मिलस्टाइन, सेझार : (८ ऑक्टोबर १९२७) अर्जेंटिनीयन ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रतिरक्षाविज्ञानातील (रोग-प्रतिकार क्षमतेसंबधीच्या विज्ञानातील) महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना ⇨ नील्स काय येर्ने व जॉर्जेस जे एफ्‌. कोलर यांच्यासमवेत वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान या विषयाच्या १९८४ सालच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

मिलस्टाईन यांचा जन्म अर्जेटिनातील बाईआ व्ह्‌लांका येथे झाला. ब्वेनस एअरीझ विद्यापीठाची रसायनशास्त्राची पदवी (१९५२) व जीवरसायनशास्त्राची डॉक्टरेट पदवी (१९५७) मिळविल्यानंतर १९५८ मध्ये ते इंग्लंडला गेले. १९६० मध्ये केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी.पदवी त्यांनी मिळविली. एक वर्ष केंब्रिज विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागात काम केल्यावर ते ब्वेनस एअरीझ येथील नॅशनल मायक्रोबायॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या रेणवीय जीव विज्ञान विभागाचे १९६१–६३ मध्ये प्रमुख होते. १९६३ मध्ये ते इंग्लंडला परतले आणि केंब्रिज विद्यापीठातील वैद्यकीय संशोधन मंडळाच्या रेणवीय जीवविज्ञान प्रयोगशाळेत त्यांनी संशोधन करण्यास सुरूवात केली. १९६९–८० मध्ये त्यांनी या प्रयोगशाळेत ज्येष्ठ वैज्ञानिक व प्रथिन रसायनशास्त्र उपविभागाचे प्रमुख म्हणून काम केले. १९८० मध्ये ते तेथेच रेणवीय प्रतिरक्षा जीवविज्ञान उपविभागाचे प्रमुख आणि पुढे १९८३ मध्ये प्रथिन व न्यूक्लिइक  अम्ल रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.

मिलस्टाइन यांनी प्रतिपिंडाच्या [प्रतिजने म्हणजे संभाव्य हानिकारक बाह्य पदार्थ-सूक्ष्मजंतू, व्हायरस इ. प्राणिशरीरात शिरल्यावर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शरीरात मिळणाऱ्या विशिष्ट प्रतिसादात रक्तद्रवामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट प्रथिनांच्या [⟶ प्रतिपिंड] रेणूंची संरचना, क्रमविकास (उत्क्रांती) व ⇨ आनुवंशिकी यांविषयी संशोधन केलेले आहे. तथापि त्यांनी कोलर यांच्याबरोबर एककृत्तकी (पूर्वनिर्धारित अतिविशिष्टता व एकसारखेपणा असलेले) प्रतिपिंड निर्माण करण्यासाठी १९७५ च्या सुमारास संकरारर्बुद तंत्राच्या लावलेल्या शोधाकरिता ते अधिक प्रसिद्ध आहेत. याकरिता त्यांनी प्रतिपिंड स्त्रवणाऱ्या एकाच लसीका कोशिकेचे [रक्तातील एका प्रकारच्या पांढऱ्या कोशिकेचे (पेशीचे) ⟶ लसीका तंत्र] अस्थिमज्जार्बुदाच्या (हाडाच्या पोकळीतील संयोजी-ऊतकातील-कोशिका समुहातील-कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीच्या) एकाच कोशिकेशी संयोग घडवून आणल्यास एक संकरज कोशिका (संकरार्बुद कोशिका) तयार होते आणि या कोशिकेत लसीका कोशिकेची प्रतिपिंड तयार करण्याची क्षमता तसेच मारक अर्बुद कोशिकेचे चिरस्थायित्व असते, असे दाखविले. त्यांनी उपयोगात आणलेल्या प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या कोशिका उंदराच्या प्लीहेतील (पानथरीतील) होत्या व त्या मेंढीच्या रक्तातील लाल कोशिकांनी प्रतिरक्षित केलेल्या होत्या. यामुळे प्रत्येक संकरार्बुद कोशिकेद्वारे मेंढीच्या कोशिकांच्या विरोधी अशा प्रतिपिंडाचे स्त्रवण झाले. निरनिराळ्या उद्‌गमांपासून मिळविलेल्या प्रतिपिंड उत्पादक कोशिका संकरित करणे शक्य आहे आणि विशिष्ट प्रतिपिंड मिळविण्यासाठी अशा कोशिकांचे मोठ्या प्रमाणावर कृत्रिम रीतीने संवर्धन करता येणे शक्य आहे, असेही मिलस्टाइन व कोलर यांनी सूचित केले. या तंत्राने पूर्वनिर्धारित विशिष्टता असलेल्या एककृत्तकी प्रतिपिंडांचे अमर्याद उत्पादन करणे शक्य झाले आहे. या प्रतिपिंडांमुळे सैद्धांतिक व अनुप्रयुक्त (व्यवहारोपयोगी) जीववैद्यकीय संशोधनात अगदी नवी अशी क्षेत्रे अस्तित्वात आली आहेत. प्रतिपिंड अणूंच्या निरनिराळ्या भागांच्या वेगवेगळ्या कार्यांसंबंधीचा तपशीलवार अभ्यास, ⇨ इंटरफेरॉनासारख्या पदार्थांचे उच्च शुद्धीकरण, अर्बुदासारख्या रोगांचे निदान व त्यांवरील उपचार ही एककृत्तकी प्रतिपिंडाच्या उपयोगाची काही उदाहरणे होत.

नोबेल पारितोषिकाखेरीज मिलस्टाईन यांना सीबा पदक व पारितोषिक (१९७८) जनरल मोटर्स कॅन्सर रिसर्च फांउडेशनचे स्लोन पारितोषिक (१९८१) लंडनच्या रॉयल सोसायटीचे रॉयल पदक (१९८२) फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे फ्रँक्लिन पदक (१९८३) युनेस्कोचे कार्लोस जे. फिनली पारितोषिक (१९८३) वगैरे अनेक सन्मान मिळालेले आहेत. स्कँडिनेव्हियन इम्युनॉलॉजिकल सोसायटीज (१९७०), यूरोपीयन मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन (१९७४), रॉयल सोसायटी (१९७५), अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ इम्युनॉलॉजिस्ट्‌स (१९७९), अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९८१), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस (१९८३), रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स (१९८३) इ. वैज्ञानिक संस्थांचे ते परदेशी अथवा सन्माननीय सदस्य आहेत.

मिठारी, भू. चिं.