हँडबॉल : एक सांघिक खेळ. हा जलदगतीचा आरोग्यदायी खेळ असून त्यात पळणे, उडी मारणे व फेकणे या मैदानी खेळातील तीनही मूलभूत क्रियांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळेच हँडबॉलचा सामना प्रेक्षणीय असतो. त्यात खेळाडूच्या लवचिकतेची, पळण्याच्या कौशल्याची वयुक्तिबाजपणाची परीक्षा असते. हा खेळ फार प्राचीन असून रोमच्या भव्य स्नानगृहांतून तो पूर्वी खेळला जात असे. ⇨ फुटबॉल, ⇨ बास्केटबॉल व रग्बी फुटबॉल या खेळांशी हँडबॉलचे साम्य आहे. यात हाताचे कार्य प्रमुख असून अचूक फेकीला महत्त्व असते. शिताफीने चेंडू झेलून, क्षणार्धात निर्णय घेऊन, योग्य त्या भिडूकडे तो टाकण्यात आणि प्रतिपक्षाला हुलकावण्या देत गोल मारण्यात या खेळाचे सार आहे. जलद हालचालींतून सांघिक सामर्थ्य प्रकट करण्यावर संघाचे यश अवलंबून असते. कुठेही, केव्हाही व कोणीही – पुरुष, स्त्रिया व मुला-मुलींनी – खेळावा असा हा स्वस्त व कमीतकमी साधनांचा खेळ आहे.

हँडबॉल खेळातील एक क्षण

हँडबॉलचा खेळ इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकात प्रविष्ट झाला. आयर्लंडमध्ये १८५० च्या दशकात त्याचे सामने होऊ लागले. आयरिश लोकांनी तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत नेला. त्यानंतर १८८७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आयरिश हँडबॉलपटू जॉन लॉलोर व अमेरिकन हँडबॉलपटू कॅसे बेगन यांच्यामध्ये स्पर्धा होऊन कॅसेने विजेतेपद मिळविले. १८९० च्या सुमारास जर्मन व्यायामशिक्षक कॉनरॅड कॉच यांनी हँडबॉल या खेळाची रचना आणि नियम विकसित केले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे हिरस्चमॅन व क्रीडाशिक्षक कार्ल शेलेंझ यांनी हँडबॉलच्या प्रसाराला हातभार लावला. १९२० पर्यंत यूरोपमध्ये हा खेळ सर्वत्र मान्यता पावला.’ बॉलगेम्स ङ्खमधील हा सर्वांत धाकटा खेळ समजण्यात येतो. यूरोपात हा खेळ असोसिएशन फुटबॉलच्या नियमांनुसार खेळला जात असल्यामुळे फुटबॉलपासून तयार केलेला खेळ असेच त्याला संबोधले जाई. या खेळाची आंतरराष्ट्रीय नियमावली करण्यासाठी ॲमच्युअर ॲथलेटिक्स फेडरेशनने एक समिती नेमली (१९२६). या खेळाचे नियम केल्यावर १९२८ मध्ये ‘इंटरनॅशनल ॲमच्युअर हँडबॉल फेडरेशन’ ही संस्था ॲमस्टरडॅम येथे स्थापन करण्यात आली. १९३४ पर्यंत सु. २५ देशांनी हा खेळ स्वीकारला. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेपासून हँडबॉल या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धांत समावेश झाला. त्या वर्षी जर्मनीचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडचे संघ अनुक्रमे दुसरे व तिसरे आले.११ जुलै १९४६ रोजी ‘इंटरनॅशनल हँडबॉल फेडरेशन ङ्ख( आय्एच्एफ्) ची स्थापना झाली. तिचे मुख्यालय बाझेल (स्वित्झर्लंड) येथे आहे. १९७२ मध्ये म्यूनिक ऑलिंपिकमध्ये पुरुष हँडबॉल खेळाचा, तर १९७६ मध्ये माँट्रिअल ऑलिंपिक स्पर्धेत महिला हँडबॉल खेळाचा समावेश करण्यात आला. सु. १६६ देशांनी आय्एच्एफ् या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे (२०१५). पुरुष हँडबॉल स्पर्धेत फ्रान्स (२००९ २०११) आणि स्पेन (२०१३) यांनी, तर महिला हँडबॉल स्पर्धेत रशिया (२००९) व नॉर्वे (२०११) यांनी जागतिक विजेतेपद पटकविले.

हँडबॉलचे दोन प्रकार आहेत : एक, मैदानावर (आउटडोअर) खेळला जाणारा. दोन, बंदिस्त जागेत (इनडोअर) खेळला जाणारा.

हँडबॉलचे क्रीडांगण

मैदानावरील हँडबॉल : यामध्ये संघात प्रत्येकी चौदा खेळाडू असतात. त्यांपैकी सात खेळाडू प्रत्यक्ष मैदानात असतात (सहा मैदान खेळाडू व एक गोलरक्षक) आणि उर्वरित सात खेळाडू राखीव-बदली खेळाडू म्हणून मैदानाच्या बाहेर असतात. क्रीडांगण आयताकृती असते. त्याची लांबी ४० मी. व रुंदी २० मी. असते. क्रीडांगणाची मध्य रेषेच्या साहाय्याने दोन समान भागांत विभागणी करतात. ४० मी. लांबीच्या रेषांना स्पर्शरेषा (टच लाइन), तर २० मी. लांबीच्या रेषेस गोल रेषा म्हणतात. मध्य रेषा गोल रेषेला समांतर असते. दोन्ही बाजूंना ६ मी.चे गोलक्षेत्रअसते. यांशिवाय बिनविरोध फेकीची रेषा (फ्री थ्रो लाइन), शासन रेषा( पेनल्टी लाइन), मध्य रेषा इत्यादींनी क्रीडांगणाची आखणी केलेलीअसते. सामन्याचा वेळ पुरुषांसाठी ५० मिनिटांचा, तर स्त्रियांसाठी ४० मिनिटांचा असतो. कुठलाही नियम न मोडता ३ मी. लांब व २ मी. उंचीच्या गोलखांबातून गोल रेषेपार चेंडू फेकला, की गोल होतो व जो संघ प्रतिपक्षावर जास्त गोल चढवतो, तो विजयी होतो.

बंदिस्त जागेतील हँडबॉल : भिंतींनी बंदिस्त जागेत हाताने रबरी (टेनिस वा तत्सम) चेंडू फेकून विशिष्ट केंद्राचा वेध घेणारा हा एक मनोरंजक क्रीडाप्रकार आहे. एक भिंत हँडबॉल खेळ न्यूयॉर्क शहरात १९१३ मध्ये लोकप्रिय झाला. त्यामध्ये स्त्री-पुरुष दोघेही सहभाग घेत. सामान्यतः ४.७ सेंमी. परिघ आणि ४३–५० ग्रॅम वजनाचा चेंडू सर्वत्र वापरला जात असे. पुढे चार भिंतींच्या क्रीडांगणात हा खेळ खेळलाजाऊ लागला. चार भिंतींचे प्रमाणित क्रीडांगण १२ ? ६ मी. क्षेत्रफळाचे असून त्याची उंची ६ मी. असते. चेंडू ज्या भिंतीवर फेकल्यानंतर उशी घेऊन मागे येतो, ती पाठीमागील भिंत ३.५ ते ४ मी. उंचीची असते. या क्रीडांगणात विविध रेषांनी सर्व्हिसची जागा, सर्व्हिस बॉक्स वगैरे गोष्टी निर्दिष्ट केलेल्या असतात. तीन भिंतींच्या क्रीडांगणाची मोजमापे व नियम चार भिंतींच्या क्रीडांगणाप्रमाणेच असतात. १९५२ पासून बंदिस्त जागेतील हँडबॉलची आवड वाढू लागली. या प्रकारात सात खेळाडूंना आटोपशीर जागेत, प्रतिकूल हवामानातही हा खेळ खेळता येतो. या प्रकारातील जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धा १९६४ पासून सुरू झाल्या. या खेळात चेंडूची कोन बदलून केलेली फेक (बाजूची भिंत, वर, खाली वगैरे) उत्कृष्ट खेळी समजली जाते.

भारतात मैदानावरील हँडबॉलचे सामने अधिक होतात. ‘हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ या संस्थेच्या नियंत्रणाखाली भारतात हँडबॉलच्या विविध गटांतील स्पर्धा होतात. हँडबॉलच्या विविध खेळी खेळण्यासाठी उत्तम शरीरयष्टी, चेंडूवरील नियंत्रण, गती आणि जोम (दणकटपणा) हे गुण आवश्यक असून अनेक ॲथलेट्स शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी हँडबॉल खेळतात.

पंडित, बाळ ज.