घोडामासा (नर) : हिंदी महासागरात आढळणारी जाती हिप्पोकँपस गट्ट्युलेटस. (१) क्लोमरंध्र, (२) गुदद्वार, (३) भ्रूणकोष्ठ. घोडामासा : हा सागरी मासा सिन्‌ग्रॅथिडी कुलातल्या हिप्पोकँपस  वंशाचा आहे. याच कुलातील नळीमाशाचा हा जवळचा नातेवाईक आहे. या वंशाच्या सु. ५० जाती आहेत. या माशाचे शीर्ष स्पष्टपणे घोड्याच्या डोक्यासारखे असल्यामुळे आणि याच्या शरीराची सरळ उभी ढब यांमुळे त्याला घोडामासा हे नाव मिळाले आहे. त्याचे शरीर अस्थि-वलयांनी (बहिःकंकालाने) वेढलेले असून मुस्कट लांबट नलिकाकार असते मुख लहान असून त्यात दात नसतात. हे मासे सु. १५ सेंमी. लांब असतात, मात्र मेक्सिकोच्या आखातातील एक जाती पूर्ण वाढ झाल्यावर ५·१ सेंमी. असते आणि हि. इंगेन्स  ही जाती ३०·५ सेंमी. पर्यंत लांब असते. अंसपक्ष (छातीच्या भागावरील पर, पर म्हणजे हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या), पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) आणि गुदपक्ष लहान असतात पुच्छपक्ष नसतो. हा मासा उभा पोहतो. पृष्ठपक्षाच्या आंदोलनांनी हा पुढे जात असतो. याचे निमुळते होत गेलेले शेपूट परिग्राही (घट्ट पकड घेणारे) असते व त्याच्या योगाने तो समुद्रतृणांना व इतर आधारांना घट्ट धरतो.

जगाच्या समशीतोष्ण आणि उष्ण प्रदेशांत यांचा पुष्कळच प्रसार झालेला आहे. या माशांच्या सगळ्या जाती प्लवकातील (पाण्यात तरंगणाऱ्या जीवांतील) प्राणी, विशेषतः त्यातील क्रस्टेशियन प्राणी खातात.

घोडामासा आपले रंग बदलू शकतो या बदलत्या रंगांंमध्ये इतकी विविधता असते की, त्यामुळे तो आपल्या स्वाभाविक निवासस्थानात अदृश्य राहू शकतो. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या एका जातीच्या घोडामाशाच्या बहिःकंकालापासून (बाहेरच्या सांगाड्यापासून) लांब प्रवर्ध (वाढी) निघालेले असतात व त्यांच्यावर पानांसारखे त्वचेचे झोल असतात. यामुळे तो ज्या समुद्रतृणांत राहतो त्यांच्यासारखा हुबेहूब दिसतो.

नराच्या उदरावर एक भ्रूणकोष्ठ (अंडी ठेवण्याकरिता असलेली पिशवी) असतो मादी आपली अंडी उबविण्यासाठी त्यात ठेवते. सु. ४० – ५० दिवसांनंतर कोष्ठातून जवळजवळ २०० पिल्ले बाहेर पडतात. भ्रूणकोष्ठाच्या अस्तराच्या स्रावामुळे भ्रूणांचे पोषण होते असा समज आहे.                                         

जमदाडे, ज. वि.