लोखंड : उद्योगधंद्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असलेले धातुरुप मूलद्रव्य. ही सर्वांत स्वस्त धातू असून हिच्या असंख्य मिश्रधातू (उदा., पोलादाचे शेकडो प्रकार) तयार होतात. यामुळे ही सर्वाधिक वापरली जाणारी धातू आहे. रासायनिक चिन्ह Fe (लोखंडाच्या ‘फेरम’ या लॅटिन नावावरून हे चिन्ह आलेले आहे). अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) २६ अणुभार ५५.८४७ आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरुप मांडणीतील ⟶ आवर्त सारणी] ८ व्या गटातील एक ⇨ संक्रमणी मूलद्रव्य वितळबिंदू १,५४०से. उकळबिंदू २,८००से. वि.गु. ७.८६ (२०से.ला). ५४, ५६, ५७  व  ५८ हे द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यट्रॉन यांची एकूण संख्या) असलेले याचे  चार स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) असून यांशिवाय लोखंडाचे ५२, ५३, ५५, ५९ व ६० या द्रव्यमानांकांचे किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म असलेले) समस्थानिकही आहेत. पैकी काहींचे अर्धायुकाल (किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काल) पुढीलप्रमाणे आहे : लोह (५३) ८.९ मिनिटे लोह (५५) २.९४ वर्षे लोह (५९) ४६.३ दिवस आणि लोह (६०) सु. ३ × १० वर्षे. हे किरणोत्सर्गी समस्थानिक रेडिओ विषारी व धोकादायक ठरू शकतात. हे सापेक्षतः मऊ म्हणजे ब्रिनेल पद्धतीनुसार २५ से. ला ९९.९ टक्के शुद्ध लोखंडाची कठिनता ८२-१०० आहे [⟶कठिनता]. विद्यु्त् विन्यास (अणुकेंद्राभोवतीच्या विविध कक्षांमधील इलेक्ट्रॉनांची संख्या) २,८,१४,२ संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) सामान्यपणे २ व ३ क्वचित ४ व ६.

लोखंडाची धातुके व त्यांची उत्पत्ती, तसेच लोखंडाचे गुणधर्म, उपयोग, संयुगे व मिश्रधातू यांची माहिती प्रस्तुत नोंदीत दिली आहे. लोखंडाच्या धातुकांचे जगातील साठे व उत्पादन, धातुकांचे समृद्धीकरण, त्यांच्यापासून लोखंडाची निर्मिती वगैरे माहिती ‘लोखंड व पोलाद उद्योग’ या नोंदीत दिली आहे. यांशिवाय ‘पोलाद’ आणि ‘लोहमिश्रके’ या लोखंडाशी संबंधित अशा दोन स्वतंत्र नोंदीही मराठी विश्वकोशात आहेत.

इतिहास : लोखंडाचा शोध इतिहासपूर्व काळात लागला. प्राचीन जगाला माहीत असलेल्या नऊ धांतूंपैकी लोखंड एक आहे. अशनीतील (पृथ्वीबाहेरून आलेल्या दगडातील) निकेलयुक्त लोखंड माणसाने प्रथम वापरले व ते इ. स. पू. ४००० च्या आधी वापरले होते. इ.स.पू. ३००० पर्यंत धातुकापासून (कच्च्या रुपातील धातूपासून) लोखंड मिळविण्यात आले नव्हते, असे मानतात. त्यानंतर मात्र धातुकाचे भट्टीत ⇨ क्षपण करून लोखंड मिळविण्यात येऊ लागले. सुरुवातीला हे अल्प प्रमाणात मिळत असल्याने त्याचा दागदागिन्यांत वापर करीत. ईजिप्तमधील फेअरो राजे याला सोन्यापेक्षा मौल्यवान मानीत. तथापि लोहयुगाच्या सुरुवातीस (इ. स. पू. सु. १२००) प्रगलनाच्या (धातू गाळण्याच्या) तंत्रांत सुधारणा झाल्याने लोखंड जास्त प्रमाणात मिळविता येऊ लागले व ते बरेच स्वस्तही पडू  लागले. त्यामुळे इ. स. पू. ८०० नंतर त्याचा शस्त्रे, हत्यारे व अवजारे यांसाठी व्यापक प्रमाणावर उपयोग होऊ लागला [⟶लोहयुग].

भारत, चीन व ईजिप्त येथे यूरोपच्या आधी लोखंड अवजारे व भांडी यांकरिता वापरले जात होते. भारतातही चांगले लोखंड बनवीत असत. कुतुबमिनारजवळील मेहरोली येथील लोहस्तंभ याचे उदाहरण आहे. हा स्तंभ इ. स. सु. ४०० मधील आहे. तो ७.५ मी. उंच असून त्याचा व्यास तळाशी सु. ४१ सेंमी. व वरच्या टोकाकडे सु. ३१ सेंमी आहे. घडीव लोखंडाच्या या स्तंभाचे वि.गु. ७.५ पेक्षा जास्त व वजन ६ टनांपेक्षा अधिक आहे. त्यात ९९.७२% लोखंड, ०.०८% कार्बन, ०.०४६% सिलिकॉन व ०.११४% फॉस्फरस आहे. हा स्तंभ अजून गंजला वा झिजला नाही. बहुधा याच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या चुंबकीय ऑक्साइडाच्या (Fe3O4)संरक्षक पातळ पटलामुळे याचे गंजण्यापासून व झिजण्यापासून रक्षण झाले असावे. याच्यापेक्षा मोठा व दोन खंडांचा इ. स. सु. १२०० मधील एक लोहस्तंभ माळव्यातील धार (मध्य प्रदेश) येथे आढळला आहे.

आता लोखंडाची जागा काही प्रमाणात ॲल्युमिनियम, काँक्रीट, प्लॅस्टिके इ. द्रव्यांनी घेतली आहे. असे असले, तरी लोखंडाचे महत्त्व लोहयुगात होते त्याहूनही अद्यापि खूपच जास्त आहे.

आढळ : ऑक्सिजन, गंधक, फास्फरस इ. मूलद्रव्यांशी लोखंडाचा सहजपणे संयोग होतो. त्यामुळे मुक्त धातूच्या रुपात ते अगदी क्वचितच आढळते. अशना तसेच ग्रीनलंडमधील मर्यादित क्षेत्रात आढळणारा बेसाल्टी खडक आणि अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील कार्बनयुक्त अवसादात (गाळात ते पार्थिव लोह (म्हणजे २-३% निकेलयुक्त मिश्रधातू) या रुपात आढळते. पाच ते सात टक्के निकेलयुक्त कॅमेसाइट, तसेच ६२ ते ७५% लोखंड आणि ३७ ते २४% निकेल असणारे टीनाइट या अशनीतील खनिजांत आणि जमिनीवरच्या निक्षेपातील लोह-निकेल यांच्या मिश्रधातूंत लोखंड आढळते. अशा रीतीने भूकवचात, विशेषतः अग्निज खडकांत, लोखंडाचे वजनी प्रमाण ५% असून विपुलतेच्या दृष्टीने धातूंमध्ये याचा ॲल्युमिनियमानंतर दुसरा क्रमांक आहे, तर इतर सर्व मूलद्रव्ये विचारात घेतल्यास भूकवचातील ऑक्सिजन, सिलिकॉन व ॲल्युमिनियम यानंतर याचा विपुलतेत चौथा क्रमांक लागतो. पृथ्वीचा गाभा मुख्यत्वे लोखंड व अल्पसे निकेल यांचा बनलेला असल्याचे मानतात. हे लक्षात घेतल्यास एकूण पृथ्वीचा विचार करता लोखंड हे सर्वांत विपुल (३५%) मूलद्रव्य आहे. हॅरल्ड सी. यूरी यांनी १९५२ साली केलेल्या अनुमानानुसार विश्वातील विपुलतेच्या दृष्टीने लोंखंडाचा नववा क्रमांक आहे. भूमिजल व समुद्राचे पाणी यांतही लोखंड आढळते. समुद्राच्या पाण्यात विपुलतेच्या बाबतीत लोखंडाचा तेविसावा क्रमांक असून या एक घ. किमी. पाण्यात सु. १२ टन लोखंड असते. समुद्राच्या पाण्यातील लोखंडाचे हे प्रमाण त्याच्यातील ॲल्युमिनियम, मॉलिब्डेनम व जस्त या धातूंच्या प्रमाणएवढे आहे.

अन्य पुष्कळ खनिजांप्रमाणे लोखंडाची खनिजेही (संयुगेही) जीवांमध्ये व माणसाच्या रक्तातील हीमोग्लोबिनात आढळतात. माणसाच्या शरीरात सरासरी सु. ४.५ ग्रॅ. (सु. ०.००४%) लोखंड असून यापैकी ६५% लोखंड हीमोग्लोबिनात असते. त्याच्या मदतीने रेणुरुपातील ऑक्सिजन फुप्फुसांत व सर्व शरीरभर नेला जातो. एक टक्का लोह निरनिराळ्या एंझाइमांत (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांत) असते. या एंझाइमांद्वारे कोशिकेच्या (पेशीच्या) अंतर्गत ⇨ ऑक्सिडीभवनाचे नियमन होते. उरलेले बहुतेक लोह शरीरात (उदा., यकृत, अस्थिमज्जा, प्लीहा-पानथरी, इ. ठिकाणी) साचते आणि गरजेनुसार त्याचे हीमोग्लोबिनात परिवर्तन होते. तांबूस मांस, अंड्यातील पीतक (पिवळा बलक), गाजर, फळे, गह, हिरव्या भाज्या यांच्यामधून सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीला दिवसभरात लागणारे १० ते २० मिग्रॅ. पैकी बहुतेक लोह मिळते. लोहाच्या त्रुटीमुळे उद्‌भवणाऱ्या पांडुरोगावर (ॲनिमियावर) औषध म्हणून एखादे लोह (बहुदा फेरस) संयुग देतात.


निसर्गात आढळणारे लोखंड हे पुढील चार समस्थानिकांचे मिश्रण असून त्यांची शेकडा प्रमाणे दिली आहेत : लोह (५६) ९१.६६, लोह (५४) ५.८२, लोह (५७) २.४९ आणि लोह (५८) ०.३३. लोखंडाची इतर मूलद्रव्यांबरोबरची शेकडो खनिजे भूकवचात आढळतात. यांपैकी थोड्याच खनिज साठ्यांपासून लोखंड मिळविता येऊ शकते. लोखंडाच्या अशा फायदेशीर साठ्यांना त्याचे धातुक साठे म्हणतात आणि त्यांच्यात लोखंडाचे प्रमाण ३०% पासून ७०% पर्यंत असे. ही धातुके मुख्यतः ऑक्साइडे, कार्बोनेटे, सिलिकेटे आणि सल्फाइडे यांच्या रुपात असतात. यांपैकी हेमॅटाइड (Fe2O3), मॅग्नेटाइट (Fe3O4) व लिमोनाइट (सजल लोह ऑक्साइड) ही लोखंडाची प्रमुख धातुके असून टॅकोनाइट (लोह सिलिकेट व सिडेराइट (FeCO3)ही याची अन्य धातुके आहेत. याव्यतिरिक्त पायराइट (FeS2) व क्रोमाइट [Fe(CrO2)2] ही याची धातुके मुख्यत्वेकरून अनुक्रमे गंधक व क्रोमियम मिळविण्यासाठी वापरतात. काही महत्त्वाच्या धातुकांची माहिती थोडक्यात खाली दिली आहे.

हेमॅटाइट : (फेरिक ऑक्साइड). यात सर्वसाधारणपणे ६९-९४% लोखंड व उरलेला बहुतेक ऑक्सिजन असतो. याचा रंग पोलादाप्रमाणे करडा ते मंद वा भडक तांबडा असतो. याचा रंग पोलादाप्रमाणे करडा ते मंद वा भडक तांबडा असतो. शुद्ध प्रकारच्या तांबड्या रंगावरून रक्तासारखे तांबडे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे हेमॅटाइट हे नाव पडले आहे. हे सामान्यपणे मातकट ते घट्ट रुपांत पुष्कळ खडकांत आढळते. उदा., खनिज शिरा, तिन्ही (अग्निज, गाळाचे व रुपांतरित) प्रकारचे खडक आणि मॅग्नेटाइटावर वातावरणक्रिया होऊन बनलेले डबर. माशांच्या अंड्यांच्या पुंजक्याप्रमाणे दिसणारे अंदुकाश्मी हेमॅटाइट हे गोलसर वा चपट गोलसर कणांचे बनलेले असते. कधीकधी याचे अभ्रकासारखे लहान वडीच्या आकाराचे करडे ते निळसर स्फटिक आढळतात. अशा चकचकीत स्फटिकांना ‘लोहकाच’ म्हणतात, तर हेमॅटाइटाच्या चुंबकीय प्रकाराला ‘मार्टाइट’ म्हणतात. यात आर्द्रता असू शकते मात्र पाण्याचा खनिजांशी संयोग झालेला नसल्याने खनिज १००सें.सपर्यंत तापविल्यास ती निघून जाते. हे लोखंडाचे एक सर्वांत महत्त्वाचे धातुक आहे. [⟶ हेमॅटाइट].

मॅग्नेटाइट : (फेरस ऑक्साइड). शुद्ध प्रकारात ७२.४% लोखंड व उरलेला ऑक्सिजन असतो. याचा रंग गडद करडा ते काळा असतो. हे तीव्र चुंबकीय (यावरून नाव पडले आहे) असल्याने हे वेगळे करण्यासाठी चुंबकीय पद्धती वापरता येतात. याच्या काही प्रकारांत टिटॅनियम आढळते व त्याला टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट म्हणतात. मॅग्नेटाइट हेही लोखंडाचे प्रमुख धातुक आहे.[⟶ मॅग्नेटाइट].

लिमोनाइट : (तपकिरी हेमॅटाइट). सर्वसाधारणपणे सजल लोह ऑक्साइडासाठी हे नाव वापरतात. यात गोएथाइट [FeO(OH)] व लेपिडोक्रोसाइट [Fe4O5(OH)2] यांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण झालेले असते. शुद्ध FeO (OH).Fe2O3 मध्ये ६० ते ६५% लोखंड, सु. २७% ऑक्सिजन व उरलेले पाणी असते. याचा रंग सामान्यतः पिवळा व तपकिरी ते जवळजवळ काळा असतो. हे सुटे, मातकट वा सच्छिद्र रुपात आढळते. कधीकधी याचा तंतुरुप रचनेचा घट्ट प्रकारही आढळतो. रंगीत मातीच्या रुपात हे जगात सर्वत्र आढळते. हे लोंखडाचे महत्त्वाचे धातुक आहे. [⟶ लिमोनाइट].

गोएथाइट :  खवल्यांच्या व सुईसारख्या चांगल्या स्फटिकांच्या रुपात हे आढळते. याचा रंग पिवळा, तांबडा अथवा तपकिरी असतो. यात सु. ६२.९% लोखंड व सु. १०% पाणी असते. लोखंडाचे धातुक म्हणून हे महत्त्वाचे आहे. [⟶ गोएथाइट].

लेपिडोक्रोसाइड : याला खरे लिमोनाइट म्हणतात. हे पुष्कळसे हेमॅटाइटाप्रमाणे दिसते व याचे गुणधर्म हेमॅटाइटासारखे असतात. धातुक म्हणून हे उपयुक्त आहे.

इल्मेनाइट : (FeTiO3). यात ३६.८% लोखंड, ३१.६%टिटॅनियम व उरलेला ऑक्सिजन असतो. मुख्यत्वे टिटॅनियम मिळविण्यासाठी हे वापरतात आणि यापासून लोखंड उपपदार्थ म्हणून मिळते. [⟶ इल्मेनाइट].

सिडेराइट : यात ४८.२ % लोखंड व उरलेले कार्बन डाय-ऑक्साइड असते. यात मँगॅनीज, मॅग्नेशियम, कॅल्शियम व कोबाल्ट ही मूलद्रव्येही असतात. हे स्फटिकी ते मातकट रुपांत आढळते. रंग हिरवट करडा ते तपकिरी असून झोतभट्टीत टाकण्याआधी हे बहुधा भाजून घेतात. [⟶ सिडेराइट].

पायराइट : यात ४६.६% लोखंड व उरसेसे गंधक असते. याचा रंग काहीसा सोन्यासारखा पिवळसर असल्याने याला फूल्स गोल्ड (मूर्खाचे सोने) म्हणतात. मात्र हे सोन्यापेक्षा अधिक कठीण असते. हे लोखंडावर घासल्यास ठिणगी पडते. म्हणून अग्नी देणारे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे पायराइट हे नाव पडले आहे. हे सर्वाधिक व्यापकपणे आढळणारे सल्फाइड असून हे शिरांच्या रूपात व तिन्ही प्रकारच्या खडकांत सापडते. गंधक व सल्फ्यूरिक अम्ल बनविण्यासाठी हे मुख्यतः वापरतात.[⟶पायराइट].

पायरोटाइट :(FeS ते FeS + S ). हे चुंबकीय असल्याने याला चुंबकीय पायराइट म्हणतात. यात ५९.४%लोखंड व उरलेले गंधक असते. याचा रंग पायराइटापासून गडद व काशासारखा ते तांब्याप्रमाणे लाल असतो. हे स्फटिकी, कणमय वा संपुंजित रूपात आढळते. सामान्यपणे सल्फ्यूरिक अम्ल बनविण्यासाठी हे वापरतात.बहुतकरून हे निकेल सल्फाइडाबरोबर आढळत असल्याने निकेलाचा शोध घेण्यासाठी याचा उपयोग होतो. [⟶पायरोटाइट].

मार्‌कॅसाइट : (FeS2). याला पांढरे लोह पायराइट असेही म्हणतात. यात ४६.६% लोखंड व उरलेले गंधक असते. याची स्फटिकरचना पायराइटापेक्षा वेगळी असून हे अधिक अस्थिर असते. विशेषेकरून हे शिसे-जस्त असलेल्या सल्फाइडी शिरांत आढळते. हे लोखंडाचे प्राथमिक स्वरूपाचे धातुक नाही. तांबे, निकेल, जस्त, चांदी किंवा सोने आणि कधीकधी गंधक मिळविण्यासाठी हे वापरतात तेव्हा लोखंड हे उपपदार्थ म्हणून मिळते. [⟶मार्‌कॅसाइट].

टॅकोनाइट: लोहयुक्त फ्लिंटसारखा गाळाचा खडक हेमॅटाइट व मॅग्नेटाइट यांच्या अतिसूक्ष्म कणांचे विविध प्रमाणांतील मिश्रण असून यात २५% ते ३५ % लोह असते. पूर्वी हा आर्थिक दृष्टीने महत्वाचा नव्हता तथापि आता तो मोठ्या प्रमाणात काढतात. तो भरडून व चुंबकीय रीतीने खनिजे वेगळी करून समृद्ध धातुक मिळवितात.

यांशिवाय चामोसाइट, क्लोरोपाल, स्टिल्य्‌नोमिलेन, ग्रीनालाइट, मिनेसोटाइट व ग्रुनेनाइट या लोखंडाच्या सिलिकेटी खनिजांचा गौण धातुक म्हणून उपयोग होऊ शकतो. या सिलिकेटांवर वातावरणक्रिया व ऑक्सिडीभवन होऊन त्यांच्यापासून वापरण्यायोग्य ऑक्साइडी धातुके तयार होतात.


धातुकांची उत्पत्ती व प्रकार : भूवैज्ञानिक काळ व भौगोलिक वाटणी लक्षात घेतल्यास लोखंडाची धातुके विस्तृतपणे पसरलेली दिसतात. काही धातुके जगातील सर्वांत जुन्या सु. २.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या खडकांत आढळली आहेत. उदा., कँब्रियनपूर्व (म्हणजे ६० कोटी वर्षांहून जुन्या) खडकांत जगातील सर्वाधिक मोठे साठे आढळले आहेत. नंतरच्या विविध भूवैज्ञानिक कालखंडातील खडकांतही ही धातुके आढळतात. तसेच हल्ली दलदलीच्या प्रदेशांत ऑक्साइडांच्या रूपातील धातुके, तर विशिष्ट किनारी भागांत यांची चुंबकीय प्लेसरे निर्माण होत असलेली दिसतात. या धातुकांचे साठे भूपृष्ठालगत काही मी. खोलीपासून ते शेकडो मी. खोलीपर्यंत आढळतात. तसेच ती भूकवचाच्या बहुतेक भागांत सापडतात. अशा तऱ्हेने जगात लोह खनिजांचे हजारो निक्षेप माहीत झालेले आहेत. अर्थात यांपैकी थोडेच साठे व्यापारी व आर्थिक दृष्ट्या सध्या उपयुक्त आहेत. ही धातुके निरनिराळ्या रीतींनी निर्माण झाली असून उत्पत्तीनुसार त्यांचे पुढील प्रकार होतात.

अग्निज धातुके : पृथ्वी थंड होण्याच्या आधीच्या काळात शिलारसाचे अंशत: स्फटिकीभवन होऊन ही धातुके बनलेली आहेत. थर वा घुसलेल्या राशींच्या रूपात ही आढळतात. यांच्यात मुख्यत्वे मॅग्नेटाइट व हेमॅटाइट ही खनिजे निरनिराळ्या प्रमाणांत असून त्यांच्यातील लोखंडाचे प्रमाण बहुधा जास्त असते. ही धातुके विस्तृतपणे पसरलेली नसतात. तथापि यांचे पुष्कळ साठे मोठे असून व्यापारी दृष्टीने ते महत्वाचे आहेत.

अवसादी धातुके: सावकाशपणे होणारी झीज, विघटन, वाहतूक व निक्षालन (धुपण्याची क्रिया) या क्रियांनी अग्निज खडकांतील खनिजांचे एकत्रीकरण होऊन  अशी धातुके बनतात. यामध्ये यांत्रिक निक्षेपणाइतक्याच रासायनिक आणि जीवरासायनिक यंत्रणाही महत्वाच्या आहेत. अंदुकी हेमॅटाइट, सिडेराइट, कधीकधी लिमोनाइट तसेच वाळूचे कण व जीवाश्म (शिळारूप झालेले जीवांचे अवशेष) यांच्याबरोबर मिसळलेले हेमॅसाइट ही अशा धातुकांची उदाहरणे होत.

संस्पर्शी  धातुके: ही धातुके अग्निज व गाळाच्या (उदा., चुनखडक) खडकांच्या सीमावर्ती भागांत आढळतात. या दोन्ही प्रकारच्या खडकांमध्ये प्रक्रिया होऊन बनलेली ही धातुके विस्तृतपणे आढळतात. सामान्यपणे यांचे वडीसारखे किंवा ओब़डधोबड प्रतिष्ठापित पिंड गाळाच्या खडकात आढळतात. यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे मॅग्नेटाइट, हेमॅटाइट व त्यांच्याबरोबर पायराइट व कार्बोनेटी धातुके असतात.

जलतापीय धातुके : ही गरम विद्रावांच्या क्रियेने बनलेली असतात. असे विद्राव खडकांच्या उघडया पडलेल्या भेगा-पोकळ्यांत भरले जातात. मग अनुकूल संघटनाच्या विरघळणाऱ्या खडकात (उदा., बहुधा चुनखडक) अन्य खनिजे प्रतिष्ठापित होऊन बहुधा सिडेराइट व कधीकधी लोह ऑक्साइडाचे असे निक्षेप बनतात.

परिवर्तित धातुके: जीवरासायनिक व संहतीकरणाच्या (एकत्रीकरणाच्या) प्रक्रियांनी धातुक परिवर्तनाच्या मालिका सुरू होऊन त्यांद्वारे ही धातुके बनतात. यांच्यात प्राणिज व वनस्पतिज घटकही असतात. चुंबकीय टॅकोनाइट व हेमॅटाइटाचा एक प्रकार ही यांची उदाहरणे होत.

बहुरूपे : लोखंडाची तीन बहुरूपे चांगली  माहीत आहेत. आल्फा लोखंड ७६८° से. पर्यंत स्थिर असते. हे शरीरकेंद्रित घनीय [⟶स्फटिकविज्ञान] संरचनेचे असून ७६८° से.  तापमानाला लोह चुंबकीय होते. कारण याच्या स्फटिकरचनेत बदल न होता इलेक्ट्रॉनीय संरचनेत बदल होतो. हे मऊ, तन्य, करडसर पांढरे असून याचे ताणबल उच्च असते. ९०६° से. तापमानाला याचे गॅमा लोखंडात रूपांतर होते. गॅमा लोखंड फलककेंद्रित घनीय संरचनेचे व समचुंबकी (म्हणजे चुंबकाचा अल्प परिणाम होणारे) असते याचा Fe3C (आयर्न कार्बाइड) बरोबर ⇨ घन विद्राव होतो म्हणून पोलादनिर्मितीच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. १,४०३° से.पेक्षा अधिक तापमानाला डेल्टा लोखंड निर्माण होते. ते शरीरकेंद्रित घनीय संरचनेचे असून १,५३६° से. तापमानापर्यंत आढळते. याची याहून अधिक माहिती उपलब्ध नाही. या तापमानापासून लोखंड सावकाश थंड केल्यास डेल्टा लोखंडाचे गॅमा लोखंडात व नंतर गॅमा लोखंडाचे आल्फा लोखंडात असे उलट परिवर्तन होते. तथापि यात इतर मूलद्रव्ये मिसळलेली असल्यास ही क्रिया मंदावते अथवा काही प्रमाणात किंवा पूर्णपणे थांबते.

एके काळी बीटा लोखंड हे स्वतंत्र बहुरूप मानीत परंतु ते गॅमा लोखंडाचा आल्फा लोखंडातील घन विद्राव असल्याचे आढळले आहे. यामुळे आता हे स्वतंत्र बहुरूप मानीत नाहीत.

गुणधर्म : लोखंडाचे गुणधर्म इतर⇨ संक्रमणी  मूलद्रव्यांसारखे विशेषेकरून कोबाल्ट व निकेल या धातूंसारखे असून रुथेनियम व ऑस्मियम यांच्याशीही या बाबतीत लोखंडाचे साम्य आहे.

लोखंड शुद्ध करणे अवघड व खर्चिक असून शुद्ध लोखंड क्वचितत्व मिळवितात. याचा अर्थ लोखंडाचे वापरात असलेले सर्व प्रकार हे या ना त्या प्रकारे अशुद्धच असतात उलट अपेक्षित गुणधर्म आणण्यासठी त्यात प्रमाणात इतर मूलद्रव्ये (अशुद्धी)  मिसळतात. आयर्न पेंटाकार्बोनिलाचे अपघटन (रेणूचे लहान तुकडे करण्याची क्रिया) करून मिळणारे चूर्णरूपातील लोखंड हे सर्वाधिक शुद्ध असते.

लोखंडाचा रंग रुपेरी पांढरा असून त्याला चांगली झिलई करता येते. ते वर्धनशील (ठोकून आकार देता येण्यासारखे) व तन्य(तार काढता येण्यासारखे) आहे. लोखंड ही कोबाल्ट व निकेल यांच्यानंतरची सर्वाधिक चिवट धातू असून तापानुशीतन करता येणारी एकमेव धातू आहे. अतिशय कमी तापमानाला लोखंड अतिशय ठिसूळ असते तापवून लाल झाले की, ते मऊ होते आणि पांढरे दिसेपर्यंत तापविल्यास याचे वितळजोडकाम करता येते. पोलादापेक्षा याचे ताणबल (ताणलेल्या स्थितीत न फाटता सहन करू शकणारे महत्तम प्रतिबल) कमी असून शुद्ध लोखंडाचे ताणबल तर पितळाचे काही प्रकार व ॲल्युमिनियम यांच्यापेक्षा कमी असते. म्हणून ते बांधकामात वापरता येत नाही. थंड स्थितीत ठोकून लोखंडाचे बल व कठिनता बरीच वाढविता येते. मात्र यामुळे तन्यता घटते. असे लोखंड सु. ६००° से. पर्यंत तापवून कोठी(सर्वसाधारण) तापमानापर्यंत थंड केल्यास त्याला मूळचे गुणधर्म प्राप्त होतात. तांबे, ॲल्युमिनियम यांसारख्या महत्वाच्या इतर धातूंपेक्षा लोखंडाची विद्युत् व उष्णता संवाहकता बरीच कमी आहे.

लोखंड चुंबकीय आहे म्हणजे ते चुंबकाकडे आकर्षित होते. हा त्याचा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे. निकेल व कोबाल्ट यांच्यापेक्षा लोखंड जास्त चुंबकीय आहे. लोखंडाचे चुंबकीकरण सुलभपणे करता येते पण त्यात चुंबकत्व टिकून रहात नाही. म्हणून याचा उपयोग विद्युत् चलित्र(मोटर), रोहित्र (विद्युत् दाब बदलणारे साधन), ⇨अभिचालित्र वगैरेत करतात. ७६८°से. या  क्यूरी बिंदूपेक्षा अधिक तापमानाला यांचे लोहचुंबकत्व पूर्णपणे निघून जाते व ते अगदी दुर्बळ चुंबकीय (समचुंबकीय) बनते [⟶चुंबकत्व].

माफक तापमानाला लोखंडाचा बहुतेक अधातूंशी (उदा., ऑक्सिजन, क्लोरीन, फॉस्फरस, गंधक वगैरे) प्रत्यक्ष संयोग होतो. मात्र नायट्रोजनाशी असा संयोग होत नाही. हायड्रोक्लोरिक व सल्फ्यूरिक अम्लांमध्ये लोखंड विरघळून हायड्रोजन वायू निर्माण होतो. नायट्रिक अम्लात लोखंड विरघळताना तापमान व अम्लाची संहती (विद्रावातील प्रमाण) यांच्यानुसार नायट्रस, नायट्रिक किंवा नायट्रोजन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. तीन नायट्रिक अम्लात लोखंड विरघळत नाही व त्याच्यात ते अक्रिय बनते. क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या) विद्रावांचा लोखंडावर परिणाम होत नाही ऑक्सिडीकारकाबरोबर मात्र यावर क्षारांची विक्रिया होऊन फेरेटे बनतात. उच्च तापमानाला लोखंडाची अमोनियाशी विक्रिया होऊन हायड्रोजन व आयर्न नायट्राइड (Fe4N2)निर्माण होतात.लोखंड चांगले क्षपणकारक [⟶ क्षपण] असून यामुळे कार्बन मोनॉक्साइड व कार्बन डाय-ऑक्साइड यांचे क्षपण होऊन फेरस ऑक्साइड बनते.


दमट व खारट हवेत लोखंडाचे ऑक्सिडीभवन जलदपणे होते, तर अम्लानी त्यांचे संक्षारण होते. अशा रीतीने सरळ रासायनिक विक्रिया अथवा विद्युत् रासायनिक क्रिया होऊन लोखंडाचे संक्षारण होते. गंजणे हा विद्युत् रासायनिक आविष्कार असून तो सर्वत्र आढळतो व हा संक्षारणाचा सर्वात त्रासदायक प्रकार आहे.

गंजणे म्हणजे लोखंडाचे मूळच्या अशुद्धियुक्त स्थितीत (ऑक्साइडरूपात) जाणे होय. याचे दोन टप्पे असतात. (१) दमट हवेने लोखंडाचा पाण्याशी संयोग होऊन ते विद्राव्य(विरघळण्याच्या) स्थितीत जाते. पाण्यातील हायड्रोजन अणूंच्या जागी लोखंडाचे आयन (विद्युत् भारित अणूचा रेणू) येतात आणि हायड्रोजन लोखंडाच्या पृष्ठभागी पटलाच्या रूपात पसरतो. यामुळे लोखंडाचे पुढील विक्रियेपासून रक्षण व्हायला हवे. तथापि हवेतील ऑक्सिजनामुळे असे घड़त नाही. (२) दुसऱ्या टप्प्यात हायड्रोजनाचा वा ऑक्सिजनाशी संयोग होऊन पाणी बनते आणि या पाण्याची विद्रावातील लोखंडाशी विक्रिया होऊन फेरिक हायड्रॉक्साइड [Fe(OH)3] बनते. अखेरीस या हायड्रॉक्साइडाची हवेबरोबर विक्रिया होऊन त्याचे हळूहळू गंजात (Fe2O3) रूपांतर होते. गंज सच्छिद्र असतो व त्यामुळे त्याच्या थरातूनही लोखंडाचा हवेशी संपर्क येऊ शकतो. अशा प्रकारे गंजण्याची क्रिया पुढे चालू रहाते. अशुद्धी, ताण व उच्च तापमान यांच्यामुळे या क्रियेची गती वाढते.

उच्च तापमानाला लोखंडाचे होणारे ऑक्सिडीभवन हे एक प्रकारचे गंजणे आहे. यामध्ये हवेतील ऑक्सिजनाशी लोखंडाचा संयोग होऊन मॅग्नेटाइड (Fe3O4) बनते आणि ४००° ते ५००° से. दरम्यान हेमॅटाइट(Fe2O3) बनते. याहून अधिक तापमानाला बुस्टाइट हा आणखी एक थर तयार होतो.  [⟶गंजणे].

अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). विद्रावामध्ये फेरस व फेरिक आयनांची पोटॅशियम फेरोसायनाइड, फेरीसायनाइट वा सल्फोसायनाइड यांच्या विक्रिया करून लोखंडाचे आभिज्ञान करतात. उदा., फेरिक आयनामुळे सल्फोसायनाइड विक्रियकाला रक्तासारखा तांबडा रंग येतो. लोखंडाचे क्षारकीय फॉर्मेटामध्ये अवक्षेपण करून (न विरघळणारा साका मिळवून) ते मँगॅनीज, कोबाल्ट, निकेल, तांबे, जस्त, कॅडमियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम व बेरियम यांपासून वेगळे करतात तर प्रबल अम्लीय विद्रावांतून क्यूपफेरॉन विक्रियकाच्या साहाय्याने फेरिक क्यूपफेरॉनेटाचे अवक्षेपण करून ते ॲल्युमिनियम, क्रोमियम, बेरिलियम, मँगॅनीज, जस्त, कोबाल्ट व निकेल यांच्यापासून वेगळे करतात. तसेच Fe2O3 मध्ये अवक्षेपण करून लोखंडाचे भारात्मक निश्चितीकरण करतात.

उपयोग : लोखंडाचा सर्वाधिक वापर संरचनात्मक पोलादे बनविण्यासाठी होतो. ते बीड व घडीव लोखंड बनविण्यासाठीही वापरले जाते. बांधकाम व अभियांत्रिकीय उद्योग यांच्यामध्ये वापरले जाणारे लोखंड हे सर्वकामी उपयुक्त द्रव्य आहे. याच्या शेकडो मिश्रधातू (उदा., पोलादांचे प्रकार) अशा रीतीने वापरले जातात. तसेच लोखंड व त्याच्या संयुगांचा निरनिराळ्या असंख्य ठिकाणी वापर केला जातो.

सर्वांत शुद्ध (९९.९९%) लोखंड वैज्ञानिक संशोधनामध्ये वापरतात. पिंडरूपातील लोखंड हे व्यापारी दृष्टीने शुद्ध लोखंड समजले जाते. याच्यात विविध प्रकारच्या अशुद्धींचे प्रमाण ०.०६% पर्यंत असते. हे लोखंड अतिशय महाग असते. म्हणून अतिशय तन्यता, संक्षारणरोधकता, चुंबकीय पार्यता किंवा विद्युत् संवाहकता या गुणधर्मांची आवश्यकता असते, तेव्हाच ते तयार करून वापरतात. घडीव लोखंडही व्यापारी दृष्ट्या शुद्ध लोखंड (०.०८ कार्बन) मानतात. यात अत्यल्प प्रमाणात आयर्न सिलिकेट मिसळलेले असते. यामुळे हे सहज गंजत नाही व याला शिणवटाही सहजगत्या येत नाही. ओतीव लोखंडात शुद्ध लोखंडाचे थोडेच गुणधर्म असतात. उपयोगानुसार त्याच्यावर संस्करण करून ते पांढरे, करड़े, वर्धनशील वा तन्य  गुणधर्माचे बनवितात. लोखंड(५८) हा समस्थानिक चुंबकत्व आणि हीमोग्लोबिनाचे अनुजात(त्यापासून बनलेली इतर संयुगे) यांच्या अभ्यासात आणि अत्यंत बिनचूक अणुकेंद्रीय घड्याळ बनविण्यासाठी वापरतात.

गंधक, फॉस्फरस, सिलिकॉन, मँगॅनीज इ. अशुद्धींबरोबर जेव्हा लोखंडातील कार्बनाचे प्रमाण ०.०५% जवळ येते तेव्हा त्याला पोलाद म्हणतात. पोलादात  लोखंड व कार्बन असतातच, शिवाय त्यात मर्यादित प्रमाणात इतर मूलद्रव्येही असतात. ओतीव पोलाद तन्य व वर्धनशील  असते. पोलादात कार्बन एकसारखे समाविष्ट करीत गेल्यास त्याचे प्रमाण २%होईपर्यंत पोलादाची तन्यता घटते व नंतर ते अतिशय ठिसूळ होते म्हणजे ओतीव पोलाद कठीण असतेच असे नाही.

नैसर्गिक व संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार केलेली) आयर्न ऑक्साइडे व हायड्रॉक्साइडे रंगद्रव्ये म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जातात (उदा., शाई, आरेखनांच्या नील प्रतींचा कागद, रूज हे लालसर छटेचे द्रव्य, काव वा गेरू, पिवडी इ. ) कारण ती स्वस्त असून त्याचा रंग पक्का बसू शकतो. फिकट ते गडद पिवळा, नारिंगी, तपकिरी, तांबडा, डाळिंबी, काळसर इ. अनेक छटांसाठी ती वापरतात. तपकिरी व तांबडा या छटांसाठी ती सर्वाधिक वापरली जातात. हेमॅटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट, पायराइट व सिडेराइट ही खनिजे रंगीत मात्यांच्या रूपात निसर्गात आढळतात. या रंगीत मात्या जगात अनेक भागांत सापडतात. त्रिसंयुजी लोखंडावर जटिल आयर्न सायनाइड हेक्झॅसायनोफेरेटाची प्रक्रिया करून ‘प्रशियन ब्लू’ हे गडद निळे रंगद्रव्य मिळते. ते रंगलेप, लॅकर व एनॅमल यांच्यात वापरतात. अशी लोखंडाच्या संयुगांपासून बनविण्यात येणारी रंगद्रव्येही पुष्कळ आहेत. अपघर्षकामध्येही (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणाऱ्या पदार्थामध्येही) लोखंडाची संयुगे वापरतात.

औषधिद्रव्यांच्या निर्मितीच्या दृष्टीने लोखंडाची अनेक संयुगे उपयुक्त आहेत. उदा., फेरस ग्लुकामेट, फेरिक ब्रोमाइड, फेरिक सायट्रेट, फेरिक हायपोफॉस्फाइड, फेरिक मॅलेट, फेरिक फॉस्फेट, फेरिक आल्जिनेट, फेरिक अमोनियम ऑक्झॅलेट व टार्ट्रे‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ट, फेरिक आर्सेनाइट, फेरिक बेंझोएट वगैरे.

रक्तक्षयावर ॲलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदातही लोहयुक्त औषधे देतात. असे लोह रोग्याला तोंडावाटे व अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देतात. असे औषध प्रत्येक वेळी किती द्यावे व दिवसातून किती वेळा द्यावे हे ठरलेले असते. फेरस सल्फेट, फेरस ग्लुकामेट, फेरिक अमोनियम सायट्रेट, फेरिक क्विनीन सायट्रेट इ. औषधे तोंडावाटे देतात तर सॅकरेटेड आयर्न ऑक्साइड शिरेतील अंतःक्षेपणाने देतात. शक्तिवर्धक औषधांतही लोहसंयुगे असतात.


संयुगे : लोखंडाची फेरस व फेरिक अशी दोन प्रकारची चांगली विक्रियाशील संयुगे तयार होतात. शिवाय उच्चतर तापमानाला याची बोरॉन, कार्बन, सिलिकॉन, गंधक, फॉस्फरस यांच्याबरोबर द्वि-अंगी (द्वैती) संयुगे, तसेच सायनाइडे, ऑक्झॅलेटे, फेरेटे, परफेरेटे वगैरेंसारखी जटिल संयुगेही बनतात. लोखंडाच्या + २ व + ३ या सर्वांत महत्वाच्या ऑक्सिडीभवन अवस्था [⟶ ऑक्सिडीभवन] आहेत. शिवाय + ४ व + ६ या ऑक्सिडीभवन अवस्थांतील संयुगेही आहेत.( उदा., FeO42– या आयनात लोखंडाची संयुजा ६ असून तो तीव्र ऑक्सिडीकारक असल्याने अम्लीय विद्रावात अस्थिर असतो). लोखंड हायड्रोक्लोरिक आणि सौम्य सल्फ्यूरिक यांसारख्या अनॉक्सिडीकारक अम्लात विरघळविल्यास + २ वा फेरस [लोखंड (II)]अवस्था मिळते. फेरस संयुगांच्या विद्रावात फिकट हिरवा Fe2 + आयन असतो. ह विद्राव हिरवट असून हवेने ऑक्सिडीभवन होऊन फेरिक संयुग बनू शकते. फेरिक संयुगाच्या विद्रावात + ३ ऑक्सिडीभवन अवस्थेतील फेरिक [लोखंड (III)] म्हणजे Fe3+ आयन असतो. जलीय विच्छेदनानुसार (पाण्याच्य विक्रियेने घटक अलग होण्याच्या क्रियेनुसार) विद्रावाचा रंग पिवळा ते नारिंगी ते तपकिरी असतो. लोखंड ऑक्सिडीकारक अम्लात विरघळविल्यास किंवा फेरस विद्रावांचे ऑक्सिडीभवन केल्यास फेरिक अवस्था मिळते.

लोखंड अतिविक्रियाशील धातू असल्याने याची अनेक संयुगे बनतात. ती निरनिराळ्या खनिजांत व जीवांमध्ये आढळतात. मुख्यतः रंगद्रव्ये, औषधे, कीटकनाशके, पॉलिशे वगैरेंमध्ये यांचा उपयोग होतो. लोखंडाच्या काही महत्वाच्या संयुगांची माहिती थोडक्यात येथे दिली आहे.

फेरस ऑक्साइड 🙁 FeO आयर्न मोनॉक्साइड). हिरवट ते काळसर रंगाचे हे चूर्ण पाण्यात व क्षारांत विरघळत नाही. हे शुद्ध रूपात मिळत नाही. निसर्गात हे ब्युएस्टाइट या खनिजाच्या रूपात आढळते. फेरस संयुग हवेविना तापवून अथवा फेरिक ऑक्साइडावरून हायड्रोजन पाठवून हे तयार करता येते. ते मुख्यतः उष्णता- शोषक काचेत रंगद्रव्य म्हणून वापरतात.

फेरिक ऑक्साइड: (Fe2O3)याचे तांबडे वा काळे स्फटिक वा घट्ट गोळे आढळतात. काव किंवा गेरू (मुख्यत्वे हेमॅटाइट) या रूपात हे आढळते. याचा रंग नारिंगी, तांबडा, तपकिरी तांबडा ते चकचकीत काळा असून याचे वि. गु. ५.१२ ते ५.२४ व वितळबिंदू १,५६५° से. आहे. हे पाण्यात विरघळत नाही पण अम्लांत विरघळते. आयर्न डाय सल्फाइडाचे ऑक्सिडीभवन करून अथवा फेरस हायड्रॉक्साइड, फेरस सल्फेट वा अन्य लोहसंयुगे हवेत उच्च तापमानाला भाजून मिळते. रंगद्रव्ये (रबर, कागद, लिनोलियम, रंगलेप इ. उद्योगांत) म्हणून याचा मुख्यत्वे उपयोग होतो. लोखंडी बांधकाम, जहाजाचा सांगाडा इत्यादींना रंग देण्यासाठी याची उच्च दर्जाची पूड काचसामान, मौल्यवान धातू, हिरे वगैरेंना पॉलिश करण्यासाठी, तसेच वायुपरिष्करण, औषधे, सौंदर्यप्रसाधने, चुंबकीय फिती वगैरेंच्या निर्मितीत आणि रंगबंधक, विक्रियाकारक व रूज म्हणून हे वापरतात.

फेरोफेरिक किंवा फेरेसोफेरिक ऑक्साइड : (Fe3O4 अथवा FeO. Fe2O3). हे चुंबकीय ऑक्साइड मॅग्नेटाइटाच्या रूपात सर्वत्र आढळते. यात फेरस व फेरिक या दोन्ही अवस्थांतील लोह आढळते. याचे काळे ते तांबूस काळे स्फटिक सापडतात. तापलेल्या लाल लोखाडावरून वाफ वा मोजकी हवा जाऊ दिल्यास, फेरस संयुगाचे अपूर्ण ऑक्सिडीभवन केल्यास तसेच फेरस व फेरिक ऑक्साइडांचे किंवा फेरिक ऑक्साइड व लोखंड यांचे मिश्रण तापविल्यास हे मिळते. उलट हवेत तापविल्यास फेरिक ऑक्साइड मिळते. अम्लाबरोबर याची विक्रिया केल्यास फेरस आणि फेरिक संयुगे बनतात. फेराइटे, संगणकाची स्मृती, चुंबकीय फितीवरील लेप इत्यादींमध्ये हे वापरतात. शिवाय रंगद्रव्य म्हणून व पॉलिश करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

फेरस हायड्रॉक्साइड : [Fe(OH)2]याची पांढरी पूड अथवा फिकट हिरवट स्फटिक असतात. हे तीव्र क्षारक असून पाण्यात थोडे तर अमोनियाच्या विद्रावात अधिक विरघळते. हवेत उघडे पडल्यास हे ऑक्सिडीभवनाने प्रथम हिरवे व नंतर तांबूस तपकिरी होते.

फेरिक हायड्रॉक्साइड : [Fe(OH)3 हायड्रेटेड फेरिक ऑक्साइड]. फेरिक संयुगाच्या विद्रावात क्षार मिसळून हे तयार करतात. हे तपकिकी रंगाचे असून ५००° से. तापमानापर्यंत तापविल्यास यापासून फेरिक ऑक्साइड मिळते. पाण्याचे शुद्धीकरण व औषधे यांच्यात तसेच सोमलाच्या विषबाधेवरील उतारा व रंगद्रव्य म्हणून हे वापरतात.

फेरस सल्फेट :[Fe SO4 ( बहुधा 7H2O)]. याला हिराकस, ग्रीन व्हिट्रिऑल अथवा कॉपेरास असेही म्हणतात. लोह धातुकावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करताना उपपदार्थ म्हणून हे मिळते. तसेच पायराइटाचे हवेत ऑक्सिडीभवन केल्यासही हे मिळते. याचे हिरवे वा हिरवट निळे स्फटिक असून कोरड्या हवेत त्यांचा भुगा होतो. हे पाण्यात बरेच विरघळते. अन्य फेरस सुंयुगे बनविणे, लोखंडाचे विद्युत् विलेपन करणे, पाणी व सांडपाणी यांच्यावर संस्करण करणे आणि लाकूड टिकविणे  यांसाठी हे वापरतात. शिवाय क्षपणकारक म्हणून आणि शाई, खते, औषधे, रंगद्रव्ये, पीडकनाशके, कापड उद्योग, चर्मोद्योग इत्यादींमध्ये याचा उपयोग होतो.

फेरिक सल्फेट : [Fe2 (SO4)3]. फेरस सल्फेटाच्या गरम विद्रावात सल्फ्यूरिक अम्ल व ऑक्सिडीकारक (उदा.,नायट्रिक अम्ल किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड)टाकून हे मोठ्या प्रमाणावर बनवितात. लोहयुक्त तुरटी व फेरिक संयुगे बनविणे, पाण्यवर संस्करण करणे, जमिनीचा पोत सुधारणे, पॉलिश करणे यांकरिता तसेच कापडउद्योग, औषधे, कीटकनाशके व वैश्लेषिक रसायनशास्त्र यांमध्येही हे वापरतात.

फेरस क्लोराइड: (FeCl2). याचे स्फटिक रंगहीन, पिवळे किंवा हिरवे आणि आर्द्रताशोषक असतात. लोखंडावरून शुष्क हायड्रोक्लोरिक वायू जाऊ देऊन, फेरिक क्लोराइडाचे हायड्रोजनाचे क्षपण करून अथवा लोखंड हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळवून हे तयार होते. हे हवेत तापविल्यास फेरिक क्लोराइड व फेरिक हायड्रॉक्साइड तयार होतात. हे एथिल अल्कोहॉल व ॲसिटोनमध्ये विरघळते. रंगबंधक व क्षपणकारक म्हणून तसेच फेरिक क्लोराइड बनविण्यासाठी याचा उपयोग होतो.

फेरिक क्लोराइड : ( FeCl). तापलेल्या लोखंडाची शुष्क क्लोरिनाशी किंवा तापलेल्या  आयर्न ऑक्साइडाशी  हायड्रोक्लोरिक अम्लाची क्रिया करून अथवा फेरस क्लोराइडाच्या ऑक्सिडीभवनाने हे तयार करतात. याचे स्फटिक तांबडे असून परावर्तित प्रकाशात ते हिरवे दिसतात. याचा उकळबिंदू ३१०° से. असून हे पाणी तसेच एथिल व मिथिल अल्कोहॉलांत थोड्या प्रमाणात विरघळते. पाण्यात याचे जलीय विच्छेदन सहजपणे होते. याचा उपयोग इतर लोह संयुगे बनविण्यासाठी, औषधांत, क्लोरिनीकरणासाठी  व पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तसेच ऑक्सिडीकारकस रंगबंधक आणि अम्लरेखनाचे संयुगे म्हणूनही होतो.

फेरिक नायट्रेट : [Fe (NO3)3. 9H2O]. याचे स्फटिक करडे, पांढरे असून हे पाणी, ॲसिटोन आणि अल्कोहॉल यांत विरघळते. लोखंडावर १.११५ एवढे वि. गु. असलेल्या नायट्रिक अम्लाची  विक्रिया करून हे मिळवितात. औषधांत आणि वैश्लेषिक रसायनशास्त्रात, रंगबंधक म्हणून तसेच कातडी कमावण्यासाठी व रेशमाला जडपणा आणण्यासाठी हे वापरतात.

फेरस सल्फाइड : (FeS). हे तपकिरी काळे असून लोखंड व गंधक यांचा थेट संयोग करून तयार करतात. यावर अम्लाची  विक्रिया केल्यास अम्लानुसार फेरस संयुग व हायड्रोजन सल्फाइड मिळतात. रंगद्रव्य व हायड्रोजन सल्फाइडाचा उद्‌‌‌‌‌‌‌‌गम म्हणून आणि मृत्तिका उद्योगात हे वापरतात.


पायराइट: (FeS2सुवर्णमाक्षिकस आयर्न डायसल्फाइड). फेरस सल्फेट व जादा प्रमाणात गंधक एकत्र तापवून हे तयार करतात. हवेत तापविल्यास याच्यापासून फेरिक ऑक्साइड व सल्फर डाय-ऑक्साइड मिळतात. सल्फ्यूरिक अम्ल बनविण्यासाठी हे खनिज वापरतात. स्वस्त दागिन्यांत व रेडिओ शोषकात (रेडिओ ग्राहीतील तरंगाचे अविरूपण करणाऱ्या भागात) तसेच सोने, चांदी व तांबे मिळविण्यासाठीही हे वापरतात.

फेरस ॲसिटेट : [Fe(C2H3O2)2. 4H2O] हे शुद्ध रूपात रंगहीन असून पाण्यात विरघळते. मुख्यतः रंगबंधक म्हणून व कॅलिको छपाईत याचा उपयोग होतो.

फेरिकॲसिटेट : [Fe(C2H3O2).OH]. फेरिक हायड्रॉक्साइड किंवा लोखंडावर ॲसिटिक अम्लाची क्रिया करून व नंतर त्याचे हवेत ऑक्सिडीकरण करून हे तयार करतात. हे तांबडे, तपकिरी ते काळे चूर्ण अम्ले आणि एथिल अल्कोहॉलात विरघळते. इतर लोह संयुगे मिळविण्यासाठी, कापड उद्योगात रंगबंधक म्हणून, औषधनिर्मिती, कीटकनाशके, छायाचित्रण, ⇨ मुद्रित मंडले वगैरेंमध्ये हे वापरले जाते.

बेसिक फेरिक ॲसिटेट : [Fe (OH) (C2H3O2)2].  फेरिक ॲसिटेटाचा विद्राव तापवून मिळणारा निक्षेप हवेच्या संपर्कात वाळवून हे तयार करतात. कापड उद्योगात रंगबंधक म्हणून, कापड वजनदार होण्यासाठी व लाकडाचे संरक्षण करण्यासाठी आणि औषधांमध्ये याचा उपयोग होतो.

आयर्न पेंटाकार्बोनिक : [Fe (CO)3]. विशिष्ट परिस्थितीत लोखंड व कार्बन मोनॉक्साइड यांच्यात विक्रिया घडवून आणून हे तयार करतात. एथिल अल्कोहॉल व खनिज तेल यांत हे विरघळते. हे ज्वालाग्राही असून आपोआप पेट घेऊ शकते. हे मुख्यत्वे अतिशय शुद्ध लोखंड व आयर्न ऑक्साइड बनविण्यासाठी वापरतात.

फेरिक फॉर्मेट : [Fe (CHO)3].याचे निर्जल स्फटिक तांबडे, तर पाण्याचा एक रेणू असलेले स्फटिक पिवळे असतात. जलीय विच्छेदनाने यापासून फेरिक ऑक्साइड व फॉर्मिक अम्ल मिळतात. म्हणून हिरवा चारा साठविण्याच्या ठिकाणी योग्य तेवढी अम्लता राखण्यासाठी  हे वापरतात.

फेरिक फेरोसायनाइड : (नीळ, आयर्न ब्ल्यू). याचे चिनी, प्रशियन व टोर्निग हे तीन प्रमुख प्रकार आहेत. नीळ तयार करण्याची कृती व कणांचे आकारमान यांनुसार या प्रकारांची चकाकी व रंगछटा वेगवेगळ्या असतात. रंग, रंगद्रव्ये, छपाईची व कार्बन कागदाची शाई, लिनोलियम, तसेच कागद लगदा, धुलाई व कापड उद्योगांत हे प्रकार वापरतात.

पोटॅशियम  फेरिसायनाइड : [K3 Fe (CN)6].पोटॅशियम फेरोसायनाइडाच्या पाण्यातील विद्रावाचे क्लोरिनाने ऑक्सिडीभवन करतात. मग बाष्पीभवन व पोटॅशने क्षारीयीकरण करतात आणि नंतर स्फटिकीभवन करून हे मिळते. याचा रंग चमकदार तांबडा असून हे पाण्यात विरघळते. निळसर छटांचे रंग, तसेच नील प्रतीचा व छायाचित्रीय कागद यांच्या निर्मितीत हे वापरतात.

पोटॅशियम  फेरिसायनाइड :[K4 Fe(CN)6. 3H20]. हे लिंबासारखे पिवळे असून पाण्यात आणि ॲसिटिलिनात विरघळते. रंग व स्फोटक मिश्रणांची निर्मिती, विद्युत् विलेपन, कापड छपाई, शिळामुद्रण इत्यादींत हे वापरतात.

फेरस अमोनियम सल्फेट : [Fe (SO4) (NH4)2 SO4.6H2O]. (मोर लवण). फेरस सल्फेट व अमोनियम सल्फेट यांच्या विद्रावांपासून याचे फिकट हिरवे स्फटिक मिळतात. हवेने याचे ऑक्सिडीभवन सहज होत नाही. म्हणून हे रासायनिक विश्लेषणात फेरस साधन मिळविण्यासाठी वापरतात.

फेरिक  अमोनियम सल्फेट : [FeNH4(SO4)2 . 12 H2O].याचे लिलॅक ते जांभळ्या रंगाचे स्फटिक असून ते फुलारतात (त्यांची लाही बनते) व पाण्यात विरघळतात. फेरिक व अमोनियम सल्फेटांचे विद्राव मिसळतात, मग त्यांचे ऊर्ध्वपातन व स्फटिकीभवन करून हे मिळवितात. औषधांत, वैश्लेषिक रसायनशास्त्रात आणि रंगबंधक म्हणून याचा वापर करतात.

फेरिक पायरोफॉस्फेट :[Fe4 (P8O7). XH2O].हे पुष्कळदा पांडुरोगावरील औषध म्हणून वापरतात. जखमेवर लावावयाच्या औषधांत तसेच विविध फेरिक लवणे तयार करण्यासाठीही हे वापरतात. 

लोखंडाच्या काही महत्त्वाच्या खास मिश्रधातूंमधील निरनिराळ्या धातूंचे शेकडा प्रमाण (यांत उरलेला भाग लोखंड आहे येथे 50% हून जास्त लोखंड असलेल्या मिश्रधातूच दिलेल्या आहेत).

मिश्रधातूचा प्रकार

कार्बन 

मॅगॅनीज 

सिलीकॉन 

क्रोमियम 

निकेल 

कोबाल्ट 

टंगस्टन 

मॉलिब्डेनम 

ॲल्युमिनियम 

तांबे 

टिटॅनियम 

उष्णतारोधी

०.३०-०.५० 

 

 

१-२

८-३० 

 

०-७ 

 

 

 

 

 

 

 

मिश्रधातू ओतिवे 

०.२०-०.७५

 

२-२.५

१०-३०

८-४१

 

 

 

 

 

 

उष्णतारोधी

१.८-३ 

 

०.३-१.५ 

 

०.५-२.५ 

 

१५-३५ 

 

कमाल ५  

 

 

 

 

 

 

 

ओतीव लोखंड 

१.८-३ 

 

०.४-१.५ 

१-२.७५ 

१.७५-५५ 

१४-३० 

 

 

 

संक्षारणरोधी

 

०.१५-०.५ 

कमाल १ 

 

 

 

 

११.५-३० 

 

०-४ 

 

 

 

कमाल ०.५

 

 

 

 

मिश्रधातू ओतिवे 

०.०३-०.२० 

कमाल १.५ 

१.५  २ 

१८-२७ 

८-३१ 

 

 

 

 

 

 

संक्षारणरोधी 

 

१.२-४ 

०.३-१.५ 

०.५-३  

१२ १५  

कमाल ५ 

 

 

 

कमाल १ 

कमाल७ 

 

ओतीव लोखंड 

 

१.८-३ 

 

०.४-१.५ 

१-२ .७५ 

१.७५-५.५ 

१४-३२ 

 

 

 

 

 

 

चुंबकीय दृष्टया सौम्य मिश्रधातू

 

 

०.५-४.५ 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

३.५ 

१६

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

१६

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

१२

 

 

चिरचुंबकी मिश्रधातू  

 

 

 

 

 

 

१२ 

 

१७ 

 

 

 

 

 

 

 

 

१२ 

 

२० 

 

 

 

 

 

 

 

२० 

 

 

 

१२

 

 

 

 

 

 

 

१७ 

१२.५ 

 

 

१०

 

 

 

 

 

 

 

२५ 

 

 

 

१२

 

 

 

 

 

 

 

२८ 

 

 

 

१२

 

 

 

 

 

 

 

१४ 

२४ 

 

 

 

 

 

 

 

 

 

१५ 

२४ 

 

 

 

१.२५ 

कमी प्रसरणशील

०.१५ 

 

०.३० 

 

३६ 

 

मिश्रधातू 

०.२४ 

०.०३ 

४२

लोखंड 

(६१-५३)

०.५-२ 

०.५-२ 

४-५ 

३३-३५ 

 

१-३ 

 

 

 

 

  


 फेरस फॉस्फाइड : (Fe2P). पोलादाचे ओतकाम करताना त्याची प्रवाहिता वाढविण्यासाठी हे वापरतात. तसेच पोलादी पत्रे लाटताना व पोलादी तार काढतानाही याचे असे साहाय्य होते.

मिश्रधातू : लोखंडाच्या मिश्रधातू म्हणजे दोन वा अधिक धातूंचे घन विद्राव असून त्यांपैकी एक घटक लोखंड असते. उद्योगधंद्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या असंख्य मिश्रधातूंचा लोखंड एक घटक असतो. पोलादाचे विविध प्रकार निर्माण करताना त्यात टाकावयाच्या महत्त्वपूर्ण घटकांना लोहमिश्रके म्हणतात. वा मिश्रधातूंत लोखंडाबरोबर सिलिकॉन, मँगॅनीज, क्रोमियम, व्हॅनेडियम, मॉलिब्डेनम, निओबियम, सिलिनियम, टिटॅनियम, फॉस्फरस अथवा इतर काही मूलद्रव्यांपैकी एक वा अनेक मूलद्रव्ये मोठया प्रमाणात मिसळलेली असतात. खास उपयोगांसाठी बनविलेल्या पुष्कळ मिश्रधातूंचा लोखंड हा महत्त्वाचा घटक असतो. अशा खास मिश्रधातूंचे चुंबकत्व, विद्युत् रोध, उष्णतारोध, संक्षारणरोध व ऊष्मीय प्रसरण या बाबतींतील गुणधर्म असाधारण स्वरूपाचे असतात. अशा काही मिश्रधातूंची माहिती कोष्टकात दिली आहे.

औद्योगिक दृष्टीने उपयुक्त असलेल्या लोखंडाच्या असंख्य मिश्रधातू आहेत. मात्र खाली अधिक परिचित मिश्रधातूंची माहिती दिली आहे. येथे खास उपयोगांच्या मिश्रधातूंवर भर दिला असून त्यांच्यात लोखंडाबरोबर मिसळलेल्या मूलद्रव्याचे अथवा मूलद्रव्यांचे प्रमाण सापेक्षत: जास्त आहे. काही अपवाद वगळता लोखंडाचे प्रमाण ५०% हून कमी असणाऱ्या मिश्रधातू येथे व कोष्टकात विचारात घेतल्या नाहीत. विविध प्रकारच्या पोलादांची माहिती ‘पोलाद’ या नोंदीत दिलेली आहे.

लोखंड-ॲल्युमिनियम : पुष्कळ वेळा शुद्ध लोखंडाचे चुंबकीय गुणधर्म आदर्श स्वरूपाचे असतात. तथापि त्याची विद्युत् रोधकता कमी असते. म्हणून ते प्रत्यावर्ती (ठराविक काळाने दिशा बदलणाऱ्या) चुंबकीय मंडलांत वापरण्यायोग्य नसते. बऱ्याच प्रमाणात ॲल्युमिनियम मिसळल्यास लोखंडाची विद्युत् रोधकता वाढते आणि अशी मिश्रधातू प्रत्यावर्ती चुंबकीय मंडलांत वापरता येते.

लोखंड व ॲल्युमिनियम यांच्या तीन मिश्रधातू व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. यांपैकी दोन मिश्रधातूंस ॲल्युमिनियम १२ व १६% असते, तर तिसरीत १६%ॲल्युमिनियम व ३.५% मॉलिब्डेनम असते. या तिन्ही चुंबकीय दृष्टया सौम्य आहेत म्हणजे चुंबकीय क्षेत्रात त्यांचे चुंबकीकरण होत असले, तरी हे क्षेत्र काढून घेतल्यास त्यांचे चुंबकत्व सहजपणे निघून जाते.

लोखंडात आठ टक्क्यांहून जास्त ॲल्युमिनियम घातल्यास मिश्रधातू अगदी ठिसूळ बनते. तिच्या जोडकामात अडचणी येतात. त्यामुळे त्या वापरता येत नाहीत. ॲल्युमिनियम मिसळल्याने लोखंडाचा ऑक्सिडीभवनास होणारा विरोध लक्षणीय रीत्या वाढतो. उदा., ६%ॲल्युमिनियम असणारी एक मिश्रधातू (पोलाद) १,३००°से. तापमानापर्यंत ऑक्सिडीभवनास विरोध करू शकते.

लोखंड-कार्बन : घडीव बिडाचे (ओतीव) लोखंड, तसेच पोलादाचे विविध प्रकार या लोखंड व कार्बन यांच्या प्रमुख मिश्रधातू आहेत.

चांगल्या  गुणवत्तेचे घडीव लोखंड हे जवळजवळ शुद्ध लोखंड असते. यातील कार्बनाचे प्रमाण क्वचितच ०.०३५% हून जास्त असते. याव्यतिरिक्त यात ०.०७५ ते ०.१५% सिलिकॉन, ०.१० ते ०.२५% हून कमी फॉस्फरस, ०.०२% हून कमी गंधक आणि ०.०६ ते ०.०१ मँगॅनीज असते. कार्बनाचे प्रमाण कमी असल्याने कोणत्याही उष्णता संस्करण क्रियेने याचे गुणधर्म बदलता येत नाहीत.

विविध प्रकारचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म येण्याकरिता बिडात २ ते ४% कार्बन आणि सिलिकॉन, मँगॅनीज, फॉस्फरस व गंधक ही विविध प्रमाणांत मिसळलेली असतात. यांशिवाय निकेल, क्रोमियम, मॉलिब्ड्रनम, तांबे, टिटॅनियम ही मूलद्रव्ये अल्पप्रमाणात (व कधीकधी ३०% वा त्याहून अधिक प्रमाणात) मिसळतात.

पोलादे या लोखंडाच्या कार्बनयुक्त मिश्रधातू किंवा मिश्रपोलादे असतात. कार्बनयुक्त पोलादाचा गट अभियांत्रिकीय दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा असून २% हून कमी कार्बनयुक्त मिश्रधातूंना सामान्यपणे पोलाद म्हणतात.

कार्बनयुक्त पोलादांत मँगॅनीज, गंधक, फॉस्फरस, सिलिकॉन व कधीकधी इतर मूलद्रव्ये गौण प्रमाणांत असतात. सर्व कार्बनयुक्त पोलादांच्या यांत्रिक गुणधर्मात उष्णता संस्करणाने योग्य फेरबदल करता येतात. कारण या प्रक्रियेने पोलादाची सूक्ष्म संरचना बदलते. ०.२५% हून अधिक कार्बनयुक्त पोलाद उष्णता संस्करणाने अधिक कठीण करता येते. तथापि असे अंतिम उष्णता संस्करण न करताच ही पोलादे वापरतात [⟶ धातूंचे उष्णता संस्करण].

गुणधर्म समृद्ध (वृद्धिंगत) केलेल्या पोलादांना मिश्र पोलादे म्हणतात. एक वा अधिक खास मूलद्रव्ये मिसळून अथवा अधिक प्रमाणात मँगॅनीज वा सिलिकॉन मिसळून गुणधर्मांत अशी सुधारणा केलेली असते [⟶पोलाद].

लोखंड – क्रोमियम : यातील महत्त्वाच्या मिश्रधातू म्हणून घडीव अगंज पोलादे व उष्णतारोधी पोलादे या होत. या सर्वांमध्ये किमान १२% क्रोमियम असते. अगंजपणा हा गुणधर्म येण्यासाठी एवढे क्रोमियम लागतेच. मात्र यापेक्षा क्रोमियमाचे प्रमाण कमी (उदा., ५% क्रोमियम व ०.५% मॉलिब्डेनम) असल्यासही ६५०° से. तापमानापर्यंत ऑक्सिडीभवनास विरोध करण्याची पोलादाची क्षमता सुधारते. विडाच्या संक्षारणरोधी मिश्रधातूंमध्ये १२ ते ३५% पर्यंत क्रोमियम व ५%पर्यंत निकेल असते, तर बिडाच्या उष्णतारोधी मिश्रधातूंत १५ ते ३५% क्रोमियम व ५% पर्यंत निकेल असते.

पहिल्या महायुद्धाच्या काळात टंगस्टनाची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे टंगस्टनयुक्त चुंबकीय पोलादनिर्मिती होऊ शकत नव्हती. तेव्हा चिरस्थायी चुंबक बनविण्याकरिता उच्च कार्बनी पोलादांमध्ये १ ते ६% (बहुधा ३.५%) क्रोमियम घालीत असत.

लोखंड-क्रोमियम-निकेल : घडीव अगंज व उष्णतारोधी पोलादे हा यांतील प्रमुख गट आहे. उष्णता व संक्षारणरोधी ओतीव लोखंडांत क्रोमियम १५ ते ३५% तर निकेल ५% पर्यंत असते.

लोखंड – क्रोमियम-ॲल्युमिनियम : यांपैकी कित्येक मिश्रधातूंचे विद्युत् रोध तापन घटक बनवितात. यांमध्ये ७२% लोखंड, २३% क्रोमियम व ५%ॲल्युमिनियम आणि ५५% लोखंड, ३७.५% क्रोमियम व ७.५%ॲल्युमिनियम असते. याचे तापन घटक भट्‌ट्यांत वापरतात. या मिश्रधातू जास्तीत जास्त २,३५० से. पर्यंत वापरता येतात. याहून जास्त तापमानाला त्या काहीशा ठिसूळ बनतात व त्यांची लांबी वाढते. यामुळे तापन घटकाला जादा आधार द्यावा लागतो. निओबियम मिसळल्यास लांबीत वाढ होत नाही.

लोखंड, ७०% क्रोमियम व २३%व ॲल्युमिनियम आणि ५% लोखंड, ( व अल्पसे कोबाल्ट ) असलेल्या मिश्रधातूचीविद्युत् रोधकता उच्च असून वर्चसमापक व रोधक यांच्यातील विद्युत् रोधया मिश्रधातूचे बनवितात.


लोखंड-कोबाल्ट : .५% पर्यंत कोबाल्ट असणाऱ्या मिश्रधातू चुंबकीय दृष्टीने सौम्य असतात व त्यांची विद्युतीय रोधकता कमी असते. मात्र कोबाल्ट महाग असल्याने यांच्या वापरावर मर्यादा पडतात. ३०% हून अधिक कोबाल्ट असणाऱ्या मिश्रधातूंत आणखी काही धातू न मिसळल्यास अथवा त्यांच्यावर खास संस्करण न केल्यास त्या ठिसूळ होतात. कोबाल्ट ४९% व व्हॅनेडियम २% तसेच कोबाल्ट ३५% व क्रोमियम १% असणाऱ्या लोखंडाच्या दोन मिश्रधातू व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यांचे तापानुशीतन केल्यावर त्यांचा एकदिश व प्रत्यावर्ती विद्युत् साधनांत वापर करता येतो. या घटकांचे भिन्न प्रमाण असलेल्या दोन मिश्रधातू खास प्रकारची विद्युत् रोहित्रे (विद्युत् दाब बदलणारी साधने) व चलित्रे (मोटर्स), दूरध्वनी पटले, श्राव्यातील साधने वगैरेंमध्ये वापरतात. कोबाल्ट पोलादे नावाच्या उच्च कार्बनयुक्त मिश्रधातू पूर्वी चिरस्थायी चुंबकांसाठी वापरीत. त्या चुंबकीय दृष्टया कठीण म्हणजे चुंबकीकरण सहजपणे न होणाऱ्या  आहेत.

लोखंड-मँगॅनीज : यांपैकी ऑस्टेरिटिक मँगॅनीज पोलाद ही महत्त्वाची मिश्रधातू आहे. हिच्याविषयीचे संशोधन हॅडफील्ड गावी झालेले असल्याने हिला हॅडफील्ड मँगॅनीज पोलाद असेही म्हणतात. सामान्यपणे हिच्यात १-२% कार्बन आणि १२ ते १३% मँगॅनीज असते. झीज, आघात व धक्का यांना ही मिश्रधातू चांगली रोधक आहे.

लोखंड-निकेल : ४० ते ६०% निकेल असलेल्या मिश्रधातू चुंबकीय दृष्टीने सौम्य असतात. यांच्यापैकी ४५ ते ६०% निकेलयुक्त मिश्रधातू चुंबकीय विवर्धक, अभिचालित्र, स्पर्श एकदिशकारक इत्यादींमध्ये वापरतात. हायड्रोजनात यांच्यावर तापानुशीतनासारखे संस्करण करून यांचे गुणधर्म बदलतात आणि मग यांचा खास वापरांसाठी उपयोग होतो.

निकेलयुक्त मिश्रधातूंचा रेखीव प्रसरणाचा ऊष्मीय स्थिरांक कमी असल्याने त्यांना नीच प्रसरण मिश्रधातू म्हणतात. म्हणून या मिश्रधातू लांबीची मानके, मोजणीसाठी वापरण्यात येणारे दंड व फिती, विशिष्ट लंबक, तोलचक्रे., तापस्थापक, जेट एंजिनाचे भाग, इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती वगैरेंत वापरतात. निकेल ४२% असलेली मिश्रधातू तांब्याचा लेप दिल्यावर विजेच्या दिव्यांत व निर्वात नलिकांत वापरतात. निकेल ३६% व क्रोमियम १२% असणारी मिश्रधातू तापमानाच्या विस्तृत पट्ट्यातही विशेष प्रसरण पावत नाही. ९% निकेलयुक्त पोलादाचे यांत्रिक गुणधर्म कमी तापमानाला टिकून राहतात. त्यामुळे कमी तापमानाला वापरण्याच्या दृष्टीने या मिश्रधातू सोयीच्या आहेत.

लोखंड – सिलिकॉन : व्यापारी दृष्ट्या यांचे दोन महत्त्वाचे वर्ग करतात : (१) सहजपणे चुंबकीकरण करता येणाऱ्या म्हणजे चुंबकीय सौम्य मिश्रधातूंना सिलिकॉन वा विद्युतीय पोलादे म्हणतात. (२) उच्च सिलिकॉनयुक्त ओतीव लोखंड नावाने ओळखण्यात येणाऱ्या मिश्रधातू संक्षारणरोधक असतात.

चुंबकीय मंडलांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बहुतेक पोलादांत ०.५% ते ५% सिलिकॉन असते. याचे बहुधा पत्रे असतात. रोहित्रांचे गाभे, स्थाते, चलित्रांचे घूर्णक इत्यादींत या मिश्रधातू वापरतात. उच्च (१४ ते १७%) सिलिकॉन बीड आणि कधीकधी ३.५% पर्यंत मॉलिब्डेनमयुक्त बीड संक्षारणरोधी असते. यामुळे अम्ले हाताळवयाच्या सामग्रीकरिता आणि प्रयोगशाळेतील नळांसाठी ते वापरतात.

लोखंड-टंगस्टन : उच्चवेगी पोलादे नावाच्या विविध जटिल मिश्रधातूंमध्ये टंगस्टन असते. पहिल्या महायुद्धापूर्वी ६% टंगस्टन व ०.५% क्रोमियम असलेली लोखंडाची मिश्रधातू मुख्यत्त्वे चिरचुंबक बनविण्यासाठी तयार करीत असत.

कठीण पृष्ठभागाच्या मिश्रधातू : दर्शनी भाग कठीण करण्यासाठी धातूच्या किंवा मिश्रधातूच्या पृष्ठभागावर विशिष्ट संघटनाच्या मिश्रधातूचा थर वितळजोडकामाने जोडतात. यामुळे मूळ पृष्ठभागात नसलेले काही खास गुणधर्म त्याला प्राप्त होतात. अशा प्रकारे ज्या मिश्रधातूचा थर देतात ती मूळ धातूपेक्षा अपघर्षण, संक्षारक, उष्णता अथवा झीज यांना अधिक चांगला विरोध करणारी असते. अशा पुष्कळ व्यापारी मिश्रधातूउपलब्ध आहेत. लोखंडाच्या अशा मिश्रधातूंत सामान्यपणे ५०% हून जास्त लोखंड आणि क्रोमियम, मँगॅनीज, सिलिकॉन, मॉलिब्डेनम, व्हॅनेडियम, टंगस्टन, निकेल, टिटॅनियम, निओबियम, बोरॉन इ. इतर मूलद्रव्ये निरनिराळ्यसा प्रमाणांत मिसळलेली असतात. या इतर मूलद्रव्यांच्या एकूण प्रमाणानुसार या मिश्रधातूंचे १२% पर्यंत, १३ ते २५% आणि २६ ते ५०% असे तीन गट करतात.

चिरचुंबक मिश्रधातू : आता चिरचुंबकासाठी उच्च कार्बनी पोलादांऐवजी या मिश्रधातू वापरतात. यांचे संघटन अतिशय जटिल असून त्या चुंबकीय दृष्ट्या कठीण असतात. कोबाल्ट १२% व मॉलिब्डेनम १७% अथवा कोबाल्ट १२% व मॉलिब्डेनम २०% असणाऱ्या मिश्रधातू ही यांची उदाहरणे आहे त. कधीकधी यांच्यात निकेल, तांबे आणि टिटॅनियम धातूही असतात.

आघात, आंदोलने किंवा तापमानांतील बदल यांच्यामुळे पोलादाचे चुंबकत्व निघून जाते मात्र या प्रकारच्या मिश्रधातूंच्या बाबतीत असे होत नाही. चुंबकीय बळाचे मान व स्थैर्य हे गुणधर्म ज्यांच्या बाबतींत महत्त्वाचे असतात अशा ध्वनिवर्धक, वॉट-तास मापक, मॅग्नेट्रॉन, पीडन चलित्र, स्विचफलक उपकरणे इ. साधनांमध्ये या मिश्रधातू वापरतात.

पहा : पोलाद लोखंड व पोलाद उद्योग लोहमिश्रके

संदर्भ :  1. Cotton, F. A. Wilkinson, G. Advanced Inorganic Chemisry, NewYork, 1980  

            2. Hueey, J. E. Inorganic Chemistry, New York, 1978.  

            3. Mellor, J. W. A Comprehensiv Treatise on Inorganic and Theoretical Chemistry, London, 1934.

            4. Parkes, G. D. Mellor’s Modern Inorganic Chemistry, London,1961.

ठाकूर, अ.ना.