पक्षाघात : तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) व स्नायू यांच्या विकृतीमध्ये स्नायूंच्या क्रियाशीलतेत बिघाड उत्पन्न होऊन ते लुळे व दुर्बल पडण्याला पक्षाघात म्हणतात. स्नायूंची क्रियाशीलता संपूर्ण नाहीशी झाल्यासच पक्षाघात ही संज्ञा वापरतात. क्रियाशीलता काही अंशी शिल्लक असल्यास ‘अंश पक्षाघात’ किंवा ‘अंशाघात’ या संज्ञा वापरतात. पक्षाघात हे एक रोगलक्षण असून ते आंगिक व मनोदोषजन्य अशा दोन्ही प्रकारच्या विकृतींत आढळते, उदा., मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे आढळणारा पक्षाघात आणि ⇨ उन्माद (हिस्टेरिया) या मनोदोषजन्य विकृतीत आढळणारा पक्षाघात. प्रस्तुत नोंदीत आंगिक पक्षाघातासंबंधी माहिती दिली आहे.

आंगिक पक्षाघाताचे निरनिराळे प्रकार समजण्याकरिता विकृतिस्थानाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्याकरिता स्थायूंची ऐच्छिक हालचाल ज्या विशिष्ट तंत्रावर अवलंबून असते ‘त्या प्रेरक तंत्रां’ची थोडक्यात माहिती येथे दिली असून या विषयावर स्वतंत्र नोंदही आहे [⟶ प्रेरक तंत्र].

प्रेरक तंत्र व पक्षाघात : (या वर्णनात मेंदू व तंत्रिका तंत्र यांच्या विविध भागांच्या संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘तंत्रिका तंत्र’ ही नोंद पहावी). प्रेरक तंत्रामध्ये तंत्राचे विशिष्ट भाग आणि ऐच्छिक स्नायू यांचा समावेश होतो. स्नायूंचे कार्य प्रत्यक्ष दिसते तसे तंत्रिका तंत्राचे दिसत नाही. कारण ते शरीरात खोल असून त्याची रचनाही गुंतागुंतीची आहे. प्रेरक हालचालीचा स्नायूपर्यंत जाणारा संदेश जेथे उत्पन्न होतो तेथून पोहोचण्याचा मार्ग दोन भागांत विभागता येतो : (१) ऊर्ध्वस्थ आणि (२) अधःस्थ.

(१) वरच्या संपूर्ण विभागाला ‘ऊर्ध्वस्थ प्रेरक तंत्रिका-कोशिका-एकक’ म्हणतात. त्याची सुरुवात प्रमस्तिष्क गोलार्धातील प्रेरक क्षेत्रापासून होते [⟶ तंत्रिका तंत्र]. या क्षेत्रातील तंत्रिका कोशिकांपासून (पेशींपासून) निघणारे तंत्रिका तंतू बरेच लांब असतात व त्यांपैकी काही मस्तिष्क स्तंभातील प्रेरक केंद्रांच्या कोशिकांजवळ व उरलेले मेरुरज्जूतील अग्रशृंगातील प्रेरक तंत्रिका कोशिकांजवळ संपुष्टात येतात. प्रेरक क्षेत्रापासून निघणारे हे तंतू सुरुवातीस एकमेकांपासून लांब असले, तरी खाली उतरताना जवळ येऊन त्यांची जुडी बनते, या जुडीला ‘स्तूप मार्ग’ म्हणतात.

(२) खालच्या विभागाला ‘अधःस्थ प्रेरक तंत्रिका-कोशिका-एकक’ म्हणतात. मस्तिष्क स्तंभातील प्रेरक केंद्रातील (मस्तिष्क तंत्रिकांचे प्रेरक भाग सुरू होतात तेथून) कोशिकांपासून तसेच मेरुरज्जूच्या वरपासून खालपर्यंतच्या अग्रशृंग भागातील प्रेरक कोशिकांपासून निघणारे तंतू स्नायूंपर्यंत गेलेले असतात. मेरुरज्जूपासून निघणारे तंतू मेरुरज्जू तंत्रिकांमधून जातात आणि ते धड, हात व पाय यांच्या स्नायूंपर्यंत पोहोचतात. प्रेरक मस्तिष्क तंत्रिकांतून जबडा, चेहरा, टाळू, ग्रसनी, ध्वनितंतू आणि जीभ या भागांच्या स्नायूंपर्यंत तंतू जातात.

वरील वर्णनावरून प्रेरक तंत्राचे तीन विभाग कल्पिल्याचे सहज लक्षात येते : (१) ऊर्ध्वस्थ प्रेरक तंत्रिका-कोशिका-एकक, (२) अधःस्थ प्रेरक तंत्रिका-कोशिका-एकक आणि (३) स्नायू. हे तीन विभाग कल्पिण्यात येत असले, तरी ज्या अनेक रोगांमध्ये पक्षाघात हे लक्षण असते, त्यांच्या निदानाकरिता ही विभागणी उपयुक्त ठरली आहे. अधःस्थ प्रेरक तंत्रिका-कोशिका-एककावर ऊर्ध्वस्थ प्रेरक-तंत्रिका-एककाचा तसेच स्तूप मार्गेतर तंत्रिका मार्गाचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे स्तूप मार्गेतर तंत्रिका मार्गांची विकृती जरी प्रत्यक्ष पक्षाघातास कारणीभूत नसली, तरी काही अंशी स्नायुदौर्बल्यास कारणीभूत होते. प्रत्येक हालचाल ज्या विशिष्ट नाजूक आणि बिनचूक क्रियांची मिळून बनलेली असते त्यावर मात्र दुष्परिणाम होतो. हा दुष्परिणाम अपसामान्य स्नायुताण किंवा अंगस्थिती, असंगतता आणि कंप यांवरून दिसून येतो.

रचना दृष्ट्या शरीराच्या दोन्ही बाजूंच्या सारख्या स्नायूंना तंत्रिका पुरवठा करणारे मार्गही सारखेच आहेत. डाव्या प्रमस्तिष्क गोलार्धातील प्रेरक क्षेत्रापासून निघणारे तंत्रिका तंतू खाली येताना लंबमज्जेमध्ये उजव्या बाजूकडे आणि उजव्या गोलार्धातील तंतू त्याच ठिकाणी डावीकडे जाताना एकमेकांना ओलांडतात. यालाच ‘प्रेरक व्यत्यास’ किंवा ‘स्तूप मार्ग व्यत्यास’ म्हणतात. काही अपवाद वगळल्यास अधःस्थ प्रेरक-कोशिका-एकक ज्या बाजूस असेल त्याच बाजूच्या स्नायूंना पुरवठा करतात. ऊर्ध्वस्थ प्रेरक तंत्रिक-कोशिका-एकक मात्र वर उल्लेखिलेल्या व्यत्यासामुळे मेरुरज्जूतील विरुद्ध बाजूच्या अग्रशृंग प्रेरक कोशिकांशी संबंधित होतात. म्हणून व्यत्यासाच्या वरील भागातील विकृती विरुद्ध बाजूचा पक्षाघात उत्पन्न करते. मस्तिष्क स्तंभातील काही प्रेरक मस्तिष्क तंत्रिका केंद्रांना दोन्ही स्तूप मार्गातील तंतू संबंधित होतात व त्यामुळे चघळणे, बोलणे व गिळणे या महत्त्वाच्या क्रियांच्या स्नायूंचा पुरवठा द्विपार्श्विक (दोन्ही बाजूंनी होणारा) असतो. मस्तिष्क तंत्रिकांच्या विकृतीमुळे उद्‌भवणाऱ्या काही पक्षाघातांची माहिती ‘तंत्रिका तंत्र’ या नोंदीत दिली आहे.

  

मस्तिष्क बाह्यकात सुरू होणारे स्तूप मार्गातील तंतू थेट मेरुरज्जूच्या खालच्या टोकापर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांची लांबी बरीच असते. ही त्यांची असाधारण लांबीच त्यांना पुष्कळ वेळा विकृतिस्थान बनविण्यास कारणीभूत होते. स्तूप मार्गाच्या विकृतीमुळे उद्‌भवणारा पक्षाघात मूळ विकृतिस्थानावर अवलंबून असतो उदा., प्रमस्तिष्क भागाची विकृती डाव्या बाजूस असल्यास ‘उजवा अर्धांगघात’ अथवा ‘लकवा’ (उजवा हात, उजवे धड, उजवा पाय आणि चेहऱ्याचा उजवा भाग यांचा पक्षाघात) उत्पन्न होतो. तरीही चघळणे, बोलणे किंवा गिळणे या प्रमुख क्रिया अबाधित राहतात. दोन्ही स्तूप मार्गांना विकृती झाल्यास (बहुतकरून लंबमज्जेच्या वरच्या पातळीवर) द्विपार्श्विक अर्धांगघात उद्‌भवतो. त्याशिवाय वरील क्रियांतही बिघाड उत्पन्न होतो. 

दोन्ही स्तूप मार्गांतील तंतू प्रमस्तिष्क गोलार्धातून खाली येताना एकमेकांपासून काही अंतरावर असतात परंतु जेव्हा ते मस्तिष्क स्तंभ आणि मेरुरज्जू भागात येतात तेव्हा हे अंतर कमी होऊन पुष्कळ जवळ येतात. यामुळे मेरुरज्जूचा वरचा भाग किंवा मस्तिष्क स्तंभाच्या विकृती दोन्ही स्तूप मार्गांवर परिणाम करून ‘चतुरांगघात’ उद्‌भवतो मेरुरज्जूचा ग्रैव (मानेसारखा) भाग सोडून त्याखालील भागातील विकृती ‘अधरांगघात’ (दोन्ही पाय लुळे पडणे) उत्पन्न करतात. 

पक्षाघाताचा विस्तार आणि प्रसारक्षेत्र यांवरून विकृतिस्थानाचा अंदाज करण्यास जशी मदत होते तशीच इतर काही लक्षणेही मदत करतात. उदा., जेव्हा विकृती ऊर्ध्वस्थ विभागात असते तेव्हा संबंधित स्नायूंचा ताण वाढल्याचे आणि त्यामुळे स्नायु-ताठरता येऊन कंडरा-प्रतिक्षेपी क्रिया [⟶ प्रतिक्षेपी क्रिया] वृद्धिंगत झाल्याचे आढळते. याउलट विकृतिस्थान अधःस्थ विभागात असेल, तर स्नायुताण कमीपडून कंडरा-प्रतिक्षेपी क्रिया कमी प्रमाणात किंवा अजिबात मिळत नाहीत व स्नायु-शैथिल्य येते. या दोन्ही प्रकारच्या पक्षाघातांना अनुक्रमे ‘स्नायु-ताठरतायुक्त पक्षाघात’ आणि ‘शिथिल पक्षाघात असे संबोधितात. याशिवाय शिथिल पक्षाघातात (१) स्नायूंची अपपुष्टी किंवा अपक्षय आणि (२) ऊत्स्फूर्त स्नायु-संकोच (स्नायूमधील छोट्या स्नायुतंतू जुडग्यातून आपोआप संकोच उत्पन्न होणे) ही लक्षणेही आढळतात. ऊर्ध्वस्थ विभाग आणि अधःस्थ विभाग यांच्या विकृतीतील आणखी एक महत्त्वाचा फरक पुढीलप्रमाणे आहे. मुख्य तंत्रिका कोशिका अविकल असल्यास अधःस्थ प्रेरक तंत्रिका विभागाचे तंत्रिका तंतू पुनर्जननाने पूर्ववत होऊ शकतात. केंद्रीय तंत्रिका तंत्राबाहेरील सर्व प्रकारचे तंत्रिका तंतू, मग ते प्रेरक असोत किंवा संवेदी असोत, पुनर्जननक्षम असतात. फक्त त्यांची उगमस्थान असलेली तंत्रिका कोशिका जशीच्या तशी प्राकृतावस्थेत (सामान्य अवस्थेत) असली पाहिजे. ऊर्ध्वस्थ विभागात अशी क्षमता नसल्यामुळे त्याच्या विकारात उद्‌भवलेला पक्षाघात अपरावर्त्य म्हणजे कायम स्वरूपाचा असतो. कोष्टकात या दोन विभागांचा पक्षाघातातील फरक दर्शविले आहेत.


पक्षाघात हे लक्षण असलेल्या विकृती : या विकृतींचे दोन प्रमुख वर्ग केले आहेत : (१) तंत्रिका ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहात) वा स्नायू ऊतकात रचनात्मक बदल घडवण्याऱ्या विकृती. (२) तंत्रिका-स्नायू कार्यात चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडींशी संबंधित) बिघाड उत्पन्न करणाऱ्या विकृती.

ऊर्ध्वस्थ प्रेरक तंत्रिका-कोशिका-एकक संबंधित विकृती 

अधःस्थ प्रेरक तंत्रिका-कोशिका-एकक संबंधित विकृती 

१. स्नायुगटावर परिणाम होतो त्यामुळे संपूर्ण क्रियांवर परिणाम होतो. 

१. एकेकट्या स्वतंत्र स्नायूवर परिणाम होतो किंवा स्नायुगटावर परिणाम होतो. 

२. स्नायूंचा अपकर्ष (ऱ्हास) किंवा अपक्षय अत्यल्प किंवा अजिबात नसतो. 

२. अपकर्ष किंवा अपक्षय हे प्रमुख लक्षण असते. एकूण विकृत स्नायूंपैकी ७० ते ८०% स्नायूंवर दुष्परिणाम होतो. 

३. स्नायु-ताठरता प्रमुख लक्षण असते. 

३. स्नायु-शैथिल्य असते. 

४. कंडरा-प्रतिक्षेप वृद्धिगंत होतात. 

४. कंडरा-प्रतिक्षेप कमी किंवा नाहीसे होतात. 

५. उत्स्फूर्त स्नायु-संकोच नसतात. 

५. उत्स्फूर्त स्नायु-संकोच आढळतात. 

६. रासायनिक विक्रियाजन्य (गॅल्व्हानिक) आणि प्रवर्तनजन्य (फॅराडिक) विद्युत् प्रवाहांना स्नायु-प्रतिक्रिया मिळते. 

६. प्रवर्तजन्य विद्युत् प्रवाहाला प्रतिक्रिया मिळत नाही परंतु रासायनिक विक्रियाजन्य प्रवाहाला मिळते (अपकर्षजन्य प्रतिक्रिया). 

पक्षाघात व प्रेरक तंत्रिका क्षेत्रे : (१) प्रमस्तिष्क गोलार्धाची उजवीबाजू, (२) प्रमस्तिष्क गोलार्धाची डावी बाजू, (३) पायाचे क्षेत्र, (४) बाहूचे क्षेत्र, (५) चेहऱ्याचे क्षेत्र. (६) अंतःप्रावर, (७) विरुद्ध बाजूचा एकांगघात किंवा एकगात्राघात, (८) विरुद्ध बाजूचा अर्धांगघात किंवा अर्धांग-पक्षाघात, (९) मस्तिष्क स्तंभ, (१०) मस्तिष्क सेतू, (११) लंबमज्जा, (१२) स्तूप मार्ग व्यत्यांग, (१३) वक्षीय मेरुरज्जू, (१४) त्याच बाजूचा एकागात्राघात, (१५) स्नायू.

 (१) या प्रकारच्या विकृतींच्या कारणांमध्ये एका बाजूच्या प्रमस्तिष्क गोलार्धातील स्तूप मार्गाची हानी हे प्रमुख व नेहमी आढळणारे कारण असते. मेंदूतील रक्तवाहिनीतील रक्तस्राव, अंतर्कीलन (रक्ताची गुठळी किंवा इतर काही बाह्य पदार्थ रोहिणीत अकस्मात अडकून तेथील रक्तप्रवाह बंद पडणे) किंवा अंतर्क्लथन यामुळे रक्तपुरवठ्यात व्यत्यय येतो व त्यामुळे ⇨ अभिकोथ होऊन ऊतकनाश होतो. ही विकृती एवढी अचानक व एकाएकी उद्‌भवते की, रोगी कुऱ्हाडीने घाव घातल्यास जसा कोसळेल तसा कोसळतो. म्हणूनच तिला ‘रक्ताघाती आघात’ म्हणतात. मस्तिष्कार्बुदामुळेही (नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे मेंदूत तयार झालेल्या गाठीमुळेही) अर्धांगघात उद्‌भवतो परंतु तो एकदम न उद्‌भवता हळूहळू वाढणारा असतो.कोणत्याही कारणावरून जेव्हा उजव्या हाताने नेहमी काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये डाव्या प्रमस्तिष्क गोलार्धातील रक्तवाहिनीच्या विकृतीमुळे उजव्या बाजूचा अर्धांगघात होतो तेव्हा बहुतकरून वाग्विकृतीही आढळते. कारण अशा व्यक्तीमध्ये मेंदूतील वाचाकेंद्र विकृत बाजूकडेच असते.

‘मस्तिष्क रोहिणी काठिण्य’  आणि ‘मस्तिष्क वाहिका उपदंश’ या रोगांत द्विपार्श्विक अर्धांगघात उद्‌भवतो. स्नायु-ताठरतायुक्त उभयांगघात या अर्भकात आढळणाऱ्या विकृतीत दोन्ही पाय लुळे पडतात व ती मेंदूतील जन्मजात विकृतीमध्ये प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या इजेमुळे (चिमटा डोक्यास लावून प्रसूती करताना) उद्‌भवते. मेरुरज्जूतील स्तूप मार्गाला रक्तवाहिन्यांची विकृती होण्याचा संभव फारच कमी असतो. बहुतकरून आघात, अस्थिविकृती किंवा अस्थिभंग आणि कशेरुक दंडाच्या (पाठीच्या कण्याच्या) संधी-विकृती स्तूप मार्गाच्या बिघाडास कारणीभूत असतात. याशिवाय मेरुरज्जु-अर्बुदे, मेरुरज्जूशोथ (मेरुरज्जूची दाहयुक्त सूज), मारक पांडुरोगातील मेरुरज्जूवरील दुष्परिणाम यांमुळेही पक्षाघात उद्‌भवतो. मध्यम वयात किंवा वृद्धावस्थेत कशेरुकदंडाच्या अपकर्षोत्पादक शोथामुळे ग्रैव भागातील अंतराकशेरुक बिंब (दोन मणक्यांच्या मधला चकतीसारखा भाग) पुढे सरकल्यामुळे मेरुरज्जूवर दाब पडून प्रगामी (हळूहळू वाढणारा) स्नायु-ताठरतायुक्त अधरांगघात उद्‍भवतो.

अधःस्थ विभागाच्या विकृतींमध्ये नेहमी आढळणारा ⇨ बालपक्षाघात (पोलिओ) आणि बहुतंत्रिकाशोथ (एकाच वेळी अनेक तंत्रिकांचा शोथ होणे) यांचा समावेश होतो. बालपक्षाघातामध्ये स्नायु-शैथिल्य व स्नायु-ऱ्हास ही लक्षणे आढळतात. बेल पक्षाघात (चार्ल्स बेल या स्कॉटिश शरीरक्रियाविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा पक्षाघात) या विकृतीत आनन तंत्रिकेच्या शोथामुळे चेहऱ्याच्या एकाच बाजूचे स्नायू लुळे पडतात[⟶ तंत्रिका तंत्र].‘स्नायु-अपकर्षयुक्त पार्श्वपथ काठिण्य’ या क्वचित आढळणाऱ्या आणि अज्ञात कारण असलेल्या विकृतीतही पक्षाघात उद्‌भवतो.

मूळ विकृतिस्थान स्नायू असलेल्या विकृतींचे प्रमाण बरेच कमी असते. यांमध्ये प्रामुख्याने ‘प्रगामी स्नायु-कष्टपोषण’ या विकृतीचा उल्लेख करावा लागतो. ही विकृती कौटुंबिक व आनुवंशिक स्वरूपाची असून दोन्ही बाजूंच्या स्नायूंना अशक्तता येऊन स्नायु-ऱ्हास होतो. बहुतकरून कुमारावस्थेत किंवा तारुण्यावस्थेत सुरू होणारी ही विकृती स्त्री व पुरुषांत सारख्याच प्रमाणात आढळते. ‘प्रगामी स्नायु-अपकर्ष’  ही विकृती प्रेरक तंत्रिका-कोशिका-एकक विकृतीमुळे उद्‌भवते. या दोन्ही विकृती निरनिराळया असून कष्टपोषणात उत्स्फूर्त स्नायु-संकोच कधीही आढळते नाही. स्नायू विकृतिस्थान असल्याचे निदान विद्युत् स्नायु-आलेख किंवा स्नायू जीवोतक (जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकाची) परीक्षा करून निश्चित करता येते.


(२) तंत्रिका ऊतकात किंवा स्नायू उतकात चयापचयात्मक बिघाड उत्पन्न करणाऱ्या विकृतींमध्ये ⇨ अंतस्रावी ग्रंथींच्या विकृती, काही विषबाधा आणि अनेक चयापचयात्मक दोष यांचा समावेश होतो. अवटुस्रावाधिक्य [⟶ अवटु ग्रंथि], अधिवृक्क ग्रंथीचा ‘कुशिंग लक्षणसमूह’ (मेदोवृद्धी, शर्करामेह इ. लक्षणे असलेली विकृती) व ॲडिसन रोग या विकृती अंतःस्रावी ग्रंथींच्या विकृतीत मोडतात [⟶ अधिवृक्क ग्रंथी ॲडिसन रोग].

विषबाधेमध्ये ‘कुपीजंतू विषबाधा’ (एक प्रकारची अन्नविषबाधा), काही सर्पविषबाधा आणि गोचीड पक्षाघात (स्त्री-लिंगी गोचीड जे विष उत्पन्न करते त्या विषापासून होणारा पक्षाघात) यांचा समावेश होतो. गंभीर स्नायु-दौर्बल्य या विकारामध्ये चयापचयात्मक विकृती पक्षाघातास कारणीभूत होते. तिचे निश्चित कारण अज्ञात असून ⇨यौवनलोपी ग्रंथी या विकृतीशी संबंधित असावी. प्रेरक तंत्रिकेच्या स्नायूतील शेवटच्या टोकाकडील भागात (अंत्यपट्टात) ही विकृती रासायनिक बिघाड उत्पन्न करते.

पक्षाघाताची वर्गवारी: पक्षाघात हे एक लक्षण असून त्याची वर्गवारी निरनिराळ्या प्रकारांनी करता येते.

(अ) तंत्रिका तंत्राचा जो भाग विकारग्रस्त असेल त्यानुसार उदा., मस्तिष्क पक्षाघात, मेरुरज्जू पक्षाघात वगैरे. 

(आ) शरीरभागानुसार : (१) एकांग पक्षाघात : एक हात किंवा एक पाय लुळा पडणे (२) अर्धांगघात : एकाच बाजूचा हात व पाय लुळा पडणे (३) अधरांगघात : कमरेखालील भाग व दोन्ही पाय लुळे पडणे (४) सर्वांग पक्षाघात : दोन्ही हात, दोन्ही पाय व धड लुळे पडणे (५) चतुरांग पक्षाघात : दोन्ही हात व दोन्ही पाय लुळे पडणे.

(इ) पक्षाघात स्वरूपानुसार : (१) पूर्ण व अपूर्ण पक्षाघात, (२) स्थायी व अस्थायी पक्षाघात, (३) स्थानिक व विस्तृत पक्षाघात, (४) व्यत्यस्त व अव्यत्यस्त पक्षाघात.

(ई) पक्षाघात ज्या वेगाने उद्‌भवतो त्यानुसार : (१) आकस्मिक पक्षाघात, (२) प्रगामी पक्षाघात.

काही विशिष्ट प्रकार : ऊर्ध्वगामी पक्षाघात किंवा लांद्री पक्षाघात : (फ्रेंच शरीरक्रियाविज्ञ जे. बी. ओ. लांद्री यांच्या नावाने ओळखण्यात येणारा पक्षाघात). या विकृतीचे निश्चित कारण अज्ञात असून प्रथम पाय, नंतर हात व शेवटी धड या क्रमाने स्नायू लुळे पडतात. या विकृतीला ‘तीव्र संक्रामणजन्य बहुतंत्रिका शोथ’ किंवा ‘गीयाँ-बॅरे’ (जी. गीयाँ व जे. ए. बॅरे या फ्रेंच तंत्रिकाविज्ञांच्या नावांवरून) लक्षणसमूह अशीही नावे आहेत. गंभीर श्वसनक्रिया पक्षाघाताचा धोका टळल्यास रोगी संपूर्ण बरा होतो. 

सकंप पक्षाघात किंवा पार्किनसन रोग : जेम्स पार्किनसन या शरीरक्रियाविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारा रोग). उतार वयात पन्नाशी ते सत्तरीच्या दरम्यान उद्‌भवणाऱ्या या विकृतीचे कारण अज्ञात असून तिचे पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा दुप्पट प्रमाण असते. स्नायु-ताठरता आणि कंप ही लक्षणे असलेल्या या विकृतीचे स्थान स्तूप मार्गेतर भागातील कार्य बिघाड हे असते. १० ते १५ वर्षे हळूहळू वाढत जाणारी ही विकृती अलीकडच्या काळातील मेंदूवरील विशिष्ट शस्त्रक्रियांपासून पुष्कळच सुसह्य बनली आहे. लिव्होडोपा नावाचे औषध या रोगावर गुणकारी ठरले आहे. [⟶ कंपवात]. 

बालपक्षाघात : सर्वसाधारण भाषेत ‘पोलिओ’ या नावाने ओळखली जाणारी ही विकृती व्हायरसजन्य असून अलीकडे २५ ते ३० % रोगी बालवयीन नसून १५ वर्षे वयाहून अधिक वयाचे असल्याचे आढळले आहे. मेरुरज्जूतील अग्रशृंग भागातील तंत्रिका कोशिकांचे या व्हायरसांना विशेष आकर्षण असल्याचे दिसून आले आहे. विकृतीस्थानाप्रमाणे पक्षाघात उद्‌भवतो.   [⟶ बालपक्षाघात].

  

आनन पक्षाघात: चेहऱ्याच्या भावप्रदर्शक स्नायूंच्या या पक्षाघाताचे दोन प्रकार आहेत : (अ) अधिकेंद्रकीय आणि (आ) अवकेंद्रकीय. यांपैकी अवकेंद्रकीय प्रकारास बेल पक्षाघात म्हणतात [⟶ तंत्रिका तंत्र].

  

लंबमज्जा पक्षाघात : लंबमज्जेच्या व्हायरसजन्य विकृतीमुळे ओठ, जीभ, मृदुतालू, ग्रसनी (घसा), स्वरयंत्र या भागांतील स्नायू लुळे पडतात. बोलणे, गिळणे या क्रिया अशक्य बनतात. क्वचित प्रसंगी लंबमज्जेतील उष्णता नियामक केंद्र, श्वसन नियामक केंद्र इ. महत्त्वाच्या केंद्रांवरही दुष्परिणाम होतात.

 लंबमज्जा पक्षाघाताभास : गिळणे, बोलणे, चघळणे या क्रिया वरील विकृतीप्रमाणेच अशक्य बनतात परंतु येथे विकृतिस्थान लंबमज्जा नसून दोन्ही प्रमस्तिष्क गोलार्धातील समरूप जागी असते.

 टॉड पक्षाघात : (आर्. बी. टॉड या इंग्रज शरीरक्रियाविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारा पक्षाघात). जॅक्सन अपस्माराच्या (जे. एच्. जॅक्सन या इंग्रज तंत्रिकाविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या अपस्माराच्या) झटक्यानंतर अल्पकाल टिकणारा स्नायु-दौर्बल्ययुक्त पक्षाघात [⟶ अपस्मार].

  

आवर्ती पक्षाघात : ही विकृती आनुवंशिक असून एकाच कुटुंबातील काही व्यक्तींमध्ये उद्‌भवते. स्नायु-दौर्बल्याचे पुनःपुन्हा येणारे झटके व त्यानंतर पूर्ववत होणारी स्नायुशक्ती हे या विकृतीचे वैशिष्ट्य असते.स्नायु-दौर्बल्याबरोबरच रक्तरसातील पोटॅशियमाचे नेहमीचे प्रमाण वाढलेले किंवा कमी झाल्याचे आढळते परंतु पुष्कळशा जीवरासायनिक अभ्यासानंतरही विकृतीचे निश्चित कारण अज्ञातच आहे.

  

प्रसूतीतील पक्षाघात : प्रसूतीत अडचण आल्यास स्त्रीची लवकर सुटका करण्यासाठी अर्भकास कृत्रिम उपाय योजून बाहेर काढावे लागते. अशा वेळी काही तंत्रिकांना किंवा मेंदूला इजा होऊन पक्षाघात संभवतो. उदा., अर्भकाच्या चेहऱ्यावर लावलेल्या चिमट्याचा आनन तंत्रिकेवर दाब पडून उद्‌भवणारा आनन पक्षाघात किंवा प्रमस्तिष्कास इजा होऊन उद्‌भवणारा मस्तिष्क पक्षाघात.

 फलानुमान : पक्षाघाताचे फलानुमान मूळ कारणावर अवलंबून असते.मेंदूतील रक्तवाहिन्यांत रक्तक्लथन (रक्त गोठून त्याची गुठळी तयार होणे) झाल्यास ज्या भागात आणि ज्या प्रमाणात विकृती झाली असेल त्यावर साध्यासाध्य विचार अवलंबून असतो. रोग्याने विकाराची तीव्रावस्था पार पाडल्यानंतर एक-दोन महिन्यांत स्नायूंची कार्यशक्ती काही प्रमाणात परत येते. बहुधा संपूर्ण कार्यशक्ती पूर्ववत होत नाही. टॉड पक्षाघात संपूर्ण बरा होतो. बेल पक्षाघात बहुतकरून तीन ते सहा महिन्यांत पूर्ण बरा होतो. अर्भकातील मस्तिष्क पक्षाघात, विशेषेकरून मेंदूतील जन्मजात विकृतिजन्य असल्यास, कायम स्वरूपाचा असतो. मेंदूतील व मेरुरज्जूतील काही अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या गाठी) शस्त्रक्रियेने बरी होत असल्यामुळे तज्जन्य पक्षाघातही बरा होतो. सकंप पक्षाघात हळूहळू वाढत जाणारी विकृती असून उपाय चालू असेतोपर्यंत कह्यात राहू शकते. मस्तिष्कशोथ व परिमस्तिष्क ज्वर यांमुळे उद्‌भवणाऱ्या पक्षाघाताचे फलानुमान अनिश्चित स्वरूपाचे असते.


सर्वसाधारणपणे ज्या स्नायूंचा सूक्ष्म व कौशल्यपूर्ण कार्यासाठी उपयोग होतो (उदा., लिहिणे, बोलणे वगैरे), ते स्नायू पूर्ववत न होता त्यांच्या कार्यशीलतेत थोडेफार व्यंग उरते. हातापायांचे मोठे स्नायू बहुतकरून संपूर्ण पूर्ववत होतात. पायाच्या स्नायूंची सुधारणा हाताच्या स्नायूंपेक्षा अधिक लवकर व उत्तम होते. योग्य उपाययोजना न झाल्यास स्नायूंचे अवकुंचन होऊन अपंगत्व येते. स्नायूंची कार्यशक्ती संपूर्णपणे परत न येऊनही आधारांच्या मदतीने चलनवलनादी क्रिया करता येतात. फासळ्यांचे स्नायू व मध्यपटल (वक्ष व उदर यांना विभागणारे स्नायुमय पटल) यांचा पक्षाघात श्वसनक्रियेत गंभीर व्यत्यय आणून प्राणहानीस कारणीभूत होऊ शकतो.

 चिकित्सा : पक्षाघाताचे कारण शोधून त्याप्रमाणे इलाज करतात. स्नायूंची अवशिष्ट कार्यक्षमता उपयोगात आणून अपंगत्व कमी करण्यास ⇨ भौतिकी चिकित्सा, व्यवसायप्रधान चिकित्सा आणि वाक्‌चिकित्सा यांची मदत होते. मेंदूतील किंवा मेरुरज्जूतील तंत्रिका ऊतकनाश मोठ्या प्रमाणावर झाला असल्यास हे सर्व उपचार किती उपयुक्त ठरतील, याचा अंदाज घेणे आवश्यक असते. विकृतिस्थान व स्नायूवरील परिणाम यांवर चिकित्सांचे स्वरूप अवलंबून असते.

 विकाराच्या तीव्रावस्थेत स्नायूंना पूर्ण विश्रांती देणे जरूर असते. त्याकरिता स्नायू जरूर पडल्यास योग्य ती साधने (उदा., सरकलेले किंवा हालचाल होऊ शकणारे शरीर भाग योग्य स्थितीत ठेवणारे दृढ वा लवचिक साधन म्हणजे बंधफलक वगैरे) वापरून बांधून ठेवावे लागतात. अवयव विशिष्ट अंगस्थितीत रहावे म्हणून अंथरूणातच वाळू भरलेल्या पिशव्या वापरता येतात. उपशमावस्थेत आणि शक्य तितक्या लवकर स्नायूंच्या अकारण हालचालींना सुरुवात करतात. त्यांची क्रियाशक्ती जागृत होऊ लागताच क्रियाशील हालचाली करवून घेतात. या हालचाली हळूहळू वाढत्या प्रतिकाराविरुद्ध वजने, स्पिंगा वगैरेंचा उपयोग करून करतात. अतिदुर्बल स्नायूंना आधार देतात. स्नायूंची हालचाल दररोज करणे आवश्यक असून या कार्यावर भौतिकी चिकित्सा तज्ञाची देखरेख असावी लागते. व्यवसायप्रधान चिकित्सेचा जीवनातील औत्सुक्य टिकविण्यास व भावी जीवनात अर्थोत्पादनाकरिता उपयोग होतो.

  

विशिष्ट प्रसंगी शस्त्रक्रिया उपयुक्त असते उदा., कशेरुक अस्थिभंग, मेंदूवर दाब पाडणारा रक्तस्रावजन्य क्लथ वगैरे. जरूर तेव्हा विकलांग चिकित्सेतील स्नायु-प्रतिरोपण, कृत्रिम भाग बसविणे आणि संधिस्थिरीकरण या शस्त्रक्रिया उपयुक्त असतात.

  

अधरांग पक्षाघातात शय्याव्रण (दीर्घ काळ बिछान्यात पडून राहावे लागल्यामुळे होणारे व्रण), मूत्राशयशोथ, मलावरोध, स्नायु-अवकुंचन यांसारखे उपद्रव उद्‌भवण्याचा संभव असतो. योग्य प्रतिबंधक उपायांनी ते टाळता येतात. श्वसनक्रियेचे स्नायू लुळे पडल्यास विशिष्ट उपकरणे वापरून श्वसनक्रिया चालू ठेवता येते. 

अलीकडाल संशोधनानुसार एकूण रक्ताघाती आघातांपैकी ७८% आघात रक्तवाहिन्यातील रक्तक्लथन किंवा अंतर्कीलनजन्य असल्याचे आढळून आले आहे. मेंदूच्या रक्तपुरवठ्यात त्यामुळे आलेला व्यत्यय नव्या सूक्ष्मवाहिनी शस्त्रक्रिया तंत्राने दूर करणे शक्य झाले आहे. त्याकरिता सूक्ष्म उपकरणे उदा., २ मिमी. लांबीची सुई आणि २० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-३ मिमी.) व्यासाचा धागा तसेच खास बनविलेल्या शस्त्रक्रियोपयोगी द्विनेत्री सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करतात.

वागळे, चं. शं. भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय चिकित्सा : पक्षाघात म्हणजे शरीराचा सर्व अर्धा भाग लुळा पडणे. ह्याला अर्धांगवात असेही म्हणतात. ह्या रोग्याला प्रथम नारायण, तेल, चंदनबलादि तेल वगैरे स्नेह पिण्याला देऊन घाम काढून मृदू विरेचन द्यावे. तसेच स्नेह बस्ती आणि रेचक बस्ती देऊन शरीराची शुद्धी करावी. ह्यावर आक्षेपक विकाराचे [⟶ आक्षेपी विकार] सर्व उपचार करावे. शिवाय वातनाशक तेलाचा डोक्याला बस्ती द्यावा. अणुतेलाचा अभ्यंग करावा. सालवणादि गुणातील औषधांचे पोटीस करून सर्व शरीर शेकत असावे. बला तेलाचा स्नेह बस्ती द्यावा. ह्याप्रमाणे ३-४ महिने सतत उपचार करावे.

पटवर्धन, शुभदा अ. 

संदर्भ : 1. Beeson, P.B. McDermott, W.,Ed.Textbook of Medicine, Tokyo, 1975.

     2. Scott, R. B. Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.

     3. Thorn, G. W. and others, Ed. Harrison’s Principles of Internal Medicine, Tokyo, 1977.