निऑन : एक अक्रिय (इतर मूलद्रव्यांशी सहजासहजी रासायनिक विक्रिया न होणारे) वायुरूप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Ne अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) १० अणुभार २०·१८३ ⇨ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) शून्य गटातील मूलद्रव्य घनता ०° से.ला व १ वा. दा.ला ०·८९९९ ग्रॅ./लि. आणि उकळबिंदूला द्रवाची घनता १·२०७ ग्रॅ./मिलि. गोठणबिंदू –२४८·६१° से. उकळबिंदू (१ वा. दा. ला) २४६·०९° से. २०° से.ला १,००० ग्रॅ. पाण्यात १०·५ मिलि. इतका विरघळतो क्रांतिक तापमान (जास्तीत जास्त दाब असताना वायूचे द्रवात रूपांतर होण्याचे तापमान) –२२८·७५° से. क्रांतिक दाब (क्रांतिक तापमानाला वायूवर असणारा दाब) २६·८६ वा. दा. विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूतील मांडणी) २, ८ स्थिर समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) अणुभार २०, २१, २२ अल्पायुषी किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे) समस्थानिक १८, १९, २३, २४.

इतिहास : विल्यम रॅम्झी आणि एम‌्, डब्ल्यू. ट्रॅव्हर्झ यांनी हवेतून ऑक्सिजन व नायट्रोजन वेगळे केल्यावर उरलेल्या अक्रिय हवेतून एक नवीन वायू शोधून काढला व त्याला निऑन हे नाव दिले. अशा शेष वायूच्या वर्णपटात एक नवीनच रेषा आढळली व त्यामुळे या नवीन वायूच्या शोधाला दुजोरा मिळाला.

आढळ : पृथ्वीवरील वातावरणात प्रत्येक दशलक्ष भागांत १८·१८ भाग इतका निऑन आढळतो स्थिर समस्थानिकांचे हवेतील प्रमाण पुढीलप्रमाणे असते : निऑन (२०) ९०·२०%, निऑन (२१) ०·२६% व निऑन (२२) ८·८२%. किरणोत्सर्गी समस्थानिके नैसर्गिक रीत्या आढळत नाहीत. व्यापारी दृष्ट्या निऑन हवेतूनच मिळवितात. तथापि नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू), काही खनिजे व अशनी (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचणाऱ्या उल्कांचे अवशेष) यांमध्ये निऑन अत्यल्प प्रमाणात आढळतो. निऑन पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवर व ताऱ्यांमध्येही आढळतो.

प्राप्ती : प्रथम हवेचे द्रवीकरण करतात व त्यातून नायट्रोजन अलग करतात. उरलेल्या हवेतील हायड्रोजन जाळून पाणी बनवून वेगळा करतात व उरलेला वायू कोरडा करतात. या वायूतून हीलियम व निऑन अलग करून त्यातून निऑन वेगळा करतात [→वायूंचे द्रवीकरण].

गुणधर्म : सर्वसाधारण परिस्थितीत निऑन वायुरूप असतो. हा वायू रंगहीन, गंधहीन व चवहीन आहे. निऑनाची स्थिर संयुगे तयार होत नाहीत, तसेच इतर अणूंना आकर्षित करून घेताना फक्त दुर्बल आंतरआणवीय व्हॅन डर व्हाल्स प्रेरणा कार्यन्वित होतात, असे आढळून आलेले आहे.

नीच तापमानाला द्रवरूप केलेल्या बहुतेक वायूंच्या बाबतीत परिसरीय तापमानाला द्रवापासून तयार होणाऱ्या वायूचे घनफळ ५०० ते ८०० पट असते, तर निऑनाच्या बाबतीत ते १,४०० पट असते. या गुणधर्मामुळे निऑनाची साठवण व वाहतूक द्रवरूप अवस्थेत करणे सोयीचे असते.

निऑनाचे किरणोत्सर्गी समस्थानिक कृत्रिम रीत्या तयार करतात. सर्व किरणोत्सर्गी समस्थानिक अल्पायुषी असून निऑन (२४) चे अर्धायुष्य (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) ३·३८ मिनिटे इतके आहे.

अभिज्ञान : निऑन ओळखण्यासाठी व त्याचे प्रमाण ठरविण्यासाठी ⇨ द्रव्यमान वर्णपटविज्ञान व वायू वर्णलेखन [→ वर्णलेखन] या पद्धती वापरतात.

उपयोग : उच्च ऊर्जा भौतिकीय संशोधनासाठी निऑनाचा उपयोग जास्त प्रमाणात करतात. अणुकेंद्रीय कणांच्या मार्गांचे निरीक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फुल्लिंग गणित्र आणि बुद्‌बुद्‌ कोठी या ⇨ कण अभिज्ञातकांत निऑनाचा उपयोग करतात. खोल समुद्रातील पाणबुड्यांच्या श्वसनासाठी वापरण्यात येणाऱ्या वायुमिश्रणात तसेच अवकाश प्रवासातही त्याचा उपयोग करणे शक्य आहे असे आढळून आले आहे. निऑनाचे याबाबतीतील उपयुक्त गुणधर्म हीलियमासारेखच आहेत. मात्र निऑनामुळे ध्वनी संदेशवहनात विकृती निमार्ण होत नाही. त्याची ऊष्मीय संवाहकता कमी असल्यामुळे पाणबुड्याच्या शारीरिक उष्णतेचा सभोवतालच्या पाण्यात होणारा ऱ्हास कमी होतो.

२५°–४०° के. या तापमानात त्याचा उपयोग प्रशीतक म्हणून करतात. अवरक्त (वर्णपटाच्या तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरण शोधकात आणि ⇨ लेसरमध्ये वरील तापमानात निऑनाचा उपयोग शीतक म्हणून करतात. ह्यापेक्षाही थोड्या कमी तापमानाला किंवा अधिक शीतन कार्यक्षमतेची जरूरी असते तेव्हा काही वेळा घनरूप अथवा अंशत: द्रवरूप (चिखलासारख्या) निऑनाचा उपयोग करतात.

नीच दाबाला निऑन वायूतून विद्युत् प्रवाह पाठविल्यास तेजस्वी नारिंगी लाल रंगाचा प्रकाश मिळतो. अशा निऑनयुक्त विद्युत् विसर्जन नळ्यांचा उपयोग जाहिरातींसाठी करतात. या नळ्यांमध्ये काही वेळा इतर अक्रिय वायू व पाऱ्याची वाफ मिसळतात. निऑनाचा उपयोग तडित् निवारकात करतात. तसेच विशिष्ट प्रकारच्या इलेक्ट्रॉन नलिका, गायगर-म्यूलर गणित्रात, उच्च विद्युत् दाबप्रेषक मार्गावर धोकादर्शक दिवा म्हणून इत्यादींसाठी निऑनाचा उपयोग करतात. अगदी कमी विद्युत् शक्तीला सुद्धा निऑन भरलेल्या दिव्यापासून दृश्य प्रकाश मिळू शकतो व त्यामुळे रात्रीकरिता व सुरक्षादीप म्हणून त्याचा उपयोग करणे स्वस्त पडते.

पहा : अक्रिय वायु.

जमदाडे, ज. वि.