राय, द्विजेंद्रलाल : (१९ जुलै १८६३ – १७ मे १९१३). बंगाली कवी, संगीतज्ञ व नाटककार. हास्यगीते लिहिणारे कवी म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे.

जन्मभूमी कृष्णनगर. पिता कार्तिकेयचंद्र राय हे कृष्णनगरच्या महाराजांचे दिवाण होते व त्यांच्याकडे त्या काळच्या अनेक विद्वान व गुणी लोकांची ये-जा असे. अशा सुसंस्कृत वातावरणात द्विजेंद्रलालांचे व्यक्तिमत्त्व घडण्यास सुरुवात झाली. १८८४ साली कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून एम्.ए. झाल्यावर, त्याच वर्षी सरकारी शिष्यवृत्ती घेऊन द्विजेंद्रलाल कृषिविद्या शिक्षणासाठी विलायतेस गेले व दोन वर्षे तेथे राहून १८८६ साली मायदेशी परतले. या दोन वर्षांच्या काळात त्यांचे एकमात्र इंग्रजी काव्य द लिरिक्स ऑफ इंद (१८८६) प्रसिद्ध झाले. मायदेशी परतल्यावर ते उप-न्यायाधीश म्हणून सरकारी नोकरीवर रुजू झाले पण प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना पुरेसे वय होण्यापूर्वीच नोकरीतून निवृत्त व्हावे लागले. निवृत्तीनंतर लगेच दोन महिन्यांतच त्यांचा कलकत्ता येथे मृत्यू झाला.

द्विजेंद्रलाल लहानपणापासूनच कविता लिहीत. १९०३ साली त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या रचनांचे विषय जरा बदलले. त्यापूर्वीच त्यांचे आर्यगाथा (२ भाग-१८८२, १८९३) आणि मंद्र (१९०२) हे दोन काव्यग्रंथ रसिकांमध्ये प्रशंसापात्र ठरले होते. हास्यगीते आणि प्रहसने लिहिण्यात द्विजेंद्रलालांचा विशेष हातखंडा होता. आषाढे (१८९९) आणि हासिर गान (१९००) हे व्यंग्यकवितासंग्रह बंगाली साहित्याचा अमोल ठेवा मानले जातात. कल्कि अवतार (१८९५), विरह (१८९७), प्रायश्चित्त (१९०२) ही त्यांची हास्यरसात्मक प्रहसने प्रसिद्ध आहेत. पाषाणी (१९००), सीता (१९०८) ही त्यांची काव्यनाट्ये आहेत.

बंगाली कवितेत केलेला नवनवीन काव्यतंत्रांचा वापर व नावीन्यपूर्ण छंदोरचना ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. रवींद्रनाथ टागोरांसारखा कवी साहित्यक्षितिजावर तळपत असतानाही, स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण ठसविणारा कवी म्हणून द्विजेंद्रलालांचे बंगाली साहित्यात खास स्थान आहे.

पत्नीवियोगानंतर, म्हणजे १९०३ सालानंतर पुढे दहा वर्षे द्विजेंद्रलालांनी प्रामुख्याने ऐतिहासिक व पौराणिक विषयांवर नाटके व प्रहसने लिहिली. या सर्व रचनांमधून त्यांची स्वदेशप्रेमाची उत्कटता, देशातील सामाजिक वातावरणात परिवर्तन घडवून आणण्याची कळकळ, थंड पडलेल्या समाजाला जागे करून वीरत्वाला आव्हान देण्याचे धाडस स्पष्टपणे दिसून येते. ताराबाई (१९०३), राणा प्रतापसिंह (१९०५), नूरजहान (१९०८), चंद्रगुप्त (१९११) ही त्यांची काही ऐतिहासिक नाटके होत. शिवाय परपारे (१९१२), वंगनारी (१९१६) ही त्यांची सामाजिक नाटके आणि पुनर्जन्म (१९११), आनंदविदाय (१९१२) ही प्रहसने प्रसिद्ध आहेत. सोराब-रुस्तम (१९०८) व सिंहलविजय (१९१६) या रचनांचे विषय पौराणिक-स्वच्छंदतावादी (रोमँटिक) धर्तीचे आहेत.

आलेख्य (१९०७) व त्रिवेणी (१९१२) हे अखेरच्या काळातले त्यांचे दोन कवितासंग्रह अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहेत. नवीन काव्यतंत्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली यांचे ते निदर्शक आहेत. त्रिवेणी या काव्यसंग्रहात द्विजेंद्रलालांनी अनेक ‘दशपदी’ कविता लिहिल्या आहेत व त्यांना ‘दशपदी’ हे नावही दिलेले आहे. प्रस्तावनेत या नावाच्या औचित्याचीही चर्चा आहे. शिवाय कालिदासभवभूती हा त्यांचा अभ्यासपूर्ण निबंधही बहुचर्चित आहे.

द्विजेंद्रलालांनी १९०५ साली ‘पूर्णिमा मीलन’ नावाने एक साहित्यसंमेलन भरविण्याचा प्रयत्न केला होता. भारतवर्ष नावाचे नियतकालिक काढण्याचा संकल्पही त्यांचाच पण या नियतकालिकाचे प्रकाशन सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत्यू आला.

संगीतकार या नात्याने द्विजेंद्रलाल यांचे बंगाली संगीताच्या क्षेत्रात वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. स्वतःच्या गीतांना ते स्वतः चाली देत. त्यांच्या या भावगीतपद्धतीला ‘द्विजेंद्रगीति’ असे नाव आहे. भारतीय शास्त्रोक्त संगीत आणि पाश्चात्त्य संगीतातील गति-रंग (मूव्हमेन्ट्‌स) यांचे मिश्रण करून त्यांनी बंगाली भावगीतगायनात अभिनवत्व आणले. शास्त्रोक्त संगीतातील धृपद व ख्याल गायकीचा प्रभाव त्यांच्या चालींमध्ये प्रकर्षाने जाणवतो. ठुमरी तसेच बाउल, भटियाली इ. प्रकारच्या लोकसंगीताचाही प्रभाव त्यावर नाही मात्र कीर्तन या गायनपद्धतीचा काहीसा प्रभाव त्यावर आहे. द्विजेंद्रलालांचे पिता कार्तिकेयचंद्र हे सुजाण संगीतज्ञ होते आणि त्यांचा गळाही गोड होता. लहानपणापासून द्विजेंद्रलाल त्यांच्याकडे गायन शिकत. द्विजेंद्रलालांनी लिहिलेली व चाली दिलेली गीते चारशेच्या जवळपास आहेत.

सेन, सुकुमार (बं.) आलासे, वीणा (म.)