रूप गोस्वामी : (सु. १४८९−सु. १५६८). सोळाव्या शतकात होऊन गेलेले बंगाली कवी व थोर वैष्णव साधक. ते जन्माने बंगाली कवी व थोर वैष्णव साधन. ते जन्माने बंगाली असले, तरी त्यांनी ग्रंथरचना संस्कृतमध्ये केली. वृंदावन क्षेत्री चैतन्य महाप्रभूंच्या गौड पंथीय वैष्णवरसतत्त्वाचा व साधनारीतीचा प्रसार करणारे ते भक्त होते.

पिता कुमारदेव. रूप गोस्वामी यांचे मूळ नाव संतोष पण चैतन्य महाप्रभूंनी दिलेल्या ‘रूप’ या नावानेच ते सर्वत्र परिचित आहेत. रूप गोस्वामी हे बंगालच्या सुलतान हुसेन शाह (कार. १४९३−१५१८) याच्या पदरी खास मुनशी म्हणून होते. ते रामकेली गावी राहत असताना १५१३ साली त्यांना चैतन्य महाप्रभूंचे दर्शन घडले व अनुग्रह लाभला. मनात भक्तितत्त्वाचे जागरण झाल्यामुळे रूप गोस्वामींनी राजकर्माचा त्याग केला व चैतन्यांची कास धरली. अखेर पुरी येथे वास्तव्य असताना चैतन्य महाप्रभूंनी त्यांना वृंदावन क्षेत्री जाऊन रसायनशास्त्राचे व कृष्णभक्तीचे निरूपण आणि प्रसार करण्याचा आदेश दिला. त्यानुसार रूप गोस्वामींनी आपले उर्वरित जीवन वृंदावन येथे व्यतीत केले व चैतन्य महाप्रभूंचा आदेश पालन केला. त्यांच्याबरोबर त्यांचा वडील भाऊ सनातन तसेच लहान भावाचे चार पुत्र (जीव, गोपालभट्ट, रघुनाथभट्ट व रघुनाथदास) हेही कृष्णभक्तिपप्रसाराच्या कार्यात सामील झाले. वृंदावनातील हे सहा गोस्वामी गौडीय वैष्णव धर्माचा सिद्धांत स्थापन करण्याच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.

लघुतोपणीभक्तिरत्नाकर या ग्रंथामध्ये रूप गोस्वीमी यांची संस्कृत भाषेत रचना करण्याची हातोटी दिसून येते. शिवाय उद्धव संदेश, मानकेली कौमुदी (१५२६), विदग्धमाधव (१५३३), ललितमाधव (१५३७), भक्तिरसामृतसिंधु (१५४१), उज्ज्वल-नीलमणि, लघुगणोद्देशदीपिका इ. संस्कृत ग्रंथ लिहिले व गौडिय वैष्णव तत्त्वातील कृष्णभक्तीला अधिष्ठान प्राप्त करून दिले. भक्तिरसाची त्यांनी समग्र चर्चा केली आणि मधुर रसात कृष्णाचे व राधेचे नायक-नायिका म्हणून अद्वितीय श्रेष्ठत्व सिद्ध केले. वृंदावन क्षेत्री त्यांचे देहावसान झाले.

आलासे, वीणा