केंद्रीय वखार निगम : शेतमालाची साठवण करण्याकरिता शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने २ मार्च १९५७ मध्ये या निगमाची स्थापना केली. या निगमाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत : (१) गुदामे व वखारी यांमध्ये शेतमालाची सुरक्षितपणे व आधुनिक शास्त्रीय पद्धती वापरून साठवण करणे त्या मालाला ओलावा, दमटपणा, कीड इत्यादींपासून धोका पोहोचणार नाही व त्यायोगे मालाचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारची काळजी घेणे. (२) निगमाच्या वखारी व गुदामे यांमधून शेतमाल ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना स्वस्त दराने कर्ज मिळण्याची व्यवस्था करणे आणि त्यांच्या मालाच्या विक्रीला बाजारपेठ जेव्हा अनुकूल असेल, तेव्हा तो विकण्याच्या कामी त्यांस मदत करणे. (३) आपल्या वखारींच्या बाहेरही पीडकजंतुनाशन सेवा उपलब्ध करणे. (४) शासन, सरकारी कंपन्या वा निगम-संस्था यांच्यातर्फे साठवणप्रतिनिधी म्हणून काम पाहणे.

देशातील महत्त्वाच्या ठिकाणी (उदा., आयात निर्यात व्यापार तसेच आंतर-राज्यीय व्यापार चालत असलेल्या शहरांमध्ये) केंद्रीय वखार निगमाने आपली उपकार्यालये स्थापन केलेली आहेत. राज्यसरकारांनी केंद्रीय वखार निगमाच्या संमतीने आपापल्या राज्यात प्रदेशीय गरजांनुसार महत्त्वाच्या शहरी राज्य वखार निगम उभारलेले आहेत.

केंद्रीय वखार निगम चालवीत असलेल्या सर्वसाधारण वखारींची प्रगती, त्यांची संख्या, त्यांची साठवणक्षमता ह्यांसंबंधात पुढील तक्त्यावरून स्पष्ट कल्पना येईल. 

वर्ष

वखारींची संख्या 

साठवणक्षमता लाख टनांत 

१९६०-६१ 

४० 

०·७९ 

१९६५-६६ 

८२ 

३·०१ 

१९६६-६७ 

८० 

३·०७ 

१९६७-६८ 

८० 

३·५८ 

१९६८-६९ 

८७ 

६·३५ 

१९६९-७० 

१२२ 

१२·९ 

१९७०-७१ 

१३० 

१३·६ 

१९७१-७२

१४१

१४·२

१९७२-७३

१४४

१५·६

केंद्रीय वखार निगमाची साठवणक्षमता मार्च १९७३ अखेर १५·६ लक्ष टन झाली. हैदराबाद व कलकत्ता येथे अनुक्रमे ६०० व १,२०० टन साठवणक्षमता असलेली शीतगुदामे बांधण्यात आली. केंद्रीय वखार निगमाला १९७०-७१ या आर्थिक वर्षात ९९·३६ लक्ष रु. फायदा झाला. मार्च १९७३ अखेर १५ राज्य वखार निगमांनी उभारलेल्या वखारींची संख्या ७७७ झाली, त्यांची एकूण साठवणक्षमता सु. १६ लक्ष टन होती.

केंद्रीय व राज्यवखार निगमांच्या गुदामांची एकूण क्षमता १९७३ मध्ये ३१·५ लक्ष टनांची होती. अल्पवधीत ह्या संस्थांनी बरीच प्रगती केली हे खरे असले, तरी देशाची गरज लक्षात घेता अजून बरीच मजल गाठावयाची आहे. नुसत्या अन्नधान्याच्या साठवणाचा विचार केला, तरी ७० लक्ष टन साठवणक्षमता निर्माण केली पाहिजे. इतर शेतमालाचा विचार केल्यास हा आकडा एक कोट टनांपर्यंत सहज जाईल.

पहा : कृषिविपणन गुदामव्यवस्था भारतीय अन्न निगम.

सुराणा, पन्नालाल