फ्रान्ट्‌स आंटोन मेस्मरमेस्मर, फ्रान्ट्‌स (फ्रीड्रिख) आंटोन : (२३ मे १७३४–५ मार्च १८१५). जर्मन-ऑस्ट्रियन वैद्यकवेत्ते. ‘मेस्मरिझम’ किंवा अलीकडे ‘संमोहनविद्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवशास्त्रीय पद्धतीचे आद्य प्रवर्तक. मेस्मर यांच्या नावावरूनच ‘मेस्मरिझम’ ही संज्ञा रूढ झाली. स्वित्झर्लंडमधील कॉन्स्टन्स सरोवराजवळील इत्सनांग ह्या खेड्यात जन्म.१७५२ मध्ये इंगोलस्टाड विद्यापीठात प्रवेश. तेथे धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, संगीत व गणित या विषयांचा अभ्यास करून पीएच्.डी. घेतली. नंतर त्यांनी १७५९ मध्ये व्हिएन्ना विद्यापीठात प्रवेश घेतला आणि प्रथम कायद्यातील व नंतर १७६६ मध्ये वैद्यकशास्त्रातील डॉक्टरेट घेतली. नंतर ते तेथेच स्थायिक झाले. ते उत्तम संगीतज्ञही होते. एक प्रकारच्या अदृश्य अशा तरल (प्लुइड) चुंबकीय शक्तीद्वारे आकाशातील ग्रह मानवी शरीरावर आणि जीवनावर परिणाम करतात, असा प्रबंध त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठात डॉक्टरेटसाठी सादर केला होता. ही तरल चुंबकीय शक्ती सर्व विश्व व चराचर सृष्टी व्यापून आहे, अशी त्यांची समजूत होती. त्यांच्या ह्या विचारसरणीवर यान हेल्‌माँट, पॅरासेल्सस आणि विर्टिग यांचा प्रभाव होता.

प्रथम त्यांनी १७७४ च्या सुमारास चुंबकाच्या सहाय्याने उन्मादासारखे मानसिक रोग बरे केले परंतु पुढे त्यांना असे आढळून आले, की चुंबकाशिवायही स्वतःमध्ये असलेल्या गूढ शक्तीमुळे असे रोग बरे करता येतात. आकाशातील ग्रहांपासून निघणाऱ्या तरल चुंबकीय शक्तीवर नियंत्रण ठेवण्याची गूढ शक्ती स्वतःमध्ये ओतप्रोत असल्याचे त्यांना वाटू लागले आणि या शक्तीलाच त्यांनी १७७५ मध्ये ‘प्राणी चुंबकीय शक्ती’ असे नांव दिले.

विशेषतः उन्माद झालेले रोगी बरे करण्यात त्यांना उल्लेखनीय यश मिळाले आणि त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला. त्यामुळे व्हिएन्ना येथील इतर मातबर वैद्यक-व्यवसायी मेस्मर जादूच्या साहाय्याने रोग बरे करतात, असा आरोप त्यांच्यावर करू लागले. या आरोपांमुळे ऑस्ट्रियन सरकारने त्यांच्या उपचारपद्धतीची चौकशी करण्यासाठी एक चौकशीमंडळ नेमले. या चौकशीमंडळाच्या प्रतिकूल निर्णयामुळे १७७८ मध्ये त्यांना व्हिएन्ना सोडून पॅरिस येथे जावे लागले. पॅरिस येथे त्यांची खूपच प्रसिद्धी आणि भरभराट झाली व ती अनेक वर्षे टिकूनही होती परंतु तेथेही त्यांच्या वाट्याला इतर मातबर व्यवसायबंधूंकडून ‘ढोंगी’, ‘भोंदू-वैद्य’ यांसारखे आरोप आणि रोषच आला. हा रोष वाढत जाऊन १७८४ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांच्याउपचारपद्धतीची चौकशी करण्यासाठी एक तज्ञांचे चौकशीमंडळ नेमले. बेंजामिन फ्रॅंकलिन हे त्या मंडळातील एक सदस्य होते. ह्या मंडळाने सादर केलेल्या अहवालाचा गोषवारा दुर्देवाने मेस्मर यांना प्रतिकूल ठरला व त्यांना आपला भरभराटीत असलेला व्यवसाय बंद करावा लागला. मंडळाने ‘प्राणी-चुंबकीय-शक्ती’ अस्तित्वात नाही, असा निर्वाळा दिला शिवाय मेस्मर यांनी अनेक रोगी बरे केल्याचे मान्य केले पण ते अज्ञात अशा शरीरक्रियात्मक कारणांनी बरे झाल्याचे म्हटले. या मंडळाने मेस्मर यांना ‘भोंदू-वैद्य’ मात्र म्हटले नाही. पॅरिस सोडून काही काल मेस्मर यांनी व्हेर्सेलि स येथे आणि नंतर काही काल स्वित्झर्लंडमध्ये एकाकीपणे आयुष्य व्यतीत केले. मेअर्सबुर्क येथे त्यांचा मृत्यू झाला.

मेस्मर यांच्या टीकाकारांनी मेस्मर यांच्या पद्धतीवर आपले लक्ष केंद्रित करून असे प्रतिपादन केले, की रोग बरा होणे हे केवळ रुग्णांच्या मानसिक अवस्थेमुळेच घडून येते. जेम्स ब्रेड यांनी एकोणिसाव्या शतकात केलेल्या मेस्मर यांच्या कार्याच्या अभ्यासानुसार तसेच इंग्लंडमध्ये झालेल्या अभ्यासानुसार असे प्रतिपादन केले गेले , की मेस्मर यांच्या उपचारातील महत्त्वाचा घटक म्हणजे रोग्याची प्रतिक्रिया. ब्रेड यांनी ‘हिप्नॉटिझम’ ही संज्ञा त्यासाठी प्रथम प्रचलित केली आणि संमोहनात्मक (हिप्नॉटिक) घटना ह्या आवश्यकपणे शरीरशास्त्रीयच असतात त्यांचा मेस्मर समजत होते तसा शरीरातील द्रवाशी काहीही संबंध नाही असे प्रतिपादन केले. नंतर फ्रान्समध्ये झालेल्या अभ्यासांनुसार (ए. ए. लीबॉल्ट व हिप्पोलाइट बर्महाईम) संमोहनात्मक घटनांचा संबंध मानसशास्त्रीय शक्तींशी, विशेषतः ‘सूचन’ (सजेशन) ह्या संकल्पनेशी, जोडला गेला. ‘मेस्मरिझम’ ह्या संकल्पनेत एकोणिसाव्या शतकात झालेल्या ह्या वैज्ञानिक परिवर्तनांशिवाय इतर काही क्षेत्रांत तिचा संबंध गूढविद्या, आध्यात्मिकता आणि श्रद्धोपचार यांच्याशी जोडला जातो तसेच ‘ख्रिश्चन सायन्स’ चा आधार म्हणूनही तिची गणना केली जाते.

स्वतःच्या उपचारपद्धतीवरील मेस्मर यांची निष्ठा निःसंशयपणे प्रामाणिक होती. त्यांना त्यांच्या उपचारपद्धतीतील मानसशास्त्रीय व शरीरशास्त्रीय मूल्यांचे संपूर्ण आकलन न झाल्याने ‘संमोहनविद्ये’ चा विकास मात्र ते स्वतः करू शकले नाहीत.

सुर्वे, भा. ग.

मेस्मर यांनी सुरू केलेल्या मेस्मरिझम या तंत्राला पुढे हिप्नॉटिझम (संमोहनविद्या) असे नाव दिले गेले. ज्या मानसिक आजारांना पूर्वी ‘हिस्टेरिया’ म्हणत आणि आता ‘रूपांतर-विभक्तन प्रतिक्रिया’ (कन्व्हर्शन-डिसोसिएशन रिॲक्शन) असे म्हटले जाते, त्या आजाराच्या रोग्यांना या तंत्राच्या वापरामुळे फायदा होत असे. रोग्यांच्या या बरे होण्याचा संबंध मेस्मरने चुंबकीय शक्तीशी जोडला परंतु ही संकल्पना चुकीची ठरुन, अशा संमोहनावस्थेत निर्माण होणारी रोग्याची वाढती सूचनक्षमता त्याच्या बरे होण्यास कारणीभूत होते हे आता सिद्ध झाले आहे.

मेस्मरिझमखेरीज, आधुनिक मनोवैद्यकात ज्यांना ‘सामूहिक मानसोपचार’ म्हणतात, त्या उपचार पद्धतीची सुरुवात मेत्मर यांनी केली असे म्हणावे लागेल. रोग्यांच्या समूहावर चुंबकाच्या जोडीला मेस्मर संगीताचा उपयोग करीत असत. अशा प्रकारे ‘सामूहिक मानसोपचार पद्धति’ सुरू करण्याचे श्रेयही मेस्मर यांच्याकडेच जाते.

पहा : संमोहनविद्या.

साठ्ये, प्रकाश श्री.

संदर्भ : 1. Goldsmith, Margaret, Franz Anton Mesmer : A History of Mesmerism, Garden City, N.Y., 1934.

             2. Podmore, Frank, From Mesmer to Christion Science : A Short History of Mental Healing, New Hyde Park, N.Y., 1964.