स्यिम्यॉनॉव्ह, न्यिकली न्यिकलाएव्ह्यिच : (१५ एप्रिल १८९६—२५ सप्टेंबर १९८६). रशियन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. रासायनिक विक्रियांच्या गतिकीसंबंधीचे, विशेषतः शृंखला व सशाख शृंखला असलेल्या रासायनिक विक्रियांविषयीच्या यंत्रणांसंबंधीचे, संशोधन केल्याबद्दल त्यांना सर सिरिल हिंशेलवुड यांच्याबरोबर १९५६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.

स्यिम्यॉनॉव्ह यांचा जन्म सराटव्ह ( रशिया ) येथे झाला. त्यांचे शिक्षण सेंट पीटर्झबर्ग ( लेनिनग्राड ) येथे झाले. त्या शहराच्या विद्या-पीठातून १९१७ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. नंतर काही काळ त्यांनी पश्चिम सायबीरियातील टॉम्स्क विद्यापीठात अध्यापन केले. १९२०—३१ या काळात ते लेनिनग्राड ए. एफ्. इऑफ फिजिकोटेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेत कार्यरत होते. १९२८ मध्ये ते लेनिनग्राड पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक झाले. १९३१ नंतर ते ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस ऑफ द यू. एस्. एस्. आर्. मधील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल फिजिक्स या संस्थेचे संचालक झाले आणि १९४४ मध्ये मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीत प्राध्यापक झाले. नोबेल पारितोषिकाचे ते पहिले रशियन मानकरी होते.

घन पृष्ठभागांवरील बाष्पाचे संघनन, इलेक्ट्रॉनीय आवेगांच्या क्रियेखालील लवण, बाष्पांचे आयनीभवन, स्फोटक द्रव्यांचे ज्वलन व विस्फोट आणि शृंखला विक्रिया हे स्यिम्यॉनॉव्ह यांच्या संशोधनाचे विषय होते.

स्यिम्यॉनॉव्ह यांनी दोन महत्त्वाची पुस्तके लिहिली : Khimichaskaia Kinetika i tsepnye reaktsii (१९३४ इं.भा. केमिकल कायनेटिक्स अँड चेन रीॲक्शन्स, १९३५) हे त्यांचे पुस्तक रसायनशास्त्रातील अशाख व सशाख शृंखला विक्रियांचा तपशीलवार सिद्धांत मांडणारे रशियातील पहिले पुस्तक होते. O nekotorykh Problemakh Khimicheskoi Kinetiki i reaktsionnoi sposobnosti (१९५४ इं. भा. सम प्रॉब्लेम्स इन केमिकल कायनेटिक्स अँड रीॲक्टिव्हिटी, १९५४) या त्यांच्या पुस्तकाच्या अमेरिकन, जर्मन व चिनी आवृत्त्याही निघाल्या.

स्यिम्यॉनॉव्ह यांना पुढील अनेक मानसन्मान मिळाले होते : नऊ वेळा ऑर्डर ऑफ लेनिन, दोन वेळा स्टालिन पारितोषिक (१९४१,१९४९), ऑर्डर ऑफ द रेड बॅनर ऑफ लेबर, दोन वेळा हीरो ऑफ सोशॅलिस्ट लेबर (१९६६, १९७६), लमनॉसॉव्ह सुवर्ण पदक (१९६९), लेनिन पारितोषिक (१९७६), ऑर्डर ऑफ द ऑक्टोबर रिव्होल्यूशन (१९८६), मेंडेलेव्ह पारितोषिक., तसेच इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, हंगेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६१), न्यूयॉर्क ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६२) व रूमानियन ॲकॅडेमी (१९६५) यांचे सन्माननीय सदस्यत्व रॉयल सोसायटी ( लंडन, १९५८ ) व युनायटेड स्टेट्स नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६३) यांचे परदेशी सदस्यत्व आणि पुढील विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या : ऑक्सफर्ड (१९६०), ब्रूसेल्स (१९६२), लंडन (१९६५), बूडापेस्ट टेक्निकल युनिव्हर्सिटी (१९६५), पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ऑफ मिलान (१९६४) इत्यादी.

स्यिम्यॉनॉव्ह यांचे मॉस्को येथे निधन झाले.

कानिटकर, बा. मो.