शास्त्री, हरप्रसाद : (६ डिसेंबर १८५३–१७ नोव्हेंबर १९३१). बंगाली पंडित व लेखक. नैहाटी (जि. चोवीस परगणा) येथे संस्कृत पंडित घराण्यात जन्म. वडील कमललोजन न्यायरत्न (भट्टाचार्य). कोलकात्याच्या संस्कृत कॉलेजमधून एम्. ए. आणि ‘शास्त्री’ या पदव्या. वेगवेगळ्या महाविद्यालयांतून संस्कृतचे अध्यापन व शेवटी संस्कृत कॉलेजमध्ये प्राचार्य. डाक्का विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते संस्कृत विभागप्रमुख होते (१९२१–२४).  संस्कृत, इंग्रजी, पाली, जर्मन, तिबेटी इ. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. नेपाळ आदी ठिकाणांहून त्यांनी बऱ्याच दुर्मीळ पोथ्या मिळविल्या होत्या. आद्य बंगाली भाषा- साहित्याचे नमुने शोधून प्रकाशित करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. बंगाली साहित्याच्या उगमस्थानी असलेल्या ‘चर्यागीतिका’ या रचना नेपाळ राजदरबारच्या पोथीशाळेत होत्या, तेथून त्या मिळवून, हरप्रसाद शास्त्रींनी बंगीय साहित्य परिषदेमार्फत हजार बछरेर / पुराण बांगला भाषाय बौद्ध गान ओ दोहा या नावाने त्या प्रसिद्ध केल्या (१९१६). चर्याचर्यविनिश्चय ही पोथी म्हणजे बंगाली भाषेतील पहिला दस्तावेज मानला जातो. हेही हरप्रसाद शास्त्री यांनीच उघडकीस आणले. याखेरीज भारत महिला (१८००). वाल्मीकीर जॉय (१८८०), मेघदूत (बंगाली अनुवाद) हे त्यांचे ग्रंथ व कांचनमाला (१९१६) आणि बेनेरमेये (१९१६) या दोन कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय होत. बेनेरमेये या श्रेष्ठ कादंबरीत दहाव्या-अकराव्या शतकांतील सप्तग्राम विभागाचे घडविलेले दर्शन ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. याखेरीज त्यांनी पुढील बंगाली पुस्तकांचे संपादन केले. प्राचीन बांगला ग्रंथावली (१९०८), कीर्तिलता (१९२५) व महाभारत : आदिपर्व (१९२८-२९) व नंतर प्रकाशित झालेली प्राचीन बांगलार गौरव (१९४०) व बौद्ध धर्म (१९४१-४२) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी इंग्रजीतही विपुल लेखन केले. नोटिसेस ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्‌स,  २ खंड (१८७०–१९११), रिपोर्ट ऑन द सर्च ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्‌स, ३ खंड (१८९५–१९११) आणि डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्‌स, १४ खंड (१९१७–५५) हे त्यांचे इंग्रजी ग्रंथ एशियाटिक सोसायटीतर्फे प्रकाशित झाले. यांखेरीज डिस्कव्हरी ऑफ लिव्हिंग बुद्धिझम इन बंगाल (कलकत्ता, १८९७), भागधन लिटरेचर : सिक्स लेक्चर्स (पाटणा, १९२०-२१) व लोकायत (डाक्का, १९२५) ही त्यांची इंग्रजी पुस्तके उल्लेखनीय आहेत.

हरप्रसाद यांच्या कादंबऱ्यांवर सर्वच दृष्टींनी बंकिमचंद्रांचा प्रभाव आहे. ‘एशियाटिक सोसायटी’ व ‘बंगीय साहित्य-परिषद’ या दोन संस्थांच्या जडणघडणीत हरप्रसादांचा मोठा वाटा आहे. ‘महामहोपाध्याय’ ही पदवी त्यांना १८९८ मध्ये देण्यात आली.

सेन, सुकुमार (बं.) जोशी, श्री. बा. (म.)