सल्फ्यूरिक अम्ल : रासायनिक दृष्ट्या हे तीव्र खनिज अम्ल असून याचे रासायनिक सूत्र H2SO4 हे आहे. सल्फ्यूरिक अम्ल रंगहीन, दाट, तेलकट, विषारी व अतिशय संक्षारक ( झीज घडवून आणणारा ) द्रव आहे. सामान्य वापरातील असंख्य उत्पादनांच्या निर्मितीत सल्फ्यूरिक अम्ल महत्त्वाचे असल्याने औदयोगिक दृष्ट्या हे एक सर्वांत महत्त्वाचे रसायन आहे. यामुळे एखादया देशाच्या औदयोगिक परिस्थितीचे निदर्शक म्हणून याच्या तेथील वापराकडे पाहिले जाते. या अम्लाच्या संपर्कात आलेला शरीराचा भाग भाजू शकतो म्हणून असा संपूर्ण भाग प्रथम भरपूर पाण्याने थोडा वेळ धुवून त्यावर प्रथमोपचार करतात. ग्रीन व्हिट्रिऑलापासून (फेरस सल्फेट Fe2SO4.7H2O ) हे अम्ल तयार करता येते म्हणून याला व्हिट्रिऑल, व्हिट्रिऑलिक ॲसिड ( अम्ल ) किंवा ऑइल ऑफ व्हिट्रिऑल असेही म्हणतात. शिवाय हायड्रोजन सल्फेट, विद्युत् घटमाला अम्ल (बॅटरी ॲसिड ), डीपिंग ( बुडणारे ) ॲसिड इ. याची पर्यायी नावे आहेत.

सल्फ्यूरिक अम्ल हे गंधकाचे सर्वांत महत्त्वाचे व परिचित ऑक्सि-अम्ल असून पेरॉक्सिसल्फ्यूरिक किंवा कारोज अम्ल (H2SO5), पायरोसल्फ्यूरिक अम्ल (H2S2O7) आणि पेरॉक्सिडायसल्फ्यूरिक अम्ल (H2S2O8) ही गंधकाची इतर ऑक्सि-अम्ले होत.

ओलियम किंवा वाफाळणारे सल्फ्यूरिक अम्ल हा सल्फर ट्रायऑक्साइड (SO3) वायूचा १००% सल्फ्यूरिक अम्लातील विद्राव आहे. या विद्रावातून बाष्पीभवनाने हा वायू पांढऱ्या धुराच्या ( वाफेच्या ) रूपात बाहेर पडत असल्याने त्याला वाफाळणारे सल्फ्यूरिक अम्ल असे म्हणतात. पांढरा धूर म्हटल्या जाणाऱ्या हवेतील ओलियमाचे ( सल्फर ट्राय-ऑक्साइडाचे ) प्रमाण सामान्यपणे २०, ४० वा ६५ टक्के असते. कार्बनी रसायने बनविण्यासाठी ओलियम वापरतात.

सल्फ्यूरिक अम्ल ⇨ खनिज जला त नैसर्गिक रीत्या आढळते. ज्वालामुखीच्या जवळच्या भागातही हे आढळू शकते. तेथे उत्सर्जित होणाऱ्या गंधकयुक्त वायूंचे दमट हवेत ⇨ ऑक्सिडीभवन होऊन हे बनते. नैसर्गिक वायूत सल्फर ट्राय-ऑक्साइड हा याचा घटक आढळतो. सल्फ्यूरिक अम्लाची सल्फेटे ही लवणे भूपृष्ठावर विस्तृतपणे विखुरलेली आढळतात. उदा., जिप्सम, तसेच क्षारीय ( अल्कलाइन ) व क्षारीय मृत्तिका धातूंची सल्फेटे असलेले खाऱ्या पाण्याचे अनेक साठे.

इतिहास : सल्फ्यूरिक अम्ल नवव्या शतकात माहीत होते, असे दिसते. १००० साली प्रथम ते तयार करण्यात आले असावे. तेराव्या शतकात आल्बेर्ट्स मागनस यांनी संक्षारक गुणधर्मामुळे याचा स्पिरिट ऑफ व्हिट्रिऑल असा उल्लेख केला होता. पंधराव्या शतकापर्यंत हे ग्रीन व्हिट्रिऑलाच्या ⇨ऊर्ध्वपातना ने तयार करीत असत. मात्र तेव्हा ते अल्प प्रमाणातच मिळत असल्याने चांगलेच महाग होते. अठराव्या शतकापर्यंत काचेच्या मोठया, खोल पात्राच्या मानेसारख्या भागात गंधक व सॉल्ट पीटर ( पोटॅशियम नायट्रेट सोरा ) यांच्या ज्वालनाव्दारे हे तयार करीत असत. या ज्वालनातून तयार झालेली गंधकाची ऑक्साइडे पात्रामधील ड्या पाण्यातविरघळून विरल सल्फ्यूरिक अम्ल तयार होई. ऊर्ध्वपातनाने तेसंहत ( अधिक दाट ) करीत.मात्र आंत्वान लॉरां लव्हॉयझर (१७४३-९४) यांच्या काळापर्यंत याचे नेमके रासायनिक संघटन माहीत नव्हते.

ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जॉन रीबक यांनी शिशाचे अस्तर असलेल्या कोठीत हे अम्ल तयार करण्याची पद्धती म्हणजे कोठी प्रक्रिया बर्मिंगहॅम ( इंग्लंड ) येथे शोधून काढली. या प्रक्रियेने सल्फ्यूरिक अम्ल मोठया प्रमाणात व कमी खर्चात तयार करता येऊ लागले. या पद्धतीत शिशाच्या पत्र्यांचे अस्तर असलेल्या मोठया टाक्यांत ( कोठींमध्ये ) गंधक व सॉल्ट पीटर यांच्या मिश्रणाचे ज्वलन करतात. यामुळे या पद्धतीला कोठी प्रक्रिया हे नाव पडले (१८३० साली या प्रक्रियेत गे-ल्युसॅक मनोरा अंतर्भूत करण्यात आला ). अठराव्या शतकाअखेरीस सल्फ्यूरिक अम्ल हे महत्त्वाचे औदयोगिक रसायन झाले. नंतर हे संपर्क प्रक्रियेने तयार करण्यात येऊ लागले. सर्वांत आधीच्या संपर्क प्रक्रियेचे वर्णन व्हिनेगार तयार करणारे इंग्रज शास्त्रज्ञ पेरेगाइन फिलिप्स यांना मिळालेल्या एकस्वाच्या वर्णनात आले आहे. या प्रक्रियेत पिवळी होईपर्यंत तापविलेली प्लॅटिनमाची तार हा उत्प्रेरक [प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिच्या गतीत बदल करणारा पदार्थ[⟶ उत्प्रेरण] वापरला होता. तिच्या संपर्कात सल्फर डाय-ऑक्साइडाचे (SO2) हवेत ज्वलन करीत ( म्हणून नाव पडले ). ही प्रक्रिया १८८०-९० या दशकात व्यापारी उत्पादनासाठी वापरण्यात येऊ लागली. तिने लगेचच कोठी प्रक्रियेची जागा घेतली. कारण संपर्क प्रक्रियेत शुद्घ सल्फ्यूरिक अम्ल व त्यात विविध प्रमाणांत विरघळलेला सल्फर ट्राय-ऑक्साइड यांचे मिश्रण तयार होते. याउलट कोठी प्रक्रियेत सापेक्षत: (६६-७०%) सल्फ्यूरिक अम्ल तयार होते. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस सल्फ्यूरिक अम्ल निर्मितीच्या उदयोगाची झपाटयाने वाढ झाली कारण कार्बनी रसायनांच्या ( विशेषत: रंगद्रव्यांच्या ) उत्पादनात मोठी वाढ झाली आणि त्यासाठी संहत ( प्रमाण जास्त असलेल्या ) सल्फ्यूरिक अम्लाची आवश्यकता असे.

गुणधर्म : शुद्घ सल्फ्यूरिक अम्लाचे वि.गु.१.८२७(२५°से. ला ), गोठणबिंदू वा वितळबिंदू १०.३७° से., उकळबिंदू ३३८°-३१५° से. च्या दरम्यान असून हे आर्द्रताशोषक, तीव्र ऑक्सिडीकारक व कमी बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारे ) आहे. तापविल्यास सल्फ्यूरिक अम्लाचे अपघटन होऊन सल्फर ट्राय-ऑक्साइड व पाणी तयार होतात. अम्लाची संहती ९८.३% होईपर्यंत सल्फर ट्राय-ऑक्साइड बाष्परूपात हवेत निघून जातो. मग हे ३३८° से. या स्थिर तापमानाला उकळते.


सल्फ्यूरिक अम्ल पाण्यात सर्व प्रमाणांत झटपट मिसळते. हे पाण्यात मिसळताना खूप उष्णता निर्माण होते. म्हणून हे काम काळजीपूर्वक करतात. द्रवाचे तापमान निर्माण होणाऱ्या उष्णतेने उकळबिंदूपेक्षा अधिक होणार नाही अशी काळजी घेतात. पाण्यात थोडे अम्ल सावकाशपणे टाकणे अधिक सुरक्षित असते. दाट अम्ल पाण्यात बुडून खाली जाताना निर्माण होणारी उष्णता सर्वत्र सारख्या प्रमाणात वाटली जाते. पाणी  ढवळत राहिल्यास हे काम सहजपणे होते. उलट अम्लात पाणी टाकल्यास उष्ण शिंतोडे उडण्याची स्फोटक क्रिया घडू शकते. याच्या पाण्याबरोबरच्या विक्रियेतून अनेक हायड्रेटे तयार होतात. यांपैकी मोनोहायड्रेट (H2SO4.H2O) हे सापेक्षत: स्थिर आहे.

सल्फ्यूरिक अम्ल हे द्विक्षारकीय अम्ल आहे. म्हणजे याचे दोन टप्प्यांत आयनीभवन होते. (H2SO4⟶ H+ + HSO4   HSO4  ⟶ H+  + SO42- जलीय विद्रावात हे अतितीव अम्ल आहे. याचे पूर्ण आयनीभवन होऊन हायड्रोनियम आयन ( H3O+  ) व हायड्रोजन सल्फेट आयन ( HSO4  )तयार होतात. विरल विद्रावात हायड्रोजन सल्फेट यनांचेही विदलन वा विच्छेदन होते आणि अधिक हायड्रोनियम आयन व सल्फेट आयन ( SO4)2-  तयार होतात.

सल्फ्यूरिक अम्ल ऑक्सिडीकारक असल्याने उच्च तापमानाला याची अनेक धातू, कार्बन, गंधक व इतर पदार्थांशी विक्रिया होते. सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया संहतीनुसार बदलते. हायड्रोजन आयनाने ऑक्सिडीभूत होणाऱ्या धातूंवर विरल सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया होऊन सल्फेट व हायड्रोजन तयार होतात. तप्त सल्फ्यूरिक अम्लाची इतर बहुतेक धातूंवर विक्रिया होऊन सल्फर डाय-ऑक्साइड, सल्फेट व पाणी तयार होतात.

उदा., 2Ag + 2H2SO4Ag2SO4 + SO2+2H2O.

सोन्यावरची याची विक्रिया सर्वाधिक सौम्य असते. संहत सल्फ्यूरिक अम्लाने कमी वितळबिंदू असलेल्या इतर अम्लांची निर्मिती होते.

उदा., NaCl + H2 SO4 ⟶ HCl + NaHSO4.

एक ऑक्सिजन अणू निघून जाण्याच्या प्रवृत्तीमुळे सल्फ्यूरिक अम्लापासून सल्फ्यूरस अम्ल (H2 SO3 ) तयार होते आणि त्याचे सहज अपघटन होऊन सल्फर डाय-ऑक्साइड व पाणी तयार होतात. सल्फ्यूरिक अम्लाच्या काही भागाचे ⇨ क्षपण होऊन सल्फर डाय-ऑक्साइड तयार होते. शुद्घ सल्फ्यूरिक अम्ल १००° से.पेक्षा अधिक तापविल्यास त्याचे अपघटन होऊन सल्फर ट्राय-ऑक्साइड व पाणी तयार होते. सल्फर ट्राय-ऑक्साइड व सल्फ्यूरिक अम्ल सममोलर प्रमाणात संयोग पावून पायरोसल्फ्यूरिक अम्ल हे स्फटिकी संयुग तयार होते.

संहत सल्फ्यूरिक अम्ल निर्जलीकारक आहे. कारण त्याला पाण्याविषयी तीव्र आकर्षण असते. त्यामुळे काही पदार्थांमधील पाण्याशी वा पाण्याच्या घटकांशी याचा जोरदारपणे संयोग होऊन ते पदार्थ भाजले जातात ( उदा., लाकूड, कागद, स्टार्च, साखर इत्यादी ) आणि मागे कार्बनयुक्त काळा अवशेष उरतो. साखरेतील हायड्रोजन व ऑक्सिजन सल्फ्यूरिक अम्ल टाकल्याने निघून जाऊन मागे फेसाळ, काळा कार्बन (लोणारी कोळसा ) राहतो.

उत्पादनसल्फ्यूरिक अम्ल मुख्यत: गंधकापासून संपर्क व कोठी या दोन मुख्य व्यापारी प्रक्रियांनी मोठया प्रमाणावर तयार करतात. दोन्ही प्रक्रियांमध्ये गंधकाचे ऑक्सिडीभवन करून तयार करण्यात आलेले सल्फर ट्राय-ऑक्साइड पाण्यात विरघळून हे अम्ल तयार करतात. संपर्क प्रक्रियेने अधिक संहत वा शुद्घ अम्ल मिळते. सर्व नवीन सल्फ्यूरिक अम्ल संयंत्रांमध्ये संपर्क प्रक्रिया वापरली जाते.

संपर्क प्रक्रिया : पूर्वीची संपर्क प्रक्रिया काही प्रमाणात यूरोपात वापरली जात असे मात्र ती अमेरिकेत वापरली जात नव्हती. गंधकापासून तयार केलेला सल्फर डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन ४००° से. पर्यंत उत्प्रेरकाविना तापविल्यास त्यांचा अतिशय सावकाशपणे संयोग होऊन सल्फर ट्राय-ऑक्साइड तयार होते व उष्णता निर्माण होते.

2SO2 + O2⟶ 2SO3 + ४५.२ किकॅ.

या मंद विक्रियेने मोठया प्रमाणात व्यापारी उत्पादन करणे शक्य होत नाही. मात्र यात सल्फर ट्राय-ऑक्साइडातील रूपांतर ९८% होते. याहून जास्त तापमानात विक्रियेची गती वाढत असली, तरी उलटी विक्रियाहीसुरू होते ( २SO3  ⟶ 2SO2 + O2  ). म्हणून सल्फर ट्राय-ऑक्साइड कमी प्रमाणात तयार होते (उदा., ७००° से. तापमानाला ६०% सल्फर डाय- ऑक्साइडाचेच सल्फर ट्राय-ऑक्साइडात रूपांतर होते). म्हणून उत्प्रेरक वापरून ४००° से. तापमानालाच विक्रियेची गती वाढविणे श्रेयस्कर ठरते.

वितळलेले गंधक तोटीतून भट्टीत फवारल्यासारखे सोडतात. तेथे त्याचे कोरड्या हवेत ज्वलन होऊन सल्फर डाय-ऑक्साइड तयार होते. अशुद्घ गंधक किंवा धातूंची सल्फाइडे यांचे ज्वलन होताना त्यांच्यातील आर्सेनिक ऑक्साइड, हॅलोजने, धूळ, आर्द्रता यांसारख्या अशुद्घींचा विचार करावा लागतो. उत्प्रेरकाच्या संपर्कात येण्याआधीच या अशुद्घी काढून टाकतात. कारण अत्यल्प अशुद्घीचीही उत्प्रेरकाला विषबाधा होऊन विक्रिया थांबू शकते. तापलेला सल्फर डाय-ऑक्साइड वायू धूळ संकलकातून पाठवून शुद्घ करतात. तेथे स्थिर विद्युत् भारामुळे धूळ निक्षेपित होऊन वेगळी होते. मग हा वायू खरारा करणाऱ्या मनोऱ्यातून नेतात. तेथे ठिबकत असलेल्या संहत सल्फ्यूरिक अम्लाने बहुतेक अशुद्घी बाहेर पडतात. पाणी वा वाफ असल्यास झाकळ तयार होते. असा वायू कोकच्या गाळण्यांतून पाठवून झाकळ काढून टाकतात. ५७५° से. या इष्ट तापमानाला सल्फर डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन पहिल्या संपर्क टाकीत ( मनोऱ्यात) जातात. तेथे टप्प्याटप्प्यावर ठेवलेल्या तबकांत उत्प्रेरक ( मुख्यत्वे व्हॅनेडियम पेंटा-ऑक्साइड ( V2   O5  ) कधीकधी प्लॅटिनमयुक्त ॲस्बेस्टस किंवा लोह ऑक्साइड ) असतो. या मनोऱ्यातून बाहेर पडलेल्या वायुमिश्रणात सल्फर ट्राय-ऑक्साइडाचे बाष्प आणि अधिक प्रमाणात ऑक्सिजन व नायट्रोजन असतात. नंतर हा वायू ९८-९९% सल्फ्यूरिक अम्ल ठिबकत असलेल्या बंदिस्त मनोऱ्यातून जलदपणे नेतात. येथे सल्फर ट्राय-ऑक्साइड वायू सल्फ्यूरिक अम्लात शोषला जातो व वाफाळणारे सल्फ्यूरिक अम्ल तयार होते. नंतर विरलकारक टाकीत या अम्लामध्ये पाणी घालून हव्या त्या संहतीचे सल्फ्यूरिक अम्ल तयार करतात. येथे सल्फर ट्राय-ऑक्साइडाशी पाण्याचा संयोग होऊन अधिक सल्फ्यूरिक अम्ल तयार होते. असे व्यापारी सल्फ्यूरिक अम्ल ऊर्ध्वपातनाने ९८.३% पर्यंत संहत करतात आणि क्रमश: स्फटिकीभवनाने शुद्घ सल्फ्यूरिक अम्ल मिळवितात.

कोठी प्रक्रियाया प्रक्रियेत शिशाच्या पत्र्याचे अस्तर असलेल्या मोठमोठया टाक्यांमध्ये सल्फर डाय-ऑक्साइड, वाफ, नायट्रिक ऑक्साइड व ऑक्सिजन यांच्यातील विक्रियेने सल्फ्यूरिक अम्ल तयार होते. येथे नायट्रिक ऑक्साइड उत्प्रेरकाचे काम करते. नंतर वायू व द्रव ग्लोव्हर ( तप्त ) व गे-ल्युसॅक ( शीत ) या दोन प्रकाराच्या मनोऱ्यांतून नेतात.सल्फर डाय-ऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडे (  NOव NO2) यांचे मिश्रण गे-ल्युसॅक मनोऱ्यांतून ग्लोव्हर मनोऱ्याच्या वरच्या भागातून खाली नेले जाते. तेथे ते सल्फ्यूरिक व नायट्रोसिल सल्फ्यूरिक अम्ल [H(NO)SO4 ] यांच्या मिश्रणाच्या संपर्कात येते. येथील विक्रियांतून अधिक नायट्रोसिल सल्फ्यूरिक अम्ल तयार होते व मनोऱ्यात खाली जाते. ग्लोव्हर मनोऱ्यातून बाहेर पडलेला वायूचा भाग कोठयंतून जातो. तेथे वायूंवर वाफेचा फवारा सोडलेला असतो. यामुळे पुढील विक्रिया घडते.

SO2 + NO2 + H2O⟶ H2SO4 + NO

 

या विक्रियेने बनलेले सल्फ्यूरिक अम्ल कोठीच्या तळाशी काढून घेतात व ग्लोव्हर मनोऱ्यात पंप करतात. तेथे ते संहत होते. कोठयंमधून बाहेर पडलेले उरलेले वायू गे-ल्युसॅक मनोऱ्यात जातात. तेथे त्यांच्यावर सल्फ्यूरिक अम्लाचा फवारा मारला जातो. यामुळे बहुतेक नायट्रोजन ऑक्साइडे परत मिळविली जातात व अधिक नायट्रोसिल सल्फ्यूरिक अम्ल तयार होते. ते परत ग्लोव्हर मनोऱ्याकडे पंप केले जाऊन चक पूर्ण होते. यामध्ये नायट्रोजन ऑक्साइडे पूर्णपणे परत मिळत नाहीत. म्हणून या चकाच्या सुरूवातीस ताजी नायट्रोजन ऑक्साइडे पुरवितात. ही प्रक्रिया सापेक्षत: स्वस्त असली, तरी हिच्यात सौम्य (७७%) सल्फ्यूरिक अम्ल ( कोठी अम्ल ) मिळते. कारण अखंड बाष्पीभवनाने अम्लाचे अपघटनही होत असते. तापवून बाष्पीभवनाव्दारे पाणी काढून टाकून अथवा कमी दाबाला उकळून हे अम्ल अधिक संहत करतात.


लोखंडाचे किंवा तांब्याचे पायराइट अथवा इतर सल्फाइड धातुके ( कच्च्या रूपातील धातू ) परिष्कृत करताना, तसेच दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे ज्वलन होताना सल्फर डाय-ऑक्साइड उपपदार्थ म्हणून मिळतो. त्याचाही सल्फ्यूरिक अम्ल निर्मितीसाठी उपयोग करणे शक्य आहे. अर्थात अशा सल्फर डाय-ऑक्साइडात अशुद्घी असू शकतात. त्यामुळे तो शुद्घ करून घ्यावा लागतो. शिवाय दगडी कोळसा वापरणारी औष्णिक विद्युत् केंद्रे सामान्यत: दूरच्या ठिकाणी असतात. त्यामुळे तेथून संक्षारक सल्फ्यूरिक अम्लाची वाहतूक करणे ही गुंतागुंतीची समस्या होईल.

दगडी कोळसा व खनिज तेल यांच्या ज्वालनातून निर्माण होणारा सल्फर डाय-ऑक्साइड वायू वातावरणात जातो. तेथे त्याचे ऑक्सिडीभवन होऊन सल्फर ट्राय-ऑक्साइड तयार होते व नंतर सल्फर ट्राय-ऑक्साइडाची पाण्याच्या वाफेशी विक्रिया होऊन सजल सल्फ्यूरिक अम्ल तयार होते. अशा रीतीने सल्फ्यूरिक अम्लाची हायड्राइडे निर्माण होतात आणि ती अम्ल-पर्जन्यातील एक महत्त्वपूर्ण घटक होतात. त्यांच्यामुळे वातावरणातील ओझोन वायूचे अपघटन होते. वातावरणातील ओझोनाच्या थराची झीज होण्यामाणे हे एक कारण असल्याचे मानले जाते.

उपयोग : खतनिर्मिती, धातुवैज्ञानिक प्रक्रिया आणि खनिज तेलाचे परिष्करण ( शुद्घीकरण ) यांत मुख्यत: सल्फ्यूरिक अम्ल वापरले जाते. खनिज तेल परिष्करणातून अनेक खनिज तेल उत्पादने मिळतात. रासायनिक उदयोगांमध्ये अनेक प्रकारची कार्बनी रसायने बनविण्यासाठी सल्फ्यूरिक अम्ल वापरतात. उदा., एथिलिनापासून अल्कोहॉल, बेंझिनाशी याची विक्रिया होऊन बनणारी सल्फोनेटे ⇨ प्रक्षालकां त वापरतात. काही रंजके, रंजक-द्रव्ये, रंगलेप, रंगद्रव्ये, स्फोटक द्रव्ये, औषधे, पोलाद, रबर, पीडकनाशके, बोरिक अम्ल, सल्फोनेटेड हायड्रोकार्बने, अकार्बनी लवणे व अम्ले ( हायड्रोक्लोरिक, नायट्रिक, हायड्रोफ्ल्युओरिक), सेलाफेन, रेयॉन वगैरे असंख्य पदार्थ तयार करताना सल्फ्यूरिक अम्ल वापरतात. मोटारगाडीतील (शिसे-अम्ल ) विद्युत् घटमालेत विद्युत् विच्छेद्य म्हणून सल्फ्यूरिक अम्ल वापरतात. इतर अम्ले व खनिजे यांतील अनिष्ट घटक यात विरघळवून काढून टाकतात. सल्फ्यूरिक अम्लात अनेक धातू विरघळतात व त्याव्दारे बनणारी सल्फेटे औदयोगिक उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.

औदयोगिक सांडपाण्यावरील संस्करण, धातुकांचे अपक्षालन, शुष्कन, ऑक्सिडीकरण, अल्किलेशन व तत्सम क्रिया, धातूंवरील अंतिम संस्करण क्रिया वगैरे कामांसाठी निरनिराळ्या संहतींचे सल्फ्यूरिक अम्ल वापरतात. सल्फ्यूरिक अम्ल सापेक्षत: स्वस्त व अबाष्पनशील म्हणजे बाष्परूपात सहज उडून न जाणारे असल्याने त्याचे असे व्यापक उपयोग होतात.

पहा : खते गंधक रासायनिक उदयोग.

संदर्भ : 1. Bailer, Jr. and others, Eds., Comprehensive Inorganic  Chemistry, 1973.

            2. Sander, U and others, Eds., Sulphur,  Sulphur Dioxide, Sulphuric Acid, 1984.

            3. Whitten, K. W. Gailey, K. D. Davis, R. E. General Chemistry, 1992.

ठाकूर, अ. ना.