भारतचंद्र राय : (१७१२ – १७६०). अठराव्या शतकातील आख्यानकाव्ये रचणारे श्रेष्ठ बंगाली कवी. हावडा जिल्ह्याच्या सीमेवरील भूरशुट परगण्यातील पँडो नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला. पिता नरेंद्रनारायण राय.

भारतचंद्र राय यांचे पूर्वायुष्य फार घटनाबहुल होते. दैव जोखण्यासाठी भारतचंद्रांनी अल्पवयातच गृहत्याग केला व अनेक ठिकाणी भ्रमंती केली. या काळात त्यांनी फार्सी भाषेचा व संस्कृत शास्त्रांचा अभ्यास केला. नि:संगपणे देवदर्शन व शास्त्रचर्चा करीत बराच काळ त्यांनी नीलाचलात हिंडण्यात घालविला. या भ्रमंतीतूनच काव्यानुभव व काव्यसामग्री जमा झाली.

अखेर कृशनगर (जि. नडिया) येथील महाराजा कृष्णचंद्र राय यांचा अगत्यपूर्ण आश्रय मिळाल्यावर भारतचंद्र मूलाजोड या ठिकाणी वस्तीला राहिले. यावेळी त्यांचे वय चाळिशीच्या आसपास होते. उर्वरित आयुष्याची सात -आठ वर्षे भारतचंद्र हे राजा कृष्णचंद्र राय यांच्या दरबारी सभाकवी होते. भारतचंद्रांच्या रसमंजरी (सु. १७५०) या ग्रंथातील कवित्व बघून राजा कृष्णचंद्र राय मुग्ध झाले व त्यांच्या आज्ञेनुसार भारतचंद्रांनी अन्नदामंगल, विद्यासुंदरमानसिंह ही बंगाली भाषेतील सुप्रसिद्ध रसाळ आख्यानकाव्ये रचली. ही तिन्ही काव्ये एका अर्थी एक ‘काव्यत्रयी’ म्हणता येतील. या काव्यांमधील पांडित्य व प्रतिमा बघून राजा कृष्णचंद्र राय यांनी भारतचंद्रांना ‘गुणाकार’ ही पदवी बहाल केली. तेव्हापासून आजवर भारतचंद्र हे ‘राय-गुणाकार’ या नावाने बंगाली साहित्यात अजरामर झाले.

समीक्षकांच्या मते अन्नदामंगल हेच भारतचंद्रांचे सर्वोत्तम मंगलकाव्य होय तथापि लोकप्रियता मात्र त्यांच्या विद्यासुंदर काव्यालाच अधिक मिळाली. भारतचंद्रांचा एक विशेष म्हणजे ते बंगाली भाषेतील पहिले नागर कवी होत. त्यांच्या काव्याचे स्वरूपही विदग्ध व नागर आहे. तत्पूर्वी बंगाली साहित्याचे स्वरूप ग्रामीण व बरेचसे रांगडे होते. भारतचंद्रांनी भाषेतील रांगडेपण घालवून तीत लालित्य व प्रवाहीपण आणले. काव्यविश्वात एक नवीन संरचण आणून श्रोत्यांना विदग्ध भाषेची चटक लावली. भाषालालित्य, छंदनैपुण्य, अलंकारप्राचुर्य व उत्कृष्ट स्वभावचित्रण या भारतचंद्रांच्या गुणांनी बंगाली काव्यमहिमा वाढविला. भारतचंद्रांच्या कवितेवर अनेकदा अश्लीलतेचा ठपका ठेवण्यात येतो. विशेषतः विद्यासुंदर या प्रेमकाव्यात भारतचंद्रांनी शृंगारस अतिशय मन:पूर्वक आळविला आहे परंतु त्याकाळचे भोवतालचे रसिक व विलासी वातावरण आणि श्रोत्यांची आवड लक्षात घेता, हे शृंगाररसप्राधान्य गैरवाजवी वाटत नाही उलट त्यामुळे आज आपणास त्याकाळच्या जीवनाची व अभिरूचीची साक्ष उपलब्ध होते. भारतचंद्रांच्या काव्यातील काही विशिष्ट ठिकाणी प्रतिमांद्वारे तत्कालीन सामाजिक विद्रोहाचे चित्रणही दृग्गोचर होते.

अन्नदामंगल या काव्यातील काही श्रुतिमधुर पदविन्यास आधुनिक वाचकालाही मोहविणारे आहेत. भारतचंद्र हे बंगालातील आद्य शैलीकार म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांच्या शैलीचा परिणाम एकोणिसाव्या शतकातील आख्यानकवितांवरही दिसून येतो. भारतचंद्रांचे काव्य मराठीतील ‘पंडित कवी’च्या आख्यानकाव्यांशी काहीसे तुलनीय अशा स्वरूपाचे आहे.

आलासे, वीणा