बैल झोंबी : (बुल्‌फाइट). माणूस आणि बैल यांच्यातील झुंजीचा रोमहर्षक रंजनप्रकार. एका विस्तीर्ण रंगणात (प्लाझा दी तोरोस) ही झुंज खेळली जाते. प्रमुख बैलझुंजाराने (मॅटॅडॉर) तलवारीच्या साहाय्याने रानटी बैलास (तोरो) ठार मारणे, हे या झुंजीचे मुख्य उद्दिष्ट होय. या लढतीत प्रमुख झुंजाराचे पाच साथीदार असतात : दोन भालाईत घोडेस्वार (पिकॅडॉर) आणि काटेरी काठ्या (बॅंडेरिला) टोचून मैदानात बैलाला डिवचणारे तीन पदाती (बँडेरिलेरो) प्राचीन काळापासून हा खेळ कोरिया,चीन, ईजिप्त, ग्रीस व रोम या देशांत खेळला जात असल्याचे उल्लेख आढळतात. आफ्रिकेतील मूर लोकांनी स्पेन जिंकल्यानंतर हा खेळ तेथे खेळला जाऊ लागला. (सु. अकरावे शतक) पुढे तो स्पेनचा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता पावला. तिथे तो ‘कॉरिदा दी तोरोस’ या नावाने ओळखला जातो. स्पेनप्रमाणेच मेक्सिको, मध्य व दक्षिण अमेरिका, मोरोक्को, द. फ्रान्स या भागांतही हा खेळ प्रसृत झाला. प्रारंभीच्या काळी बैलझुंजार सरदार घोड्यावर बसून लांब भाल्याने बैलाशी झुंज देत. अठराव्या शतकात स्पॅनिश अमीर-उमरावांमध्ये हा खेळ फार लोकप्रिय होता, तथापि पुढे हा प्रकार मागे पडला व त्यात व्यावसायिक खेळाडूंनी पदार्पण केले, परिणामतः झुंजीच्या पद्धतीस नवे वळण मिळाले. घोड्यावर बसून बैलाशी झुंज देण्याची ही पद्धत सु. ६०० वर्षे रुढ होती. परंतु फ्रान्सीस्को रॉमेरो या आद्य व्यावसायिक खेळाडूने १७२६ च्या सुमारास केवळ एक तांबडे निशाण व तलवार या साधनांनिशी बैलाशी झुंज देण्याची पद्धत सुरु केली व तीच पुढे कायम स्वरुपात रुढ झाली.

या खेळाची रंगणे स्पेन, मेक्सिको या देशांत सर्वत्र बघावयास मिळतात. स्पेनमध्ये अशी सु. दोनशे रंगणे आहेत. माद्रिद येथील ‘प्लाझा मॉन्युमेंटल, माद्रिद’ हे रंगण सर्वांत मोठे असून त्यात सु.चोवीस हजार प्रेक्षकांची आसनव्यवस्था आहे. त्यात ३१२ रंगणे आहेत. जगातील सर्वांत मोठे पन्नास हजार प्रेक्षक-क्षमता असलेले, ‘प्याझा, मेक्सिको सिटी’ हे रंगण मेक्सिको येथ आहे. हा खेळ साधारणपणे मार्च ते नोव्हेंबरमध्यापर्यंत खेळला जातो. लढाऊ बैलांची पैदास व जोपासना करून त्यांचा लढतीसाठी पुरवठा करणे, हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. हे लढतीचे बैल कमीत कमी ५४२ किग्रॅ. (१,१९४ पौंड) वजनाचे व साधारणपणे चार ते पाच वर्षे वयाचे असावे लागतात.

प्रसिद्ध बैलझुंजार मानोलेती बैलाला नामोहरम करताना

आधुनिक बैलझोंबीचे तंत्र साधारणपणे तीन विभागांत विभागलेले आहे. कित्येकदा त्याची तुलना नाटकाच्या तीन अंकांशी केली जाते. या लढतीचा आरंभ मोठ्या नाटयपूर्ण रीतीने केला जातो. लढतीस सुरुवात होण्याअगोदर दोन रंगणाधिकारी घोडेस्वार, प्रमुख बैलझुंजार व त्याचे साथीदार यांच्यासह आकर्षक व रंगीबेरंगी पोषाखात वाजतगाजत भपकेबाज मिरवणूक काढतात (Paseillo). त्यानंतर या झुंजीचे नियंत्रण करणारा प्रमुख अधिकारी हा पहिल्या बैलास रंगणात सोडण्याचा इशारा करतो.

बैलास रंगणात सोडल्यानंतर प्रमुख झुंजाराचे मदतनीस त्या बैलापुढे टोप्या वा निशाणे फडफडवून त्याचे लक्ष वेधून घेऊन त्यास हल्ल्यास उद्युक्त करतात. या पहिल्या भागात झुंजाराचे साहाय्यक भालाईत घोडेस्वार दौडत जाऊन भाल्याचे टोक पुनःपुन्हा बैलाच्या मानेत खुपसून त्यास डिवचतात, त्यामुळे तो चिडून स्वारावर प्रतिहल्ला करतो. स्वार त्यास चुकवून पुन्हा भाल्याने ढोसतो. परंतु बैलास चुकवताना स्वाराचा घोडा जखमी होऊन, स्वार त्या घोड्याच्या अंगाखाली सापडल्यास प्रमुख झुंजाराचे अन्य साथीदार त्या स्वाराच्या मदतीस धावून येतात व आपल्या टोप्या बैलासमोर वारंवार फडफडवून बैलाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेऊन स्वाराचा बचाव करतात. लढतीच्या दुसऱ्या भागात प्रमुख झुंजाराचे ‘बँडेरिलेरो’ नामक पदाती साथीदार रंगणात येतात. त्यांच्याजवळ सु. ४६ सेंमी. लांबीच्या, टोकदार काटेरी पराण्या (बँडेरिला) असतात व त्या पराण्या बैलाच्या मानेखाली व खांद्याच्या भागात वारंवार टोचून ते बैलास जास्तीत जास्त डिवचतात व तो अधिकच क्रुद्ध होऊन अंगावर धावून जातो. या खेळातील घोडेस्वार व पदाती यांची मुख्य कामगिरी म्हणजे बैलाच्या मानेलगतच्या भागातील सशक्त स्नायू कमकुवत करून, त्यास खाली मुंडी घालावयास लावणे होय. तसेच या सर्व हल्ल्या-प्रतिहल्ल्यांमुळे प्रमुख झुंजारास बैलास ताकदीचा तसेच त्याच्याबरोबर कशा प्रकारे लढत द्यावी, ह्याचा अंदाज बांधणे सुकर होते. यानंतर लढतीचा शेवटचा टप्पा सुरु होतो. आता प्रमुख झुंजार रंगणात येतो. त्याच्या एका हातात काठीला गुंडाळलेले कापडी तांबडे निशाण (मुलेटा) व दुसऱ्या हातात तलवार असते. हे निशण फडफडवून तो बैलांचे लक्ष वेधून घेतो. क्रुद्ध झालेला बैल निशाणावर शिंगाने ढुशी मारण्याकरिता वेगाने धावून जातो. बैल जवळ येताच झुंजार निशाण बाजूला करतो व बैल स्वतःचा वेग आवरु न शकल्यामुळे सरळ पुढे जातो. तो वारंवार बैलाला अंगावर धावून येण्यास उद्युक्त करतो व त्याचवेळी शिताफीने त्याच्या मार्गातून बाजूला होत त्यास हुलकावण्या देतो. बैलास जास्तीत जास्त शरीराजवळून हुलकावणी देणे कौशल्याचे व साहसपूर्ण मानले जाते. अशा प्रकारे बैलास वांरवार हुलकावण्या दिल्या, की तो जेरीस येतो व प्रमुख झुंजार त्याच्यावर पूर्ण काबू मिळवितो. बैल थकला की मुंडी खाली घालून, शरणागताप्रमाणे चारी पायांवर स्थिर उभा राहतो. त्यावेळी झुंजार पुढे सरसावतो आणि तलवारीने बैलाच्या मानेच्या पाठीमागे सफाईने वार करतो. एका घावात बैलास ठार मारणे हे अधिक कौशल्याचे मानले जाते. झुंजाराने आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडली व श्रेष्ठ प्रतीचे कौशल्य प्रकट केले, तर त्यास सन्मानादाखल पारितोषिक म्हणून मारलेल्या बैलाचा कान वा शेपूट भेट देण्याची प्रथा आहे. काही बैलझोंबीच्या भव्य व प्रेक्षणीय कार्यक्रमांत एका वेळी सहा बैल व तीन बैलझुंजार भाग घेतात. त्यावेळी प्रत्येक झुंजाराला दोन बैलांबरोबर झुंजावे लागते. झुंजाराचे यश असाधारण साहस व श्रेष्ठ प्रतीचे कौशल्य यांवरच बव्हंशी अवलंबून असते. पेद्रो रॉमेरो, ह्‌वान बेलमाँते, जोझेलितो, मानोलेती, कार्लोस आरुझ्झा, मान्वेल बेनीतेस अशी प्रख्यात बैलझुंजारांची एक परंपराच या खेळात दिसून येते. पोर्तुगालमधील बैलझोंबीच्या प्रकारात (Rejoneadores) बैलझुंजार हे उत्तम कमावलेल्या व शिकून तयार केलेल्या घोड्यांवर स्वार होऊन बैलाशी झुंज खेळतात. मात्र या प्रकारात बैलाला ठार मारत नाहीत.

संदर्भ :    1. Hemingway, Ernest, Death in the Afternoon, London, 1966.               2. Tynan, Kenneth, Bull Fever, New York, 1966.

इनामदार, श्री. दे.