बंदोपाध्याय, रंगलाल : (? डिसेंबर १८२७–१७मे १८८७). बंगाली कवी, निबंधलेखक व पत्रकार. वरद्वार जिल्ह्यातील बाकूलिया येथे जन्म व तेथेच प्राथमिक व शालेय शिक्षण. सहा वर्ष महाविद्यालयीन शिक्षण चिनसुरा (चुचूरा) येथील महंमद महसीन कॉलेजमध्ये. प्रथम सहा महिने कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये बंगाली साहित्याचे प्राध्यापक म्हणून तात्पुरती नोकरी व त्यानंतर नडिया जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक. उपजिल्हाधिकारी म्हणून कटक येथे अनेक वर्षे काम केल्यावर अखेर हावडा विभागाचे ते उपजिल्हाधिकारी व उपन्यायधीश होते.१८८२ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

रंगलाल यांना लहानपणापासूनच ‘जात्रा’ गीतांची आवड होती व त्यांनी तशी काही गीतेही रचली होती. त्यांना कवी ⇨ईश्वरचंद्र गुप्त (१८१२-५९) यांचा सहवास लाभला. ईश्वरचंद्रांच्या संवाद प्रभाकर पत्राचे ते नियमित लेखक होते. संवाद रससागर या आठवड्यांतून तीन वेळा निघणाऱ्या पत्रकाचे रंगलाल संपादक (१८५०) तसेच १८५६ मध्ये एज्युकेशन गॅझेटसाप्ताहिक वार्ताहर या दोन पत्रकांचे ते संहसंपादक होते. नोकरीनिमित्त ओरिसात असताना त्यांनी उत्कल दर्शन नावाचे वर्तमानपत्र सुरू केले होते. चांगला कविताविषयक प्रबंध (१८५२) हे रंगलालांचे सर्वप्रथम पुस्तक होय. त्यांचे पद्मिनी उपाख्यान (१८५८) हे काव्य म्हणजे ऐतिहासिक कहाणीवर आधारलेले बंगाली भाषेतील पहिले आख्यानकाव्य होय. मेक भूषिकेर युध्द (१८५८) हे त्यांचे काव्य एज्युकेशन गॅझेटमधून क्रमश. प्रसिध्द झाले. कर्मादेवी (१८६२) व सूरसुंदरी (१८६८) या दोन काव्यांमध्ये त्यांनी राजस्थानमधील पतिव्रतांची व वीरबालांची छंदोबध्द चरित्रे ग्रंथित केलेली आहेत. कांचीकावेरी (१८७६) हे त्यांचे काव्य ओरिसातील प्राचीन कवी पुरूषोत्तम दास यांच्या एका कवितेतील कथेवर आधारलेले वीरसात्मक काव्य आहे. कुमारसंभव (१८७२) मध्ये त्यांनी कालिदासाच्या मूळ काव्यातील पहिल्या सात सर्गांचा व आठव्या सर्गातील काही अंशाचा बंगाली पद्यानुवाद केलेला आहे.

रंगलाल हे उत्कट देशभक्त होते, ही गोष्ट त्यांनी काव्यरचनेसाठी निवडलेल्या ऐतिहासिक विषयांवरून स्पष्ट दिसून येते. ते इंग्रजी काव्याचा आदर्श समोर ठेवून स्वदेशी बाण्याने बंगाली काव्यलक्ष्मीला अलंकृत करणारे एक प्रधान कवी होत. आजही त्यांच्या देशभक्तीपर ओळी जनमनात रूजलेल्या आढळतात.

आलासे, वीणा