मोटारसायकल शर्यती : मोटारसायकल या दुचाकी वाहनाच्या चित्तथरारक व साहसी शर्यतींचा प्रकार आता जगभर लोकप्रिय ठरला आहे. हौशी व व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर या स्पर्धा होतात. या शर्यतींत तुफान वेगाबरोबरच वाढता धोका असला, तरी आठ-नऊ वर्षांच्या लहान मुलांपासून ते पन्नाशीच्या प्रौढांपर्यंतचे मोटारसायकलपटू साहसाच्या ओढीने त्यांत भाग घेतात.

‘पारा’ च्या चौथ्या इंडियन मोटोक्रॉस ग्रां प्री (१९८५) स्पर्धेतील एक दृश्य, नेहरु स्टेडियम, पुणे.

मोटारसायकल शर्यतींचे वाहनक्षमतेनुसार तसेच धावमार्गांनुसार अनेकविध प्रकार केले जातात: कमी-अधिक अंतरांवरील वेगाच्या वेड्यावाकड्या व चढउताराच्या रस्त्यावरच्या वालूकामय मार्गावरच्या शर्यती तसेच वाहनाच्या भक्कमपणाची चाचणी घेण्यासाठी योजलेल्या खराब मार्गावरच्या स्पर्धा (रिलायबिलिटी टेस्ट) यंत्राची क्षमता अजमावणाऱ्या लांब पल्ल्याच्या शर्यती नव्या-जुन्या यंत्रांच्या चाचण्यांसाठी आयोजित केलेल्या शर्यती इ. प्रकार त्यात मोडतात. या शर्यतींसाठी नेहमीचे वाहतुकीचे रस्ते वापरले जातात (रोड रेसिंग) तद्वतच खास तयार केलेले वळणावळणांचे, चढउतारांचे आखीव मार्गही (ट्रॅक) वापरतात. शर्यतमार्गांबंधी काही नियम आणि संकेतही आहेत. उदा., धावमार्गाच्या दोन्ही बाजूंनी पिवळे किंवा पांढरे पट्टे असावेत, मार्ग किमान ६ फुट (१·८२ मी.) तरी रुंद असावा, रस्ता अतिशय निसरडा असू नये, की ज्या योगे चालकाला इजा होईल निरनिराळ्या जागी संरक्षण-धोका-संबंधी सूचना पुरेसे अंतर ठेवून असाव्यात इत्यादी. मोटारसायकल शर्यतीमध्ये स्पर्धकाने शरीराच्या डोके, छाती, हात, गुडगे, नडगी, पाय या अवयवांवर पुरेशी संरक्षक साधने वापरणे सक्तीचे असते. मोटारसायकल शर्यतींचे इंजिनाच्या क्षमतेनुसार पुढीलप्रमाणे गट केले जातात : ५० सी. सी., १२५ सी. सी., २५० सी. सी., ३५० सी. सी., ५०० सी. सी., ७५० सी. सी. आणि अमर्यादित-म्हणजे ७५० सी. सी. पेक्षा अधिक. मोटारसायकल क्रमांक सहज दिसतील असे, विशिष्ट आकाराचे, रंगाचे व विशिष्ट जागीच लावावे लागतात. हाता-पायाचे वेगनियंत्रक (ब्रेक्स), हँडबार, क्लच वायर, बैठक (सीट), निष्कास नळी (एक्‌झॉस्ट पाइप) व त्यातून येणारा धूर या प्रत्येकासंबंधी विशिष्ट नियम आहेत व त्यांनुसार वाहन आहे की नाही, ह्याची शर्यतीपूर्वी कसून तपासणी केली जाते. शर्यतीची लांबी व प्रारंभरेषेची रुंदी यांचेही प्रमाण ठरलेले असते. ‘ड्रॅग रेसिंग’ ही शर्यत दोघादोघांमध्ये ४४० यार्ड (४०२·३३ मी.) अंतराची असते. पहिल्या जोडीतील विजेता पुढच्या स्पर्धकाबरोबर खेळतो. अशा रीतीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत-मिळवत जो सर्वांत शेवटी जिंकतो तो सर्वश्रेष्ठ विजयी स्पर्धक म्हणून घोषित केला जातो. ‘स्प्रिंट’, ‘स्पीड वे’, ‘बर्फावरील शर्यती’, मोटोक्रॉस असे मोटारसायकल शर्यतींचे विविध प्रकार आहेत. मोटारसायकलच्या अडथळ्याच्या शर्यतींना ‘मोटोक्रॉस’ असे नाव आहे. मोटारसायकलींचे उत्पादक कारखानदार व व्यापारी अशा शर्यतींना मुख्यत्वे उत्तेजन देतात.

रस्त्यावरील विदेशी मोटारसायकल शर्यतीचे एक दृश्य

मोटारसायकल शर्यतींचा प्रारंभ २९ नोव्हेंबर १८९७ साली इंग्लंडमध्ये शीन हाउस, रीचमंड, सरे येथे झाला. १९०४ मध्ये फ्रान्स येथे ‘ऑटो सायकल क्लब’ ने पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर शर्यतींचे नियमन व नियंत्रण करणारी ‘Federation Internationale Motorcrycliste’ ही संस्था १९०४ मध्ये स्थापन झाली. शिवाय इतर यूरोपीय देशांत व अमेरिकेत या शर्यतींच्या राष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या आहेत. इंग्लंडमधील आइल ऑफ मॅन येथे लोकप्रिय अशी ‘ऑटो-सायकल यूनियन टूरिस्ट ट्रॉफी’ स्पर्धा २८ मे १९०७ पासून सुरू झाली. यांखेरीज यूरोपमधील महत्त्वाच्या मोटारसायकल शर्यतीममध्ये ‘जर्मन ग्रां प्री’ (मे महिन्यात), ‘फ्रेंच ग्रां प्री’ (मे मध्ये), ‘डच टूरिस्ट ट्रॉफी’ (जून मध्ये), ‘बेल्जियन ग्रां प्री’ (जुलै मध्ये), ‘अल्स्टर ग्रां प्री’ (ऑगस्ट मध्ये), ‘इटालियन ग्रां प्री’ (सप्टेंबर मध्ये) इत्यादींचा उल्लेख करता येईल. अमेरिकेतील ‘डेटोना इंटरनॅशनल स्पीड वे’ (१९३७ मध्ये प्रारंभ) ही प्रतिवर्षी भरणारी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय हमरस्ता-शर्यत होय. बेल्जियन ग्रां प्री शर्यतीत बॅरी शीन याने सर्वाधिक वेगात (म्हणजे ताशी २२०·७२ किमी). ४९५ सी. सी. ची मोटारसायकल चालवली (दि. ३. जुलै १९७७).


दुसऱ्या महायुद्धानंतर स्कूटरच्या शर्यतींना प्रारंभ झाला. १९५८ साली आइल ऑफ मॅन येथे १२ आणि २४ तासांच्या शर्यतींची प्रथा सुरू झाली. ‘डेली मिरर’ नावाची इंग्लंडमधील दक्षिण मिडलॅँड येथील स्कूटर शर्यत विशेष लोकप्रिय आहे.

भारतात मोटारसायकल शर्यतींना मान्यता व लोकप्रियता मिळवून देण्याचे कार्य प्रामुख्याने ‘पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन’ (पारा) या संस्थेन केले आहे. पुण्यामध्ये १९४० ते १९६६ या काळात ‘डेक्कन मोटार स्पोर्टस्’ ही संस्था अशा प्रकारे स्पर्धा भरवत असे. तदनंतर १९७८ मध्ये प्रथम ‘पूना ऑटोमोटिव्ह टीम’ चे ‘पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन’ मध्ये रूपांतर झाले. हळूहळू ‘पारा’ या संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारत गेले. प्रारंभी हडपसर येथे २ वर्षे त्यांनी मोटोक्रॉस स्पर्धा भरवल्या. १९८२ मध्ये पाराने पहिली मोटोक्रॉस ग्रां प्री स्पर्धा घेऊन पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय मोटारसायकल शर्यतींच्या क्षेत्रात नोंदविले. व्यवस्थापन कौशल्य व तांत्रिक बाबींची परिपूर्तता यांमुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरून आंतरराष्ट्रीय संघटनेने या स्पर्धांना ‘सुपरक्रॉस’ चा दर्जा देऊन ही स्पर्धा जगातील कोणीही स्पर्धकाला खुली केली. पाराचे अध्यक्ष सुरजितसिंग व कमलेश दवे, अनिरुद्ध देशपांडे इ. कार्यकर्ते यांचे परिश्रम ह्या यशास कारणीभूत आहेत. पारातर्फे दरवर्षी नियमितपणे इंडीयन ग्रां प्री व आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धा पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर भरवल्या जातात. स्पर्धांसाठी उंच मातीचे ढिगारे, चिखल, खाचखळगे, पूल, उंटाच्या पाठीसारखे (कॅमल बॅक) उंचवटे, उड्डाणे इ. प्रकारे अडथळ्यांनी युक्त असे खास शर्यतमार्ग तयार करण्यात येतात. १९८६ च्या स्पर्धांमध्ये एकूण ९ गट होते व त्यांत परदेशी स्पर्धकांसाठी २५० सी. सी. व १२५ सी. सी. हे दोन गट, महिला स्पर्धकांचा स्वतंत्र गट व नवोदितांसाठी वेगळा गट यांचा अंतर्भाव होता. पाराच्या स्पर्धांतून यशस्वी ठरलेल्या भारतीय मोटारसायकलपटूंमध्ये शशिपाल गरचा, राजीव आगरवाल, राजेश व विजय देशपांडे, संपत कोळी इ. तसेच राजश्री पाटकर, रेश्मा लालवाणी इ. महिला शर्यतपटू यांचा उल्लेख करता येईल.

पहा: मोटारसायकल.

संदर्भ : 1. Carrick, Peter, Ed. The Book of Motor Cycle Racing, London, 1967.

             2. ‘Know the Game’ Series, Motor Cycling, London, 1960.

नातू, मो. ना. आलेगावकर, प. म.