गोम : आर्थ्रोपोडा (संधिपाद प्राण्यांच्या) संघातील मिरिॲपोडा वर्गातल्या ऑपिस्थोगोनिएटा या उपवर्गाच्या कायलोपोडा गणातील कृमीसारखा दिसणारा लांब भूचर प्राणी. जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत हा आढळतो.

बहुतेक गोमा दिवसा जमिनीच्या, दगडधोंड्यांच्या किंवा पालापाचोळ्याच्या खाली, खडकांच्या भेगांत किंवा घरांच्या काळोख असलेल्या दमट कोपऱ्यात राहतात पण रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतात. गोमांच्या थोड्या जाती सागरी असून त्या वेलाचिन्हांच्या (भरती व ओहोटी यांच्या खुणांच्या) मधल्या प्रदेशात समुद्रतृणे, दगड, रिकामे शंख आणि कृमींच्या मोकळ्या पडलेल्या नळ्या यांत राहतात. गोड्या पाण्यात गोमा राहत नाहीत. 

गोमेची लांबी सर्वसाधारणपणे २·५–१५ सेंमी. असते. पण एका वंशात ती ३० सेंमी.पर्यंत असल्याचे  गोम

दिसून आले आहे. शरीर उत्तराधर (वरून खाली) चपटे आणि खंडयुत असते. त्याचे शीर्ष आणि धड असे दोन स्पष्ट भाग असतात. शीर्षावर संवेदी शृंगिकांची (सांधे असलेल्या लांब स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, चर्वणाकरिता दंतुर (दाते असलेल्या) जंभांची (भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता असणाऱ्या संरचनांची) एक जोडी आणि मुखाकडे अन्न नेण्याकरिता जंभिकांच्या (जंभांच्या मागे असणाऱ्या विविध कार्ये करणाऱ्या उपांगांच्या) दोन जोड्या असतात. डोळे सामान्यतः नसतात, पण असलेच तर ते अक्षिकांच्या (बारीक डोळ्यांच्या) लहान समूहाच्या स्वरूपाचे असतात. घरांत आढळणाऱ्या गोमांचे डोळे कीटकांच्या संयुक्त नेत्रांसारखे असतात. धडाच्या सगळ्या खंडांची वरची व खालची पृष्ठे जाड पट्टिकांनी झाकलेली असून त्या लवचिक कलांनी (पातळ पटलांनी) जोडलेल्या असतात. धडाचा पहिला आणि शेवटचे दोन खंड वगळून प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते त्याचप्रमाणे जवळजवळ प्रत्येक खंडावर श्वासरंध्रांची एक जोडी असते. धडाच्या पहिल्या खंडावर एक पोकळ बाकदार चिमटा वा विषारी नखरांची एक जोडी असते. पकडलेल्या भक्ष्याच्या अंगात हे तीक्ष्ण नखर खुपसून विषाच्या अंतःक्षेपणाने (शरीरात सोडण्याने) गोम त्याला मारते. लहान कीटक, कृमी, पिकळ्या इ. यांचे भक्ष्य होय. पण काही गोमा शाकाहारी असतात.

आहारनाल (अन्नमार्ग) साधा व सरळ असतो. मालपीगी नलिका (आतड्यात उघडणाऱ्या धाग्यासारख्या उत्सर्जन नलिका) दोन असून त्या आहारनालाच्या मागच्या भागात उघडतात. श्वासनाल कीटकांच्याप्रमाणेच शाखित असून श्वासरंध्रांनी बाहेर उघडतात. हृदय लांब नळीसारखे व कोष्ठित (भाग पडलेले) असते. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) जवळजवळ ॲनेलिडांच्या तंत्रिका तंत्रासारखे असते [→ ॲनेलिडा]. अनुकंपी तंत्रिका तंत्रही (आहारनालाला जाणारा आंतरांग तंत्रिका तंत्राचा भाग) असते [→ तांत्रिका तंत्र]. लिंगे भिन्न असून जनन ग्रंथी सामान्यतः एकच असते, जननरंध्रे शेवटच्या खंडाच्या अलीकडील खंडावर उघडतात. काही गोमा मातीत अंडी घालतात पण इतर काही अंडी वाळू नयेत म्हणून अंड्यांच्या पुंजक्याभोवती आपले अंग घट्ट गुंडाळतात.

गोम सहसा माणसाला चावत नाही पण चावलीच, तर ती जागा काही वेळ अतिशय दुखते पण दुखणे लवकरच थांबते. मोठ्या गोमांच्या चावण्यामुळे चावलेल्या जागी सूज येऊन अतिशय आग होते, तापही येतो. 

कुलकर्णी, सतीश वि.