आलाओल सैयद: (१६०७–१६८०). एक बंगाली मुसलमान कवी. अभिजात संस्कृत शैलीच्या बंगाली काव्ययुगाचा एक प्रमुख प्रवर्तक व बहुभाषाविद. त्याचे वडील जलालपूरचा (जि. फरीदपूर) नबाब समशेर कुतुब याचे मंत्री होते. लहानपणी आलाओल वडिलांबरोबर समुद्रप्रवास करीत असता पोर्तुगीज चाच्यांच्या हल्ल्यामध्ये वडील मारले गेले व स्वतः आलाओल आराकानकडे रोसांग येथे पळून गेला. तेथे मगन ठाकूर नावाच्या मुसलमान मंत्र्याचा त्याला आश्रय लाभला.

सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातील विख्यात हिंदी सूफी कवी ð मलीक मुहमंद जायसी  ह्याच्या पद्मावत ह्या काव्याच्या आधाराने त्याने पद्मावती  हे अभिजात काव्य लिहिले (१६५१). चितोडच्या राणी पद्मिनीची कथा त्यात वर्णिली आहे. या रूपकात्मक काव्यात त्याची स्वतंत्र प्रतिभा व सूफी संकेतयोजना यांचे दर्शन घडते.

आलाओल केवळ कवीच नव्हता, तर थोर पंडित तसेच अरबी, फार्सी व संस्कृत ह्या भाषांचा गाढा व्यासंगीही होता. हिंदु-मुसलमानांच्या सांस्कृतिक समन्वयासाठी झटणारा हा कवी या दोन्ही समाजांना ‘आमादेर कवी’ (आमचा कवी) वाटत राहिला. अरबी-फार्सी भाषाव्यासंगाचा त्याच्या काव्यावर अत्यल्प प्रभाव आहे. हिंदूंच्या सांस्कृतिक जीवनाचे त्याचे निरीक्षण सूक्ष्म असून महाभारत, रामायण, भागवत तसेच नाथपंथी व वैष्णवपंथी साहित्य यांतील अनेक दृष्टांत, उपमा, प्रसंग इत्यादींचे निर्देश त्याच्या काव्यात आढळतात. हप्त पैकर, तोहफाइस्कंदरनामा  ह्या मूळ फार्सी ग्रंथावरून त्याने बंगाली भाषेत केलेले अनुवाद प्रसिद्ध आहेत.

आलाओलचे इतर ज्ञात ग्रंथ पुढीलप्रमाणे: दौलत काजीच्या अपूर्ण सती मैनावतीचा उत्तरार्ध, सैफुल-मुलुक-वहिउज्जमाल (पूर्वार्ध १६५९, उत्तरार्ध १६६९). याशिवाय त्याने आणखी काव्यग्रंथ रचल्याचे सांगतात, पण ते आज उपलब्ध नाहीत. त्याची अनेक वैष्णव पदे मात्र ग्रामीण हिंदु-मुसलमान समाजांत आजही मोठ्या आवडीने गायिली जातात.

खानोलकर, गं. दे.