मॅग्नेशियम : धातुरूप मूलद्रव्य रासायनिक चिन्ह Mg अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) १२ अणुभार २४·३१२ आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील ⟶ आवर्त सारणी] गट २ नैसर्गिक समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) २४, २५ व २६ किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर फेकणाऱ्या) समस्थानिकांचे द्रव्यमानांक २३, २७ व २८ इलेक्टॉन विन्यास (अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांतील इलेक्टॉनांची संख्या) २, ८, २ संयुजा [इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दाखवणारा अंक ⟶ संयुजा] २ रंग रुप्यासारखा पांढरा वि. गु. १·७४ वितळबिंदू ६५०° से. उकळबिंदु १११०° ± १०° से. ही धातू थोडी वर्धनशील (यांत्रिक पद्धतीने आकार बदलता येणारी) व तन्य (तार काढता येण्यासारखी) आहे. ग्रीसमधील मॅग्नेदशिया या प्रदेशावरून हिचे मॅग्नेशियम हे नाव आले आहे.

इतिहास: नैसर्गिक मॅग्नेरशियम सिलिकेटाच्या दगडापासून केलेली भांडी व कारागिरीच्या वस्तू प्राचीन काळापासून माहीत आहेत. ॲस्बेस्टस [CaMg3 (SiO3)4] या खनिजाचा वापर दिव्यांच्या वाती व न जळणारे कापड बनविण्यासाठी ग्रीक व रोमन लोक करीत असत. १६९५ मध्ये एन्. ग्रू यांनी एप्सम (इंग्लंड) येथील खनिज झऱ्यांतून एक लवण मिळवले व त्यास एप्सम सॉल्ट असे नाव दिले. तेच मॅग्नेशियम सल्फेट होय त्याचा औषधी उपयोग माहीत होता.

इ. स. १७५४ साली जोसेफ ब्लॅक यांनी मॅग्नेशिया (मॅग्नेशियमाचे ऑक्साइड) व लाइम (कॅल्शियमाचे ऑक्साइड) हे दोन भिन्न पदार्थ असल्याचे दाखविले, तर हंफ्री डेव्ही यांनी मॅग्नेशिया हे नव्या धातूचे ऑक्साइड असल्याचे दाखविले. १८०८ साली डेव्ही यांनी तप्त मॅग्नेशियम ऑक्साइडावरून पोटॅशियम धातूची वाफ पाठवून मॅग्नेशियम पाऱ्याच्या साहाय्याने पारदमेलाच्या [धातूंच्या ज्या मिश्रणातील एक घटक पारा असतो त्याला पारदमेल म्हणतात ⟶ पारदमेल] स्वरूपात मिळविले, तसेच त्यांनी मॅग्नेशियम सल्फेटाचे विद्युत् विच्छेदन (विद्युत् प्रवाहाने रेणूचे तुकडे करून घटक अलग करण्याची क्रिया) करून पारदमेल स्वरूपात ही धातू मिळविली. त्यानंतर १८२८ मध्ये ए. ब्यूसी यांनी निर्जल मॅग्नेशियम क्लोराइड व पोटॅशियम एकत्र वितळवून ही धातू मिळविली. १८३३ मध्ये मायकेल फॅराडे यांनी वितळलेल्या मॅग्नेशियम क्लोराइडापासून विद्युत् विच्छेदन पद्धतीने ही धातू तयार करण्यात यश मिळविले. १८५२ साली आर्. बन्सन यांनी मॅग्नेशियम बनविण्यासाठी कार्बनाचे पोकळ ऋणाग्र असलेला नवा विद्युत् विच्छेदन घट बनविला. त्यामुळे संपर्कात आल्यावर होणारे मॅग्नेशियमाचे ज्वलन टाळता येऊ शकते.

आढळ: मॅग्नेशियम अतिविक्रियाशील असल्यामुळे निसर्गात मूलद्रव्याच्या रूपात आढळत नाही पण संयुगांच्या रूपात ती सर्वत्र आढळते. १५० पेक्षा जास्त खनिजांत मॅग्नेशियम आढळते. मात्र त्यांपैकी थोडीच खनिजे औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त आहेत. शिलावरणातील याचे प्रमाण २·५% इतके असून विपुलतेच्या दृष्टीने याचा आठवा क्रमांक आहे. ⇨ मॅग्नेसाइट (MgCO3) व ⇨ डोलोमाइट (MgCO3·CaCO3) ही खनिजे मुख्यतः मॅग्नेशियम कार्बोनेटाची बनलेली असतात. यांपैकी मॅग्नेसाइटामध्ये २८% व डोलोमाइटामद्ये १४% मॅग्नेशियम असते. यांशिवाय ⇨ ब्रूसाइट [Mg (OH)2] हे खनिजही मॅग्नेशियमयुक्त असून त्यात ४१% मॅग्नेशियम असते. हे खनिज मुख्यतः कॅनडात आढळते. मॅग्नेसाइट खनिजाचे मोठे साठे ऑस्ट्रिया, रशिया, ग्रीस, झेकोस्लोव्हाकिया, मँचुरिया, भारत, ब्राझील, व्हेनेझुएला इ. ठिकाणी आढळतात तर डोलोमाइटाचे साठे ब्रिटन, ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन, अमेरिका, नॉर्वे इ. ठिकाणी सापडतात. जर्मनीतील श्टासफुर्ट येथे कार्नालाइटामध्ये (MgCl2·KCI·6H2 O) मॅग्नेशियम आढळते. मॅग्नेशियमाची अनेक सिलिकेटे (ऑलिव्हीन, सर्पेटाइन) व इतर संयुगे पृथ्वीच्या कवचात आढळतात. समुद्राच्या पाण्यात ही धातू ०·२३  इतकी असून विपुलतेच्या दृष्टीने तिचा पाचवा क्रमांक आहे. मॅग्नेशियम क्लोसराइडामुळे समुद्राचे पाणी कडवट लागते. खारी सरोवरे व बहुतेक मृदांमध्येही मॅग्नेशियम आढळते. भारतात तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील चॉकहिल्स येथे उत्कृष्ट दर्जाचे मॅग्नेसाइट आढळते. एकूण उत्पादनाच्या ९०% उत्पादन या विभागात होते. अल्मोडा व पिठोरगड (उत्तर प्रदेश) आणि म्हैसूर (कर्नाटक) जिल्ह्यांतही मॅग्नासिट आढळते. सालेम वे म्हैसूर येथील साठे १० कोटी टनांचे आसावेत. १९८० साली भारतात याचे ३,८५,१०४ टन उत्पादन झाले. डोलोमाइटाचा उत्कृष्ट साठा पश्चिम बंगालमधील जलपैगुरी व दार्जिलिंग जिल्ह्यांत आढळतो.

मानवी शरीरातही मॅग्नेशियम असते त्याचे प्रमाण पोटॅशियमाच्या प्रमाणाच्या १/६ असते. मानवी शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण रासायनिक विक्रियांना चालना देणाऱ्या ⇨ एंझाइमांपैकी पुष्कळांच्या (उदा., कार्बोहायड्रेटांच्या चयापचयातील-शरीरात सतत होत असणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतील-एंझाइमांच्या) विक्रियेत मॅग्नेशियम उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) म्हणून उपयुक्त असते. तसेच डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल व रियोन्यूक्लिइक अम्ल या ⇨ न्यूक्लिइक अम्लांच्या द्विगुणनामध्ये (तंतोतंत प्रतिकृती निर्मिण्यामध्ये) मॅग्नेशियम भाग घेते. त्यामुळे सर्व जीवांच्या आनुवंशिक लक्षणांच्या दृष्टीने मॅग्नेशियमाचे कार्य महत्त्वाचे असते. वनस्पतीतील हरितद्रव्य हे मॅग्नेशियमाचे संयुग आहे. रक्तातील हीमोग्लोनबिनाच्या संदर्भात लोहाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व हरितद्रव्यामधील मॅग्नेशियमाला आहे.

उत्पादन : मॅग्नेशियमाचे उत्पादन प्रायः दोन पद्धतींनी करतात : (१) विद्युत् विच्छेदन पद्धत व (२) फेरोसिलिकॉन वा सिलिकोथर्मिक पद्धत. यांपैकी पहिल्या पद्धतीने सु. ८०% व्यापारी उत्पादन होते.

विद्युत् विच्छेदन पद्धती: याकरिता वितळलेले मॅग्नेनशियम क्लोराइड हे विद्युत् विच्छेद्य (ज्याचे विद्युत् विच्छेदन करावयाचे तो पदार्थ) म्हणून वापरले जाते. मॅग्नेशियम क्लोराइड मिळविण्यासाठी प्रामुख्याने समुद्राचे पाणी वापरतात. त्याचा वितळबिंदू कमी करण्यासाठी त्याच्यात थोडे सोडियम क्लोराइड मिसळतात. विद्युत् विच्छेदनाकरिता पोलादी घट वापरतात व त्यात धनाग्र म्हणून कार्बनाची कांडी व ऋणाग्र म्हणून घटाचा पोलादी पत्रा उपयोगात येतो. धनाग्रापाशी क्लोरीन वायू निघतो. ऋणाग्रात म्हणजेच घटात मॅग्नेशियम धातू मुक्त होते. मॅग्नेशियम धातू हलकी असल्याने घटात पृष्ठभागावर तरंगू लागते. विद्युत् विच्छेदन कोळसा वायूच्या (कोल गॅसच्या) उपस्थितीत केले जाते. यामुळे तयार होणाऱ्या मॅग्नेशियमाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] होत नाही व ती जळत नाही.


 फेरोसिलिकॉन पद्धती: डोलोमाइट भाजून मिळणाऱ्या कॅल्शियम व मॅग्नेशियम ऑक्साइडांत फेरोसिलिकॉन (लोह व सिलिकॉन यांची मिश्रधातू) मिसळतात. हे मिश्रण भट्टीत तापवून त्याच्या लहान लहान विटा बनवतात व त्या पोलादी बकपात्रात घालून निर्वात स्थितीत सु. १,२००° से.ला तापवतात. येथे मॅग्नेशियम ऑक्साइडाचे सिलिकॉनाने ⇨ क्षपण होऊन मॅग्नेशियम वायुरूपात तयार होते ते थंड करून मॅग्नेशियम स्फटिकरूपात मिळते ते वितळवून मॅग्नेशियमाच्या लगडी तयार करतात.

समुद्राच्या पाण्यातील मॅग्नेशियम हा कधीही न संपणारा साठा आहे. समुद्राचे पाणी एका मोठ्या टाकीत घेतात. त्यात लाइम वा कॅल्शियम हायड्रॉक्साइड (कधीकधी ऑयस्टर प्राण्याची भाजलेली कवचे) घालून मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड तयार होते. हे गाळून त्याचे हायड्रोक्लोरिक अम्लाने मॅग्नेशियम क्लोराइड बनवतात. हे मॅग्नेशियम क्लोराइड कोरडे करतात. त्याच्या विद्युत् विच्छेदनाने मॅग्नेशियम धातू व क्लोरीन वायू मिळतो. विद्युत् विच्छेदनात मिळणारा क्लोरीन वायू हायड्रोक्लोरिक अम्ल बनविण्यासाठी परत वापरतात. ८०० टन पाण्यापासून १ टन मॅग्नेशियम मिळते. समुद्राच्या पाण्यातून प्रतिवर्षी १० कोटी टन मॅग्नेशियम १० लाख वर्षांपर्यंत काढले, तरी पाण्यातील त्याचे सध्याचे ०·१३% हे प्रमाण फक्त ०·१२% होईल, असे गणित करून काढले आहे.

मॅग्नेशियम बनविण्यासाठी कॅनडा, फ्रान्स, इटली व जपान येथे डोलोमाइट नॉर्वेत डोलोमाइट व समुद्राचे पाणी अमेरिकेत डोलोमाइट, भूमिगत खारे पाणी व समुद्राचे पाणी आणि रशियात डोलोमाइट व कार्नालाइट हा कच्चा माल वापरतात. हेच मॅग्नेयशियमाचे उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत.

गुणधर्म: ही धातू तापविली असता हिचा हवेतील ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्याशी संयोग होऊन अनुक्रमे मॅग्नेशियम ऑक्साइड (MgO) व मॅग्नेशियम नायट्राइड (Mg3N2) तयार होते. गंधकाबरोबर मॅग्नेशियम सल्फाइड (MgS) व हायड्रोजनाबरोबर मॅग्नेशियम हायड्राइड (MgH2) तयार होते. मॅग्नेशियमाची बहुतेक सर्व अम्लांशी विक्रिया होते. मात्र क्षांरांशी (अम्लांशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या H पदार्थांशी अल्कलींशी) हिची विक्रिया होत नाही. सौम्य हायड्रोक्लोरिक व सौम्य सल्फ्यूरिक अम्लांशी विक्रिया होऊन अनुक्रमे मॅग्नेशियम क्रोराइड (MgCl2) व मॅग्नेशियम सल्फेट (MgSO4) तयार होते. थंड पाण्याबरोबर मॅग्नेशियमाची सावकाश विक्रिया होऊन मॅग्नेशियम ऑक्साइड (MgO) तयार होते. मॅग्नेशियम बहुतेक अधातवीय मूलद्रव्यांशी संयोग पावते (उदा., हॅलोजनांची हिच्याशी सहज विक्रिया होते). बऱ्याचशा धातू त्यांच्या ऑक्साइडांचे किंवा लवणांचे मॅग्नेशियमाने ऊष्मीय क्षपण करून मिळवता येतात. मॅग्नेशियमाची तार हवेत जळताना शुभ्र झगझगीत प्रकाश पडतो. पेटेलेल्या मॅग्नेशियमाची आग पाण्याने विझत नाही कारण पाण्याशी हिची विक्रिया होऊन ज्वलनशील हायड्रोजन निर्माण होतो. ओलसर हवेत ही गंजते. ही चांगली उष्णात व विद्युत् संवाहक धातू आहे.

उपयोग: मॅग्नेशियमाचे काही गुणधर्म असे आहेत की, त्यामुळे तिचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करून घेता येतो. उदा., उत्कृष्ट यंत्रणक्षमतेमुळे हिच्यावर व हिच्या मिश्रधांतूवर सर्व प्रकारच्या धातुरूपण पद्धतींनी काम करता येते. त्यामुळे त्यांच्या पट्ट्या, पत्रे, नळ्या, गज, दंड, मुद्रा, मुद्राकारक इ. असंख्य वस्तू बनविता येतात. शिवाय त्यांचे जोडकाम साध्या पद्धतींनी करता येते. नवीन मिश्रधातू व जोडकामाची तंत्रे यांच्यामुळे त्यांचा उपयोग वाढत आहे. ही धातू व हिच्या मिश्रधातू (वि. गु. १·७४–१·८३) हलक्या परंतु त्यामानाने बळकट असल्याने त्यांचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. उदा., वाहतुकीची साधने, विमाने, हेलिकॉप्टर, प्रक्षेपणास्त्रे, रॉकेटे, अवकाशायाने, मालवाहू पेटारे, माल हाताळणारी साधने, प्रवासी साहित्य, खेळांचे सामान, सुवाह्य विद्युतीय व वातचलित (दाबाखालील हवेच्या साहाय्याने कार्य करणारी) हत्यारे, धारक पकड व छिद्रपाट (यांत्रिक हत्यारावर निरनिराळ्या आकारांच्या वस्तूंना अगदी ठराविक ठिकाणी भोके किंवा खाचा पाडण्यासाठी वापरण्यात येणारी साधने), छायाचित्रीय व प्रकाशीय उपकरणे इत्यादींमध्ये यांचा वापर होतो. मॅग्नेशियामाची तार जळताना शुभ्र झगझगीत प्रकाश पडतो त्याचा उपयोग छायाचित्रणातील स्फुर दिव्यात, शोभेच्या दारूकामात आणि संदेश पोहोचविण्यासाठी उडविण्यात येणाऱ्या व युद्धोपयोगी दारूगोळ्यात करतात. मॅग्नेशियम चांगली क्षपणकारी असल्याने लोखंड, निकेल, जस्त, टिटॅनियम, हाफिनयम, युरेनियम, बेरिलियम, झिर्कोनियम इ. धातू तसेच काही संयुगे यांच्या निर्मितीत मॅग्नेशियमाचा क्षपणक म्हणून उपयोग करतात. तांब्याच्या व निकेलाच्या मिश्रधातूंतील ऑक्सिजन व गंधक यांचा अंश कमी करण्यासाठी शुद्ध मॅग्नेशियम वापरतात. हिची ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्याशी विक्रिया होत असल्याने इलेक्ट्रॉन नलिकांसारख्या नलिकांतील अत्यल्प हवा काढून टाकण्यासाठी मॅग्नेशियमाची पट्टी वा तार वापरतात. शुष्क विद्युत् घटांत जस्ताऐवजी मॅग्नेशियम वापरतात. छायाचित्रीय उत्कीर्णनात [⟶ मुद्रण] हिचा वाढता उपयोग होत आहे. जमिनीत पुरलेल्या टाक्या, नळ, केबल, स्तंभ यांच्यालगत मॅग्नेशियमाचे तुकडे ठेवतात किंवा त्यांच्याशी विद्युतीय दृष्ट्या जोडतात. त्यामुळे या वस्तू गंजत नाहीत. जहाजाच्या नौकापृष्ठावरही अशा प्रकारे मॅग्नेशियमाच्या पट्ट्या गंजरोधक म्हणून बसविलेल्या असतात.

मिश्रधातू: बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूंपैकी मॅग्नेशियम ही सर्वांत हलकी धातू असून हिच्या मिश्रधातूही हलक्या असतात. मॅग्नेशियम धातू तेवढी बलवान नसली, तरी तिच्या मिश्रधातूंचे बल चांगले असते व त्या अनेक अभियांत्रिकीय कामांत वापरल्या जातात. ॲल्यूमिनियम, मॅंगॅनीज, तांबे, शिसे, जस्तनिकेल, कथिल, लिथियम, थोरियम, झिर्कोनियम, कॅडमियम इ. धातूंबरोबर मॅग्नेशियमाच्या मिश्रधातू बनतात. मॅग्नेशियमामुळे मिश्रधातूंची गुणवत्ता वाढते. उदा., गंजरोध, उष्णता संस्करणक्षमता, ताणबल, कठिनता इ. गुणधर्मांत चांगली सुधारणा होते. मॅग्नेशियमाच्या अनेक मिश्रधातू असून त्यांपैकी ‘इलेक्ट्रॉन’ (९५ % मॅग्नेशियम व ५% जस्त) व मॅग्नॅलियम (१०% मॅग्नेशियम व ९०% ॲल्युमिनियम) या अधिक महत्त्वाच्या आहेत.

संयुगे : मॅग्नेशियमाची सर्व संयुगे द्विसंयुजी आहेत. ती विपुल प्रमाणात आढळतात व ती अतिशय उपयोगी आहेत.

मॅग्नेशियम कार्बोनेट: (MgCO3). निसर्गात मुख्यतः ⇨ मॅग्नेपसाइटाच्या स्वरूपात, तसेच डोलोमाइड व डोलोमाइटी चुनखडकातही सापडते. मॅग्नेशशियम सल्फेटाच्य विद्रावात सोडियमबायकार्बोनेटाचा विद्राव ओतल्यास हे तयार होते. निसर्गात सापडणारे मॅग्नेसाइट हे बरेच अशुद्ध असल्याने आणि ते शुद्ध करण्याच्या पद्धती फायदेशीर नसल्याने याचे उत्पादन मुख्यतः रासायनिक पद्धतीनेच करतात. मॅग्नेशियम कार्बोनेट घनरूप व पांढरे असून ते तापवल्यास उष्णतेमुळे त्याचे अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होते आणि मॅग्नेशियम ऑक्साइड (MgO) व कार्बन डायऑक्साइड तयार होतात. मॅग्नेशियम कार्बोनेटावर सौम्य हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया केल्यास मॅग्नेशियम क्लोराइड, पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड तयार होतात. मॅग्नेशियम कार्बोनेटाचा उच्च तापसह (उच्च तापमानाला न वितळता टिकून राहणारा) पदार्थ म्हणून, तसेच मृत्तिकाशिल्प, काच, खते, रबर, शाई, रंग, औषधे, सौंदर्यप्रसाधने इ. धंद्यांत उपयोग होतो. औषधनिर्मितीत चूर्णाचे आकारमान वाढविण्याकरिता, तसेच मॅग्नेशियम सायट्रेट व इतर काही संयुगे तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.


 मॅग्नेशियम क्लोराइड: (MgCl2). हे निसर्गात ⇨ कार्नालाइट या खनिजाच्या रूपात (KCI·MgCl2·6H2O) तसेच समुद्राच्या पाण्यात आढळते. हे पांढरे व धनरूप असून याचे वि. गु. २·३ व वितळबिंदू ७०८° से. आहे. ते चिघळणारे (हवेतील आर्द्रता शोषून घेणारे) आहे. समुद्राच्या पाण्यापासून मॅग्नेशियम क्लोराइड तयार करण्याच्या पद्धतीचा अलीकडे मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. या पद्धतीत प्रथम मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड मिळते. त्यावर हायड्रोक्लोरिक अम्‍लाची विक्रिया करून मॅग्नेशियम क्लोराइड मिळते. त्याचे स्फटिक तयार करतात. या स्फटिकांचे सूत्र MgCl2·6H2O असे आहे. ते पाण्यात बरेच विद्राव्य (विरघळणारे) आहे, तर मिथेनॉल व एथॅनॉल यांमध्ये अल्प प्रमाणात विद्राव्य आहे. मॅग्नेशियम क्लोराइडातील स्फटिकजल नुसते तापवून घालवता येत नाही, कारण त्याचे ऑक्सिक्लोराइडात व शेवटी ऑक्साइडात रूपांतर होते. निर्जल मॅग्नेशियम क्लोराइड करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. सर्वांत महत्त्वाची म्हणजे दोन टप्प्यांत निर्जलीकरण करणे. पहिल्या टप्प्यात बाष्पीभवनाने स्फटिकजलाचे चार रेणू घालवतात व उरलेले दोन रेणू हायड्रोजन क्लोराइड किंवा क्लोरीन वायूच्या वातावरणात बाष्पीभवन करून घालवतात. संहत (विद्रावात जास्त प्रमाणात असलेल्या) मॅग्नेशियम क्लोराइडामध्ये भाजलेला मॅग्‍नेशिया (मॅग्नेशियम ऑक्साइड) घालून त्याची रबडी तयार केल्यास ते मिश्रण दगडासारखे कठीण होते. या मिश्रणास ‘सॉरेल सिमेंट’ किंवा ऑक्सिक्लोराइड सिमेंट असे म्हणतात. यापासून कृत्रिम दगड, फरश्या तयार करता येतात, तसेच जमिनीसाठी व गिलाव्यासाठीही हे वापरतात.

मॅग्नेशियम क्लोराइडाचा उपयोग मुख्यतः मॅग्नेशियम धातुनिर्मितीसाठी, तसेच न गोठणारी मिश्रणे बनविण्याकरिता व ऑक्सिक्लोराइड सिमेंट तयार करण्याकरिता करतात.

मॅग्नेशियम ऑक्साइड :(MgO). मॅग्नेशियम धातू ऑक्सिजनाच्या वातावरणात तापवून किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट अगर मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड अथवा मॅग्‍नेसाइट उच्च तापमानाला तापवून मॅग्नेशियम ऑक्साइड मिळवतात. याला ‘मॅग्‍नेशिया’ म्हणतात. कच्चा माल, तापमान व वेळ यांवर मॅग्‍नेशियाची प्रत अवलंबून असते. १,६५०° से. तापमानाला तयार केलेल्या मॅग्‍नेशियाला ‘डेडबर्न्ट’ मॅग्‍नेशिया म्हणतात. याचा वितळबिंदू २,८००° से. आहे. त्यामुळे त्याच्या उच्चतापसह विटा बनवितात य त्या निरनिराळ्या उच्च तापमान विद्युत् भट्ट्यांना आतून अस्तरासाठी वापरतात. मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्नेशियम धातू तयार करण्यासाठी, रबर, औषधे, सौंदर्यप्रसाधने, ऑक्सिक्लोराइड सिमेंट, कागद, खते, कापडावरील संस्करण, अग्‍निरोधन इ. उद्योगांत वापरतात. शुद्ध मॅग्‍नेशिया मॅग्नेशियम संयुगे तयार करण्यासाठी व निर्जल धुलाईच्या कामात विद्रावकाचे (विरघळविणाऱ्या पदार्थाचे) रंग काढण्यासाठी वापरला जातो.

मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड : [Mg (OH)2]. गाळून घेतलेल्या समुद्राच्या पाण्यात चुन्याची निवळी घातल्यास हे तयार होते. हे पांढरे असून याचे वि. गु. २·३६ असते. ३५° से. पर्यंत तापवल्यास याचे अपघटन होते व मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होते. याचा उपयोग औषधांमध्ये अम्लनाशक म्हणून व सौम्य रेचक म्हणून होतो. ‘मिल्क ऑफ मॅग्‍नेशिया’ या नावाने द्रव स्थितीत व वड्यांच्या (गोळ्यांच्या) स्वरूपात हे विकले जाते. टूथपेस्टमध्येही याचा उपयोग होतो.

मॅग्नेशियम सल्फेट : (MgSO4). हे कीसेराइट (MgSO4· H2O), तसेच एप्सम सॉल्ट (MgSO4·7H2O) या स्वरूपात आढळते. मॅग्नेशियम ऑक्साइड, हायड्रॉक्साइड आणि कार्बोनेट यांच्यावर सल्फ्यूरिक अम्‍लाची विक्रिया केल्यास हे मिळते. हे पांढरे असून याचे वि. गु. २·६६ आहे. हे पाण्यात विरघळते. याचे जलीय विच्छेदनही (पाण्यामुळे रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) अल्प प्रमाणात होते. एप्सम सॉल्ट २५०° से. पर्यंत तापविल्यास निर्जल मॅग्नेशियम सल्फेट तयार होते व पुढे ६००° से. पर्यंत तापविल्यास त्याचे अपघटन होऊन मॅग्नेशियम ऑक्साइड आणि सल्फर ट्राय-ऑक्साइड तयार होतात.


मॅग्नेशियम सल्फेटाचा उपयोग सिमेंट तयार करण्याकरिता, खते तयार करण्यासाठी, कातडी कमवण्याच्या कृतीमध्ये तसेच रेचक म्हणून औषधामध्ये होतो. शिवाय कागद, कापड, स्फोटके, आगपेट्या,पशुखाद्य इ. उद्योगांतही हे वापरतात. वनस्पतींतील हरितद्रव्यात मॅग्नेशियम हा एक घटक आहे, मॅग्नेशियमाच्या खतांतून वनस्पतींना हरितद्रव्य निर्मितीसाठी मॅग्नेशियम मिळते [⟶ हरितद्रव्य].

मॅग्नेशियमाच्या इतर काही अकार्बनी संयुगांची नावे, त्यांची सूत्रे व गुणधर्म मागील कोष्टकात दिले आहेत.

मॅग्नेशियमाची ॲसिटेट [ Mg3(C2H3O2 )2·4H2O], सायट्रेट [Mg3(C6H5O7)2·4H2O], लॅक्टेट [Mg(C3H5O3)2·3H2O], सॅलिसिलेट [Mg(C7H5O3)2·4H2O], ओलिएट [Mg(C18H33O2)2] इ. कार्बनी संयुगे तयार होतात. यांपैकी शेवटचे संयुग पाण्यात न विरघळणारे व पिवळे असून इतर संयुगे पांढरी व पाण्यात विरघळणारी आहेत. मॅग्नेशियमाच्या संयुगांपासून पुष्कळदा अमाइने व अमाइन जटिले बनतात, तर अल्किल व अरिल हॅलाइडांशी मॅग्नेशियमाची विक्रिया होऊन ग्रीन्यार विक्रियाकारक बनतात. ही याची महत्त्वाची कार्बनी संयुगे असून त्यांचे सूत्र RMg X (R = अल्किल गट, X = हॅलोजन) असे आहे. या संयुगांचा उपयोग सिलिकोनांसारख्या अनेक कार्बनी संयुगांच्या संश्लेषणात (घटक द्रव्ये एकत्रित आणून कृत्रिम रीतीने पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत) होतो. [⟶ ग्रीन्यार विक्रिया].

अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). मॅग्नेशियमाच्या आयनांचे (विद्युत् भारित अणूंचे) अस्तित्व ‘मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट’ या परीक्षेने ओळखतात. मॅग्नेशियम क्लोराइडामध्ये अमोनिया व अमोनियम क्लोराइड घालून त्यात सोडियम फॉस्फेट घातल्यास मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेटाचे पांढरे स्फटिक मिळतात. यावरून मॅग्नेशियमाचे अस्तित्व कळते.

मॅग्नेशियम लवणाच्या किंचित अम्ल विद्रावात पॅरा-नायट्रोबेंझीन-ॲझोरिसॉर्सिनॉलाच्या (मॅग्नेसॉनाच्या) ०·५% विद्रावाचे थोडे थेंब टाकून ते सोडियम हायड्रॉक्साइडाने क्षारीय केल्यावर निळा रंग किंवा निळ्या रंगाचा साखा मॅग्नेशियमाचे अस्तित्व दर्शवितो. मॅग्नेशियमाचे परिमाणात्मक विगणन मॅग्नेशियम पायरोफॉस्फेटाद्वारा [Mg2P2O7] करतात.

संदर्भ : 1. Emley, E. F. Principles of Magnesium Technology, Oxford, 1966.

            2. Parkes, G. D. Mellor’s Modern Inorganic Chemistry, London, 1961.

            3. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, London, 1966.

            4. Roberts, C. S. Magnesium And Its Alloys, New York, 1960.

गोखले, दि. मो. आठवले, वि. त्र्यं. घाटे, रा. वि. ठाकूर, अ. ना.