सेन, मिहिर : (१६ नोव्हेंबर १९३०–११ जून १९९७). इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू. पुरुलिया (प. बंगाल) येथे एका सधन, सुशिक्षित कुटुंबात जन्म. त्यांचे वडील कटक येथे डॉक्टर होते. मिहिर सेन हे कायद्याचे पदवीधर होते. व्यवसायाने ते वकील होते.

मिहिर सेन

इंग्लंडला कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी ते गेले असताना तेथील ⇨ इंग्लिश खाडी पोहून जाण्याची ईर्षा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यांमधील अटलांटिकचा भाग इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो. सेन यांनी अत्यंत कठीण अशी ही खाडी डोव्हर ते कॅलेपर्यंत १४ तास ४५ मिनिटे अशा विक्रमी वेळेत पोहून पार केली (२७ सप्टेंबर १९५८). ही खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय व आशियाई जलतरणपटू असा जागतिक लौकिक त्यांनी मिळवला. पुढे त्यांनी पाल्कच्या सामुद्रधुनीतील तलाईमनार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) ह्या ठिकाणांदरम्यानचे अंतर २५ तास ४४ मिनिटांत पोहून पार केले. ह्या सामुद्रधुनीत विषारी साप, मगरी, शार्क यांचा धोका असतानाही जलतरणातील नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला (६ एप्रिल १९६६). पुढे धोकादायक अशी जिब्राल्टर सामुद्रधुनी पोहून पार करणारे ते पहिले आशियाई जलतरणपटू ठरले (२४ ऑगस्ट १९६६). त्यानंतर त्यांनी दार्दानेल्स सामुद्रधुनी (१२ सप्टेंबर १९६६), बॉस्पोरस सामुद्रधुनी, रशियातील काळा समुद्र, इस्तंबूलमधील गोल्डन हॉर्नपर्यंतचे अंतर, पनामा कालवा इ. ठिकाणी जलतरण-क्रीडाप्रकारात भारताचे नाव उज्ज्वल केले. १९६६ या कॅलेंडर वर्षात एकूण पाच खंडांतील सात समुद्रांत पोहण्याच्या विश्वविक्रमाची नोंद सेन यांच्या नावावर आहे.

सेन यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये सु. ६०० किमी. अंतर पोहून पार केले. त्यांनी जलतरणात एकूण पाच जागतिक विक्रम प्रस्थापित केले. त्यांचे जलतरणकौशल्य व साहसी वृत्ती कित्येक भारतीय जलतरणपटूंसाठी प्रेरणादायी ठरली. बेला या स्कॉटलंडच्या युवतीशी ते विवाहबद्ध झाले.

सेन यांना भारत सरकारने पद्मश्री (१९५९) व पद्मभूषण (१९६७) हे किताब देऊन गौरविले. ‘इक्स्प्लोअरर्स क्लब ऑफ इंडिया’ या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.

मिठारी, सरोजकुमार