कान्नीद्झारो, स्तानीझ्लाओः  (१३ जुलै १८२६- १० मे १९१०). इटालियन रसायनशास्त्रातील आधुनिक अणुसिद्धांताचे एक आद्य प्रवर्तक. यांचा जन्म पालेर्मो येथे झाला. १८४५-४६ या काळात ते राप्फाएले पिरिया (पीसा येथील रसायन शास्त्राचे प्राध्यापक) यांचे साहाय्यक होते. १८४९ मध्ये ते पॅरिस येथे गेले व तेथे त्यांनी १८५१ पर्यंत चेव्हस्ल यांच्या प्रयोगशाळेत काम केले. त्यानंतर आलेस्सांद्रिया या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. येथे त्यांनी `कान्नीद्झारो विक्रिया’ या नावाने प्रसिद्ध असलेली विक्रिया शोधून काढली. १८५५ मध्ये जिनिव्हा विद्यापीठात ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. सहा वर्षानंतर ते पालेर्मो येथे अकार्बनी व कार्बनी रसानयशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गेले व १८७१ मध्ये रोम विद्यापीठात प्राध्यापक झाले.

क्लोएज यांच्या सहकार्याने त्यांनी ईथरामधील सायनोजेन क्लोराइडाच्या विद्रावावर अमोनियाची विक्रिया करू. 1851 मध्ये सायनामाइड तयार केले. अल्कोहॉली पोटॅशामुळे ऍरोमॅटिक आल्डिहाइडांचे अपघटन होऊन (मोठ्या रेणूचे तुकडे होऊन लहान रेणू तयार होऊन) तदनुसार अम्ल व अल्कोहॉल यांचे मिश्रण मिळते, हा महत्वाचा शोध त्यांनी लावला. ही विक्रिया `कान्नीद्झारा विक्रिया’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी सॅंटोनिनाच्या संरचनेसंबंधी मौलिक संशोधन केले. रेणूभार व अणुभार यांमधील फरक त्यांनी स्पष्ट केला. बाष्पनशील (वाफ होऊन उडून जाणाऱ्या) संयुगातील मूलद्रव्यांचे अणूभार, त्या संयुगांच्या रेणूभारांवरून व बाष्पघनता माहित नसलेल्या संयुगातील मूलद्रव्यांचे अणुभार, त्यांच्या विशिष्ट उष्णतेवरून (एक ग्रॅम पदार्थाचे एक अंश तपमान वाएविण्यास लागणाऱ्या उष्णतेवरून) कसे काढता येतात, हे त्यांनी दाखवून दिले. रसायनशस्त्रातील अणुसिद्धांविषयक मौलिक कार्याबद्दल त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे  कॉप्ली पदक १८९१ मध्ये देण्यात आले.

इटलीच्या सीनेटचे ते १८७१ मध्ये सभासद व उपाध्यक्ष झाले. इटलीमधील वैज्ञानिक शिक्षणासंबंधीही त्यांनी महत्वाचे कार्य केले. ते रोम येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.