फिटिख, रूडोल्फ : (६ डिसेंबर १८३५-१९नोव्हेंबर १९१०). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. संश्लेषणाने (कृत्रिम रीत्या) अरिल हायड्रोकार्बने तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘व्ह्यूर्त्‌स-फिटिख विक्रिये’बद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म जर्मनीमधील हँबर्ग येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षकी पेशाबद्दल असलेल्या आस्थेमुळे ते वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षक झाले. १८५६ मध्ये वनस्पतिविज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांनी गटिंगेन विद्यापीठात प्रवेश केला. तेथे शिकत असतानाच त्यांच्या एका मित्राच्या वडिलांनी रंजकद्रव्य निर्मितीच्या कारखान्यात नोकरी देण्याचे कबूल केल्यामुळे त्यांनी त्याच विद्यापीठात रसायनशास्त्र शिकण्यास सुरुवात केली. तेथेच ते हाइन्‍रिख लिम्प्रिख्ट व फ्रीड्रिख व्हलर यांचे मदतनीस म्हणून काम करू लागले. १८५८ मध्ये त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली व त्याच विद्यापीठात ते विनावेतन अध्यापक झाले. १८६६ मध्ये त रसायनशास्त्राचे ‘विशेष’ प्राध्यापक झाले व व्हलर यांचे खास साहाय्यक म्हणून काम करू लागले. याच सुमारास त्यांची व फ्रीड्रिख बाइलस्टाइन यांची ओळख झाली. १८७१-७६ या काळात ट्युबिंगेन विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर स्ट्रॅस्‌बर्ग विद्यापीठात आडोल्फ फोन बेयर यांच्या जागी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. या विद्यापीठात त्यांनी एक नवीन प्रयोगशाळा स्थापन केली व ती १८८२ मध्ये पूर्ण झाली. १८९५-९६ मध्ये त्यांनी विद्यापीठाचे कुलमंत्री (रेक्टर) म्हणून काम केले. १९०२ मध्ये ते निवृत्त झाले.

फिटिख यांना सैद्धांतिक रसायनशास्त्रपेक्षा प्रायोगिक रसायनशास्त्रात अधिक रस होता. निर्जल ॲसिटोनावर सोडियमाची विक्रिया करून त्यांनी पिनॅकोलाचा शोध लावला. सी. ए. व्ह्यूर्त्‌स यांनी कार्बनी हॅलोजन संयुगांवर सोडियमाच्या होणाऱ्या विक्रियेचा अभ्यास केला होता. या विक्रियेप्रमाणे बेंझीन हॅलाइडावर सोडियमाची विक्रिया करून फिटिख यांनी बायफिनिलासारखी अनेक समजातीय (ज्यांतील लागोपाठच्या संयुगांच्या रेणूंत एका CH2 गटाचा फरक आहे अशा) संयुगांच्या श्रेणीतील ⇨ ॲरोमॅटिक संयुगे तयार केली. ही विक्रिया ‘व्ह्यूर्त्‌स –फिटिख विक्रिया’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी मेसिटिलीन व त्याचे अनुजात (एका संयुगापासून तयार केलेली दुसरी संयुगे), नॅप्थॅलीन व फ्ल्युओरेन या ॲरोमॅटिक संयुगांवरही काम केले. त्यांनी डांबरापासून फेनँथ्रीन स्वतंत्र रीत्या शोधून काढले. १८७३ मध्ये त्यांनी बेंझोक्किनोनासाठी क्किनोनॉइड पद्धतीची संरचना सुचविली. या संरचनेमुळे अनेक कार्बनी रंजकद्रव्यांच्या कार्याविषयीची माहिती मिळू शकली. १८७३ नंतर त्यांनी आपले लक्ष अतृप्त (ज्यांतील रेणू इतर अणूंशी वा अणुगटांशी संयोग पावू शकतात अशी) अम्‍ले व लॅक्टोने यांवर केंद्रित केले होते.

बाइलस्टाइन व हान्स ह्यूब्‍नर यांच्या मदतीने त्यांनी Zeitschrift Für Chemie und Pharmacie या नियतकालिकाच्या संपादनाचे काम १८६५ मध्ये घेतले व १८७१ पर्यत या तिघांनी ते नियतकालिक Zeitschrift für Chemie या नावाने चालविले. १८९५-१९१० या काळात ते Annalen der Chemie या नियतकालिकाचे सहसंपादक होते. १८७१ मध्ये त्यांनी रसायनशास्त्राचे एक पाठ्यपुस्तक लिहिले. पुढे या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. व्हलर यांच्या कार्बनी रसायनशास्त्राच्या दहाव्या आवृत्तीचे संपादन फिटिख यांनी १८७७ मध्ये केले. त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यानी लिहिलेले सु. ४०० संशोधनपर निबंध Annalen der Chemie मधून प्रसिद्ध करण्यात आले. त्यांनी विल्यम रॅम्झी, इरा रेमसेन यांसारख्या नंतर प्रसिद्धीस आलेल्या बऱ्याच इंग्लिश व अमेरिकन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांना अनेक रासायनिक संघटनांचा मानसेवी सभासदत्व देण्यात आले होते.ते स्ट्रॅस्‌बर्ग येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.