बोर्ग, ब्यर्न : (६ जून १९५६ – ). प्रख्यात स्वीडिश टेनिसपटू. विंबल्डन येथील टेनिसच्या अत्यंत चुरशीच्या खुल्या जागतिक सामन्यांमध्ये १९७६ ते १९८० या प्रत्येक वर्षी लागोपाठ पाच वेळा अजिंक्यपदाचा चषक मिळवून ऐतिहासिक विक्रम करणारा, विसाव्या शतकातील असामान्य टेनिसपटू म्हणून त्याने जागतिक लौकिक संपादन केला आहे.यापूर्वी विंबल्डनच्या आधुनिक पर्वात रॉड लेव्हर याने लागोपाठ चार वेळा आणि फ्रेड पेरी याने लागोपाठ

ब्यर्न

तीन वेळा विंबल्डन चषक जिंकला होता. या तुलनेत बोर्गचे यश अधिकच नजरेत भरते. त्याने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी मातापित्यांच्या प्रोत्साहनाने टेनिस खेळायला सुरुवात केली त्यावेळी दोन्ही हातांनी रॅकेट पेलून तो खेळत असे. पार्श्वहस्त (बॅक हॅन्ड) फटका दोन्ही हातांनी मारण्याची त्याची शैली पुढेही टिकून राहिली. मात्र ही त्याची पद्धती त्यावेळी त्याच्या शिक्षकांना अमान्य होती. फक्त त्याचा पुढील काळातील शिक्षक व व्यवस्थापक लेन्नार्ट बर्गलिन याने मात्र तेव्हाही ही पद्धत बदलायची आवश्यकता नाही, असा त्यास सल्ला दिला. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वीडनकडून डेव्हिस करंडकाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बोर्गने भाग घेतला. सतराव्या वर्षी त्याने फ्रान्समधील खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले व ते त्याने त्यानंतर पाच वेळा राखले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्याने विंबल्डन चषक मिळवून, ही स्पर्धा जिंकणारा सर्वांत लहान वयाचा खेळाडू म्हणून विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या दैदिप्यमान यशात, त्याच्या खेळातील विलक्षण वेग, त्याचे टॉप्‌स्पिन फटके आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांचा मोठाच वाटा आहे. चेंडूवरील असाधारण ताबा हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य. इतर खेळाडू रॅकेटचे तात (गट्स) सामान्यतः दर चौरस इंचास (६.४५ चौ.सेंमी.) ५० ते ६० पौंड (२२.६७ ते २७.२१ किग्रॅ.) या ताणाचे वापरतात. तर बोर्ग दर चौरस इंचास ८० पौंड (३६.२८ किग्रॅ.) इतक्या प्रचंड ताणाचे तात रॅकेटसाठी वापरतो. इतरांना इतक्या ताणाच्या तातीने फटक्यांवर ताबा ठेवणे शक्य होत नाही. या ताणामुळे बोर्गच्या रॅकेटचे तात वारंवार तुटतात, म्हणून तो सदैव आपल्याबरोबर सु. तीस रॅकेट्स बाळगतो. त्याच्या यशामागे त्याने घेतलेले कठोर परिश्रमही आहेत. १९७९ च्या विंबल्डन सामन्यापूर्वीचे सु. दोन आठवडे टेनिसमधील सर्वात अवघड पण उपयुक्त फटका म्हणजे आरंभखेळी (सर्व्हिस) परिणामकारक करण्यासाठी तो दररोज दोन-तीन तास फक्त तेवढयाच फटक्याचा सराव करीत होता, हे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. त्यानंतर तो सामन्यात उतरला, तेव्हा ही त्याची अनोखी आरंभखेळी त्याच्या त्यावेळच्या विजयाचे प्रमुख कारण ठरली. १९८० च्या विंबल्डनच्या अंतिम सामन्यात, प्रख्यात अमेरिकन टेनिसपटू जॉन मॅकेन्रो याच्याशी झालेल्या लढतीत, प्रथम मागे असलेल्या अवस्थेत त्याने ज्या थंडपणाने, विलक्षण चिकाटीने पण तडफेने खेळ करून तो सामना जिंकला, त्यास टेनिसच्या इतिहासात तोड नाही. ही अविस्मरणीय झुंज ३ तास ५३ मिनिटे चालली होती व ती बोर्गने १-६, ७-५, ६-३, ६-७ व ८-६ अशी जिंकली.

आगाशे, क. म.