मॅलेइक अम्ल : (मॅलेइनिक अम्ल). एक कार्बनीअम्ल.ब्युटीनडायोइक (डीहायड्रोसक्सिनिक) अम्लाचे दोन समघट (रेणुसुत्र तेच पण संरचना भिन्न असलेले संयुगाचे प्रकार) असून यांपैकी समपक्ष (सारखे अणुगट एकाच दिशेला वा जवळजवळ असलेले) रूप म्हणजे मॅलेइक अम्ल व विपक्ष (सारखे अणुगट विरुद्ध दिशांना असलेले) रूप म्हणजे ⇨ फ्यूमेरिक अम्ल होय. ही अम्ले द्विक्षारकीय [रेणूमध्ये दोन मूलके- रासायनिक विक्रियेत कायम राहणारे पण स्वतंत्र अस्तित्व नसलेले अणुगट (येथे-COOH)-असलेली] व अतृप्त (दोन कार्बन अणूंमध्ये एकापेक्षा जास्त-येथे दोन-बंध असलेली) असून प्रकाशीय दृष्ट्या क्रियाशील नाहीत [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र]. दोन्हींचे रासायनिक सूत्र C4H4O4 असून मॅलेइक अम्लाचे संरचना सूत्र खालीलप्रमाणे दर्शवितात :

H

– 

C

– 

COOH

   

‖ 

   

H

– 

C

– 

COOH

भिन्न संरचनांमुळे दोन्हींच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांत भेद आढळतो. उदा., फ्यूमेरिक अम्लाच्या मानाने मॅलेइक अम्लाचा उकळबिंदू कमी, विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) अधिक आणि रासायनिक स्थैर्य कमी असते.

मॅलेइक अम्ल नैसर्गिकरीत्या आढळत नाही. उत्प्रेरकाच्या (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिचा वेग बदलणाऱ्या पदार्थाच्या) उपस्थितीत बेंझिनाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] करून मॅलेइक अम्ल मोठ्या प्रमाणात मिळवितात. थॅलिक ॲनहायड्राइडाच्या उत्पादनात मॅलेइक अम्ल एक उपपदार्थ म्हणून मिळते. स्फटिकीकरणाने मॅलेइक अम्लाचे शुद्धीकरण करतात.

गुणधर्म : याचे स्फटिक रंगहीन व एकनताक्ष [⟶ स्फटिकविज्ञान] असून याची चव किळसवाणी व तुरट असते. याला मंद वास येतो. याचा वितळबिंदू १३०° से. व वि. गु. १·५९ असते. हे पाणी, अल्कोहॉल व ॲसिटोन यांत विरघळते आणि याची पाण्यातील विद्राव्यता सु. ६० टक्के (१०० मिलि. मध्ये ५८·८ ग्रॅ) आहे. हे कार्बन टेट्राक्लोराइड व बेंझीन यांत अत्यल्पच विरघळते. १३०° से. पेक्षा किंचित अधिक तापमानाला याचे अंशतः फ्यूमेरिक अम्लात रूपांतर होते तर १३५° – १४०° से. तापमानाला यातील जवळजवळ असलेल्या COOH गटांमध्ये आंतरक्रिया होऊन पाणी बाहेर पडून वलयी मॅलेइक ॲनहायड्राइड बनते. हे फ्यूमेरिक अम्लापेक्षा अधिक विषारी असून ही दोन्ही संयुगे त्वचेचा क्षोभ करणारी आहेत. याच्या अनेक रासायनिक विक्रिया ओलेफिने [⟶ ॲलिफिटिक संयुगे] व ⇨ कार्‌बॉक्सिलिक अम्ले यांच्या विक्रियांसारख्या असतात. यांपैकी पॉलिएस्टरे [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके] व मॅलेइक ॲनहायड्राइड बनविण्याच्या विक्रिया औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत.

उपयोग : काही पॉलिएस्टरे बनविण्यासाठी या अम्लाचा व मॅलेइक ॲनहायड्राइडाचा उपयोग होतो. मोटारगाड्या, होड्या, नावा इत्यादींचे सांगाडे (बाह्यांग), पुतळे इत्यादींकरिता ही पॉलिएस्टरे वापरतात. मॅलिक, सक्सिनिक, ॲस्पार्टिक, टार्टारिक, लॅक्टिक इ. विविध अम्ले संश्लेषित (घटक द्रव्यापासून संयुगे निर्मिण्याची क्रिया) करण्यासाठी, कृत्रिम रेझिने, फ्यूमेरीक अम्ल इ. अनेक रसायने बनविण्यासाठी, तेले व रसायने टिकविण्यासाठी, सूत , लोकर व रेशीम रंगविण्यासाठी व त्यांच्यावर अंतिम संस्करण करण्यासाठी हे अम्ल व याची संयुगे वापरतात.

मॅलेइक ॲनहायड्राइड : ब्युटाडाइनाचे वा क्रोटानाल्डिहाइडाचे व्हॅनेडियम पेंटॉक्साइड या उत्प्रेरकाच्या सान्निध्यात ऑक्सिडीकरण करून याचे उत्पादन करतात. याचे स्फटिक रंगहीन व सुईसारखे असतात. याचा वितळबिंदू सु. ६०° से. व उकळबिंदू १९७°–१९९° से. असून हे पाणी व इतर सर्वसामान्य विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विरघळते. याचा उपयोग मॅलेइक अम्लाप्रमाणेच होतो. याचा अनेक रासायनिक विक्रियांत उपयोग होतो. उदा., डील्स-आल्डर वा डाइन समावेशन विक्रिया [⟶ डील्स. ओटो पाउल हेरमान आल्डर, कूर्ट] कॅरोटिनासारख्या पदार्थांतील एकाआड एक असलेल्या द्विबंधांची संख्या ठरविण्यासाठी व ब्युटाडाइनाचे प्रमाण काढण्यासाठी याचा उपयोग होतो.

पहा : फ्यूमेरिक अम्ल.

घाटे, रा. वि. ठाकूर अ. ना.