हैद : हा सागरी मासा करली या नावाने विशेष प्रसिद्ध आहे. दताली व मुंबई भागात दोराब या नावांनीही तो ओळखला जातो. याचे इंग्रजी नाव हैद (कायरोसेंट्रस दोराब)वुल्फ हेरिंग व शास्त्रीय नाव कायरोसेंट्रस दोराब असे असून त्याचा समावेश क्लुपिइफॉर्मीस गणाच्या कायरोसेंट्रिडी कुलात होतो. या कुलातील ही एकमेव सागरी जाती आहे. तिचा प्रसार तांबडा समुद्र, हिंदी महासागर, पश्चिम पॅसिफिक महासागर ते जपान व पूर्व ऑस्ट्रेलिया येथे आहे. ती भारतात दोन्ही किनाऱ्यांवर सर्वत्र आढळते परंतु तिच्या झुंडी नसतात. ती सु. १२० मी. खोलीपर्यंत आढळते. 

 

हैद माशाचा रंग पाठीवर गर्द निळसर हिरवा, दोन्ही बाजूंना व पोटाकडे रुपेरी असून ते रंग एका सोनेरी पट्ट्याने वेगळे झालेले असतात. पृष्ठपक्ष व गुदपक्ष पिवळसर असून त्यांच्या कडा काळसर धुरकट व गुदपक्षस्पष्ट असतात. त्याच्या शरीराची लांबी साधारणतः १.२ मी.पेक्षा जास्तअसते सर्वाधिक लांबी ३.७ मी. असून वजन १७०–१,२०० ग्रॅ. असते. शरीर अरुंद, लांबट व चपटे असते. तोंड खूप मोठे व रुंद असते. वरच्या ओठाला पुढच्या बाजूला अभिमध्य आखूड घडी पडलेली असते. खालचा जबडा लांब पुढे आलेला असतो. जंभिका (उत्तर हन्वस्थी) डोळ्यांच्या मागच्या कडांपर्यंत पोहचलेली असते. खालच्या जबड्यातील सुळे दात बळकट असतात. वरच्या जबड्यात पटाशीसारख्या बळकट दातांच्या दोन जोड्या असतात व त्या पूर्वजंभिकेच्या पुढे डोकावत असतात. खवले लहान व गळून पडणारे आणि पार्श्विक रेखा अस्पष्ट असते. 

 

क्लुपिइडी कुलातीलहेरिंग माशां प्रमाणे लांबट व रुपेरी शरीर आणि शाखायुक्त शेपटी असे वरवरचे साम्य हैद माशात दिसून येते. हैद मासा अन्य हेरिंग माशांप्रमाणे प्लवकावर उपजीविका करणारा नसून मांसाहारी आहे. त्यामुळे मत्स्य भक्षक माशांच्या व त्यांवर अन्नासाठी अवलंबून असणाऱ्या सागरी पक्ष्यांच्या अन्नसाखळीमध्ये त्याला अप्रत्यक्ष-पणे खूपच महत्त्व आहे. मोठे आकारमान व परभक्षक सवय यांमुळे इतर अनेक माशांना याच्यापासून धोका असतो. उड्या मारण्याविषयी तो विशेष प्रसिद्ध असून धावत्या लाँचवरून तो सहज उडी मारतो. 

 

जुलै-ऑगस्ट महिन्यांत किनाऱ्यापासून दूरवर सागरात माद्या अंडी घालतात. चार वर्षे वयाचे मासे व्यापारी मच्छीमारीत सापडतात. रापण जाळ्यात लहान-मोठे मासे सापडतात परंतु गिल-नेट प्रकारच्या जाळ्यात मोठे मासे सापडतात व त्यांच्याबरोबर पक्व किंवा निरुपयोगी जनन ग्रंथी मिळतात. महाराष्ट्रातील मासेमारीत महत्त्वाच्या व्यापारी माशांमध्ये हैद माशाचा समावेश होतो. दरवर्षी सरासरी २,००० टन हैद मासे पकडले जातात. हा खाण्यासाठी चांगला असतो परंतु त्यात भरपूर काटे असतात. 

जमदाडे, ज. वि.

 

हैद (कायरोसेंट्रस दोरब)