पतंग –  १: पतंग हवेत उडवणे हा एक आकर्षक व मनोरंजक क्रीडाप्रकार आहे व त्यासाठी विशिष्ट कौशल्य लागते. दोन पातळ कामट्यांना कागद चिकटवून पतंग तयार करतात. त्यांतील उभ्या कामटीला ‘तिड्डा’ तर आडव्या कमानीसारख्या कामटीला ‘कमान’ म्हणतात. पतंगाला सामान्यपणे खाली लांब शेपटी जोडतात. पतंग आकाशात उंच उडवता यावा, म्हणून त्याला लांब दोरा बांधलेला असतो. त्यास तिड्डा व कमानी यांच्याविरुद्ध बाजूस ‘किन्ना’ बांधतात. पतंग हे विविध आकारांचे व प्रकारांचे असून ते कागद, कापड वा प्लॅस्टिक यांपासून बनवितात.

प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ टरेन्टमचा आर्काईटस याने इ. स. पू. पाचव्या-चौथ्या शतकांत पतंगाचा शोध लावला असे मानले जात असले, तरी आशिया खंडात तो त्यापूर्वी अनेक वर्षे ज्ञात असावा, असे दिसते. एक चिनी सेनानी हान सिन याने इ. स. पू. २०६ मध्ये युद्धात पतंगाचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. कोरियन, चिनी, जपानी व मलायी लोकांचा पतंग हा राष्ट्रीय खेळ आहे. पतंगाशी काही धार्मिक समजुतीही निगडित आहेत. रात्री घरावर पतंग उडविले म्हणजे भुते दूर पळतात, असा समज होता.

पतंगांचे विविध प्रकार : (१) करकोचाच्या आकाराचा चिनी पतंग, (२) स्त्रीप्रतिमेचा अलंकृत चिनी पतंग, (३) ‘इका-बाटा’ : जपानी पतंगाचा नमूना, (४) पेटी-पतंग, (५) साध्या पतंगाची आकृती, (६) कोरियन पतंग, (७) ‘त्सुरू कामे’ : करकोचा व कासव यांच्या आकृत्यांनी युक्त जपानी पतंग, (८) सयामी पतंग.

विमानांचा शोध लागेपर्यंत पतंगाचा सैनिकी व इतर उपयुक्त कामांसाठीही उपयोग करीत असत. एका कोरियन सेनापतीने आपल्या सैनिकांना स्फूर्तिदायक इशारे देण्यासाठी दिवा जोडलेला  पतंग उडविला, अशी समजूत आहे. हेस्टिंग्जच्या लढाईत इशारे देण्याकरिता पतंग वापरण्यात आले. बोअर युद्धात टेहळणीसाठी आणि माणसांना वाहून नेण्याकरिता पतंगांचा उपयोग करण्यात आला होता. समुद्रात वाहून चाललेल्या तसेच बर्फात अडकलेल्या व्यक्तींना उचलून घेण्यासाठी पतंगाचा उपयोग केला जात असे. त्याचप्रमाणे उंचीवरून छायाचित्रे घेण्यासाठी पतंगांचा उपयोग करीत असत. पतंगाचा उपयोग करून केलेले छायाचित्रण (काइट फोटोग्राफी) हाही एक लोकप्रिय छंद ठरला आहे. बैंजामिन फ्रँक्‌लिन या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाने १७५२ साली पतंगाला बांधलेल्या किल्लीवर वादळी वीज आकर्षित करून त्याचा अभ्यास व प्रयोग केला होता. वातयानाचा (बलून) शोध लागण्यापूर्वी पतंगाच्या साहित्याने जास्तीत जास्त उंचीवरील वातावरणाचा अभ्यास करीत असत. १८९४ मध्ये कॅ. बेडन पोएल याने १०·९७ मी. उंचीचा पतंग तयार करून त्याच्या साहाय्याने एक मनुष्य हवेत ३०·४८ मी. उंच उचलून दाखविला. मार्कोनी यानेही आपल्या बिनतारी संदेशवाहकाचे प्रयोग करण्यासाठी मोठ्या पतंगांचा उपयोग केला होता. १९१० मध्ये माउंट वेदर वा येथे पियानोच्या तारेची दोरी करून, एकाला एक पतंग जोडीत ७,२६५ मी. (२३,८३५ फूट) या कमाल उंचीपर्यंत पतंग नेण्यात आला होता. नायगारा धबधब्याच्या टांगत्या पुलाची पहिली तार टाकण्यासाठीही प्रथम पतंगाचाच उपयोग केलेला होता. दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्यांच्या टेहेळणीच्या टप्प्यात वाढ व्हावी, म्हणून हेलिकॉप्टरसारख्या दिसणाऱ्या तीन पात्यांच्या पतंगांचा उपयोग नाझी करीत असल्याचे उल्लेख सापडतात. गोलंदाजांना विमानांवर नेम घेण्याचा सराव व्हावा, म्हणूनही अमेरिकेत पतंगाचा उपयोग करीत.

  

मो त्सू व कुंगशू-फान (चीन, इ. स. पू. सहावे-पाचवे शतक), लॉरेन्स हारग्रेव्ह (ऑस्ट्रेलिया, १८५०–१९१५), अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (अमेरिका, १८४७–१९२२), फ्लेचर बेडन-पोएल (इंग्लंड, १८६०–१९३७), फ्रान्सिस रोगॅलो व डोमिना जॅलबर्ट (अमेरिका) हे पतंगसंशोधनाविषयी प्रसिद्ध आहेत.

पतंगाचा खेळ अनेक शतकांपासून भारतीयांना परिचित आहे. हा खेळ चीनमधून भारतात आला, असे एक मत आहे. भारतात मोगलांच्या काळात पतंगाचा छंद विशेष जोपासला गेला. उत्तर भारतात हा खेळ विशेषत्वाने खेळला जातो. गुजरातमध्ये पतंगाचा खेळ सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. दिवाळीनंतर या खेळाचा हंगाम सुरू होतो आणि तो संक्रांतीनंतर संपतो. संक्रांतीचा दिवस फार महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रातही पतंगाचा खेळ मुलांमध्ये विशेष प्रिय आहे. चीनमध्ये नवव्या महिन्याचा नववा दिवस हा ‘पतंग दिन’ म्हणून पाळला जातो.

पतंगांचे विविध आकार आणि प्रकार दिसून येतात. पक्षी, माणसे, जहाजे, फुलपाखरे इ. विविध आकारांत पतंग तयार करतात. पेटी-पतंग (बॉक्स काइट) हा प्रकारही विशेष लोकप्रिय आहे. भारतीय पतंग सामान्यतः चौकोनी आकाराचे असतात. पतंगांचा आकार व किंमती यांवरून ‘पैचुडी’, ‘चापट’, ‘अद्धा’, ‘पोण्या’, ‘ताव्या’ इ. प्रकार केले जातात. चिनी पतंग सामान्यतः बदामाकृती असतात. चिनी पतंगांना कित्येकदा ‘ड्रॅगन’चा वैशिष्ट्यपूर्ण आकार दिला जातो. विविध प्रकारच्या पतंगांना शोभा आणण्यासाठी चित्रविचित्र रंग आणि वस्तू यांचे उपयोजन केले जाते. कित्येकदा पतंग एकाच रंगीत कागदाचा न बनविता अनेक रंगीत लहानलहान तुकड्यांचा बनवितात.


पतंगाच्या आकाराला योग्य अशा कामट्या व इतर आवरण वापरल्यास आणि जरूर त्या ठिकाणी दोरे बांधून समतोल साधल्यास पतंग योग्य रीतीने हवेत वरवर जातो व संथपणे तरंगतो इतकेच नव्हे, तर दोरी ज्याच्या हातात असेल त्याची पतंगावर संपूर्ण हुकमत राहू शकते. हा तोल साधला नाही किंवा पतंगाच्या कामट्या बारीक असल्या, तर पतंग एका बाजूला जाणे, खाली झेप घेणे, गरगर फिरू लागणे इ. दोष उद्‌भवतात. पतंग सहज फाटू नये, म्हणून कागदाच्या कडांत दुमडण्यापूर्वी दोरा घालण्यात येतो. पतंग उडवण्यासाठी जो दोरा वापरतात, तो पीळदार व बळकट असावा लागतो. या दोऱ्यावर काचेची पूड, खळ वगैरे पदार्थांचे लुकण लावून हा दोरा म्हणजे ‘मांजा’ तयार करतात. पतंग उंच उडवण्यामध्ये जशी मौज असते, तशीच पतंगांची लढाई लढवण्यातही. पतंगाची लढाई म्हणजे काटाकाटी करावयासाठी वाऱ्याची दिशा, वेग, आपल्या पतंगाची कुवत, मांजाची प्रत यांचा अंदाज घेऊन प्रतिपक्षाच्या पतंगाजवळ, वर किंवा खाली पतंग न्यावयासाठी कौशल्य लागते. पेच घेऊन दुसऱ्या पतंगावर मात करावयाची असल्यास पतंगावर स्वतःची संपूर्ण हुकमत असावी लागते. पेच चालू झाला, म्हणजे दोन्ही पतंगांचे मांजे एकमेकांवर घासू लागतात. पतंग सरसर ओढून अथवा ढिला सोडून प्रतिपक्षाचा पतंग कापता येतो. विरोधकाच्या पतंगाच्या वरून किंवा खालून आपला पतंग नेऊन हे काम साधता येते.

आ. २. पतंगावरील प्रेरणा

पतंगाचे आकारप्रकार वेगवेगळे असले, तरी शास्त्रीय दृष्ट्या पतंगाला वातोड्डाण यंत्र (वातापेक्षा वजनाने भारी असलेले) म्हणता येईल. विमान आणि ग्लायडरला लागू पडणारे वायुगतिकीय नियमच पतंगालाही लागू पडतात. आ. २ वरून याचे स्पष्टीकरण करता येईल. पतंगाच्या वातपर्णावर (एअरोफॉइल म्हणजे पतंगाचा कागद किंवा तत्सम पदार्थ) वातप्रवाहाचे व इतर प्रेरणांचे पुढीलप्रमाणे परिणाम होतात. उत्थापक प्रेरणेचा तोल पतंगभार आणि दोरीवरील रेट्याच्या अधोघटकामुळे समसमान होतो. कर्षणाचा तोल रेट्याच्या क्षैतिज घटकामुळे समसमान राखला जातो. पतंगाला खूप उंचीवर नेण्यासाठी उत्थापक व कर्षण यांचा गुणोत्तर परम ठेवावा लागतो. भारवाहक पतंगासाठी कर्षण व उत्थापक यांचा गुणोत्तर परम असतो. सामान्यतः पतंग सममित आकाराचे व दृढ सांगाड्याचे असतात. परंतु परम कार्यक्षमतेसाठी पतंग दृढ सांगाड्याचे बनवीत नाहीत. ते हवेच्या दाबाचा उपयोग करतात. हवाई छत्री किंवा नवीनच प्रचारात आलेल्या हस्ततरंगी (हँडग्लायडर) सारख्या पतंग-यंत्रणेत त्यांचे नियंत्रण लवचिक पोतांनी व शिडांच्या दोरखंडाने केले जाते. पतंग उंच उडविण्याच्या खेळासाठी दर तासाला १२·८७ किमी. ते ३२·१८ किमी. (८ ते २० मैल) वाऱ्याचा वेग चांगला. १२·८७ किमी. पेक्षा वेग कमी असेल, तर पतंग हवेत उंच नेणे कठीण पडते. वेग जास्त असेल, तर पतंगावर हुकमत ठेवणे कठीण होते. पतंगाचा मांजा ओलसर असेल, तर जास्त विद्युत् दाबाची वीज वाहून नेणाऱ्या तारांना तो चिकटून धक्का बसण्याचे किंवा अपघात होण्याचे भय असते. याच कारणामुळे पतंग उडविण्यासाठी तार वापरीत नाहीत. मांजा जरुरीप्रमाणे वापरता यावा म्हणून तो रीळावर गुंडाळतात. प्रत्यक्ष पतंग उडविताना ते रीळ आपल्या सवंगड्याच्या हातात दिल्यास खेळ सोयीस्कर रीतीने खेळता येतो.

अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी मुलामुलींचे पतंगांचे सामने भरवितात. सामन्यांसाठी शेपूट असलेल्या व शेपूट नसलेल्या पतंगांचे , पेटी-पतंगाचे आणि इतर पतंगांचे ०·६० मी. (३ फूट) लांब व त्यापेक्षा लांब असे गट पाडण्यात येतात. भारतात असे सामने विशेषेकरून भरविण्यात येत नसले, तरी पतंग उडविण्याचा व लढविण्याचा छंद अनेक लोक करतात.

संदर्भ : 1. Downer, Marion. Kites : How to Make and Fly Them, New York, 1959.

    2. Hart, Clive, Kites, New York, 1967.

गोखले, श्री. पु.