सम्नर, जेम्स बॅचलर : (१९ नोव्हेंबर १८८७-१२ ऑगस्ट १९५५). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी युरियेज या ⇨ एंझाइमाचे स्फटिक सर्वप्रथम वेगळे केले आणि त्यामुळे एंझाइमांचे प्रथिनरूप माहीत झाले. या संशोधन कार्याबद्दल सम्नर यांना ⇨ जॉन हॉवर्ड नॉर्थ्रप आणि ⇨ वेंडेल मेरेडिथ स्टॅन्ली यांच्याबरोबर १९४६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. सम्नर यांनी एंझाइमांचे संहतीकरण आणि शुद्धीकरण करणारी, तसेच एंझाइमांचे प्रथिनरूप ओळखणारी साधने तयार केल्यामुळे जैव-उत्प्रेण [→उत्प्रेण] या विषयाच्या अध्ययनाला गती मिळाली.

सम्नर यांचा जन्म अमेरिकेतील कँटन (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांनी हार्व्हर्ड महाविदयालयामध्ये अध्ययन केले. त्यांनी रसायनशास्त्राची बी. ए. (१९१०), एम्. ए. (१९१३) आणि जीवरसायनशास्त्राची पीएच्. डी. (१९१४) या पदव्या संपादन केल्या. त्यांनी स्टॉकहोम विदयापीठातील ⇨ हान्स कार्ल ऑयलर-केल्पिन आणि अप्साला विदयापीठातील ⇨ टेऑडॉर स्व्हेडबॅरी यांच्याबरोबर एंझाइमांसंबंधी संशोधन केले. सम्नर कॉर्नेल मेडिकल स्कूलमध्ये जीवरसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक (१९१४-२९) आणि प्राध्यापक (१९२९-५५) होते.

सम्नर यांनी युरियेजाची संहती वाढविण्याकरिता ३०% अल्कोहॉला-ऐवजी विरल ॲसिटोन वापरण्याचे १९२६ ध्ये ठरविले. त्यांनी ३१·६% ॲसिटोनाबरोबर सूक्ष्मचूर्णरूपातील जॅक बिन पिठाचे निष्कर्षण केले आणि गुरूत्वीय पद्धतीने ते गाळून घेतले. नंतर त्याचे सु. २° से. तापमानाला रात्रभर शीतन केले. दुसऱ्या दिवशी त्या गालिताची तपासणी केली असता त्यामध्ये अष्टफलकीय, रंगहीन स्फटिक असल्याचे त्यांना आढळले. यांतील काही स्फटिक त्यांनी केंद्रोत्सारणाने वेगळे केले. त्या स्फटिकांचा पाण्यामध्ये विद्राव करून परीक्षा केली असता हे स्फटिक प्रथिन असल्याचे आणि उच्च प्रकारची युरियेज क्रियाशीलता असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर केलेल्या प्रयोगांनी असे दिसून आले की, स्फटिकीकरणामुळे युरियेजाची शुद्धता ७०० ते १४०० पट वाढविता येते. १९३७ साली सम्नर यांनी कॅटालेज या एंझाइमांचे स्फटिकीकरण केले.

नॉर्थ्रप यांनी सम्नर यांच्या संशोधन कार्याचा विस्तार केला. त्यांनी रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमध्ये पेप्सीन (१९३०), ट्रिप्सीन (१९३२) आणि कायमोट्रिप्सीन या एंझाइमांचे स्फटिक तयार केले. स्टॅन्ली यांनी एंझाइमांप्रमाणेच ⇨ व्हायरस सुद्धा स्फटिक रूपातील प्रथिने असतात, असे दाखविले. सम्नर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे व्हायरस आणि व्हायरसजन्य रोग या क्षेत्रातील संशोधनाला प्रेरणा मिळाली (उदा., इन्फ्ल्यूएंझा, बालपक्षाघात). सम्नर यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून कॉर्नेल लॅबोरेटरी ऑफ एंझाइम केमिस्ट्नी ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली व सम्नर यांना १९४७ मध्ये तिचे संचालक करण्यात आले.

सम्नर यांचे अमेरिकेतील बफालो (न्यूयॉर्क राज्य) येथे निधन झाले.

पहा : एंझाइमे.

सूर्यवंशी, वि. ल.