ल्यूइस, गिल्बर्ट न्यूटन : (२३ ऑक्टोबर १८७५-२३ मार्च १९४६). अमेरिकन रसायानशास्त्रज्ञ. रेणवीय संरचनेमधील इलेक्ट्रॉन युग्माचे महत्त्व त्यांना प्रथम समजले. त्यामुळे सुधारित संयुजा बंध सिद्धांताचा पाया घातला गेला.

ल्यूइस यांचा जन्म वेमथ (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण नेब्रॅस्का, लिंकन व हार्व्हर्ड विद्यापीठ येथे झाले. त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाच्या बी.ए. (१८९६), एम्.ए. (१८९८) आणि पीएच. डी. (१८९९) या पदव्या संपादन केल्या. नंतर प्रवासी अधिछात्रवृत्ती मिळाल्यामुळे ते जर्मनीत लाइपसिक व गटिंगेन येथे गेले. तेथे त्यांनी व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट व व्हाल्टर नेर्स्ट यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केले. ते फिलिपीन्समधील शासकीय प्रयोगशाळेत वजने व मापे कार्यालयाचे प्रमुख होते (१९०४-०५). ते १९०५ मध्ये केंब्रिज येथील मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भौतिकीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेत दाखल झाले आणि १९११ मध्ये तेथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. तेथे त्यांनी रासायनिक ⇨ऊष्मागतिकीसंबंधी संशोधन केले. ते बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि अधिष्ठाते होते (१९१२-४६).

ल्यूइस यांनी १९१६ मध्ये असे सुचविले की, दोन अणूंनी एकत्र धरून ठेवलेल्या संयुजी इलेक्ट्रॉन-युग्मनामुळे एक रासायनिक बंध (सहसंयुजी बंध) तयार होतो. त्यांच्या अष्टक या संकल्पनेप्रमाणे अणूभोवती जोडीजोडीच्या स्वरूपात मांडणी असलेल्या आठ इलेक्ट्रॉनांच्या कवचामुळे अणूला अधिक स्थिरता प्राप्त होते. या संकल्पनांचा पुढे अर्विंग लँगम्यूर आणि लायनस पॉलिंग यांनी इलेक्ट्रॉन सिद्धांतामध्ये विस्तार केला.

ल्यूइस यांनी ड्यूटेरियम हा हायड्रोजनाचा समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेला त्याच मूलद्रव्याचा प्रकार) प्रथम वेगळा तयार केला. त्यांनी १९३३ मध्ये जड पाण्याचा (ड्यूटेरियम ऑक्साइडाचा) शुद्ध नमुना तयार केला. कार्बनी रेणूंमधील उद्दीपित इलेक्ट्रॉन अवस्थांसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनामुळे अनुस्फुरण व प्रस्फुरण हे जटिल आविष्कार आणि कार्बनी द्रव्यांना असलेल्या रंगाचा उद्गम समजण्यास मदत झाली.

ल्यूइस यांनी रासायनिक बंधासंबंधीचे आपले मत व्हॅलन्सी अँड द स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्यूल्स (१९२३) या ग्रंथात प्रसिद्ध केले. या ग्रंथात त्यांनी अम्ले व क्षारक यांसंबंधी असामान्य सिद्धांत मांडला आणि १९३८ मध्ये तो पूर्णपणे विकसित केला. त्यांनी मेर्ले लेंडल यांच्या समवेत थर्मोडायनॅमिक्स अँड द फ्री एनर्जी ऑफ केमिकल सबस्टन्सेस (१९२३) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथाचा रसायनशास्त्राच्या प्रगतीवर चांगला परिणाम झाला आणि उत्कृष्ट पाठ्यपुस्तक म्हणून त्याला मान्यता मिळाली.

ल्यूइस यांना रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक, स्वीडिश ॲकॅडेमीचे अऱ्हेनियस पदक तसेच गिब्ज व रिचर्डस् या पदकांचा बहुमान मिळाला. त्यांची ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस ऑफ द सोव्हियट युनियनच्या पहिल्या परदेशी सदस्यांमध्ये निवड झाली. त्यांचे बर्कली (कॅलिफोर्निया ) येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.