हवाई खेळ व शर्यती : अंतराळातील क्रीडाप्रकार. हवेत तरंगण्याच्या हौसेलाच स्पर्धात्मक वळण लागले आणि हवाई खेळ व शर्यतींनी क्रीडाक्षेत्राला एक नवा चेहरा दिला. ग्लायडर व ग्लायडिंग, हवाई शर्यती, हवाई कसरती, बलून उड्डाणे, पॅरशूट (हवाई छत्री) इ. क्रीडा-प्रकारांतून याचा प्रत्यय येतो.

 

ग्लायडर व ग्लायडिंग : अमेरिकेमध्ये सॅम्युएल लँग्ली, राइट बंधू आदींनी आकाशावरोहण-आकाशरोहण (ग्लायडिंग-सोअरिंग) चे प्रयोग व ग्लायडरच्या बांधणीचे प्रयत्न सुरू केले. ग्लायडर (आकाशयान) म्हणजे एंजिन नसलेले विमान, तर ग्लायडिंग म्हणजे ग्लायडर अथवा सेलप्लेन यांतून आकाशात केलेले भ्रमण. १९२२ मध्ये पहिले सेलप्लेन नावाचे ग्लायडर बांधण्यात आले. १९२९ पर्यंत ग्लायडिंग-सोअरिंगचा खेळ मर्यादित होता परंतु त्यानंतर मात्र वातावरणविज्ञान व ऊष्मागतिकी यांतील प्रगतीमुळे सर्वत्र तो प्रसृत झाला. या संदर्भात माक्स केगल, सिमोनोव्ह, रिचर्ड जॉन्सन, चार्ल्स ॲटगर, लॉ रेन्स एडगर वगैरे क्रीडा-पटूंचे पराक्रम नोंदविले गेले आहेत. ग्लायडर चालकाच्या विशिष्ट पोशाखा-पासून ते त्याच्या आणि वाहनाच्या सुरक्षेपर्यंत लागणारी आवश्यक तीसर्व उपकरणे विमानांप्रमाणेच ग्लायडरमध्येही उपलब्ध असतात. त्यातही विशेषेकरून सुकाणू , एक जादा राखीव पॅरशूट, नकाशे, होकायंत्रे,वाहनाचा वेग, जमिनीपासूनची उंची, खाद्यपेये, दुर्बिणी वगैरे अनेक उपकरणे असतात आणि ती सर्व उड्डाणापूर्वीच विशिष्ट तांत्रिक अधि-काऱ्यांकडून तपासून घेतली जातात. अशा प्रकारच्या सर्व तांत्रिक गोष्टीसर्व हवाई वाहनांसाठी सारख्याच असतात. तसेच आकाशातील हालचालींवर कायद्यांनुसार आणि नियमांनुसार असणारी सर्व बंधनेही सर्वांना सारखीच सक्तीची असतात. ग्लायडर्सच्या अनेक देशांतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा-शर्यती नियमितपणे होत असतात. [→ ग्लायडर व ग्लायडिंग].

 

हवाई शर्यती (एअर रेसिंग) : हवाई शर्यतींच्या क्षेत्रात ‘फॉर्म्युला हवाई शर्यतीङ्ख सर्वाधिक लोकप्रिय आहेत. किंबहुना या शर्यतींची स्पर्धात्मक संकल्पना आणि त्यांचे व्यवस्थापन प्रातिनिधिक मानावे लागेल. हवाई शर्यतीतील विमाने अगोदर ठरवून दिलेल्या मार्गावरून भ्रमण करतात किंवा हा मार्ग सोडून क्रॉस कंट्री जाऊन खंडांच्या सीमा ओलांडतात. रिम्स (फ्रान्स) येथे पहिली आंतरराष्ट्रीय परिषद या संदर्भात झाली व नंतर शर्यतीस १९०९ मध्ये सुरुवात झाली. या शर्यतींमुळे विमानांच्या अभि-कल्पात (डिझाइन) सुधारणा झाल्या. पुढे १९२०–३० च्या दशकात हवाई शर्यतींची लोकप्रियता वाढली आणि विमानांच्या निर्मात्यांनी त्यास उत्तेजन दिले. गती आणि लांबचा पल्ला यांत अनेक पराक्रमांची नोंद झाली. नामांकित पदके मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली. या पदकांपैकी स्नायडर (फ्रान्स), द किंग्ज कप (इंग्लंड), पुलित्झर, टॉमसन व वेंडिक्स (अमेरिका) ही पदके ख्यातनाम होती मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर विमानांच्या किमतीत अवाजवी वाढ झाली, जेट प्रकारची विमाने वापरात आली आणि उत्तमोत्तम विमाने लष्कराच्या अखत्यारित गेल्यामुळे विमानांच्या शर्यतींत घट झाली.

 

ॲथलेटिक्समधील धावण्याच्या ट्रॅकवरील शर्यतींच्या धर्तीवर विमानां-च्याही शर्यती घेतल्या जातात. ट्रॅकची एकूण रचनाही ॲथलेटिक ट्रॅकप्रमाणे असते. फरक असतो तो अंतराचा. विमानशर्यतीच्या ट्रॅकमधील समोरा-समोरील सरळ मार्ग प्रत्येकी १.६ किमी.चे, तर दोन अर्धवर्तुळाकार मार्ग प्रत्येकी ०.८ किमी.चे असा एकूण ४.८ किमी. अंतराचा ट्रॅक असतो. त्याला फेऱ्या मारून विविध अंतराच्या शर्यती घेतल्या जातात. अर्थात, शर्यतींचा प्रारंभ आणि शेवट एकाच ठिकाणाहून होतो. ट्रॅकच्या अर्ध-वर्तुळाकार दोन्ही बाजूंच्या मार्गावर ९ मी.च्या अंतराने प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा मनोरे उभारलेले (प्रत्येकी ९ मी. उंचीचे) असतात. ‘स्पर्धक विमाने’ त्या मनोऱ्यांच्या बाहेरून वळण घेतात. विमान चालकाला पुढील किमान दोन मनोरे स्पष्टपणे दिसावेत अशी ती रचना असते. तसेच ते मनोरे एकाआड एक अशा दोन रंगांच्या वर-खाली सारख्या आकाराच्या पट्ट्यांनी रंगविलेले असतात. ते अधिक स्पष्ट दिसावेत हा त्यामागचा हेतू असतो.

 

अखेरीला विमानाच्या शर्यतीसुद्धा खेळांच्या चढाओढीतलाच एक भाग आहे. या जाणिवेतून कुठलाही धोका येणार नाही अशीच विमानांची निर्मिती असते. तसेच स्पर्धा-प्रवेश पात्रतेचे निकषही कडक आणि गुंतागुंतीचे असतात. मुख्यतः विमान चालकाच्या पूर्वानुभवाचा विचार त्यात होतो. विशेष म्हणजे चालकाच्या विमानाचीही चाचणी घेऊन प्रवेश पात्रता ठरविली जाते. त्याबरोबर स्वतः स्पर्धक-चालक, त्याचे प्रतिस्पर्धी आणि विमान यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते.

 

शर्यतीत एका वेळी आठ विमानांचा ताफा असतो. ती धावपट्टीवर एकामागे एक उभी राहतात आणि दर ३० सेकंदाला एक याप्रमाणे ती हवेत उड्डाण करतात. शर्यतीत विमान जमिनीपासून किमान ७.५ मी. उंचीवर, तर कमाल १५० मी. उंचीपेक्षा कमी उंचीवर असावे लागते. आंतरराष्ट्रीय शर्यतींसाठी पंचांची एक समिती आहे. त्यात एक सरपंच, तर पाच ते सात अनुभवी वैमानिक पंचांचा समावेश असतो.

 

हवाई कसरती : (एअरोबॅटिक्स). या विमानस्पर्धा तुलनात्मकदृष्ट्या धोक्याच्या असतात, पण त्यात कौशल्य व कलात्मकता यांचे दर्शन होते. कारण शारीरिक कसरतीसारख्या विमानाच्या कसरती आणि कवायतीही असतात. विशेषतः सांघिक प्रकारात तर विमानांची साखळी बनवून विविध प्रकारचे ‘आकार’ दाखविता येतात. विमानांची नागमोडी अगर वर्तुळाकार भ्रमणे चित्तथरारक असतात.

 

सर्वसाधारणतः अशा कसरतींसाठी छोट्या एंजिनाच्या विमानाचा वापर केला जातो पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अधिक क्षमतेची विमाने उपयुक्त ठरतात.

 

स्पर्धा चालू असताना स्पर्धकाला विमान बदलता येते. यांत्रिक बिघाड झाल्यास स्पर्धकाला तीच फेरी पंचांच्या अनुमतीने पुन्हा करण्याची संधी दिली जाते. प्रत्येक स्पर्धकाला क्रीडाकौशल्य दाखविण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला जातो. सांघिक गटात महिलांचाही समावेश होऊ शकतो. स्पर्धेत विमानाचे भ्रमण १०० मी. उंचीपेक्षा अधिक, तर १,००० मी. उंचीच्या आत असावे लागते.

 

विमानाच्या स्पर्धेत वैमानिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि उपकरणे पुरविली जातात.

 

पहा : ग्लायडर व ग्लायडिंग वातयान (बलून उड्डाण ) हवाई छत्री.

जोगदेव, हेमंत

 


 

'गोइंग फॉर द गोल्ड' रेनो हवाई शर्यंत (१९९१). 'स्नायडर ट्रॉफी' साठी सहभागी द यू. एस्. नेव्ही संघ (१९२६).
   
प्रसिद्ध 'रेनो' हवाई शर्यंतीतील एक दृश्य (२०१४).
'द जेम्स गॉर्डन बेनेट' हवाई शर्यंतीचे एक दृश्य, शिकागो (१९१२). 'द रेड बुल' हवाई शर्यंत, सॅन डिएगो (२००७).