प्राणिसंग्रहोद्याने: ज्या उद्यानातून विविध प्रकारचे पशुपक्षी व इतर प्राणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी किंवा विद्यार्थिवर्गाला प्राणिजीवनाचे दर्शन घडविण्यासाठी अथवा वन्य प्राण्यांचे शास्त्रीय दृष्टीने निरीक्षण व प्रयोग करण्यासाठी किंवा नष्टप्राय होण्याच्या मार्गास लागलेले वन्य प्राणी यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पाळलेले असतात, त्या उद्यानाला प्राणिसंग्रहोद्यान किंवा जिवंत संग्रहालय म्हणतात.

 

इतिहास: मानवाच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तर असे आढळून येते की, प्राचीन काळापासून माणूस उपयुक्त प्राण्यांबरोबरच आपल्या मनोरंजनासाठी मोर, पोपट, मैना, कबूतर, ससा, खार वगैरे प्राणी पाळत होता. कदाचित या छंदातूनच प्राणिसंग्रहोद्यानाची कल्पना निर्माण झाली असावी.

 

इ. स. पू. १४०० मध्ये ईजिप्तच्या हॅटशेपसूट या राणीने नागरिकांच्या करमणुकीसाठी ‘गार्डन ऑफ ॲक्लिमेशन’ नावाचे उद्यान उभारले होते. या उद्यानात आफ्रिकेतील सिंह, हत्ती, गेंडा, कुत्री, माकडे इ. वन्य पशू ठेवण्याची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे इ. स. पू. बाराव्या शतकात चीनमधील जौ घराण्यातील वन वांग या राजांनी आपल्या राजप्रासादाजवळ ‘गार्डन ऑफ इन्टेलिजन्स’ नावाचे उद्यान उभारले होते व त्या उद्यानात त्यांनी चिनी साम्राज्यातील चित्रविचित्र पशुपक्षी ठेवण्याची व्यवस्था केली होती.

 

जीवविज्ञानाचे संस्थापक आणि थोर ग्रीक तत्त्ववेत्ते ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४-३२२) यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या आवारात बरेच पशुपक्षी ठेवले होते व ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी काही काळ अबाधित राखली होती. ग्रीक सम्राट अलेक्झांडर (इ. स. पू. ३५६-३२३) यांनी भारतातून परत जाताना आपल्याबरोबर अनेक मोर व इतर प्राणी, पूर्वापार चालत आलेले प्राणिसंग्रहोद्यान समृद्ध करण्यासाठी नेले होते.

 

वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, पूर्वीपासून प्राणिसंग्रहोद्यानाची कल्पना अस्तित्वात होती परंतु शास्त्रीय दृष्ट्या उभारलेल्या प्राणिसंग्रहोद्यानाचा इतिहास मात्र गेल्या एक-दोन शतकांइतकाच जुना आहे. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील वैज्ञानिक प्रगतीमुळे, विशेषतः प्राणिसृष्टीच्या उत्पत्ती व विकासासंबंधीच्या शास्त्रीय सिद्धांतांमुळे प्राणिसंग्रहोद्यानाकडे बघण्याच्या दृष्टीत बदल झाला व त्यामुळे प्राणिसंग्रहोद्यानाच्या रचनेत व मांडणीतसुद्धा आमूलाग्र बदल घडून आला.

 

इ. स. १८२८ मध्ये लंडन शहरात झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेतर्फे शास्त्रीय पद्धतीने पहिले प्राणिसंग्रहोद्यान उभारण्यात आले व त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने इतरत्र प्राणिसंग्रहोद्याने उभारण्यात आली. भारतात पहिले प्राणिसंग्रहोद्यान बंगलोर येथे उभारण्यात आले. त्यानंतर म्हैसूर, बडोदा, कलकत्ता, मुंबई, हैदराबाद, मद्रास, त्रिवेंद्रम व नवी दिल्ली या ठिकाणी प्राणिसंग्रहोद्याने स्थापन करण्यात आली. यांपैकी कलकत्ता येथील प्राणिसंग्रहोद्यान फारच मोठे आहे. या प्राणिसंग्रहोद्यानातील प्राणी आधुनिक पद्धतीने प्रदर्शित केले असल्यामुळे हे एक प्रेक्षणीय प्राणिसंग्रहोद्यान बनले आहे.

 

पूर्वीच्या प्राणिसंग्रहोद्यानांतून वन्य पशूंना साखळदंडांनी बांधून ठेवीत किंवा लोखंडी गज असलेल्या पिंजऱ्यात ठेवीत. या बंदिस्तपणामुळे श्वापदांना हालचालसुद्धा करता येत नसे. त्याचप्रमाणे अस्वच्छता, रोगराई व अन्नाची हेळसांड यांमुळे ही जनावरे फारच रोडावलेली असत शिवाय बंदिस्तपणामुळे प्रेक्षकांनासुद्धा प्राणी नीटपणे पाहता येत नसत. या कारणांमुळे त्या वेळची प्राणिसंग्रहोद्याने फार लोकप्रिय होऊ शकली नाहीत.

 

आधुनिकप्राणिसंग्रहोद्याने: आधुनिक प्राणिसंग्रहोद्यानांत वन्य पशूंना मोकळ्या व त्यांना पोषक अशा वातावरणात ठेवण्याची प्रथा आहे. हिंस्र श्वापदांसाठी घनदाट जंगल सुसर, कासव वगैरे जलचरांसाठी पाणथळ प्रदेश करकोचा, बगळा यांसारख्या पक्ष्यांसाठी योग्य आकारमानाचा जलाशय अशा प्रकारे त्या त्या प्राण्यांसाठी निसर्गसदृश वातावरण उद्यानाच्या परिसरात निर्माण केलेले असते. अशा प्रकारे नैसर्गिक वातावरणात प्राणी ठेवण्याची पद्धत पुढारलेल्या राष्ट्रांतील बहुतेक प्राणिसंग्रहोद्यानांतून पाहण्यास मिळते. वॉशिंग्टन येथील प्राणिसंग्रहोद्यानात तर ध्रुव प्रदेशासारख्या बर्फाळ प्रदेशात राहणारे पेंग्विनसारखे पक्षी व इतर प्राणी ठेवण्यासाठी कृत्रिम बर्फाळ प्रदेश निर्माण केला आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे आता पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही प्राणी संग्रहोद्यानात पाहण्यास मिळण्याची सोय झाली आहे.

 

या नवीन पद्धतीमुळे वन्य प्राण्यांना हिंडण्याफिरण्यास ऐसपैस जागा मिळते. त्याचप्रमाणे नियमित आहार व आरोग्यदक्षता यांमुळे ही जंगली श्वापदे सुदृढ राहतात व त्यांची नियमित वीणही होते. डब्लिनचे प्राणिसंग्रहोद्यान सिंहांकरिता प्रसिद्ध आहे. या प्राणिसंग्रहोद्यानात सबंध एकोणिसाव्या शतकात एकंदर शंभर सिंह जन्मले. या नवीन फेररचनेमुळे प्राणिसंग्रहोद्याने मनोरंजनाबरोबर ज्ञानार्जनाची महत्त्वाची ठिकाणे झाली आहेत.

 

प्राणिसंग्रहोद्यानातील मोकळी जनावरे पळून जाऊ नयेत व प्रेक्षकांना त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारची इजा होण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून या प्राण्यांच्या निवासाभोवती आवश्यक त्या रुंदीचे खंदक खणलेले असतात. सिंह किंवा वाघ ९ मी. पेक्षा जास्त लांब उडी घेऊ शकत नाहीत म्हणून खंदकाची रुंदी १५-२० मी. ठेवतात. त्याचप्रमाणे सारस वगैरे पक्ष्यांच्या पंखांची काही पिसे कापून टाकतात किंवा एकत्र बांधून ठेवतात त्यामुळे या पक्ष्यांना उडून जाता येत नाही व त्यामुळे त्यांच्याकरिता मोठमोठे तटबंदीसारखे पिंजरे उभारण्याची आवश्यकता नसते. अशाच प्रकारे प्राण्यांच्या शरीररचनेचा व त्यांच्या हालचालीचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांच्याकरिता अशा बंदिस्त जागेची योजना करतात. या व्यवस्थेमुळे प्रेक्षकांना प्राणी स्वस्थ चित्ताने पाहता येतात.

 

वर सांगिल्याप्रमाणे वन्य प्राण्यांना कृत्रिम उद्यानाच्या बंदिस्त जागेत ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मूळच्याच जंगलात सुरक्षित ठेवण्याची प्रथा सुरू झाली आहे. अशा प्राणिसंग्रहोद्यानाचा उद्देश मुख्यत्वेकरून नष्टप्राय होण्याच्या मार्गास लागलेल्या प्राण्यांना संरक्षण देणे हा असतो. अशा जंगलातून एकाच जातीच्या किंवा अनेक जातींच्या प्राण्यांना संरक्षण दिलेले असते. उदा., भारतात आसाममधील कझिरंगा वनात गेंड्याला संरक्षण दिले आहे गुजरातमधील गीर जंगलात सिंहाला संरक्षण दिले आहे तर मध्य प्रदेशातील कान्हा व शिवपुरी वनात अनेक जातींचे प्राणी सुरक्षित ठेवलेले आहेत. हे वन्य पशू तिन्हीत्रिकाळ रानावनांतून कशा प्रकारे कालक्रमण करतात, हे प्रेक्षकांना पाहण्यास मिळावे म्हणून उंच वृक्षांवर मचाणे बांधलेली असतात. त्याशिवाय वाहनांची सुद्धा व्यवस्था केलेली असते. त्यामुळे निर्भयपणे वन्य पशूंचे अवलोकन करता येते. (चित्रपत्र २१ अ, २१ आ).

 

पहा: राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश वन्य जीवांचे रक्षण.

 

संदर्भ : 1. Crandall, L. S. Management of Wild Animals in Captivity, Chicago, 1964.

            2. Hediger, H. Wild Animals in Captivity, Eng. Trans. by Sircom, G., New York, 1950.

            3. Schomber, G. British Zoos, London, 1957.

 

केतकर, श. म.


प्राणिसंग्रहोद्यान

 


प्राणिसंग्रहोद्यान

 


प्राणिसंग्रहोद्यान