बलाइचाँद मुखोपाध्यायमुखोपाध्याय, बलाइचाँद : (१९ जुलै १८९९–? १९७९). प्रसिद्ध बंगाली साहित्यिक. पूर्णिया जिल्ह्यातील मणिहारी गावी जन्म. पाटणा व कलकत्ता विद्यापीठांत शिक्षण. ते एम्. बी. बी. एस्. होते व वैद्यकीय व्यवसाय करत. ‘बनफूल’ हे टोपणनाव त्यांनी स्वीकारून आपले लेखन केले. प्रथमपासूनच ते कविता लिहीत. व्यंगकविता, विडंबनात्मक कविता लिहिण्यात बलाइबाबू सिद्धहस्त होते परंतू नंतर ते कथा कादंबऱ्यांकडे वळले. त्यांच्या वैद्यकीय विद्यार्थिजीवनातील अनुभवांवर बलाइबाबूंनी लिहिलेल्या तृणखंड (१९३५) आणि वैतरणी तीरे (१९३७) या पुस्तकांनी बंगाली साहित्याला नवी वाट दाखविली. बलाइबाबूंच्या पुस्तकांची संख्या पन्नासहून अधिक आहे. बनफूलेर कविता (१९३६), अंगारपर्णी (१९४०), आहवनीय (१९४३), चतुर्दशी, करकमलेषु इ. त्यांचे कवितासंग्रह होत. बनफूलेर श्रेष्ठ गल्प (१९४८), बाहुल्य, बिंदुविसर्ग इ. त्यांचे कथासंग्रह होत. द्वैरथ (१९३७), निर्मोक (१९४०), किछु क्षण (१९४४), मानदंड (१९४८), नवदिगंत (१९४९), स्थावर (१९५१), कष्टीपाथर (१९५८), पंचवर्ष (१९५४), जंगम (३ भाग-१९४३), मुगया (१९४०), शे ओ आमी (१९५०), लक्ष्मीर आगमन (१९५४), अग्नी (१९७३) इ. त्यांच्या कादंबऱ्या आहेत. शिक्षार मित्ति (१९५५) हा निबंधसंग्रह, श्रीमधुसूदन (१९३९) व विद्यासागर (१९४१) ही दोन चरित्रात्मक नाटके आणि रूपांतर, मंत्रमुग्ध (१९३८), मध्यवित्त, दशभाग (१९४४) ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत.

कथा-कादंबऱ्यांच्या विषयांसाठी बलाइबाबूंनी ज्ञान-विज्ञानाच्या निरनिराळ्या विभागांत विहार करून, अनुभवसिद्ध साधनसामुग्री मिळविली. त्यांच्या साहित्यातील विषयांचे वैशिष्ट्य व वैविध्य, विषय प्रतिपादनातील ठामपणा, लेखनातील विनभ्रभाव इ. गुणांमुळे बंगाली जाणकार वाचकांत बलाइचाँद मुखोपाध्याय लोकप्रिय झाले.

कमतनूरकर, सरोजिनी