बसु, अमृतलाल : (१७ एप्रिल १८५३-२ जुलै १९२९). बंगाली रंगभूमीच्या इतिहासातील एक प्रमुख नाटककार, प्रहसनकार, नट व सार्वजनिक रंगभूमीच्या स्थापनेतील महत्त्वाचे कार्यकर्ते. जन्म कलकत्त्यास. वडिलांनी स्थापिलेल्या कम्बूलियाटोला वंगविद्यालयामध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. दोन वर्षे हिंदू कॉलेजमध्ये शिकून ‘जन-रल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशन’ तर्फे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी १८६९ मध्ये  वैद्यकीय  महाविद्या- लयात प्रवेश घेतला. तेथे दोन वर्षे शिकून  त्यांनी  वैद्यकीय  शिक्षण सोडले व  होमिऑपथी  शिकण्या- साठी काशीचे प्रख्यात होमिऑपथ लोकनाथ मैत्र  यांच्याकडे  प्रयाण केले. १८७२ मध्ये  लोकनाथ  मैत्र यांचे शिफारसपत्र  घेऊन  बांकिपूर येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला पण   काही   महिन्यांतच आयुष्याला वेगळे  वळण  मिळून ते  नाट्य  व्यवसायाकडे  वळले.अमृतलाल हे त्यांच्या वडिलांनी स्थापिलेल्या शाळेचे आयुष्यभर व्यवस्थापक होते व स्वप्रयत्नांनी त्यांनी या शाळेत माध्यमिक शिक्षणाचा इंग्रजी विभागही सुरू केला. नॅशनल, ग्रेट नॅशनल, ग्रेट नॅशनल ऑपेरा कंपनी, बेंगॉल, स्टार, मिनर्व्हा इ. नाट्यसंस्थांशी ते नट, नाटककार अथवा व्यवस्थापक या नात्यांनी निगडित होते. देशप्रेम व समाजजागृती ह्या ध्येयांनी प्रेरित होऊन त्यांनी लेखन केले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

अमृतलाल बसू

 

काशी येथे असताना अमृतलाल बसूंनी इंग्लंड व फ्रान्सचा इतिहास इंग्रजी नाटके व कादंबऱ्या आणि इतरही विदग्ध वाङ्-मयाचे सखोल वाचन केले. त्यांच्या लेखनप्रवृत्तीवर या वाचनाचा संस्कार झाला शिवाय अर्धेदुशेखर मुस्तफी व गिरीशचंद्र घोष यांच्या सहवासाचा परिणामही त्यांच्या नाट्यविषयक व अभिनयविषयक भूमिकेवर पडलेला दिसतो. अमृतलाल बसू यांच्या प्रहसनांवर फ्रेंच नाटककार →मोल्येर याचा प्रभाव जाणवतो. त्यांचे पहिले नाटक हीरकचूर्ण (१८७५) हे इंग्रजांच्या राजवटीत बडोदा संस्थानात घडलेल्या एका खळबळजनक प्रकरणावरील नाटक आहे. याशिवाय तिलतपर्ण नाटक (१८८५), तरूबाला (१८९१), विमाता वा विजयवसंत (१८९३), खास दखल (१९१२), नवयौवन (१९१३), याज्ञसेंनी (१९२८) ही त्यांची विविध विषयांवरील उल्लेखनीय नाटके आहेत. चोरेर उपर वाटपाडि (१८७६), डिसमिस (१८८३), विवाह विभ्राट (१८८४), चाटुज्जे ओ बाडुज्जे (१८८६), ताज्जव व्यापार (१८९०), बौभा (१८९७), कृपणेर धन (१९००) इ. प्रहसनांमधून त्यांची मार्मिक विनोदी वृत्ती जाणवते. पाश्र्चात्त्य संस्कृतीच्या सन्मुख असलेल्या मध्यमवर्गीय बंगाली समाजाची विचलित अवस्था त्यांनी नेमकी टिपली व खेळकर विनोदी शैलीत ती शब्दबद्ध केली. त्यांचा विनोद प्रासंगिक असतो. अमृतलालांनी कथा, कादंबरी, भावकाव्य इ. साहित्यप्रकारही हाताळून पाहिले पण प्रहसनकार म्हणून त्यांना जे यश लाभले ते इतरत्र लाभले नाही. तरूबाला (१९००), विजय वसंत (१९०२) व विवाह बिभ्राट (१९०८) या त्यांच्या नाटकांचे बापू नरसिंह भावे यांनी मराठी अनुवाद केलेले आहेत.

हास्यविनोदचातुर्यामुळे अमृतलाल हे बंगाली रंगभूमीवर ‘रस-राज’ (‘रस’ म्हणजे विनोद या अर्थी) म्हणून प्रसिद्ध होते. १९२३ मध्ये ते वंगीय साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले १९२५ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने ‘जगत्तारिणी सुवर्णपदक’ देऊन त्यांचा गौरव केला. १९२६ मध्ये सतराव्या वंगीय साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्षही होते.

आलासे, वीणा