सीबॉर्ग, ग्लेन थीओडोर : (१९ एप्रिल १९१२ – २५ फेब्रुवारी १९९९). अमेरिकन अणुकेंद्रीय रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी युरेनियम या मूलद्रव्यापेक्षा अधिक जड असलेली नऊ ⇨युरेनियमोत्तर मूलद्रव्ये ओळखून वेगळी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. या कार्यासाठी त्यांना १९५१ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक ⇨एडविन मॅटिसन मॅकमिलन यांच्याबरोबर विभागून देण्यात आले.

सीबॉर्ग यांचा जन्म अमेरिकेत मिशिगन राज्यातील इश्पेमिंग येथे झाला. त्यांनी लॉस अँजेल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेऊन १९३४ मध्ये बी.ए. पदवी संपादन केली. नंतर त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९३७ मध्ये पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यांनी तेथे रसायनशास्त्राचे अध्यापन केले आणि १९४६ मध्ये ते प्राध्यापक झाले. १९५८– ६१ या कालावधीमध्ये ते या विद्यापीठाचे कुलगुरु होते.

सीबॉर्ग यांनी १९४० – ५५ या काळात अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ९४ ते १०२ असलेली नऊ मूलद्रव्ये शोधून काढली. यांपैकी प्लुटोनियम (अक्र. ९४) हे मूलद्रव्य सर्वाधिक परिचित आहे. कारण त्याचा अणुकेंद्रीय विस्फोटक म्हणून तसेच अणुकेंद्रीय वीजनिर्मितीसाठी उपयोग होतो. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात ते शिकागो विद्यापीठात धातुविज्ञान प्रयोगशाळेचे विभाग प्रमुख होते. तेथे अणुकेंद्रीय विक्रियांमधून निर्माण झालेल्या द्रव्यांतून प्लुटोनियम अलग करण्याच्या कामाची जबाबदारी मुख्यत्वे त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. प्लुटोनियमाबरोबरच त्यांनी पुढील नवीन मूलद्रव्येही शोधून काढली. (त्यांचे चिन्ह व अणुक्रमांक कंसात दिले आहेत) : अमेरिसियम (Am ९५), क्यूरियम (Cm ९६), बर्केलियम (Bk, ९७), कॅलिफोर्नियम ( Cf, ९८ ), आइन्स्टाइनियम (Es, ९९), फेर्मियम (Em, १००), मेंडेलेव्हियम (Md, १०१) आणि नोबेलियम (No, १०२). त्यांनी शंभराहून अधिक समस्थानिके (अणुक्रमांक तोच परंतु भिन्न द्रव्यमानांक असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) तयार केली. १९४४ मध्ये त्यांनी ॲक्टिनाइड संकल्पना मांडली. या संकल्पनेनुसार ॲक्टिनियमापेक्षा अधिक जड असलेली १४ मूलद्रव्ये (अक्र. ९० ते १०३) ⇨आवर्त सारणी त एका स्वतंत्र गटात येतात. हे तत्त्व महत्त्वाचे ठरले कारण या आणि यांच्यापेक्षा अधिक जड असलेल्या अनेक मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांविषयी भाकीत करण्यासाठी आणि मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीतील त्यांचे स्थान निश्चित करण्यासाठी सीबॉर्ग यांच्या संकल्पनेची मोठी मदत झाली.

सीबॉर्ग अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. (१९६१ – ७१) या काळात अमेरिकेतील अणुवीजनिर्मिती उद्योगाचा झपाट्याने विकास झाला. १९९१ मध्ये ते बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात परत गेले.

सीबॉर्ग यांनी पन्नासाहून अधिक ग्रंथ आणि सु. ५०० संशोधनपर लेख लिहिले. या लेखनासाठी त्यांना सहकाऱ्यांची मदत झाली. त्यांना अनेक सन्माननीय डॉक्टरेट पदव्या, अनेक पदके ( उदा., पर्कीन पदक १९५७, प्रीस्टली पदक १९७९ इ.), पुरस्कार वगैरे मानसन्मान मिळाले. एका लघुग्रहाला त्यांच्या गौरवार्थ त्यांचे नाव देण्यात आले. १९४४ मध्ये अणुक्रमांक १०६ असलेल्या अनिल्हेक्सियम या मानवनिर्मित मूलद्रव्याला त्यांच्या सन्मानार्थ सीबॉर्गियम हे नाव देण्यात आले.

सीबॉर्ग यांचे कॅलिफोर्नियातील लाफायेत येथे निधन झाले.

पहा : मूलद्रव्ये, मानवनिर्मित.

राजमाने, रूपाली दिलीप