बोथाटी : मराठेशाहीतील एक मर्दानी खेळ. भारतात मुसलमानी अंमल असतानाच बोथाटीचा खेळ उगम पावला आणि मराठेशाहीत त्याची जोपासना झाली. त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर होई आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे चालवता यावा, म्हणून बोथाटीचा खेळ निघाला. भाल्याचे वार करण्याचा व तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे अणकुचीदार लोखंडी टोक काढून टाकून त्याऐवजी बासास चिंध्याचे कापडी चेंडू किंवा लाकडी गोळे बांधून ती फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत. अशा भाल्याची अणी बोथट असल्याने त्या खेळास ‘बोथाटी’ हे नाव पडले. नित्याच्या अशा सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले. अल्पावधीतच हा खेळ एक द्वंद्वात्मक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे हात करण्याचा उत्तम सराव होऊन त्याचा त्याला लढाईत उपयोग होई. या खेळाचे ‘सलाम’, ‘बंद’, ‘बेल’ व ‘दुहेरी बेल’ हे प्रमुख हात होत.

बोथाटीचा वार मारण्याची व तो अडविण्याची क्रिया

बोथाटी ही सामान्यतः २.८९ मी. (साडे नऊ फुट) लांब असते. बोथाटीचे हात भाल्याप्रमाणे कमरेच्या वर करायचे असतात. तिच्या मागच्या टोकापासून १.०६ मी. (साडे तीन फुट) अंतरावर बोथाटी-चेंडू असतो. त्याला रंग लावल्यास सामनेवाल्याच्या अंगावर खूण राहते. चेंडूच्या खाली शोभा म्हणून दोन लोंबत्या पट्ट्याही सोडलेल्या असतात. भाल्याचा सराव व करमणूक अशा दोन्ही गोष्टी बोथाटीपासून साधतात. यात ‘सलामी’ (बोथाटीची टोके वार करण्यापूर्वी एकमेकांस भिडवणे), ‘दांड मारणे’ (बोथाटी काखेत धरून उलट बाजूने वार करणे), ‘सळक मारणे’ (जरुरीप्रमाणे बोथाटी पुढे सरकवून मागे घेणे) वगैरे डाव आहेत. मराठेशाहीच्या अस्तानंतर हा खेळही लुप्त झाला.

संदर्भ : करंदीकर (मुजुमदार), द. चि. व्यायामज्ञानकोश , खंड २ रा, बडोदे, १९३७.  

पंडीत, बाळ ज.