अस्थिमज्जाशोथ : हाडांच्या अंतर्भागातील (पोकळ जागेतील) मज्जेला (एक प्रकारच्या मऊ पदार्थाला) येणाऱ्या दाहयुक्त सुजेला ‘अस्थिमज्जाशोथ’ म्हणतात. याला ‘अस्थीचे गळू’ ही म्हणता येईल.
अस्थिमज्जाशोथाचे तीव्र आणि चिरकारी (दीर्घकालिक) असे दोन प्रकार आहेत. पीत-पुंजगोलाणू (स्टॅफिलोकॉकस ऑरियस ) व क्वचिक मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस ) व फुप्फुसगोलाणू (न्यूमोकॉकस) या सूक्ष्मजंतूंच्या संसर्गामुळे हा रोग होतो. चिरकारी शोथ मुख्यतः क्षयाच्या जंतूंमुळे होतो.
संप्राप्ती : हा रोग बहुधा गोवरासारख्या साथीच्या रोगानंतर होतो. रोगजंतू तीव्र प्रभावी असल्यास अथवा रोग्याची प्रतिकारशक्ती कमी झालेली असल्यास हा रोग संभवतो. शरीरात इतरत्र–विशेषत: घसा, नाक वगैरे ठिकाणी–असलेले जंतू रक्तमार्गे अस्थिमज्जेत जाऊन तेथे शोथ उत्पन्न करतात. हे जंतू अस्थिमज्जेवरच का आघात करतात, ते निश्चितपणे सांगता येत नाही. कदाचित लक्षात न आलेला आघात अथवा स्नायूंच्या जोराच्या आकुंचनामुळे अग्रप्रवर्धावर (वाढ होत असलेल्या लांब हाडांच्या टोकाशी असलेल्या व ज्यामुळे हाडाची वाढ होते अशा भागावर) ताण पडल्यामुळे अस्थिमज्जाशोथ होत असावा, असे मानतात.
अस्थिमज्जाशोथाची सुरुवात पर्यास्थिकलेखाली (संधिस्थानाची जागा सोडून अस्थीच्या इतर पृष्ठभागावरील संयोजी म्हणजे जोडणाऱ्या ऊतकाच्या दाट थराखाली ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्म घटकांचा म्हणजे कोशिकांचा समूह) किंवा अग्रप्रवर्धाजवळच्या मध्यप्रवर्धात (लांब हाडांच्या दंडात) होते. पर्यास्थिकलेखाली शोथनि:सार (सुजेतील स्राव) साठून राहिल्यामुळे पर्यास्थिकला अस्थीपासून वेगळी होऊन तिच्यापासून अस्थीला होणारा रक्तपुरवठा बंद पडतो. त्यामुळे अस्थीचा तेवढा भाग मृत होतो. अशा मृत अस्थिखंडाला ‘विविक्तास्थी’ म्हणतात. त्याच वेळी अविकृत पर्यास्थिकलेपासून नवीन अस्थी उत्पन्न होत असल्यामुळे विविक्तास्थीच्या भोवती नवीन अस्थीचे थर बसतात. पर्यास्थिकलेखालच्या नि:सारामुळे तेथे विद्रधी (गळू) तयार होतो व तो विद्रधी स्नायूंमधून वाट काढून त्वचेवर जवळ किंवा दूर फुटतो. अग्रप्रवर्धाजवळ साठणारा नि:सार बाहेर किंवा वर अस्थिमज्जेत अथवा जवळच्या सांध्याजवळ जाऊन तेथे विद्रधी उत्पन्न होतो.
तीव्र प्रकाराची लक्षणे व उपद्रव : थंडी वाजून ताप भरणे, विकृत अस्थिभागात वेदना, जवळच्या सांध्याला सूज, विद्रधी झाला असल्यास त्वचा व सांधा सुजून लाल होणे, ठणका वगैरे लक्षणे दिसतात. क्वचित मूळ अस्थीपासून अग्रप्रवर्ध विलग होतो. ⇨पूयरक्तता आणि ⇨जंतुरक्तता हे उपद्रव महत्त्वाचे आहेत.
निदान : सुरुवातीस रक्तात जंतू असल्यामुळे त्यांचे शरीराबाहेर माध्यमावर संवर्धन करता येते. संधिवात, संधिज्वर, बालपक्षाघात (पोलिओ) आणि संयोजी ऊतकशोथ या रोगांपासून व्यवच्छेदक निदान करणे पुष्कळ वेळा कठीण असते. काही काळानंतर क्ष-किरण परीक्षेमध्ये विविक्तास्थी दिसू शकते.
चिकित्सा : प्रतिजैव औषधे [→ प्रतिजैव पदार्थ] मोठ्या मात्रेने दिल्यास लवकर गुण येतो. विद्रधी झाला असल्यास तो फोडून पुवाला वाट करून द्यावी लागते. विकृत अस्थीची हालचाल थांबविण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर आधारके वापरावी लागतात. विविक्तास्थी तयार झाल्यावर शस्त्रक्रियेने ती काढून टाकावी लागते. त्यापूर्वीसुद्धा अस्थिमज्जेतील पुवाचा निचरा करण्यासाठी अस्थीच्या बाह्य टणक भागात भोके पाडून वाट करून द्यावी लागते.
चिरकारी अस्थिमज्जाशोथ : मूळच्या तीव्र प्रकाराचा अवशिष्ट भाग म्हणजेच चिरकारी शोथ. त्याची लक्षणे वरच्यासारखी पण सौम्य असतात. चिरकारी शोथ कित्येक महिने राहू शकतो व त्यामुळे रोगी खंगत जातो. पूर्णपणे काढून टाकला गेला नाही, तर जखमेतून सारखा पू येत राहून नाडीव्रण (त्वचेशी जोडला गेलेला संसर्गयुक्त मार्ग) तयार होतो. पूयोत्पत्ती फार दिवस होत राहिल्यास शरीरकोशिकांत पिष्टाभ अपकर्षण (स्टार्चासारखे पदार्थ प्लीहा, यकृत, मूत्रपिंत्र इ. ठिकाणी साचणे) होते. क्षयजंतुजन्य चिरकारी अस्थिमज्जा – शोथामध्ये होणारा विद्रवी फार दिवस राहतो. त्याला ‘शीत-विद्रधी’ म्हणतात.
अभ्यंकर, श. ज.