कारर, पॉल : (२१ एप्रिल १८८९—१८ जून १९७१). स्विस रसायनशास्त्रज्ञ. रसायनशास्त्राच्या १९३७ सालच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म मॉस्को येथे आणि शिक्षण झुरिक (स्वित्झर्लंड) येथे झाले. १९११ मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळविली. झुरिक येथील केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्ष काम केल्यावर, त्यांनी गेओर्क स्पायर हाऊस (फ्रॅंकफूर्ट-आम-मेन) येथे पॉल अर्लिक यांच्याबरोबर सहा वर्षे संशोधन केले. १९१८ मध्ये झुरिक येथे त्यांची रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. १९१९ मध्ये ते केमिकल इन्स्टिट्यूटचे संचालक झाले.

कॅरोटिनॉइडे, प्लाविने, अ व ब जीवनसत्त्वे यांच्या संरचनेसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल डब्ल्यू. एन्‌. हॉवर्थ यांच्याबरोबर त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. वनस्पतीतील रंगद्रव्यांसंबंधी, विशेषतः कॅरोटिनॉइडांसंबंधी त्यांनी संशोधन केले. बीटा कॅरोटीन या गाजरात असणाऱ्या रंगद्रव्याची संरचना त्यांनी १९३० मध्ये ठरविली व अशा काही द्रव्यांचे प्राण्यांच्या शरीरात अ जीवनसत्त्वात रूपांतर होते असे सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी अ जीवनसत्त्वाची संरचना स्पष्ट केली व सेंट ड्यर्ड्यी यांनी दिलेली ऍस्कॉर्बिक अम्लाची (क जीवनसत्त्वाची) संरचना बरोबर आहे, हे सिद्ध केले. ब व ई या जीवनसत्त्वांसंबंधीही त्यांनी संशोधन केले. लॅक्टोप्लाविन हे जीवनसत्त्व ब समूहाचा एक भाग आहे हे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी Lehrbuch Der organisechen Chemie हे सुप्रसिद्ध पाठ्यपुस्तक १९३० मध्ये लिहिले. त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली असून त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. ते झुरिक येथे मरण पावले.

जमदाडे, ज.वि.