किमया : (अल्केमी). शिसे, तांबे यांसारख्या धातूंचे चांदीत किंवा सोन्यात रूपांतर करणाच्या प्रयत्नांचे कूटशास्त्र म्हणजे किमया होय. या सर्व प्रयत्नांमध्ये रासायनिक पद्धतींचा वापर करण्यात येत असे. यामुळे पुढे रसायनशास्त्राची प्रगती व सुधारण होण्यास या शास्त्राचे साहाय्य झाले. किमयेचा इतिहास म्हणजे रसायनशास्त्र अस्तित्वात येण्यापूर्वीच्या कालातील रासायनिक विक्रियांचा इतिहास होय.

काहींच्या मते ‘अल्केमी’ हा शब्द ‘केओ’ (Cheo) म्हणजे ‘मी आततो’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आला आहे. त्यांच्या मते धातुकाम करणारे लोक हे किमयेचे आद्य प्रवर्तक होत, तर काहींच्या मते ‘खेम’ (Khem) या ईजिप्तच्या प्राचीन नावावरून अल्केमी हा शब्द आला आहे. खेम म्हणजे काळी माती. त्यांच्या मते ईजिप्त ही किमयेची आद्य भूमी होय. अरबी लोकांनी ‘अल्‌’ (Al) हे उपपद त्या शब्दापूर्वी जोडून ‘अल्केमी’ हा शब्द तयार केला. रसायनशास्त्रास स्वतंत्र शास्त्र मानण्यात आल्यानंतर, त्या शब्दातील ‘अल्‌’ हे उपपद गाळण्यात आले. किमया हा शब्द ‘किमया’ ह्या अरबी-फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे.

इतिहास व तात्त्विक आधार : किमया कधी सुरू झाली हे निश्चित सांगता येत नाही. पाश्चात्य देशांत किमयेवरील प्रथम लिखाण इ. स. च्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात झाले. हेलेनिस्टिक संस्कृतीच्या काळात ईजिप्तमधील ॲलेक्झांड्रियामध्ये किमयेची सुरुवात झाली असावी, असे मानतात. हे शहर म्हणजे त्या काळातील बुद्धिवान लोकांचे आगर होते. ग्रीक तत्त्वज्ञान, ईजिप्शियन तंत्र आणि मध्यपूर्वेतील धर्मांमध्ये असलेली गूढता यांच्यामधून किमयेची सुरुवात तेथे झाली असावी. 

त्या काळी ज्ञात असलेल्या वास्तव जगाचे स्वरूप उघड करण्याचे प्रयत्न तत्त्वज्ञांनी केले. ॲरिस्टॉटल यांनी काही सिद्धांत मांडले होते. त्यांपैकी काहींतून किमयेचा जन्म झाला. विश्वातील सर्व पदार्थ, हे एका मूळ पदार्थापासून तयार होतात, असे ॲरिस्टॉटल यांचे मत होते. मूळ पदार्थ कोणता मानावा हे निश्चित नव्हते. प्रथम पाणी हा मूळ पदार्थ मानला गेला, तर नंतर अग्नी, हवा, पाणी व पृथ्वी हे चार पदार्थ मूळ पदार्थ मानले गेले. 

अगदी सुरुवातीपासून किमयागार म्हणजे धातुकाम करणारे लोक होते. हे लोक श्रीमंतांच्यासाठी सोन्या चांदीचे दागिने बनवीत. पण तांबे, शिसे यांसारख्या धातूंपासून सोने बनविणे त्यांना शक्य झाले नाही. मेसापोटेमियामध्ये रूढ असलेल्या ज्योतिषीय कल्पानांमुळे या किमयागारांचा फायदा झाला. काही विशिष्ट ज्योतिषीय परिस्थितींमध्ये शिशाचे सोने बनविणे सोपे होईल असे त्यांचे मत होते.

ज्याप्रमाणे मानवी शरीर वाढते आणि बदलते त्याचप्रमाणे धातुही वाढतात व बदलतात. तसेच ज्याप्रमाणे आत्मा शुद्ध होऊन मृत्यूनंतर स्वर्गात जातो, त्याचप्रमाणे धातू कमी शुद्धतेकडून जास्त शुद्ध अशा सोन्यामध्ये रूपांतरीत होतात, असे त्या काळी मानीत. याच तत्वाचा उपयोग कारागिर प्रयोगशाळेत करीत. प्रथम तांबे तापवून काळे करीत. त्यानंतर पारा किंवा अर्सेनिक यांच्या साहाय्याने पांढरी मिश्रधातू बनवीत. अन्य क्रियाकारक पदार्थ वापरून तिला पिवळा किंवा तांबडा रंग आणीत. हा या क्रियेतील अंतिम टप्पा होता. धातु काम करणाऱ्या ॲलेक्झांड्रियामधील कारागिरांच्या मनावर या रंगबदलाचा मोठा परीणाम झाला. काळे-पांढरे-पिवळे-तांबडे ही रंगबदलाची क्रिया नंतरच्या काळात किमयेत फार महत्त्वाची मानली गेली.

यावरून निसर्गातील पदार्थांच्या उत्पत्तीचे तत्व व ॲलेक्झांड्रियाच्या परिसरात प्रचलित असलेल्या ज्योतिषी व धार्मिक रूढी यांच्या साहाय्याने रासायनिक प्रक्रियांच्या प्रयोगांचे केलेले विवरण म्हणजेच किमया असे दिसून येते. ही प्रायोगिक किमया आत्म्याच्या शुद्धतेच्या संज्ञेत मांडता येत असे, त्याचा फायदा, ज्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याचा तिटकारा होता, त्यांना झाला. अशा प्रकारे प्रायोगिक किमयागार व गूढ किमयागार असे दोन पंथ निर्माण झाले.

प्रायोगिक किमयागारांनी बरीच शास्त्रीय उपकरणे वापरली आणि नवीन शोधून काढली. यांपैकी बरीच अद्यापिही सुधारलेल्या अवस्थेत वापरली जातात. किमयेत वापरलेल्या पदार्थांना व उपकरणांना वेगवेगळ्या संज्ञा देण्यात आल्या होत्या. किमयेवरील ज्योतिषशास्त्रांच्या प्रभावामुळे, धातूंना ग्रह-तारे यांची नावे दिली गेली व लिखाणात ती, ज्योतीषी चिन्हांनी दाखविली जात. देवता, राजे किंवा जुने तत्वज्ञानी यांना ही लिखाणे अर्पिलेली असत. इसिस, मोझेझ, आरून, एरमिश, सॉलोमन, डीमॉक्रिटस इ. नी हे लेखन केलेले असावे असे मानले जाते.

प्रायोगिक किमयागारांनी आणलेली किमयेची परिकल्पना गोंधळ निर्माण करणारी होती, ती सुधारताना गूढवाद्यांनी आणखीच कठीण केली. सी. जी. युंग या आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की, मानवी मनाच्या प्रवृत्तीला किमयेचे नावच उत्तेजित करते आणि रसायनशास्त्राच्या ज्ञानाच्या अभावी बरेचजण किमयेतील गूढत्वामुळे तिच्याकडे आकर्षिले गेले. किमयेचे गूढ लिखाण आणखीच गोंधळ निर्माण करते. डीमॉक्रिटस यांच्या नावावर असलेला पण मेंडेसाचे बोलोस यांनी लिहिला असे मानतात तो Physica et Mystica हा ग्रंथ आणि झोसिमस यांचा किमयेचा ज्ञानकोश हे वाचण्यासही अवघड वाटतात. तांत्रिक व शास्त्रीय मतांपासून हेलेनिस्टिक तत्त्वज्ञान जसजसे ज्ञेयवाद, नवप्लेटोमत व ख्रिश्चन धर्मातील दैविकता यांच्याकडे झुकू लागलग तसतसे किमयेवरील लिखाण अतिगूढ आणि रूपकात्मक होऊ लागले. बायझॅंटीन हस्तलिखिते या प्रकारची आहेत.

चिनी लोकांची किमया : ज्यावेळी किमयेत वर उल्लेख केल्याप्रमाणे सुधारणा होत होत्या, त्याचवेळी चीनमध्येही किमयेची वरीलप्रमाणेच प्रगती झाली. ही किमया ‘ताओ’ तत्त्वज्ञानावर आणि पाश्चात्यांप्रमाणेच हलक्या धातूंपासून सोने बनविण्याच्या प्रयत्नांवरच आधारलेली होती. तथापि चिनी किमया काही बाबतींत पाश्चात्यांच्या किमयेपेक्षा भिन्न होती. पारा किंवा इतर धातूंचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी चिनी लोक विशिष्ट पदार्थ वापरीत. या पद्धतीने तयार झालेल्या सोन्याची किंमत मात्र कमी करण्यात येत असे. कालांतराने पश्चिमेकडे व पूर्वेकडे गूढवादी किमयेचा प्रभाव वाढू लागला. किमयेचे लिखाण जास्त जास्त गूढ होऊ लागले व किमयागार प्रयोग शाळेपासून दूर जाऊ लागले. पुढे पुढे चीनमध्ये किमयेचा लोप झाला. 

अरबी किमया : बायझॅंटीनमधील नेस्टोरियन ख्रिश्चन पाचव्या शतकात जेव्हा पुराणमतवादी ख्रिश्चनांपासून वेगळे झाले, तेव्हा त्यांनी आपल्या मतांचा आशिया मायनरमध्ये शीघ्रगतीने प्रसार केला. एडेआ, निसिबिस व झुंडी-शापूर  येथे त्यांनी शाळा काढल्या. त्यांमध्ये हेलेनिस्टिक पद्धतीचे तत्वज्ञान व शास्त्र शिकविण्यास सुरुवात केली. ग्रीक भाषेतील उपलब्ध ज्ञानाचे त्यांनी सिरियाक भाषेत भाषांतर केले. या ज्ञानातच किमयेचेही ज्ञान होते. या लोकांचा अरबांशी आठव्या व नवव्या शतकात संपर्क आला. पुढे सिरियाक भाषेतील ज्ञानाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. 

यानंतर अरबी लोक किमयेचे प्रयोग करू लागले. रेझिस व इब्न सीना यांसारखे प्रसिद्ध वैद्यही किमयेपासून अलिप्त राहू शकले नाहीत. इस्माइलिया पंथाच्या अनुयायांनी त्यामध्ये बरेच संशोधन केले. या लोकांनी किमयेवर आणि गुढतेवर बरेच लिखाण केले. त्यापैकी बरेच लिखाण जबीर इब्न ह्ययान यांच्या नावावर प्रसिद्ध झालेले आहे.

चिनी लोकांशी संपर्क आल्यावर त्यांच्याही कल्पना त्यांनी स्विकारल्या, तसेच ॲरिस्टॉटलप्रणित कल्पनेतही त्यांनी बदल केले. त्यांनी दाहक क्षारांसारखी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणाऱ्या पदार्थासारखी, अल्कलींसारखी) नवीन रसायने शोधून काढली.उर्ध्वपातनाच्या (वाफ थंड करून घटक वेगळे करण्याच्या) पद्धतीत सुधारणा केल्या. दहाव्या शतकात गूढवादाची वाढ झाल्याने चीन व पाश्चात्य देशातील किमयेप्रमाणेच अरबी किमयेची स्थिती झाली.


दहाव्या शतकानंतरची स्थिती : रोमच्या पाडावानंतर ग्रीक तत्त्वज्ञानाचे व शास्त्राचे युरोपातून उच्चाटन झाले. त्याचबरोबर किमयाही नष्ट झाली, पण अकराव्या व बाराव्या शतकात शास्त्राची महती कळल्यानंतर अरबी किमयेला परत महत्त्व प्राप्त झाले. स्पेन सिसिली इ. देशांत युरोपीय व अरबी लोक एकत्र रहात. त्यामुळे त्यांचे सर्व बाबतींत संबंध येत. अरबी ज्ञानाचे युरोपीय भाषांत रूपांतर करण्याचे काम सुरू झाले वैद्यक, तत्वज्ञान व भौतिक शास्त्रे यांविषयीचे अरबी भाषेतील ज्ञानाचे प्रथम लॅटिन भाषेत व नंतर इतर युरोपीय भाषांत भाषांतर करण्यात बरेच विद्वान गुंतले होते. हे ज्ञान ग्रीकांच्याकडून सिरियाक भाषिकांच्या मार्फत अरबी भाषेत आले होते. ते त्यावेळी पाश्चात्य देशात पोहोचले.यात किमयेचाही समावेश होता.उपलब्ध ज्ञान एकत्र करण्याच्या कार्यास बाराव्या-तेराव्या शतकांत आर्नो द व्हील्नव्ह, रॉजर बेकन आणि ॲल्बर्टस्‌ मॅग्नस्‌ यांसारख्या विद्वानांनी सुरुवात केली. यामध्ये पदार्थांचे स्वरूप कसे असते हे किमयेच्या साहाय्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे किमया परत लोकांपुढे आली.

प्रायोगिक व गुढवादी किमयेची प्रगती स्वतंत्रपणे झाली. प्रारंभीचे युरोपीय रसायनशास्त्रज्ञ म्हणजेच (किमयागार) होते. चौदाव्या शतकात जबीर स्पेनमध्ये किमयेचे प्रयोग करित होते असे मानले जाते.स्वतः केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष सांगण्यासाठी त्यांनी किमया तत्वाचा उपयोग केला. पण त्यांच्या पुस्तकांत उल्लेख केलेल्या प्रयोगांचे वर्णन म्हणजे प्रयोगशाळेतील शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या पद्धतीच होत्या. जबीर यांचे किमयेवरील लिखाण हे किमयेवरील उत्कृष्ट क्रमिक पुस्तक मानले गेले. पण त्यांची स्वतःची इतर पुस्तके ही गुढ व रूपकात्मक अशीच होती.

किमयागारांना समाजात सन्माननीय व्यक्ती म्हणून मानले जात असे. त्यांच्या बद्दल भीतीयुक्त आदर दाखविला जाई. पुढे पुढे त्यांपैकी बरेच लोक ढोंगी व अविश्वासू ठरले. परंतु काही प्रामाणिक किमयागारांनी आपले आयुष्य मुलभूत धातूंचे सोन्यात रूपांतर कसे करावे, याच्या संशोधनातच खर्चिले. राजेरजवाडे, सरदार, धर्मगुरू इ. लोक त्यांना मदत करित पण प्रयोग अयशस्वी झाल्यास त्यांना मृत्यूदंडही मिळे. पंधराव्या ते सतराव्या शतकांत किमयेची प्रगती खुंटली. त्यामध्ये अवघडपणा फार येऊ लागला. हळूहळू प्रायोगिक किमयागार सोने बनविण्यापासून विचलीत होऊन इतर फायद्याच्या व महत्त्वाच्या गोष्टींकडे वळले. धातवीय औषधे वापरून रोग बरे करण्याकडे पॅरासेल्सस यांसारख्या वैद्यांनी प्रयत्न केले. 

ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानापासून ग्रिक तत्त्वज्ञान सोळाव्या शतकात दूर जाण्यास सुरुवात झाली. यामुळे नवीन भौतिक  रसायन  शास्त्रज्ञ निर्माण झाले. पूर्वी किमयेत उल्लेख केलेली रासायनिक माहिती नवीन प्रकारे मांडण्यात आली व आधुनिक रसायनशास्त्राचा पाया रचला गेला.

याचा अर्थ असा नव्हे कि किमया पूर्णपणे नष्ट झाली. कारण हलक्या व स्वस्त धातूंपासून सोने तयार करून जलद श्रीमंत होण्याची हाव अद्यापिही आहे. किमयागार हल्लीही आढळतात. 

भारतीय किमया : इ. स. ८००—१००० या काळात वैद्यक व रसायन यांची फारकत झाली. किमयेच्या नादाने व रासायनीक विक्रियेने धातूंची भस्मे बनविण्याची प्रवृत्ती वाढली. हलक्या धातूंपासून सोने बनविण्याची धडपड पूर्वी हिंदू लोक करीत नसत, परंतु वरील काळात त्यांचा अरबांशी संपर्क आल्यावर किमयेचा भारतातही प्रसार झाला. तथापि किमयेचा मुळ हेतू कोणास फारसा साध्य झाला नाही, परंतु यामुळे भारतीय रसायनशास्त्रात मात्र भर पडली. हिंदूंचे लक्ष मुख्यतः पारमार्थिक गोष्टींकडे असल्याने इतर देशांप्रमाणे किमया व परीस यांच्या शोधांवर त्यांनी जास्त भर दिला नाही. 

प्राचीन भारतीय ग्रंथांत हलक्या धातूंपासून किंवा पाऱ्यापासून सोने तयार कसे करावे याचे उल्लेख आढळतात. आजही किमया जाणणारे काही लोक भारतात आहेत. त्यांनी काही प्रयोगही केले आहेत. १९६९ मध्ये नडियादमध्ये ए. पी. आचार्य यांनी सोने बनविण्याचा प्रयोग केला. १९४२ मध्ये कृष्णपाल शर्मा यांनी वनस्पतीचुर्ण व पारद (पारा) यांच्यापासून सोने बनविण्याचा प्रयोग केला. १९४८ मध्ये त्यांनी दिल्ली येथेही तसाच एक प्रयोग केला. परंतु हे सर्व प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अणूची संरचना शोधली गेली. सर्व पदार्थ एकाच पदार्थापासून बनतात या एकेकाळच्या किमयेच्या गृहीत तत्त्वाची ही पुनरावृत्तीच होय. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्राॅॅन व इतर मूलकण यांच्या संरचनेने सर्व पदार्थ बनतात. असे आता सिद्ध झाले आहे. योग्य परिस्थितीत व प्रयोगांनी हल्लीचे शास्त्रज्ञ हलक्या मूलद्रव्यापासून सोनेसुध्दा बनवू शकतील, पण ही पद्धत खर्चिक व कठीण असल्याने व्यावहारिक दृष्ट्या परवडणारी नाही. 

पहा  : रसायनशास्त्र.

संदर्भ : 1. Holmyard, E.J. Alchemy, 1957.

2. Read, J. humour and Humanism in Chemistry, 1947.

3. Sherwood, Taylor F. The Alchemists, 1949.

4. Stillman, J. M. The Story of Early Chemistry, 1924.

मिठारी, भू. चिं.