असलेला किंवा त्याच्या पाण्याबरोबर वाहत येऊन किनाऱ्यावर पडलेला आढळतो. त्याला कस्तुरीसारखा वास असून इतर सुगंधी द्रव्यांत मिसळल्यावर त्यांचा सुगंध अधिक मधुर व पुष्कळ टिकाऊ होतो.

सुगंधी पदार्थ बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पूर्वी तंत्रिका विकारांवर तो औषध म्हणून वापरीत असता. कामोद्दीक म्हणून पौर्वात्य देशांत अजूनही त्याचा उपयोग केला जातो.

ठाकूर, अ. ना.